भक्तीचा राजमार्ग

विवेक मराठी    06-Jul-2019
Total Views |

***स्नेहा शिनखेडे***

 देहाचा पडदा दूर करून बघितले की सर्वांच्या अंतर्यामी ईश्वरच चैतन्यरूपात भरलेला आहे, हे संतांनी भक्तीची वाट निर्माण करून दाखवून दिले. श्रीरामायण आणि श्रीमद्भागवतामध्ये भक्ती नऊ प्रकारांनी करता येते हे सांगितले आहे. या लेखात भक्तीच्या या राजमार्गांचा आढावा घेणार आहोत.

ऐन थंडीच्या दिवसात बहराला येणारी आंबटचिंबट, गोड, तुरट बोरे सर्वांच्या खूप आवडीची असतात. किती छोटेसे फळ. म्हटले तर नगण्य. रानावनात सापडणारे. बोरीची झाड काटेरी. हे एवढेसे फळ भक्तीच्या राज्यात अजरामर करून ठेवले ते प्रेममूर्ती शबरीने. श्रीरामायणात अढळ स्थान मिळवणारी शबरी डोळयांसमोर येते ती बोराची टोपली घेऊनच. श्रीरामांनी तिची उष्टी बोरे आवडीने खाल्ली, कारण त्या बोरांमागे श्रीरामांना समर्पित असलेले तिचे तेजस्वी, भक्तिमय जीवन होते. श्रीरामांनी शबरीला नवविधा भक्ती सांगितली. भक्तीचे प्रकार सांगून झाल्यावर श्रीराम म्हणाले, ''या भक्तीचे सगुण साकार रूप शबरी तूच आहेस'' पं. किशोरजी व्यास म्हणतात, 'श्रीरामांनी गायिलेले हे जणू काही 'शबरी स्तोत्र' आहे. श्रीरामांना राज्याभिषेक झाल्यानंतर पंचपक्वानाचे ताट समोर आले की श्रीरामांना शबरीची गोड बोरे आठवायची, कारण त्यात श्रध्दा-भक्तीच्या अवीट अमृताची गोडी होती.

शांती, दया, क्षमा यांची मूर्ती असलेले संत एकनाथ महाराज काशीची कावड घेऊन रामेश्वरास चालेले होते. हरिनामात रंगून गेलेल्या नाथांनी वाळवंटात पाण्यावाचून तडफडणारे गाढव बघितले. नाथांनी तत्काळ कावडीतले पाणी त्याच्या मुखात घातले आणि म्हणाले, ''हाच माझा रामेश्वर.'' एका गाढवाला वेळेवर पाणी पाजण्याचे पुण्य लक्ष विप्रभोजनाहून जास्त आहे, हे भक्तांना दाखवून दिले. एरवी उपेक्षित आणि बुध्दिहीन असलेल्या गाढवाला भक्तीच्या साम्राज्यात नाथांनी अमर केले. पंढरपूरातील विठोबाला भक्त राका कुंभाराने भक्तीच्या बळावर एका साधारण मांजरीच्या पिलांना आगीपासून वाचवून जीवदान दिले. एवढेच नाही, तर त्याने मांजरीच्या पिल्लांसाठी स्वत:च्या संसारावर पाणी सोडले. मुंगीपासून माणसांपर्यंत सर्वांचा देह नश्वर आहे. देहाचा पडदा दूर करून बघितले की सर्वांच्या अंतर्यामी तोच चैतन्यरूपात भरलेला आहे, हे संतांनी भक्तीची वाट निर्माण करून दाखवून दिले. श्रीरामायण आणि श्रीमद्भागवतामध्ये भक्ती नऊ प्रकारांनी करता येते हे सांगितले आहे. 'नऊ' या संख्येचे महत्त्व श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रात वर्णिले आहे. नऊला एकाने भागल्यास नऊ येतात. नऊला दोनने गुणल्यास अठरा ही संख्या येते. एक आणि आठ यांची बेरीज नऊ येते. नऊला तीनने गुणल्यास सत्तावीस ही संख्या येते. सात आणि दोन नऊच. संपूर्ण पाढयामध्ये बेरीज नऊ येते. नऊ ही संख्या ब्रह्मतत्त्व सुचवते, असे विवरण श्रीपादांच्या चरित्रात केले आहे.

संत तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात, 'भक्तिसी शोधीत, गेले महाऋषी। धुंडिता ब्रह्मयासी सापडेना। भक्ती म्हणजे काय हात नाही पाय। कैचा बाप माय तिथे लागी॥' भक्ती मोठमोठया विद्वानांना, इतकेच नव्हे, तर ब्रह्मदेवालासुध्दा मिळाली नाही. भक्तीला ना हातपाय, ना आईबाप. परंतु तुकाराम महाराजांजवळ मात्र भक्ती नांदते, कारण त्यांची भक्ती ही कणखर हिऱ्यासारखी आहे. हिरा ऐरणीवर ठेवला आणि घणाला घाव घातला तरी हिरा अभंग राहतो. लोकांनी निंदेचे, उपेक्षेचे कितीही घणाघाती घाव घातले, तरी तुकोबांच्या अभंगभक्तीचा हिरा अभंगच राहणार. म्हणूनच इंद्रायणीच्या डोहातून महाराजांचे अभंग जसेच्या तसे वर आले. भक्तीमध्ये श्रध्दा, जिव्हाळा, प्रेम, आपुलकी यांचे सुरेख मिश्रण असते. निसर्गकन्या बहिणाबाई म्हणतात, 'ज्याच्यामधी नही भाव त्याले भक्ती म्हनू नाही। ज्याच्यामधी नही चेव त्याले शक्ती म्हनू नाही।' चेव अर्थात स्फूर्ती, चैतन्य. ज्याच्यात भाव नाही, ती भक्ती नाही आणि ज्यात चेतना नाही, ती शक्ती नाही. संत जनाबाईंचा एक अभंग आहे, 'विठू माझा लेकुरवाळा। संगे गोपाळांचा मेळा।' या अभंगात विठूरायांच्या अंगाखांद्यावर जणू काही नवविधा भक्ती साकारली आहे. खांद्यावरचे निवृत्तीनाथ श्रवणभक्ती, करांगुली धरणारे नामदेव महाराज कीर्तनभक्ती, मांडीवर बसलेले गोरा कुंभार स्मरणशक्ती, विठूरायाने ज्यांचा हात धरला आहे ते सोपानदेव पादसेवन भक्ती, कबीरशिष्य जीवा अर्चनभक्ती, तुमच्या महारांचा मी महार म्हणत जोहार मायबाप जोहार करीत विठूरायाच्या बरोबरीने चालणारे चोखामेळा, कडेवर बसलेले चोखामेळयाचे मेहुणे बंका दास्यभक्ती, भक्तीच्या वाटेवर कुणी रस्ता चुकू नये म्हणून करडी नजर ठेवणारी शिस्तीची सुंदर मुक्ताबाई सख्यभक्ती, तर अवघ्या जगाला समर्पित होऊन ज्ञानेश्वरीचे अमृत पाजणारी ज्ञानोबा माउली आत्मनिवेदन भक्ती, असा हा भक्तीचा सोहळा निरंतर त्या विठूरायाजवळ शतकानुशतके चालला आहे.

भक्तीच्या वाटेवरचा पहिला राजमार्ग आहे श्रवणभक्ती. साखरे महाराजांच्या जीवनातील एक घटना नेहमी अंतर्मुख करते. पूर्वाश्रमीचे जोशी असलेले महाराज सरकारी अधिकारी होते. एक दिवस संध्याकाळी पुण्यामध्ये पासोडया विठोबापाशी घोडयावरून ते फुले विकणाऱ्या एका माळिणीजवळ गेले. उशीर झाल्यामुळे तिने सगळे आवरले होते. तेवढयात यांनी फुले, गजरे यांची मागणी केली. तिला 'नाही' म्हणणे शक्य नव्हते, म्हणून परत सामान काढीत ती पुटपुटली, 'वाढवेळ झाला आणि जायबंदी दूर हाये' वाढवेळ म्हणजे उशीर, खूप वेळ. हा शब्द संत नामदेवांचा आहे. हे तिचे शब्द त्यांच्या कानातून मनात गेले आणि डोक्यात प्रकाश पडला. त्यांना वाटले देवच मला हे सांगतोय की वाढवेळ झाला आणि जायचेही दूर आहे. परमेश्वराच्या प्राप्तीसाठी तर आपण अजून सुरुवातही केली नाही. नंतर त्यांनी हाती ज्ञानेश्वरी घेतली. चिंतन, मनन, उपासना करून ते साखरे महाराज म्हणून प्रसिध्द झाले. त्यांना आत्मस्वरूपाचे ज्ञान झाले. कुणाच्या तरी मुखातून परमेश्वरच आपल्याशी बोलतोय, त्याचे नीट श्रवण करायला हवे ही सजगता म्हणजेच श्रवणभक्ती. होय ना?

दुसरा मार्ग आहे, कीर्तनभक्ती. कीर्तनात मन तल्लीन होऊन एकाग्र झाले की अष्टसात्त्वि भाव जागृत होऊन शरीराच्या पवित्र हालचाली आपोआप होऊन नृत्य प्रकट होते. समर्थ रामदास स्वामींचे शिष्य उध्दव यांच्या कीर्तनात हनुमंत, तर नामदेवांच्या कीर्तनात पांडुरंग नाचत असे. समर्थ रामदास स्वामींना व्यावसायिक, कीर्तनकार, प्रवचनकार आवडत नसत. ते म्हणत, कीर्तनात भक्तिभाव प्रधान आहे. पारतंत्र्याच्या काळात ओजस्वी कीर्तने करून कीर्तनकारांनी केलेली लोकजागृती स्वातंत्र्याच्या लढयाला खूपच उपकारक ठरली. लोकमान्य टिळकांनासुध्दा राष्ट्रीय कीर्तनकार व्हायचे होते. संत नामदेवांनंी म्हटलेच आहे, 'नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी।

भक्तीची तिसरी वाट आहे विष्णुस्मरणभक्ती. प.पू. गोंदवलेकर महाराजांना 'नामावतार' म्हणतात. महाराज म्हणत, 'इतर सर्व साधने घराच्या विविध खोल्यांसारखी आहेत, तर नाम हे छपरासारखे आहे.' नामामुळे देह शुध्द होतो. ओशो म्हणतात, माणसात प्रचंड शक्ती असते, प्रतिभा असते; परंतु बुध्दिमानातील बुध्दिमान माणूसही आपल्या प्रतिभेतील 15 टक्के प्रतिभेचाही उपयोग करत नाही. 85 टक्के प्रतिभा नासून जाते. बुध्दिमानाची ही गत, तर बुद्दू माणसाचे काय? आपली शक्ती, ऊर्जा अनेक छिद्रे असलेल्या पाण्याच्या बादलीतील पाण्यासारखी व्यर्थ वाहून जाते. स्वत:कडे वळणारी ऊर्जा म्हणजे ध्यान. म्हणजेच आत्मस्मरण, धु्रवबाळाला देवर्षी नारदांनी 'ओम् नमो भगवते वासुदेवाय' हा मंत्र दिला. धु्रवाने कडक तपश्चर्या करून भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेतले. धु्रव हा तारा आकाशात स्थिर आहे. माउली म्हणतात, 'ढगांबरोबर जसे आकाश धावत नाही, गतिमान ग्रहांच्या चक्राबरोबर जसा ध्रुवतारा फिरत नाही, तसा ज्ञानी पुरुषाचा देह फिरत असला तरीही त्याच्या चित्ताला चंचलता नसते.'' आकाशातील ध्रुवतारा हे स्थिर मनाचे प्रतीक आहे. मनावर संस्कारांचे थर असतात. अनंत जन्मांचे संस्कार नाहीसे होतात ते नामामुळे. महर्षी वाल्मिकी हे त्याचेच उदाहरण. विकारातून विकासाकडे नेते ते मन. माणसाचे सामर्थ्य त्याचे मन आहे. मनाचे विश्वमनात रूपांतर करते ते नाम. कृष्णाचे एक नाम गोवर्धन आहे. गोवर्धन पर्वत श्रीकृष्णाने करंगळीवर उचलला म्हणजे काय? तर शून्य या आकडयाला अंकामुळे किंमत येते. गोपाळांचा समूह एकत्र असूनही शून्य होता. त्यामागे श्रीकृष्ण हा एक आकडा लागला आणि समूहमनाची शक्ती प्रचंड वाढली आणि ते वरुण-इंद्रदेवतेचा सामना सहज करू शकले. नामस्मरण भक्ती म्हणून श्रेष्ठ आहे.

भक्तीची चौथी वाट पादसेवन भक्ती आहे. पादसेवन ही विशिष्ट भक्ती आहे. अहंकाराचा लोप आणि सर्वत्र हरीचे दर्शन म्हणजे पादसेवन. श्रीदत्तगुरूंचे पूजन म्हणजे पादुकापूजन. श्रीदत्तांना रूप, आकार नाही. दत्त ही देवता पंचमहाभूतांमध्ये विरघळली आहे म्हणूनच कुणीही 'दत्त' म्हणून दारात उभा राहू शकतो. एकदा एक व्यापारी स्वामी समर्थांकडे केळयााची भरगच्च टोपली घेऊन निघाला. वाटेत त्याला एक भुकेला माणूस भेटला आणि केळी द्या म्हणून याचना करू लागला. तो व्यापारी त्याला म्हणाला, ''चल, नीघ इथून. ही केळी समर्थांसाठी आहेत.'' समर्थांकडे केळी घेऊन जाताच समर्थ गरजले. म्हणाले, ''मघाशी उपाशी रूपात भेट दर्शन देऊन दोन केळी मागितली तर दिली नाहीस आणि आता श्रीमंती दाखवतोस का? नकोत तुझी केळी.'' अवघा घनदाट भरला हरी असे अशी अवस्था म्हणजे पादसेवन. आपल्या इष्टदेवतेला, सद्गुरूंना घटाघटात बघणे, अनुभवणे म्हणजे पादसेवन भक्ती.

भक्तीची पाचवी वाट आहे अर्चनभक्ती. श्री दत्त माहात्म्यात म्हटले आहे, 'जे जे आपणास आवडे। ते ते ठेवावे देवापुढे।' अर्च म्हणजे देवांची पूजा. अर्चन म्हणजे भक्तिभावाने देवाला समर्पण. अर्चनपूजेत देवांसह माता, पिता, गुरू, पशू-पक्षी, प्राणी, पंचमहाभूते सारे येतात. प्रतिमेशिवाय मनातल्या मनात कल्पनेप्रमाणे करता येणारी मानसपूजा म्हणजे अर्चनभक्ती. श्रीपादशास्त्री किंजवडेकर म्हणतात, 'पूजाविधी हा निराळया स्वरूपात एक योगाभ्यासच आहे.' त्यामुळे मन उल्हासित होते. अर्चनभक्तीतून व्यवहारात परमार्थ येतो. एरवी लग्न समारंभात आहेराच्या, देण्याघेण्याच्या साडया, कपडे वेगळे आणि स्वत:साठी निराळे असे आपण बघतो. आहेराच्या कपडयांना फारसे मूल्य नसते. पूजेच्या सुपाऱ्या, सामान इतकेच नव्हे, तर पितरांचे पुण्यस्मरण करताना द्यावयाच्या वस्तूही पुन्हा पुन्हा वापरल्या जातात. माणसाच्या वृत्तीमधला हा दोष अर्चनभक्तीने जातो. 'कांदा मुळा भाजी। अवघी विठाई माझी।' म्हणत मळा फुलवणारे संत सावतामाळी यांची कर्मपूजा ही अर्चनभक्ती नव्हे का? अर्चनभक्ती पराकोटीला गेली की साध्या मातीच्या, दगडाच्या मूर्तीमध्ये प्राणतत्त्व अवतरते. एकलव्याने द्रोणाचार्यांच्या मातीच्या मूर्तीत भावभक्तीने चैतन्य आणले आणि धनुर्विद्या शिकून घेतली. विठोबाने नामदेव महाराजांचा नैवेद्य खाल्ला, तर गोंदवले येथील रामाच्या डोळयात महाराज गाव सोडून जाताना अश्रू आले.

भक्तीची सहावी वाट आहे वंदनभक्ती. वंदन अर्थात नमस्कार. नमस्काराचे निरनिराळे प्रकार आहेत. साष्टांग नमस्कार, सप्रेम नमस्कार, प्रणिपात, दंडवत, प्रदक्षिणापूर्वक नमस्कार, पायी लोळण घेणे. शिवाय आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार, दुर्जनांना, प्रथम नमस्कार, दुरून नमस्कार, कोपरापासून नमस्कार. नमस्कारात अहंकाराचा नाश दडला आहे. वंदनभक्तीसाठी साधनसामग्री लागत नाही. त्यासाठी फक्त देह पुरेसा आहे. त्यासाठी पैसा आणि कष्ट लागत नाही. पूज्यपाद भगवान आद्य शंकराचार्यांच्या चरित्रात एक कथा येते. शंकराचार्य एकदा भ्रमण करीत दक्षिण भारतातील विजयानगर भागात आले. दुपारच्या समयी सडासंमार्जन करून गोपद्म रेखिलेल्या द्वारी उभे राहून त्यांनी 'ॐ भवति भिक्षां देही' म्हणत आपण आल्याची आत गृहिणीला वर्दी दिली. अतिथीची हाक येताच आतमध्ये असलेल्या गृहिणीला ब्रह्मांड आठवले. तिच्या घरी मूर्तिमंत दारिद्रय वसत होते. दारी आलेल्या अतिथीला भिक्षा वाढता येत नसली, तरी मनापासून नमस्कार तर करता येईल ना?  हा विचार करून ती जीर्णवसना स्त्री दारात आली आणि तिने आचार्यांना मनापासून नमस्कार केला आणि तोंडू झाकून ती रडू लागली. आचार्य म्हणाले, ''देवी, आपली परिस्थिती मला कळली आहे. सतीव्रताच्या नमस्काराने आपण माझा सन्मान केलात यातून आपले मंगलहृदय प्रतीत होते. मी अन्नपूर्णादेवीची प्रार्थना करतो. तुमची करुण कहाणी कथन करतो. ती सदैव आपल्या घरात नांदेल.'' त्यानंतर आचार्यांनी चार श्लोकांनी अन्नपूर्णादेवीची प्रार्थना केली आणि त्या सतीचे घर धनधान्याने भरून टाकले. हा आहे वंदनभक्तीचा महिमा. आपल्या सर्व संतांनी तर विठूच्या पायी लोळण घेतली आहे.

भक्तीची सातवी वाट आहे दास्यभक्ती. समर्थ रामदास स्वामी स्वत:ला रामाचा दास म्हणून घेत. द्वैत आणि अद्वैत यात न पडता सगळे काही ईश्वराच्या इच्छेने चालते, याला संत प्राधान्य देतात. संत तुकाराम महाराज म्हणतात, 'चाले हे शरीर कोणाचिये सत्ते। कोण बोलविते हरिवीण। वृक्षाचेही पान हाले त्याची सत्ता। राहिली अहंता मग कोठे।' जगण्याचा प्रत्येक श्वास म्हणजे त्याची इच्छा हे कळले की दास्यभाव आपोआप येतो. स्वामी स्वरूपानंद देहाची, आयुष्याची सूत्र देवाच्या हातात देऊन म्हणतात, 'खेळविसी तैसा खेळेन साचार। तूं चि सूत्रधार बाहुले मी॥' जीवनात फक्त त्याच्या मनासारखे होते हे कळणे म्हणजे दास्तभक्ती होय.

भक्तीची आठवी वाट सख्यभक्तीची आहे. गुजरातमधील डाकोर येथे रणछोडदास श्रीकृष्णाच्या मंदिरात अनुभवलेली भक्ती विसरता येणे अशक्य आहे. आपल्या महाराष्ट्रात जसे वारकरी पायी पायी पंढरपूरला भक्तिभावाने जातात, तसेच लहान खेडयांमधले, गावातले ग्रामीण लोक खांद्यावर, डोक्यावर शेतामधले अन्नधान्य घेऊन अनवाणी पायी पायी डाकोरकडे जात होते. देवळामधले दृश्य तर अपूर्व होते. द्वारकाधीश कृष्णाशी प्रत्येक जण संवाद करीत होता. गावामधल्या बारा भानगडी सांगणारे कुणी, तर घरातला वाद सांगणारे कुणी. बायका तर चक्क सासूची, जावेची गाऱ्हाणी सांगत होत्या. भान विसरून कृष्णाशी बोलणारे ते लोक बघितले तेव्हा कृष्ण हा त्यांच्यासाठी आजही राजा असून त्यांचा जिवलग सखा आहे, हे लक्षात आले. सख्यत्वात जेवढे प्रेम, तेवढे भांडणही असते. संत तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणतात, 'ऐके ऐके गे विठ्ठले। आम्ही तुझे काय केले?' एकनाथ महाराज तुझे काका लागतात का? त्यांच्या घरी फुकट पाणी भरलेस. कबीर तुझा मामा आहे का? त्याचे शेले विणतोस. सावतामाळी तुझा बाप आहे का? त्याच्या उदरी गडप झालास. नामदेव काय माउसा आहेत तुझे? त्यांच्याबरोबर जेवतोस. जनी काय तुझी मावशी? तिच्यासाठी राबराबतोस. तुका म्हणे घेतली आळ। सलगीने बोले बाळ। तुकाराम महाराजांची योग्यता फार मोठी होती, म्हणून ते विठोबाशी सख्य करतात.

नववी भक्ती श्रेष्ठ आहे, ती म्हणजे आत्मनिवेदन. म्हणजे सर्वस्व समर्पण करणे. स्वत:लाच देवाला अर्पण करणारे आपले सगळे संत म्हणजे आत्मनिवेदन भक्ती. पंढरपूरला देवळात जाण्यापूर्वी असणारी नामदेव पायरी काय सांगते? संत सखू, संत कान्होपात्रा, संत मुक्ताबाई या विठोबापाशी शून्य झाल्या. त्यांच्यात विलीन झाल्या. ही वाट भक्ताला मोक्षाकडे नेते.

देव नेमका आहे कुठे? तर तो भक्तांच्या मनात आहे. माउली एका अभंगात म्हणतात, फुलांची माळ करता येईल, पण सुगंध गुंफता येईल का? मोती पाणीदार असतात, पण त्याचे पाणी रांजणात भरता येते का? डोळयाखालील बुबुळाला आपण बाहुली म्हणतो, पण म्हणून ती खेळायला घेता येईल का? आपल्या सावलीला सखी म्हणता येईल का? विठ्ठल-रखुमाई भांड भांड भांडले तरी त्यांची समजूत कोण काढेल? कारण ते एकरूप आहेत. जसे ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथांच्या चरणी एकरूपतेने शरण आहेत तसे. माउली म्हणतात, देव लहान की मोठा? गोरा की काळा? सुंदर की कुरूप? काही कळत नाही. डोळयांना दिसत नसला, तरी मनाला त्याचे अस्तित्व सतत जाणवत असते.

विठोबाचे अस्तित्व कळायला मानसिक तयारी असावी लागते. त्यासाठी भक्तीची वाट अनुसरावी लागते. पंढरपूरच्या वाटेवर एकमेकांच्या पाया पडणारे वारकरी बघितले की अवघी नवविधा भक्ती सगुण-साकार होते. संत तुकाराम महाराज म्हणतात, 'तुका म्हणे सोपी केली पायवाट। उतरावया भवसागर रे।' तो विठूराया आणि त्याचे भक्त यांच्या नुसत्या स्मरणाने वैकुंठाची वाट दिसू लागते. प्रकाशमान होते.

9823866182