समाजमनाला जोडणारी निर्मल वारी

विवेक मराठी    06-Jul-2019
Total Views |

 गेली चार वर्षे 'निर्मल वारी'अंतर्गत आळंदी/ देहू ते पंढरपूर मार्गावर स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. सेवा सहयोग, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच अन्य संस्था या मोहिमेत सहभागी आहेत. गेल्या तीन-चार वर्षांत निर्मल वारीच्या विकासाचे विविध टप्पे दिसून येतात. त्याविषयी माहिती  सांगणारा लेख.

आषाढी वारी पालखी सोहळा हा आध्यात्मिक व सांस्कृतिक परंपरेचे लेणे आहे. प्रतिवर्षी पालखी सोहळयात सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. वारकऱ्यांना स्वच्छ पाणी, आरोग्य, पाणी, निवारा व शौचालये यासारख्या प्राथमिक गरजा पुरवणे ही जेवढी सरकारची जबाबदारी आहे, तेवढेच सरकारला सहकार्य करणे हेसुध्दा नागरिकांचे कर्तव्य आहे. या सामाजिक बांधिलकीतून निर्मल वारी अभियानासारख्या स्तुत्य उपक्रमाची सुरुवात झाली. या मोहिमेला बघता बघता चार वर्षे पूर्ण होत आहेत. वारीतील सार्वजनिक स्वच्छतेचे अवजड शिवधनुष्य निर्मल वारी अभियानाने उचलले. सेवा सहयोग या संस्थेकडे या मोहिमेची जबाबदारी देण्यात आली.

क्षेत्र प्रचारक अतुल लिमये, प्रांत प्रचारक यशोवर्धन उर्फ अण्णा वाळिंबे यांनी निर्मल वारीसाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. पुण्याचे माजी खा. प्रदीप रावत, देहू संस्थानाचे माजी अध्यक्ष शिवाजीराव मोरे, नरेंद्र वैशंपायन, प्रांत सहप्रमुख संदीप जाधव अशी कोअर टीम पाच वर्षे काम करत आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळयासाठी संतोष दाभाडे, धनंजय वाडेकर राजाभाऊ माने, सुनील देशपांडे ही प्रमुख मंडळी काम बघत आहेत, तर संत तुकाराम महाराज पालखी सोहळयासाठी माउली कुडले, किरण धमढेरे, पोपटराव शिंदे, प्रज्ञाकांत वांगीकर ही प्रमुख मंडळी काम बघत आहेत.

 या मोहिमेच्या संकल्पनेविषयी सांगताना निर्मल वारीचे नरेंद्र वैशंपायन म्हणाले, ''2013-14 साली पंढरीच्या वाळवंटातील उघडयावरील मलमूत्रविसर्जनमुळे काही सामाजिक संस्थांनी न्यायालयामध्ये केस दाखल केली होती. त्याचा परिपाक म्हणून न्यायालयाने वारी थांबवावी की त्यावर संख्येचे निर्बंध घालावेत, असा विचार केला होता. 2014-15 साली या सगळया कलहामुळे महाराष्ट्राच्या राज्यपालांना वारकऱ्यांनी आळंदीत दर्शनाला जाण्यापासून रोखले. याच पार्श्वभूमीवर सेवा सहयोग या संस्थेने या गोष्टींचा सखोल अभ्यास योग्य उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. दर वर्षी आषाढी एकादशीनिमित्त संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पंढरीत येत असतात. या पालख्यांत तीन ते साडेतीन लाख वारकरी सहभाग असतात. पालखी मार्गावर कुठेही स्वच्छतागृहाची सोय नसल्यामुळे वारकऱ्यांना उघडयावर मलमूत्रविसर्जन करण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे गावाजवळचा परिसर दूषित होत असतो व परिसरामध्ये विविध आजारांची लागत होत असते. हे टाळण्यासाठी सेवा सहयोग फाउंडेशन संस्थेने 2015 'निर्मल वारी'ची स्थापना केली. वारीमधील सहभागी वारकरी, त्यांची व्यवस्था करणारे ग्रामीण भागातील लोक, त्याचबरोबर असापासाच्या शाळा, बाजारपेठेचे ठिकाण याचा सारासार विचार करता सर्वत्र वापरता येईल आणि उघडयावर मलमूत्रविसर्जन होणार नाही, याचा विचार केला गेला.

 प्रातिनिधिक स्वरूपात लोणी व यवत गावांमध्ये त्याची रचना लावण्यात आली. वारीसाठी शौचालय पुरवणे, ते स्वच्छ ठेवणे, तेथे मुबलक वीज-पाण्याची सोय करणे, तसेच मैल्याची शास्त्रशुध्द पध्दतीने विल्हेवाट लावणे व लोकांना शौचालयाचा वापर करण्यास प्रवृत्त करणे हे निर्मल वारीचे प्रमुख उद्दिष्ट. सुरुवातीच्या दोन्ही वर्षी लोकसहभागातून फिरणारी शौचालये (पोर्टेबल टॉयलेट) ही संकल्पना वारकऱ्यांना आवडली. लोणी काळभोर आणि यवत अशा दोन गावांत प्रत्येकी 200 स्वच्छतागृहे उभी करण्यात आली. 2015 साली सुमारे 17000 लोकांनी ह्या स्वच्छतागृहांचा वापर केला व 34000 लीटर मलमूत्र जमा झाले. नंतर एक मोठा खड्डा करून त्यात हे जमा झालेले मलमूत्र गाडले गेले व नंतर तयार झालेले खत शेतांमध्ये वापरले गेले. गेल्या दोन वर्षांपासून पालखी गेल्यानंतर माशा, किडे यांची संख्या व रोगराई कमी झाली आहे. याच साली पंढरपुरात मोठया प्रमाणात पोर्टेबल टॉयलेट लावण्यात आले. या कामी सेवा सहयोग, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विविध संस्था आणि महाविद्यालयांचे सहकार्य मिळाले. पंढरपूर व वाळवंट स्वच्छ करण्यासाठी याची मोठी मदत मिळाली. अशा प्रकारे पहिल्याच वर्षी निर्मल वारीला यश मिळाले. निर्मल वारी उपक्रमात शौचालयांची व्यवस्था लावणे हा मुख्य घटक आहे, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे वारकऱ्यांना शौचालय वापरण्याचे आवाहन करणे हेही काम विशेषतः रात्री 11 ते सकाळी 7 या वेळेत करावे लागते. यासाठी अनेक जण आनंदाने सहभागी झाले. 2018पर्यंत या मोहिमेत वारकरी प्रबोधनासाठी 30000 स्वयंसेवकांनी सहभाग नोंदवला.

गेल्या चार वर्षांत निर्मल वारीच्या विकासाचे विविध टप्पे दिसून येतात. या वारीमुळे अनेक गावे हागदणरीमुक्त झाली. अनेक गावांनी यापासून प्रेरणा घेत स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली. पालखी सोहळयामध्ये देहू ते पंढरपूरदरम्यान संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे 18 मुक्काम आहेत, तर माउलींच्या पालखी सोहळयात 15 मुक्काम आहेत. गेल्या तीन वर्षांत या सर्व ठिकाणी शौचालये बसवण्यात आली. पहिल्या वर्षी सेवा सहयोग संस्थेच्या माध्यमातून हा प्रयोग राबवण्यात आला होता. 2016 साली राज्य सरकारने या उपक्रमाचा अभ्यास केला. प्रशासकीय स्तरावरील अडचणी दूर करत निर्मल वारी या योजनेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्मल वारी अभियानाला विशेष निधीची उपलब्धता करून दिली. सरकारच्या सहयोगामुळे निर्मल वारीच्या कामाला आणखी गती मिळाली. निर्मल वारीच्या टीमने 2016 साली पालखी मार्गावरील सर्व मुक्कामांचे सर्वेक्षण, तसेच तेथील स्थानिक टीम बांधणीचे काम जानेवारी 2016 ते 2016मध्ये केले होते. निर्मल वारी मोहीम मुक्कामांच्या सर्व ठिकाणी कशी राबवता येईल, यासाठी सेवा सहयोग संस्था व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सहा महिने नियोजन करत होते. वारीला पंधरा दिवस बाकी असताना सेवा सहयोगाच्या टीमने सरकारी अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेतले. समाजमाध्यमातूनही प्रबोधन करण्यात आले. मुक्कामांच्या सर्व ठिकाणी निर्मल वारी मोहीम कशी राबवता येईल, यासाठी सेवा सहयोग संस्था व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सहा महिने नियोजन करत होते. वारीनंतर होणारे आजार कसे नियंत्रित राहतील, हे सर्व मुक्कामाच्या ठिकाणी सेवा सहयोगच्या टीमने, तसेच संघाच्या स्वयंसेवकांनी लोकांपर्यंत पोहोचवले. पालखी पुढे जाता जाता मागे राहणारी घाण आणि अस्वच्छता कमी होत गेली. गावातील नागरिकांनी वारी गेल्यावर निर्मल वारीचे मुक्तकंठाने कौतुक केले. गावातील शाळा पंधरा-वीस दिवस बंद असायच्या. निर्मल वारीमुळे त्या दुसऱ्या दिवशी चालू झाल्या. गावात येणारे साथीचे रोग कमी झाले. काही ठिकाणी गाव सोडून जाणारे नागरिकसुध्दा गावातच राहू लागले. एवढा सकारात्मक बदल होऊ शकतो, याची लोकांनी कल्पनाच केली नव्हती.


2016च्या अनुभवावरून असे लक्षात आले की, निर्मल वारी अभियानासाठी सरकारचे अनेक विभाग काम करत आहेत. त्यातील एकाही विभागात निर्मल वारी अभियानाच्या पूर्ण कामाचा समाविष्ट होत नाहीत. त्यामुळे या कामाच्या निधीच्या नियोजनाची अडचण होत होती. यासाठी मुख्यमंत्र्यांनी आणि अर्थमंत्र्यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात दर वर्षी तरतूद केली. यामुळे राजाश्रयाच्या आणि लोकाश्रयाच्या जोरावर निर्मल वारीला पाठिंबा मिळत गेला. परिणामी 2015-16 साली जे प्रश्न अथवा विरोध होता, तोही मावळला. 2017मध्ये एक विशेष घटना घडली. ज्या वाळवंटात विष्ठा तुडवत माउलींच्या व तुकाराम महाराजांच्या पादुका चंद्रभागेत स्नानाला जात होत्या, तेथेच रांगोळी घालण्यात आली. पुण्यातील काही कलावंतांच्या मदतीने हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाचे लोकांनी कौतुक केले. यामुळे वाळवंट स्वच्छ राहिले, तर रांगोळीमुळे सुंदर दिसू लागले.

2018 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता सेवा ही मोहीम राबवली होते. यामध्ये एनएसएसच्या विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या कामांसाठी शंभर तास देण्याचे आवाहन करण्यात आले होते. सेवा सहयोग संस्थेने विद्यापीठाला आवाहन केले. शंभर तासांतील काही तास निर्मल वारीसाठी राखीव केल्यास वारी मार्गावारील महाविद्यालयांना स्वतःचे काहीतरी वेगळेपण दाखवता येईल, या उद्देशाने महाविद्यालयाचा सहभाग वाढला.

यंदा निर्मल वारीसाठी महाराष्ट्र सरकारने 5 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. स्वच्छतागृहांमध्ये वाढ करण्यात आली आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळयाबरोबर 700 फिरत्या शौचालयांची, तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळयाबरोबर 900 फिरत्या शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. वारीमध्ये प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या संयोजकांना विभागून दिल्या आहेत. यामध्ये प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी 1 क्लस्टर प्रमुख, मुक्कामाचा 1 प्रमुख, शौचालयासाठी पाणी, वीज, शोष खड्डे, नियोजनासाठी 1 प्रमुख, 1 लोकेशन प्रमुख, मुक्कामाच्या ठिकाणी प्रबोधन करण्यासाठी दोन्ही पालखी सोहळयांत प्रत्येकी 200-300 कार्यकर्ते स्वच्छतेबरोबर प्रबोधन करत असतात. मुक्कामाच्या ठिकाणी 1 ते दीड लाख लीटर मैला शोषखड्डयांत जमा केला जातो. त्यामध्ये दुर्गंधी येऊ नये म्हणून केमिकलची फवारणी केली जाते. पुढच्या वर्षी त्याचे खत होते व ते शेतकऱ्यांना दिले जाते. मुक्कामाच्या ठिकाणी दुर्गंधी येऊ नये म्हणून केमिकलची फवारणी केली जाते. हे कामसुध्दा इनोव्हेटिव्ह क्लीनिंग सोल्यूशन संस्थेच्या माध्यमातून केले जाते. या मोहिमेत सुमारे 30 ते 35 हजार महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

ह्या वर्षी सासवड दोन मुक्काम व जेजुरी अशा मुक्कामांच्या तीन ठिकाणी खूप वेगळा अनुभव आला. ''मी 2015पासून निर्मल वारीत सक्रियपणे सहभागी आहे. वारकऱ्यांना त्या वेळी स्वच्छतेविषयी प्रबोधन करावे लागत होते. शौचालयाचा वापर करा, असे सांगावे लागत असे. आता शौचालय दिसले की वारकरी त्याचा पुरेपूर वापर करताना दिसतात, इतका सकारात्मक बदल झाल्याचा दिसून येतो'' असे नरेंद्र वैशंपायन यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला महाराष्ट्रातील निर्मल वारीची साथ मिळाली आहे. निर्मल वारी उपक्रमाची प्रेरणा घेऊन, जेथे मोठया प्रमाणावर जनसमुदाय एकत्र येतोय व स्वच्छतेचे प्रश्न उद्भवतात तेथे अनेक ठिकाणी लोकसहभागातून निर्मल वारीसारखा उपक्रम राबवला जात आहे. एकूणच निर्मल वारी हा कौतुकाचा, अभ्यासाचा आणि कुतूहलाचा विषय बनलेला आहे. या मोहिमेने पर्यावरण रक्षणासाठी उचललेले पाउल आदर्शवत आहे. त्यामुळे ही निर्मल वारी हा समाजमनाला जोडणारा प्रकल्प आहे.