लोकमान्य टिळक

विवेक मराठी    31-Jul-2019
Total Views |

टिळकांना स्वराज्य हे असे सर्वांचे, सर्वांसाठी आणि सर्वांकडून हवे होते. अनेकांनी तेव्हा स्वराज्याला जो विरोधी सूरही आळवला होता त्याला हे उत्तर होते. त्यांना, स्वराज्य मिळाल्यास तुम्हाला कोण व्हायला आवडेल, पंतप्रधान की परराष्ट्रमंत्री, असा सवाल करण्यात आला होता तेव्हा त्यास त्यांनी शांतपणे उत्तर दिले की, आज जर स्वराज्य खरेच मिळाले तर मी फर्ग्युसनमध्ये दाखल होऊन माझा आवडीचा गणित विषय शिकवायला घेईन. 

 
लोकमान्य टिळकांनी स्वतंत्र भारत हा कसा असायला हवा ते आपल्या अनेक भाषणांमधून आणि अग्रलेखांमधून स्पष्ट केले होते. भारताचे औद्योगिक धोरण कसे असावे, शैक्षणिक धोरणाची दिशा कशी असावी, परराष्ट्र धोरणात कोणते प्रतिबिंब दिसावे, आर्थिक धोरणामध्ये कोणकोणते मुद्दे महत्त्वाचे ठरू शकतात, ते त्यांनी लखलखीत शब्दांमध्ये अनेकदा प्रकट केले होते. अनेक सभांमधूनही त्यांनी आपले यासंबंधीचे विचार स्पष्ट शब्दांत मांडले होते. 'आमचे प्राप्तव्य' या विषयावर वऱ्हाडात अकोला येथे 3 मे 1908 रोजी झालेल्या सभेत तर त्यांनी अनेक गोष्टींचा ऊहापोह केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी देशास स्वातंत्र्य मिळवून दिले ही त्यांच्या आयुष्यातील मुख्य गोष्ट होय. हे स्वातंत्र्य अर्धे हवे की पूर्ण, असा वाद ते घालत बसले नाहीत आणि ते पूर्णच मिळवले हे महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी त्या भाषणात स्पष्ट केले. ते अर्धेमुर्धे मिळवण्यात त्यांना यत्किंचितही स्वारस्य नव्हते. याच संदर्भात उदाहरण देताना ते म्हणाले की, नांगराचा बैल गाडीला जुंपला तर त्यास अधिक बरे वाटेल; पण हे त्याचे अंतिम साध्य नव्हे. सर्व देशावर सावट असून त्याखाली राहा म्हणणे म्हणजे देशाची वाढ खुंटविणे होय. काशीयात्रेची अडचण जवळच्या नदीवर स्नान करून भागवून घे, असे जर हिंदूस सांगितले तर तो ऐकणार नाही. मक्केच्या अलीकडील एखाद्या मशिदीत नमाज पढावयास सांगून मक्केचे पुण्य मिळव, असे मुस्लिमास सांगितले तर तोही त्यास नाकबूल होईल. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यदेवीच्या मंदिराकडे तोंड करून जाणाऱ्याला अर्धवट स्वातंत्र्यमंदिर अगदी अंतिम साध्य या नात्याने पसंत पडायचे नाही. राजकीय गोष्टीत अंतिम साध्य विशेष महत्त्वाचे आहे. आम्ही माणसे आहोत. स्वतंत्र राहण्याचा आमचा हक्क आहे. परमेश्वराची तशी इच्छा आहे. तत्त्वज्ञान्यांची मोठी इच्छा मोक्ष मिळवायचीच असते. ज्यांना ही इच्छा नसेल ते पशू होत. त्यांना गोठयात बांधले म्हणजे ते खूश असतात.

त्यांचे हे भाषण म्हणजे अगदी आजच्या परिस्थितीवरही उत्तम भाष्य आहे, असे म्हटले तरी चालेल. ते म्हणतात, ''हल्लीचा काळ मोठा कठीण आला आहे. कित्येक उन्मत्त, मदांध, बलाढय व विद्वान अधिकारी जुलूम करीत आहेत. आम्ही संपत्तीहीन झालो असून शेतकरी धान्य कमावतो त्याचा मोबदला त्याला मिळेनासा झाला आहे. मुसलमानांच्या राज्यातदेखील असे नव्हते. त्यांनी लूट केली तरी ती सातासमुद्रापार जात नव्हती. पाटलाचा पैसा लुटला तरी तो दुसऱ्या भावास मिळत असे. अलीकडे स्थिती तशी नाही; हा सध्याच्या राज्यपध्दतीचा दोष आहे. माझे व माझ्या भावाचे पैसे विलायतेला गठडीतून जात आहेत. सरकारचा रोष व संकटे सोसूनही सरकारला जागे करण्याचा आम्ही प्रयत्न करीत असता जर सरकार जागे झाले नाही तर तो दोष आमचा नाही. आम्हाला राजद्रोह करायचा नाही. विहिरीच्या काठावर निजलेल्या मनुष्यास 'अरे इथे निजू नको' असे म्हटले व त्याने जर तिकडे लक्ष दिले नाही, तर दोष कोणाचा? आत पडेल म्हणून आम्ही त्यास जागे केले याबद्दल झोपमोड झाली म्हणून जर तो आमच्यावर खटला करील तर त्याचे नशीब. या प्रयत्नात मोडता घालण्यासाठी नेमस्त लोक मध्ये येतात ही शरमेची गोष्ट आहे.'' (टिळकांनी हा उल्लेख केला याचे कारण संपूर्ण स्वराज्य मागायचे की साम्राज्याअंतर्गत ते खपवून घ्यायचे याविषयी नेमस्त घोळ घालत असत. नेमस्तांचा बहिष्कारासारख्या विचारांनाही नेहमी विरोधच असे. या नेमस्तांचे नेतृत्व नामदार गोखले यांच्याकडे होते.)

टिळकांनी या भाषणात बऱ्याच गोष्टींना स्पष्ट केले आहे. कोणताही विचार मांडताना त्यात कोठेही अस्पष्टता राहणार नाही, याची ते खबरदारी घेत असत. यानंतरच्याच काही अग्रलेखांमध्ये राजद्रोह असल्याचे इंग्रजांना वाटले. म्हणून दोनच महिन्यांनी त्यांना आणखी एका राजद्रोहाच्या खटल्याला सामोरे जावे लागले आणि त्यात त्यांना सहा वर्षांच्या काळया पाण्याच्या शिक्षेला तोंड द्यावे लागले. विशेष हे की, टिळकांच्या 'केसरी'त तेव्हा प्रसिध्द झालेल्या एकूण आठ लेखांना इंग्रज सरकारचा आक्षेप होता. 'देशाचे दुर्दैव' (12 मे 1908) हा अग्रलेख आणि त्याच अंकातील दोन स्फुट सूचना असे एकूण तीन लेख टिळकांच्या लेखणीतून उतरलेले होते. अन्य पाच लेख हे कृष्णाजी प्रभाकर ऊर्फ काकासाहेब खाडिलकर यांचे होते. 'केसरी'त प्रसिध्द झालेले हे लेखन आपले नाही, असे टिळकांनी न्यायालयास सांगितले असते तर इतिहास वेगळा झाला असता, पण त्यांनी तसे चुकूनसुध्दा म्हटले नाही.

मंडालेहून 17 जून 1914 रोजी पुण्यात परतल्यावर या पुढल्या काळात आपण काय करू इच्छितो ते 'केसरी'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्पष्ट केले होते. आपल्याला देशाबाहेर घालवण्यात आल्यानंतर आपली प्रकृती ढासळली, पण तरीही आपल्या आयुष्याची उर्वरित वर्षे आपल्याला देशकार्यातच घालवायची असल्याचे त्यांनी म्हटले होते. ईश्वरावर त्यांची नितांत श्रध्दा होती, पण त्यांनी त्या काळच्या अन्य सुशिक्षितांप्रमाणे इंग्रज हे देवदूत आहेत असे कधीच मानले नाही. इंग्रज हे या देशाची लूट करायलाच आलेले आहेत आणि आपल्याला ती नुसती थांबवायची आहे असे नाही तर त्यांना इथून गाशा गुंडाळायलाच भाग पाडायचे आहे, ही त्यांची जिद्द सहा वर्षांच्या कालखंडानंतर जराही कमी झालेली नव्हती. इंग्रजांशी वैर धरणारा नेता या नात्याने आपल्याला वारंवार तुरुंगात जावे लागले तरी चालेल, पण इंग्रज इथून गेलाच पाहिजे हे ब्रीद त्यांनी स्वीकारलेले होते. त्या व्रताच्या ध्येयपूर्तीसाठी त्यांनी आपल्या भाषेला जेवढे रौद्र स्वरूप देता येईल तेवढे दिले होते.

टिळक परतले तेव्हा काँग्रेसची अवस्था लोळागोळा झाली होती. त्यांच्या अनुपस्थितीत काँग्रेसचे नेतृत्व नेमस्तांच्या हाती होते. स्वराज्य विसरले जाऊन साम्राज्यांतर्गत स्वराज्य चालेल, म्हणण्याइतपत गाडी घसरलेली होती. त्यामुळे काँग्रेस पक्षाला उभारणी देण्याबरोबरच त्यांना देशाला जागे करायचे होते. त्यांनी ठिकठिकाणी सभा घेतल्या. अगदी लाहोरपासून कलकत्त्यापर्यंत आणि लखनौपासून मद्रासपर्यंत असे एकही ठिकाण नव्हते की, जिथे टिळकांचे विचार पोहोचले नाहीत. इतर ठिकाणी ते पोहोचवायला तेव्हाचा ब्रिटिशधार्जिणा 'टाइम्स' होताच. 1914 नंतरचा काळ हा टिळक-युगाचा होता, त्या युगपुरुषाचा होता. त्यांनी आपल्या असंख्य भाषणांमधून कोणताही मुद्दा हा भारतीय स्वातंत्र्याशी जोडून घेतला नाही असे कधी झालेले नाही. 'फिजी बेटावरील गुलामगिरी' या विषयावरही ते बोलले. या विषयावर 11 फेब्रुवारी 1917 रोजी मुंबईत शांतारामाच्या चाळीत भरलेल्या सभेत टिळकांनी आपण अशा संस्था निर्माण कराव्यात की एजंट लोकांस मजूरच मिळू नयेत, असे म्हटले. हे काम सरकारच्या विरुध्द नाही; तथापि कायद्याचा भंग झाल्याचा आरोप आल्यास तो मान्य करू व शिक्षा भोगू, असेही त्यांनी स्पष्ट केले. फिजी बेटावर भारतीयांना नेण्यात येते आणि गुलामगिरीत खितपत ठेवले जाते, अशा तक्रारी झाल्यामुळे ही सभा मुंबईत आयोजित करण्यात आली होती. पुरुष जास्त आणि महिला कमी संख्येने तिथे जातात आणि त्यामुळे तिथे स्त्रिया सुरक्षित राहात नाहीत हे योग्य नाही, हे आपण सरकारास कळवायला हवे आणि त्यास विरोधही करायला हवा. सरकारी हस्तक येथे उद्योगांसाठी मजूर गोळा करतात आणि त्यांना फिजीसारख्या देशात गुलामगिरी करायला पाठवून देतात, यास विरोध व्हायला हवा, हे त्यांनी स्पष्ट केले.

टिळकांचे चिरंजीव रामचंद्र यांनी लिहून ठेवलेल्या एका आठवणीमध्ये त्यांच्या सामाजिक दृष्टिकोनाविषयी वेगळीच माहिती दिली आहे. एकदा सिंहगडावर टिळकांनी आपल्या दोघा चिरंजीवांना बोलावून घेतले आणि त्यांच्या अभ्यासातल्या प्रगतीविषयी माहिती घेतली. तेव्हा त्यांनी आपल्या चिरंजीवांना सांगितले की, तुम्ही पाहिजे तो धंदा करा, तुम्ही जोडे तयार केलेत तरी मला वाईट वाटणार नाही; पण एक लक्षात ठेवा, की जोडे शिवले तर ते असे शिवा, की लोकांनी म्हटले पाहिजे, जोडे शिवावेत तर टिळकांनीच. जे काही कराल ते इतके उत्कृष्ट करा, की त्या धंद्यााविषयी कोणी विचार करू लागला तर तुमचेच नाव त्याच्या मनात पहिल्यांदा उभे राहिले पाहिजे. उदाहरणार्थ, जसे चहाची आठवण झाली की, लिप्टन हे नाव डोळयांसमोर उभे राहते, बिस्किटांची आठवण झाली की इंटले पामर हे नाव डोळयांसमोर उभे राहते. शारीरिक शक्तीची गोष्ट निघाली की पूर्वीचा भीमसेन सोडून दिला तरी आधुनिक सँडो अथवा राममूर्ती हे डोळयांसमोर उभे राहतात, तसे तुम्ही ज्या व्यवसायात पडाल त्याचे नाव निघाले की तुमचे नाव लोकांच्या मनश्चक्षूंसमोर उभे राहिले पाहिजे. भले तुम्ही चर्मकार झालात तरी त्याचे मला काही वाईट वाटणार नाही, हे टिळकांनी आपल्या मुलांना सांगितले होते आणि ते त्यांचे मत त्यांच्याच चिरंजीवांनी आपल्या पित्याच्या आठवणींमध्ये लिहिलेले आहे. थोडक्यात जे काही कराल ते उत्तमच असले पाहिजे, ही त्यांची शिकवण होती. स्वराज्य हे त्यांचे ध्येय होते आणि स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण ही त्यांची साधने होती. त्यांची ही चतु:सूत्री म्हणून ओळखली गेली. आपल्या सनदशीर चळवळीचा एक भाग म्हणून ते या चतु:सूत्रीकडे पाहात असत.

लोकमान्यांनी पुण्याच्या गणेशोत्सवात मंडईतील गणपतीपुढे केलेल्या भाषणात (31 ऑगस्ट 1906) तेव्हाच्या पोस्टमनांच्या संपाला पाठिंबा दिला होता. तेव्हा तो संप झाला, पण तो तेवढा यशस्वी झाला नाही. त्या वेळी बोलताना टिळकांनी संप करणे हा अधिकाराचाच भाग असल्याचे सांगितले होते आणि कोणत्याही परिस्थितीत संप करणे हा गुन्हा ठरत नसल्याचे प्रतिपादन केले होते. त्यांनी मुंबईत अनेकदा कामगारांपुढे भाषणे केली होती. अनेकांना कदाचित हे माहितीही नसेल की, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या अध्यक्षपदी लोकमान्य टिळकांचीच निवड करण्यात यायची होती, पण दुर्दैवाने त्यांचे दि. 1 ऑगस्ट 1920 रोजी निधन झाले. खुद्द टिळकांना झालेल्या सहा वर्षांच्या काळया पाण्याच्या शिक्षेनंतर मुंबईत गिरणी कामगारांनी सलग सहा दिवस संप केला होता. तो संपही इतिहासात नोंद ठेवून गेला. त्याबद्दल रशियन नेते कॉम्रेड लेनिन यांनी मुंबईतील कामगारांचे अभिनंदन केले होते.

महाराष्ट्रात त्या काळात इंग्रजांच्या सत्तेचे कौतुक करणाऱ्यांचीही कमतरता नव्हती. भलेभले पुढारी, संपादक आणि इंग्रजी पत्रकार (त्यात काही मराठीही आलेच) इंग्रजांच्या सत्तेला ओवाळण्यात अग्रभागी होते. त्यांची खिल्ली उडवताना टिळकांनी 1906 च्या गणेशोत्सवात बेळगावला सांगितले की, आम्हाला असे सांगण्यात येते की, इंग्रजी राज्यात सर्वत्र शांतता नांदत आहे. चोरांचा बंदोबस्त झाला आहे. पेंढाऱ्यांचा नायनाट झालेला आहे. आगगाडया, तारायंत्रे, पोस्ट ऑफिसे यांचे सुख सर्वांना सारखे मिळते आहे आणि काठीला सोने बांधून काशीपासून रामेश्वरपर्यंत निर्धास्तपणे जाण्यायेण्यास रुंद सडकही तयार झालेली आहे. या गोष्टी चांगल्या आहेत; पण देशात शांतता नांदत असता व व्यापारवृध्दीच्या साधनांची भरपूर वृध्दी देशात झालेली असता देशाची संपत्ती सालोसाल का कमी होत आहे, हा मुख्य विचार करण्याचा प्रश्न आहे. देश भिकारी होत चालला आहे हे कोणीही सांगू शकेल, पण विद्वानांमध्ये मात्र या संबंधाने मतभेद आहेत. जॉन मोर्ले (तेव्हाचे भारतमंत्री) म्हणतात की, मातीची भांडी जाऊन तांब्यापितळेची भांडी आली म्हणजे दारिद्रय हटले आहे. मातीची भांडी जाऊन धातूची भांडी वापरात आल्याने देश एकदम श्रीमंत कसा काय होऊ शकतो?

महाराष्ट्रात सहकार कुणी रुजवला याविषयी अनेक नावे घेतली जाऊ शकतात, पण ज्या एका व्यक्तीने सहकाराची या देशात पायाभरणी केली त्या व्यक्तीचे नाव लोकमान्य टिळक हे आहे. राज्यातल्या जनतेकडून प्रत्येकी एक पैसा एवढेच भागभांडवल घेऊन ज्याने पैसा फंड काच कारखाना उभारला त्या व्यक्तीला सहकाराचे जनक म्हटले पाहिजे. वेगवेगळया चाळींमधून हिंडून घरटी एक पैसा एवढीच रक्कम त्या कारखान्याच्या उद्दिष्टापोटी मागितली गेली. दोन वर्षांत मिळून 21 हजार रुपये तेव्हा जमले. त्यावरून त्यांनी हिशेबाची मांडणी केली आणि मुंबईला शांतारामाच्या चाळीत भरलेल्या सभेत त्या रकमेचा हिशेब लावून 13 लाख लोकांनी हा निधी दिल्याचे निदान केले. त्यावर कोटी करताना ते म्हणाले, ''तरी मी हिशेबातले बरेच आकडे सोडून दिले आहेत, नाही तर मला गुणाकार येत नाही, असे लोक म्हणतील. कोणी जास्त रक्कम दिल्याचे म्हटले तर पाच-सहा लाख लोकांनीच वर्गणी दिली असे म्हटले पाहिजे. मुंबईची लोकसंख्या (तेव्हा) दहा लाख आहे. म्हणजे एकटया मुंबईच्या लोकांनीही वर्गणी दिलेली नाही. मुंबईतील एखादा गिरणीचा मालक आपल्या गिरणीच्या वार्षिक उत्पन्नातून सहज वीस हजार रुपये देऊ शकेल; पण आम्हाला पैसा, पैसा गोळा केलेली वर्गणीच विशेषत: हवी आहे.''

या एक पैशाचे त्यांच्या लेखी काय होते महत्त्व? तर ते बरेच होते, कारण सामान्याला आपण या एका मोठया कारखान्याचे भागीदार असल्याबद्दलचे समाधान मिळणार आहे आणि आपल्या पैशाचा विनियोग कसा होत आहे हे जाणून घ्यायचाही अधिकार त्याला असल्याने आपण एक प्रकारे त्या कारखान्याचे मालक आहोत ही जाणीव त्याला होणार आहे, ही टिळकांची किमया जादूई सहकाराची होती. तीच गोष्ट त्यांनी होमरुल लीगविषयीही करून दाखवली. होमरुल (स्वराज्य संघ) या त्यांनीच स्थापन केलेल्या (या संघटनेची शताब्दी 2016 मध्ये होती, पण तिचा सर्वांनाच विसर पडला.) संघटनेसाठीही त्यांनी पावती पुस्तके छापून कार्यकर्त्यांमार्फत प्रत्येकी एक रुपयाच घेतला. त्या वेळी कलकत्त्यात काही उद्योगपतींनी त्यांना एका रात्रीत काही लाख रुपये देणगीदाखल द्यायचे कबूल केले, पण टिळकांनी त्यास नकार दिला. मला प्रत्येक सभासदाकडून केवळ एक रुपयाच अपेक्षित असताना मी काही लाख रुपये घेऊन काय करणार आहे, ही टिळकांची विचारसरणी होती. एक सभासद एक रुपयामध्ये माझ्या स्वराज्य संघाचा कार्यकर्ता बनणार आहे आणि हे त्याचे समाधान मोठे आहे. अशा पध्दतीने माणसे जोडून घेण्यात टिळकांना समाधान होते, कारण त्यातून मोठा जनसमूह उभा राहणार होता. हा समुदाय त्यांना ब्रिटिश सरकारच्या विरोधात वापरायचा होता. त्यांच्या या कृतीचे खुद्द महात्मा गांधींनीही कौतुक केले होते. टिळकांच्या निधनानंतर गांधींनीही जो टिळक पर्स फंड उभारला त्यासाठी त्यांनी हीच रीत वापरली आणि त्यातून आपल्या आदर्शाला आगळीवेगळी श्रध्दांजलीच वाहिली.

टिळकांच्या कार्याबद्दल कितीही लिहिले तरी ते कमीच पडणार आहे. लखनौमध्ये 1916 मध्ये काँग्रेसचे अधिवेशन सर्वार्थाने गाजले. त्या अधिवेशनातच टिळकांनी 'स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' अशी जगप्रसिध्द सिंहगर्जना केली. वास्तविक ती घोषणा इंग्रजीत होती, ती अशी - 'होमरुल इज माय बर्थराइट ऍंड आय शॅल हॅव इट'. त्या घोषणेचीही शताब्दी होऊन गेली. तिचाही विसर आपल्या जनतेला पडावा हे किती वाईट आहे. एखाददुसरा कार्यक्रम वगळता कोठेही त्या घोषणेचे स्मरण केले गेले नाही. लखनौमध्ये हिंदू-मुस्लीम ऐक्याचा घोष झालेला होता. त्यालाही शंभर वर्षे पूर्ण झाली, पण उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीच्या माहोलमध्ये त्याकडेही कोणाचे लक्ष गेले नाही. त्या वेळी टिळकांनी केलेले भाषण हे मर्मभेदक होते. त्यांनी ब्रिटिश सरकारलाच थेट आव्हान दिले होते. ते आपल्या भाषणात म्हणाले होते की, ''या करारामुळे मुसलमानांचे समाधान होऊन ते जर काँग्रेस पक्षात येत असतील तर त्यांचे कौतुक केले पाहिजे. या करारामुळे मुसलमानांचा हिंदुस्थानबाह्य ओढा कमी होणार असेल तर त्याचे उदार अंत:करणाने स्वागत करायचे नाही तर काय करायचे?'' लखनौ काँग्रेसला गांधीजी हजर होते आणि प्रतिनिधी निवडण्याच्या कामी त्यांनी मदतही केली होती, पण शेवटच्या घटकेला त्यांचेच नाव प्रतिनिधींच्या यादीतून गळाले. तेव्हा टिळकांनी मध्यस्थी केली. त्यांनी आग्रह करून गांधीजींचे नाव प्रतिनिधींच्या यादीत घालायला भाग पाडले.

लखनौमध्ये हे अधिवेशन होते. त्याच लखनौमध्ये त्याच तारखांना मुस्लीम लीगचे आणि हिंदुमहासभेचे अधिवेशन झाले. या दोन्ही अधिवेशनांचीही दखल 'केसरी'च्या त्या अंकामध्ये घेतलेली आहे. ते स्वत: काँग्रेसव्यतिरिक्त या दोन्ही अधिवेशनांना हजर राहिले होते. हिंदुमहासभेच्या अधिवेशनात तर त्यांच्याच निषेधाचा ठराव संमत करण्यात आला होता. त्याचीही दखल 'केसरी'च्या या अंकाने घेतलेली आहे. या संपूर्ण अंकावर लोकमान्य टिळकांची पूर्ण छाप आहे. संपादक कसा असावा, हे या अंकावरून आपल्याला जाणवते. एवढेच नव्हे तर त्यापुढला 9 जानेवारीच्या अंकावरही लखनौ अधिवेशनाचीच छाया आहे. या अंकामध्ये जो अग्रलेख आहे तोही मागल्या अंकावरून पुढे चालू आहे, असे म्हटले तरी चालेल. त्या अंकात मागल्या अंकात ज्यांची भाषणे जाऊ शकली नाहीत किंवा मागे राहिली त्यांची भाषणे तसेच 'हिंदुस्थानात धोका आहे, सांभाळा! अर्थात सिडेनहॅमसाहेबांचा पोटशूळ' हा लखनौनंतर सिडेनहॅमसाहेबाने व्यक्त केलेल्या मतावरला अग्रलेख ही पुन्हा त्या अंकाची वैशिष्टये सांगता येतील. (हा अग्रलेख न. चिं. केळकरांचा होता) हा सर्व वृत्तांत आणि प्रसिध्द करण्यात आलेला एकूण एक मजकूर अभ्यासकांसाठी अतिशय उपयुक्त आहे.

'स्वराज्य हा माझा जन्मसिध्द अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच' हे वाक्य टिळकांनी नेमके कधी उच्चारले याविषयी अनेक प्रवाद आहेत. त्यांनी ते अहमदनगर, बेळगाव, अकोला, सातारा, अलाहाबाद, कानपूर, कलकत्ता आदी ठिकाणी उच्चारल्याचे सांगितले जाते, प्रत्यक्षात त्यांनी स्वराज्याची मोहीम हाती घेतल्यापासून आणि होमरुल संघटनेची (स्वराज्य संघ) स्थापना केल्यापासून स्वराज्याविषयीचा आवाज वाढवत नेला, पण प्रत्यक्षात त्यांनी ही घोषणा लखनौ काँग्रेसमध्ये केली. या घोषणेची तारीख आहे 29 डिसेंबर 1916. स्वामी श्रध्दानंद हे आर्य समाजाचे एक थोर नेते. त्यांनी या घटनेचे आजच्या भाषेत थेट वृत्तांकन केले आहे. स्वामी श्रध्दानंद हे काही लेचेपेचे नेते नव्हते. हरिद्वारमध्ये त्यांनी गुरुकुलाची स्थापना केली होती. लोकमान्यांच्या निधनानंतर त्यांनी एक लेख लिहिला होता, त्यात त्यांनी लखनौ काँग्रेसपूर्वी लोकमान्यांची दोन वेळा गाठ पडली होती आणि तिसऱ्यांदा आपण त्यांना लखनौ काँग्रेसच्या काळात भेटलो, असे म्हटले आहे. आपल्या या लेखात त्यांनी लखनौमध्ये लोकमान्यांचे न भूतो स्वागत झाल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी या लेखात लोकमान्य व्यासपीठावर आले आणि टाळयांचा जो गजर सुरू झाला तो थांबेच ना, असे म्हटले आहे. मुस्लिमांबरोबरचा लखनौ करार हा त्या टाळयांबरोबर आकाशाशी स्पर्धा करत होता. स्वामी श्रध्दानंद म्हणतात, ''लोकमान्य व्यासपीठावर आले आणि त्यांनी नेहमीप्रमाणे सभागृहावर एक कटाक्ष टाकला. टाळया वाजतच राहिल्या. साधे धोतर, त्यावर साधा सदरा आणि पायात मराठा पध्दतीचे जोडे असा त्यांचा वेश होता. दोन्ही हात वर करून त्यांनी काँग्रेस प्रतिनिधींना नमस्कार केला. टाळयांचा गजर थांबेपर्यंत ते थांबले. ते एकेक शब्द तोलूनमापून बोलू लागले. साधी वाक्ये ते उच्चारू लागले. त्यासरशी श्रोते कान सरसावून त्यांना ऐकू लागले. त्यांचा आवाज चढला आणि ते उच्चारते झाले, 'आम्हाला ब्रिटिश सांगतात, तुम्ही आर्यांचे वंशज आहात, तुम्ही काही या भूमीचे खरे मालक नाही आहात. आम्ही आर्यांनी येथल्या मूळ वंशाच्या लोकांकडून हा देश घेतला. त्यानंतर मुस्लिमांनी या देशावर आक्रमण करून तो आमच्याकडून काबीज केला. त्यामुळे इंग्लिश राज्यकर्ते हे या अनार्यांच्या भूमीचे पालक आहेत. ठीक आहे, मी त्यांचा हा युक्तिवाद मान्य करायला तयार आहे, पण मग जर ते या भूमीचे सध्याचे रक्षणकर्ते आहेत, तर त्यांनी ही भूमी आता सोडून ती भिल्ल, गोंड, आदिवासी अशा दलित आणि आदि द्रविड आदींच्या ताब्यात परत द्यावी आणि मुख्य म्हणजे येथून तातडीने चालते व्हावे. या भूमीचे जे मूळ मालक आहेत, त्यांची सेवा करायलाही आम्ही आनंदाने तयार आहोत.' लोकमान्यांनी ही घोषणा करताच सभागृहात प्रचंड जल्लोष झाला, टाळया तर एकसारख्या वाजतच राहिल्या. लोकमान्यांनी इंग्रजांच्या मर्मावरच घाव घातल्याचा हा आनंद होता. टाळया कमी होण्याची काहीशी वाट पाहून त्याच टिपेला गेलेल्या आवाजात लोकमान्यांनी म्हटले की, 'होमरुल (स्वराज्य) इज माय बर्थराइट ऍंड आय शॅल हॅव इट'. सर्व सभागृह प्रचंड आवाजाने दुमदुमून गेले, एक क्षण तर असा निर्माण झाला की या कडकडाटाने मांडव कोसळतो की काय अशी स्थिती उद्भवली.''

टिळकांना स्वराज्य हे असे सर्वांचे, सर्वांसाठी आणि सर्वांकडून हवे होते. अनेकांनी तेव्हा स्वराज्याला जो विरोधी सूरही आळवला होता त्याला हे उत्तर होते. त्यांना, स्वराज्य मिळाल्यास तुम्हाला कोण व्हायला आवडेल, पंतप्रधान की परराष्ट्रमंत्री, असा सवाल करण्यात आला होता तेव्हा त्यास त्यांनी शांतपणे उत्तर दिले की, आज जर स्वराज्य खरेच मिळाले तर मी फर्ग्युसनमध्ये दाखल होऊन माझा आवडीचा गणित विषय शिकवायला घेईन. त्यांच्या या धाडसाला दाद द्यावी तेवढी थोडीच आहे. टिळकांना समर्थ भारत हा असा अपेक्षित होता आणि सामर्थ्य आहे चळवळीचे हे दाखवून द्यायचे होते. टिळकांनी 1918-19 या वर्षभरात इंग्लंडमध्ये जाऊन इंग्रजांना केलेला विरोध आणि त्यासाठी त्यांनी मजूर नेत्यांसमवेत घेतलेल्या बैठका या महत्त्वपूर्ण होत्या. देशाचे स्वातंत्र्य आताच हवे, कारण इंग्रज सरकार अडचणींमध्ये आहे, ते महायुध्दाने पिचलेले आहे, हे ओळखूनच त्यांनी ठिकठिकाणी सभा घेतल्या. व्हॅलेन्टाइन चिरोल या एका सामान्य पत्रकारावर खटला भरण्याच्या निमित्ताने ते इंग्लंडमध्ये गेले. त्या खटल्यात त्यांना अपयश आले तरी आपले मूळ ध्येय त्यांनी बाजूला ठेवलेले नव्हते; किंबहुना खटला हे एक निमित्त होते इंग्लंडला जाऊन स्वातंत्र्याची मशाल हाती घेण्याचे. ती त्यांनी घेतली आणि स्वराज्याची मोहीम अधिक तीव्र केली. ते तिथे ब्रिटिश मजूर पक्षाच्या नेत्यांना भेटले. त्यांनी कामगार संघटनांच्या नेत्यांच्याही भेटीगाठी घेतल्या. जॉर्ज लॅन्सबरी, ऑर्थर हेन्डरसन, कनल जोसेफ वेगवूड, रॅम्से मॅक्डोनाल्ड आदी नेत्यांना ते जाऊन भेटले. त्यांच्या अनेक सभा या हाइड पार्कमध्ये पार पडल्या. त्यात मजूर पक्षाच्या तेव्हाच्या अनेक नेत्यांनी भागही घेतला होता. दादाभाई नौरोजी यांच्यानंतर त्या काळात इंग्लंडमध्ये भारतीय स्वातंत्र्यासाठी अतिशय परिश्रमपूर्वक काम करणारे या नात्याने केवळ लोकमान्य टिळक यांचेच नाव घ्यावे लागते. नामदार गोखले, विठ्ठलभाई पटेल, जोसेफ बाप्टिस्टा, बिपिनचंद्र पाल, सत्यमूर्ती यांनीही इंग्लंडमध्ये स्वातंत्र्यासाठी बरेच प्रयत्न केले, पण त्यांच्या या प्रयत्नांना दिवाणखानी चर्चेचे स्वरूप जास्त असे. प्रत्यक्षात आम्हाला काय हवे हे तिथे राहून जनसामान्यांना आपल्या बाजूने वळवायचे वाखाणण्याजोगे कौशल्य त्यांनी दाखवले. मजूर पक्ष आपल्या बाजूने आहे आणि तोच आपल्या स्वातंत्र्याला संमती देईल हे लक्षात घेऊन त्यांनी व्यक्तिगत पातळीवर त्या पक्षाला 2 हजार पौंडांची रक्कम देणगीदाखल दिली. (ही पावती केसरीच्या लोकमान्य संग्रहालयात आहे. त्या काळात मजूर पक्षाच्या संपूर्ण वार्षिक अधिवेशनाचा खर्च सहाशे पौंड होता.)

आजकालही अनेकांना राष्ट्र म्हणजे काय याविषयी संदेह असल्याचे पाहायला मिळते. टिळकांनी 10 डिसेंबर 1901 च्या 'केसरी'च्या अग्रलेखात राष्ट्राची व्याख्या केली आहे, ती अशी -

'राष्ट्र म्हणजे समुद्र आणि नद्या यांनी मर्यादित पृथ्वीचा भाग अशी जर कोणी व्याख्या करत असेल तर ती चुकीची आहे. पृथ्वीच्या काही चौरस तुकडयास राष्ट्र म्हणावयाचे तर सहारा वाळवंटासही राष्ट्र म्हटले पाहिजे किंवा उत्तर ध्रुवाजवळील बर्फाच्छादित प्रदेशासही राष्ट्र म्हणता येईल; परंतु राष्ट्र शब्दाचा अर्थ तसा नाही व नुसता लोकसमुदाय म्हणजेही राष्ट्र नव्हे, हेही लक्षात ठेविले पाहिजे. ज्या लोकसमुदायात एक प्रकारचा धार्मिक, सामाजिक किंवा राजकीय आपलेपणा भरलेला नाही, ज्याचे घटकावयव सामान्य बंधनांनी एकत्र बांधलेले नाहीत अथवा ज्यांच्या अंगात इतर समुदायाहून भिन्न अशा प्रकारचे वैशिष्टय वास करत नाही, ते लोक किंवा त्यांचा समुदाय कधीही राष्ट्र या संज्ञेस पात्र होत नाही.'

मला वाटते समर्थ भारताचे त्यांनी पाहिलेले स्वप्न आजच्या युगातही या एका व्याख्येत स्पष्ट व्हायला हरकत नाही.