फिटला संदेह अन्य तत्वी

विवेक मराठी    05-Jul-2019
Total Views |

 

 5 जुलै 1989 रोजी डॉ. हेडगेवार रुग्णालयाची सुरुवात झाली. सात डॉक्टरांनी हे सेवेचे व्रत स्वीकारले, आज या शृंखलेत जोडले गेलेल्यांची संख्या बाराशेच्या पुढे आहे. आरोग्य सेवेच्या प्रवाहातून अनेक आयाम जोडले गेले. आता इथल्या प्रत्येक आयामाचा विस्तार झाला आहे आणि त्या प्रत्येक विस्ताराचे विस्तारीकरण सुरू आहे.

एखादी संस्था आपल्या कारकिर्दीची 30 वर्षे पूर्ण करते, यात विशेष काय असू शकते? त्या संस्थेचा मागोवा घ्यायचा, त्याचे काही सिंहावलोकन करायचे तर किमान त्या संस्थेची 50 वर्षे पूर्ण होणे ही संकेत रेषा आहे. डॉ. हेडगेवार रुग्णालय त्या रेषेच्या आसपासही नाही. ज्या ठिकाणी बक्कळ पैसे आहेत, व्यवसाय म्हणून उच्चस्तरीय मानमरातब आहे, अशा मोहपाशात गुंतून मूळ ध्येय-उद्दिष्टाला हरताळ फासण्याचे प्रसंग आणि घटना वारंवार घडलेल्या आपण पाहिल्या आहेत. हा नियम नाही, पण याला अनेक संस्था अपवादही आहेत. औरंगाबादचे डॉ. हेडगेवार रुग्णालय हे त्या अपवादांपैकी एक आहे. रुग्णालय म्हणून त्यात काही विशेष आहे.

 सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील विवेकचे  फेसबुक पेज like करावे....

https://www.facebook.com/VivekSaptahik/

 आपल्या सर्व गरजा पूर्ण झाल्यानंतर काही शिल्लक राहिले, तरच समाज सेवा करण्याची तयारी अनेकांची असते. पण तीस वर्षांपूर्वी स्वत:चे वैद्यकीय शिक्षण सुरू असताना, ज्या समाजाने आपल्याला काही देऊ केले आहे, त्याचे ऋण फेडण्याची एक कल्पना कुणा एका वेडया विद्यार्थ्याच्या मनात येते. तो आपल्या सहाध्यायींसमोर ही कल्पना मांडतो आणि त्याला तत्काळ सकारात्मक प्रतिसाद मिळतो. ही कुठली काल्पनिक गोष्ट नाही, कारण त्या सकारात्मक प्रतिसादातून समाजस्वास्थ्यासाठी आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग करण्याचा संकल्प आकाराला येतो. पुढे समाजऋणातून मुक्त होण्याची योजना अमलात येते.

हा संकल्प गेली तीस वर्षे सातत्याने, अव्याहतपणे पूर्णत्वाचा प्रवास करतो आहे. या प्रवासात अनेक सहकारी लाभले. अनेक प्रवासी आपली लय आणि द्रुतगती सोडून या संकल्पपूर्तीच्या वाटेवरील पांथस्थ झाले. अनेकांना या वाटेवरून चालताना हे कार्य ईश्वरीय असल्याचा साक्षत्कार झाला. हे का झाले असावे? याचे उत्तर शोधताना लक्षात येते की या सगळयाला खरोखरच एक आध्यात्मिक अधिष्ठान आहे. जो संकल्प हाती घेतला आहे, त्याची पूर्तता व्हावी ही आंतरिक तळमळ आहे. थोडी अतिशयोक्ती वाटेल, पण ह्या तळमळीला उपमाच द्यायची झाली तर ती ज्ञानदेवांच्या विठ्ठलभेटीच्या आर्ततेशी देता येईल.

ज्ञानदेवांच्या ठायी उत्पन्न झालेली ही आर्तता, ही विलक्षण ओढ त्यांनी त्यांच्या विरहणींच्या स्वरूपात मांडलेली आहे. आपण एक सासुरवाशीण आहोत आणि आपल्या घराच्या परसदारी असलेल्या आंब्याच्या झाडावर येऊन बसलेला कावळा हा माझ्या माहेराचा, म्हणजे विठ्ठल माउलीचा संकेत घेऊन आलेला आहे आणि त्याने तो शुभशकुन पटकन सांगावा असे समजून केलेली आळवणी आहे.

पैल तो गे काउ कोकताहे

शकुन गे माये सांगताहे

डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या संकल्पसिध्दीच्या पहिल्या चरणात ती सर्व आळवणी जाणवते. ज्या समाजासाठी हा खेळ मांडला आहे, त्याच्यापर्यंत ही विशुध्दता पोहोचली पाहिजे, अन्यथा दिवसाकाठी उभ्या राहणाऱ्या चार रुग्णालयांसारखे हे पाचवे रुग्णालय अशी त्याची धारणा होऊ नये. ही ती ओढ आहे. त्यासाठी शहरातून आणि आसपासच्या तालुक्यांतून, ग्राामीण भागातून केलेला प्रवास असेल, त्या ठिकाणच्या जाणकार लोकांचा सल्ला आणि परिचय असेल, त्यांना आपल्या या धडपडीत येनकेनप्रकारे सम्मीलित करून घेणे असेल... असा तो पहिला टप्पा होता.

5 जुलै 1989 रोजी साधेसे दीपप्रज्वलन करून रुग्णालयाची सुरुवात केली, त्या वेळी बोलताना सर्वांसाठी ऋषितुल्य आणि ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ असलेल्या मा. भाऊसाहेब जहागीरदार यांनी फार मोठी आशा व्यक्त केली नाही. ते इतकेच म्हणाले, ''वैद्यकीय व्यवसायामध्ये रुग्णोपचारात जिथे जिथे म्हणून अभद्र अंधकार दाटून आला आहे, तो या दीपत्कारातून दूर करण्याचा अथक प्रयत्न करा आणि मनात असलेल्या संकल्पाला व्यक्तिसापेक्ष विकल्पतेतून बाधा येणार नाही, यासाठी सजग राहा.''

ऋषितुल्य मा. भाऊसाहेब जहागीरदार यांनी व्यक्त केलेली माफक अपेक्षा मनातील योजनेच्या हजारपट आव्हानात्मक होती आणि आजही आहे. या संकल्पाची सुरुवात दीपप्रज्वलनाच्या मंद आश्वासक प्रकाशात पवित्र गंगोत्रीसारखी झाली होती. पण इथपर्यंत येण्यासाठी केलेली धडपडसुध्दा अनेक दोलायमान मनोव्यापारचा पण निग्राही निश्चयाचा समग्रा वस्तुपाठ आहे. मनात आलेली कल्पना आणि ती प्रत्यक्षात साकार होताना झालेल्या चर्चा, बैठका, त्यातून आपल्याच मित्रमैत्रिणींचा त्या विषयाकडे पाहण्याचा दृष्टीकोन, यशापशाच्या कल्पना या सगळया मंथनातून कधी हाती हलाहल लागले, तर कधी अमरत्वाची आशा पल्लवित करणारे अमृत. मग त्यातून हाती गवसलेले हलाहल पचवून नीलकंठ होण्याचे भाग्य पदरी पाडून घ्यायचे की आशा पल्लवित करणाऱ्या अमृताला प्राप्त करण्यासाठी आपल्याच मनातील असुरशक्तींना परास्त करायचे? तो हा विलक्षण प्रवास आहे. या सर्व प्रवासात 'यशस्वी भव:'चा आश्वासक हात पाठीवर ठेवून ''मीही तुमच्या बरोबर चार पावले चालतो'' म्हणणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अधिकारी नाना नवले, रमेश पांडव, बलराम येरमे यांचेही योगदान महत्त्वाचे होते. संस्थेच्या उभरत्या काळात मा. प्रल्हादाजी अभ्यंकर या तत्कालीन संघअधिकाऱ्यांचा सहवास लाभला. एकात्म समाजनिर्मितीचा उगम व्यक्तिनिर्माणातून होतो. त्यामुळे स्वत:प्रति कठोर आणि इतरांप्रति क्षमाशील राहून ते साध्य करता येते, याचा वस्तुपाठ त्यांनी आपल्या कृतीतून लक्षात आणून दिला. आजही तो वस्तुपाठ परीसस्पर्शाची अनुभूती करून देतो, हे नक्की.

डॉ. सतीश कुलकर्णी, डॉ. नरेंद्र कुलकर्णी, डॉ. भारत देशमुख, डॉ. ज्योत्स्ना पाटवदकर, डॉ. मंजिरी व्यवहारे, डॉ. राजेंद्र क्षीरसागर आणि डॉ. अश्विनीकुमार तुपकरी या सात डॉक्टरांनी तो सेवेचा वसा स्वीकारला. ज्या ठिकाणी रुग्णसेवा प्रत्यक्षात साकारायची, त्याची चाचपणी सुरू झाली. पुन्हा एकदा ईश्वरी कृपेचा अनुभव आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन शहर संघचालक आणि औरंगाबाद शहरातील प्रतिष्ठित व्यावसायिक सुधीर उर्फ आबासाहेब देशपांडे यांनी अतिशय माफक भाडेतत्त्वावर त्यांची अगदी मोक्याची जागा उपलब्ध करून दिली आणि त्याचबरोबर, ''पहिले नेटाने रुग्णालय चालवा भाडे द्यायचे कसे याची चिंता करू नका'' असा प्रेमळ सल्लाही देऊन गेले.

डॉ. हेडगेवार रुग्णालयाची सुरुवात झाली. पुन्हा एकदा ती ज्ञानियाची आर्तता मनात डोकावू लागली. ज्या समाजरूपी पांडुरंगासाठी वैद्यकीय सेवेची कवाडे उघडी केली आहेत, तो 'भावतारकू कान्हा वेगी भेटणार का?' ही ती आस होती. पण त्यासाठी फार व्याकूळ व्हावे लागले नाही. एका बाजूला रुग्णसेवेचा श्रीगणेशा झाला आणि दुसऱ्या बाजूने जे रुग्ण असाहाय्य आहेत, जे ह्या सेवा स्वास्थालयात येऊ शकत नाही त्यांच्या दारी सेवा स्वास्थ्यालय घेऊन जाण्याचा विचार दृग्गोचर होत गेला आणि रुग्णालय सुरू होण्याच्या पुढील सहा महिन्यांत सेवा वस्तीतील वैद्यकीय केंद्राची सुरुवात झाली. ज्या रुग्णाला देवस्वरूप मानून पूजेचा घाट घातला, तो अवचित केंद्राच्या दारात येवून पोहोचला. सेवासरितेचा हा प्रवास पुन्हा एकदा ज्ञानदेवांच्या विरह व्याकूळतेशी सलगी करून जातो. अवचित परिमळ दरवळावा, त्या सुगंधाची झुळूक अंगणी पिंगा घालून जावी आणि तो गोपाळ इथे प्रत्यक्ष येतो आहे याची नि:शब्द ग्वाही द्यावी, असा तो चमत्कार होता.


काळाच्या ओघात सेवेच्या प्रवाहातून अनेक आयाम स्फुरत गेले. सेवा वस्तीच्या आरोग्य केंद्रातून तिथल्या समाजजीवनाची विविध अंगे जवळून पाहिली गेली. शहरी वस्त्याबरोबरच ग्राामीण भागातील निवडक क्षेत्रात पोहोचण्याचा प्रयोग केला गेला. वैद्यकीय उपचारांबरोबर काही समाजजाणिवा उत्पन्न करण्याची, काही जाणिवांना पुन्हा एकदा घासून पुसून लख्ख करण्याची आवश्यकता निर्माण झाली. यातून किशोरी विकास प्रकल्प, एड्स जनजागृती प्रकल्प सुरू झाले. वस्तीतल्या रिकाम्या डोक्यातून बाहेर पडणाऱ्यर विकृतीला विधायकतेची जोड दिली पाहिजे, यासाठी विचारविनिमय झाला. त्यातून संगणक प्रज्ञा, गवंडी प्रशिक्षण वर्ग सुरू झाले. ग्राामीण जीवनातील प्रश्न याहीपेक्षा वेगळे असतात. त्याचे कारण, अर्थकारण समजून घ्यावे लागते. त्याची तीव्रता लक्षात येताच शेती विकास, पाणलोट क्षेत्रविकास, पशू आरोग्य साथी योजना कार्यान्वित होत गेल्या.     

महिलांच्या हाताला कामाची सवय होतीच, पण त्यात कौशल्याचा अभाव होता. त्या हातांना अन्नपूर्णा प्रकल्प, ब्युटी पार्लर, शिवणकामाचे कौशल्य आत्मसात करायला लावले. दिसणाऱ्या प्रत्येक समस्येला संस्थेच्या विकासाची संधी समजून उत्तर शोधले गेले. ज्या समाजासाठी हे सगळे सुरू आहे, त्यात देवाचा अंश शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला. काम करणाऱ्या  व्यक्तींची पराकाष्ठा प्रामाणिक असल्याने 'देणाऱ्या' हातांचा आधार अधिकाधिक मजबूत होत गेला.

शारीरिक आरोग्याचे स्वप्न पाहणाऱ्या डोळयांना मानसिक, सामाजिक, आर्थिक आरोग्याचे प्रश्न सोडवण्याचे दायित्व स्वीकारावे लागले. सात डॉक्टर आणि कमी-अधिक सात कर्मचारी यांच्यापासून हे यज्ञकुंड प्रज्वलित केले होते. रुग्णालयाची गरज लक्षात येता मेडिसिन विभागाच्या प्रवेशाची संधी बाजूला ठेवून तत्काळ पॅथॅलॉजी विभागामध्ये प्रवेश घेणारे डॉ. महेंद्रसिंग चौहान, बाहेर अनेक संधी स्वागतोत्सुक असताना इथल्या डॉक्टरांच्या प्रामाणिक प्रयत्नात आपलाही वाटा असावा म्हणून या संस्थेत सहभागी होणाऱ्या डॉ. सीमा पांढरे, डॉ. रवी पाटवदकर, डॉ. विकास रत्नपारखे, आपल्या तळमळीची कदर इथे होऊ शकते याची खात्री पटल्यानंतर स्वत:चा व्यवसाय बाजूला ठेवून या रुग्णालयात मनाने समर्पित होणारे डॉ. रंजना आणि डॉ. गोविंद देशमुख हे दांपत्य, सेवा वस्तीतील रुग्णाच्या शारीरिक आजारबरोबर त्यांच्या अन्य समस्यांवर तोडगा शोधण्यासाठी डॉ. दिवाकर कुलकर्णी, डॉ. प्रसन्न पाटील, डॉ. सतीश घोटनकर यांनी त्याच सेवा वस्तीत आपला संसार मांडला. ग्राामीण भागातील वैद्यकीय केंद्र तर आज तिथल्या बहुमूल्याधिष्ठित परिवर्तनाचे केंद्र झाले आहे. डॉ. सुरेशराव रिसबूड, डॉ. प्रतिभा फाटक, डॉ. विशाल बेद्रे यांनी इथले परिवर्तनाचे चक्र गतिमान केले आहे. या आणि अशा अनेकांनी ह्या यज्ञकुंडात आपल्या सेवेची समिधा पडावी आणि हा यज्ञ असाच धगधगता राहावा, म्हणून बाहेरच्या जगातील व्यक्तिगत समृध्दीच्या वाटांकडे आनंदाने पाठ फिरवली. आज या शृंखलेत जोडले गेलेल्यांची संख्या बाराशेच्या पुढे आहे. या बाराशे कंठातून आणि कृतीतून त्या समाजपुरुषाला आळवणी केली जाते आहे. ह्या आळवणीला नम्रतेची झालर आहे, त्याच्यातही ज्ञानियाची आर्तता आहे. 'विठाई, किठाई माझे कृष्णाई कान्हाई येई वो' ही साद आहे आणि बरोबरच 'तुझे ध्यान लागो' अशी मागणीसुध्दा आहे.

सारे आयुष्य आखीवरेखीव चौकटीत जगून झाले की निवृत्तीच्या उंबरठयावर बसून भूतकाळाच्या डोहात निवांतपणाचे गळ टाकत आनंदाचे क्षण गवसतात का, याची वाट बघणारे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला हाच उंबरठा ओलांडून वर्तमानाच्या साक्षीने दु:खितांच्या आयुष्यात स्वहस्ते आनंदाची तुषार कारंजी उडवत आपलेही जीवन सार्थकी लावू पाहणारे सेवाव्रती डॉ. हेडगेवार रुग्णालयात अनुभवायला मिळतात. हा या रुग्णालयाचा अमूल्य ठेवा आहे. रुग्णालयातील त्यांच्या उपस्थितीत कुणाच्या घरची लग्ने होतात. कुठे लांबवर असलेल्या भावाच्या आठवणीत राखी पौर्णिमेचा हृद्य सोहळा पार पडतो, तर कुणी रुग्ण बरा होऊन घरी जाताना ''तुमच्यामुळे मी हा दिवस पाहू शकलो'' असे म्हणत त्या सेवाव्रतींच्या पायावर डोके ठेवतो. हे सारेच विलक्षण आहे. रुग्ण आणि रुग्णालय व्यवस्था यांच्यामधील स्नेह स्निग्धता टिकवून ठेवणारी ही अकृत्रिम रचना आहे.


डॉ. हेडगेवार रुग्णालय हे अशा अनेक रचनांचे आणि संरचनांचे आरंभस्थान आहे. कुणीतरी एक जण निर्णय घेणार आणि बाकी सगळे त्याप्रमाणे काम करणार, याला रुग्णालय प्रशासनाने छेद दिला. सामूहिक निर्णय प्रक्रिया, जो बदल पाहिजे आहे तो वरच्या स्तरावरून सुरू करून खालच्या स्तरावर अपेक्षित परिणाम साधायचा, व्यक्तिमाहात्म्य नाही, त्यामुळे जो ज्या पदावर विराजमान आहे त्या पदाचे मोठेपण मनापासून मान्य करायचे. मग त्या ठिकाणी बसलेला नव्या पिढीतला, अगदी आत्ता आत्ता आलेला असला तरीही. त्यामध्ये मी वरिष्ठ, तो कनिष्ठ हा भाव नाही. प्रशासकीय बदल सर्वसंमतीने, त्यात सर्वसमावेशकता, या सर्व बदलांचे कुठल्याही परिस्थितीत राजकियीकरण नसल्याने मतभेद झाले तरी मनभेदाला थारा नाही. गेली तीस वषर्े याच संरचनेत काम झालेले असल्याने पुढील तीनशे वर्षे तरी यातील विकास आणि वाढ एकमेकांच्या हातात हात घालून पुढे प्रवास करतील, याची खात्री आहे.     

या प्रवासाने आता गती घेतली आहे. इथल्या प्रत्येक आयामाचा विस्तार झाला आहे आणि त्या प्रत्येक विस्ताराचे विस्तारीकरण सुरू आहे.

इवलेसे रोप लावियले द्वारी,

तयाचा वेलू गेला गगना वेरी

अशी ही स्थिति आहे. औरंगाबादच्या कक्षा रुंदावून त्या नाशिक आणि आसामच्या शिबसागरपर्यंत पोहोचल्या आहेत.

या कक्षेच्या कवेत आणखी एक नवा पैलू विसावला आहे. येणाऱ्या पिढीला सेवा संगमाच्या घाटाचे विहंगम दर्शन व्हावे, त्याने हे पावित्र्य मनात साठवावे, तिथला सेवांकुर अलवारपणे हाती घ्यावा आणि आपापल्या ठिकाणी याची रुजवात करावी यासाठी डॉ. तुपकरी यांसारखा वरिष्ठ डॉक्टर आपले आयुर्मान विसरून स्वत:ला झोकून देतो आहे. आसाम प्रांतातील सुदूर गावात निम्नस्तरीय जीवन जगणाऱ्या गावकऱ्यांना शहरासारखे उत्कृष्ट वैद्यकीय उपचार मिळावे, म्हणून डॉ. अनंत पंढरे यांसारखा आजच्या पिढीचा प्रतिनिधी खऱ्या अर्थाने रक्ताचे पाणी करतो आहे.

अशी स्वत:ला गाडून घेणारी माणसेच भव्य दिव्यतेचा उत्कृष्ट मापदंड निर्माण करू शकतात. डॉ. हेडगेवार रुग्णालयाचा हाही एक तेजस्वी पैलू आहे.

माणूस जगतो कशासाठी? या प्रश्नाचे उत्तर अनेक जण अनेक पध्दतीने देतील. पण हे जग सुंदर करण्यासाठी माझे जीवन आहे हे कृतीतून सांगणारी माणसे पाहिली की 'हे जीवन त्यांना कळले हो, 'मी'पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो' या कवी बोरकरांच्या ओळी सहज ओठी येतात.

जगाच्या सुंदरतेचा ध्यास घेतलेल्या व्यक्तींच्या वाटेवरच उपेक्षांचा आणि अवहेलनांचा पाऊस पडतो. परंतु या पावसामुळेच या वाटेवर परिश्रमांच्या मातीतूनच समाजऋणमुक्तीचे अंकुर फुलतात. 'ते' वाट चालतच राहतात. या निरपेक्ष व्यक्तींच्या पावलांचे अनुसरण करणाऱ्यांना हे फुलून आलेले अंकुर मार्गदर्शक ठरतात.

पाण्याचे गढूळपण दूर करायचे असेल, तर त्यात तुरटी फिरवावी लागते. हे करताना तुरटीचे अस्तित्व कालांतराने संपून जाते, पण पाण्याचे नितळपण उजळून निघते. समाजातील नितळपण असेच उजळावयाचे असेल, तर आपणही आपल्या अस्तित्वाचा अहंकार बाजूला ठेवला पाहिजे, आपल्या संस्कारांना घेऊन समाजात मिसळले पाहिजे हाच या सेवा संकल्पाचा बोध आहे. हे रुग्णालय सुरू करणारे ते सात डॉक्टर आणि त्यांच्या बरोबरीने चालणारे सर्व जण यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाची मुद्रा तितक्याच निरलसपणे या गंगौघात प्रवाहित करून टाकली आहे.

हे सारे अनुभवलेला कुणी एक रुग्ण इथल्या डॉक्टरांना परमेश्वर म्हणून आपल्या हृदयात अधिष्ठित करतो आणि त्या भावना शब्दबध्द करतो -

 

माणसातील देव

मी पाहिलाय

नाही येत माझा देव

मला मदत करण्यास

गदा, चक्र घेऊन

मला दिसतो देव

तुमच्यासारख्या

आदरणीय व्यक्तींमधून

मी आणि माझे म्हणून

जगणारे स्वार्थी जग

चहूकडे पसरलेय

पण दुसऱ्याचे दु:ख पाहून

मदतीचा हात देणारा

एक देवमाणूस

मी पाहिलाय

 

वैद्यकीय सेवेतून समाजातील देवत्वाचा शोध घेत असताना आपण स्वत:च ते 'ईशतत्त्व' आल्याचा साक्षात्कार होतो. या ठिकाणी संकल्पातून सिध्दीकडे जाणारा एक टप्पा पूर्ण होतो. 'देव पाहावयासी गेलो, देव होवोनी ठेलो' असे काहीसे होऊन जाते अन इथे पुन्हा ज्ञानियाचा तो आर्त भाव प्रकट होतो.

 अरे अरे ज्ञाना, झालासी पावन,

तुझे तुझ ध्यान, कळो आले

तुझा तूची देव, तुझा तूची भाव,

फिटला संदेह, अन्य तत्त्वी

 त्यामुळेच हा सेवा संकल्प माझ्या दृष्टीने एक शास्त्र आहे. वैद्यकीय क्षेत्रात मी काम करणार असेन तर त्या वाटेवर चालताना आत्मसात करण्याचे शास्त्र. आपल्याकडे भारतीय संगीत शास्त्र आहे, तसे. यामध्ये 'मी, माझे' हे स्वर वर्ज्य आहेत. 'आम्ही, आमचे' हे संवादी स्वर आहेत. 'असू आम्ही सुखाने पत्थर पायातील' हा आरोह आहे आणि व्यक्तिगत सुखाची धडपड हा अवरोह आहे.

मी ह्या आर्त साधनेचा मूक आस्वादक आहे. या आरोग्याच्या शांतिपाठातील सूरसाधनेत माझाही स्वर लागावा, ही माझी तळमळ आहे. पण तरीही डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या 30व्या वर्धापन दिनी मी मात्र अगदी 'अमनस्क' आहे.

 

सुहास वैद्य

9922915254

suhaspvaidya@gmail.com

डॉ. हेडगेवार रुग्णालय

गारखेडा परिसर, औरंगाबाद