''पुस्तके मनाच्या कुपीत अत्तरासारखी जपली पाहिजेत'' - निशिगंधा वाड

विवेक मराठी    05-Jul-2019
Total Views |

 ''आपण सर्व जण ग्लोबल नागरिक असलो, तरी डिजिटल डीटॉक्स हा खूप गरजेचा आहे. डिजिटल डीटॉक्सचा अर्थ एवढाच की या डिजिटल युगात तेवढंच वापरा, जितकं आपल्या आकांक्षांना गरजेचं आहे. पण पुस्तकाशी नातं तोडू नका. कारण पुस्तकांचं नातं जितकं घट्ट असेल, तितकं ते आपल्या बालपणाशी, घरपणाशी, आपल्या आई-वडिलांशी, आपल्या परंपरेशी, संस्कृतीशी जोडलेलं असेल. त्यामुळे वाचत राहा, आनंदी राहा. कारण सूर्योदय दूर शिखरावर बघत होत नाही, तर तो आपल्या मना मनात झालेला असतो. त्यामुळे पुस्तकं वाचलीच पाहिजेत आणि मनाच्या कुपीत अत्तरासारखी जपलीच पाहिजेत'' असे उद्गार प्रसिध्द अभिनेत्री निशिगंधा वाड यांनी पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात काढले.


सा. विवेक आणि राजारामशेठ विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राजारामशेठ विद्यालय, खिंडीपाडा येथे दि. 5 जुलै 2019 रोजी डॉ. विजया वाड लिखित 'भेट' या बाल कादंबरीचे प्रकाशन झाले, त्या वेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर अभिनेत्री निशिगंधा वाड, डॉ. विजया वाड, सिध्दिविनायक शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष रमेश खानविलकर, शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा खानविलकर, विवेकचे सह कार्यकारी संपादक रवींद्र गोळे आणि विवेक प्रकाशन विभाग प्रमुख शीतल खोत उपस्थित होत्या. रमेश खानविलकर यांच्या पन्नासाव्या वाढदिवसाचे आणि शाळेच्या रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आपल्या भाषणात निशिगंधा वाड पुढे म्हणाल्या, ''पुस्तकांना झालेला स्पर्श हा फक्त हाताला होत नसतो, तर तो मनाला होतो, बुध्दीला होतो, आयुष्याला होतो, भविष्याला होतो, जगण्याला होतो आणि यश-अपयश स्वीकारणाऱ्या आपल्या स्वभावाला होतो. आमची पिढी घरातील संस्कारांचं गाठोडं घेऊन बाहेर जायची, बाहेरचं जग आत्मसात करायची आणि आपली जागा बनवायची. पण आता बाहेरचं जग घरात इतकं शिरलंय की घरातली नातीदेखील आपण हरवत आहोत. त्यामुळे घराचं घरपण जपणं हे जसं पालकांचं कर्तव्य आहे, तसंच पाल्याचंदेखील आहे.

नात्यांना खरा स्पर्श झाला पाहिजे. ही नाती आपण जितकी जपू, तितके आपण माणूस म्हणून अधिक समृध्द होऊ. आपल्या आयुष्याच्या विद्यापीठात आपण यश-अपयश किती वाचायला शिकलो, हे महत्त्वाचं असतं. हे वाचण्याचं बळ आपल्याला मिळतं ते आपल्या घरातून आणि चांगल्या शिक्षणसंस्थेतून. आपणा सर्व विद्यार्थ्यांना खूप चांगली शिक्षणसंस्था मिळाल्याने आपण नशीबवान आहात. परमेश्वराने आपल्याला दिलेल्या आयुष्याचा आपण कसा उपयोग करायचा हे प्रत्येकाने अंतर्मुख होऊन ठरवायचं आहे,'' अशा आशयाची गौतम बुध्दांची एक सुंदर कथा सांगून त्यांनी भाषणाला पूर्णविराम दिला.

लेखिका डॉ. विजया वाड यांनी आई-वडिलांच्या भांडणाने मुलांना असुरक्षित वाटते, त्यामुळे मुलांच्या सुखाचा विचार पालकांनी केला पाहिजे, असे सांगून नेहमीप्रमाणे कुटुंबावर आधारित एक सुंदर गाणे उपस्थितांसोबत गाऊन सर्वांनाच आनंदाची 'भेट' दिली.

विवेकचे सह कार्यकारी संपादक रवींद्र गोळे यांनी विवेक प्रकाशनाचा आढावा घेत, आपल्यासारख्या ज्येष्ठ साहित्यिकांच्या सहकार्यामुळेच विवेकने 71राव्या वर्षात यशस्वी पदार्पण केल्याचे सांगितले. तर रमेश खानविलकर यांनी आपल्या आयुष्यातील पुस्तकांचे महत्त्व विशद करून प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाला पुस्तके सप्रेम भेट देण्याचे आवाहन केले. रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्ताने www.rsvsems.in या वेबसाईटचे उद्घाटनही निशिगंधा वाड आणि डॉ. विजया वाड यांच्या हस्ते करण्यात आले. आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.