'संत विद्यापीठाचा आराखडा तयार!''- समिती अध्यक्ष अतुल भोसले

विवेक मराठी    08-Jul-2019
Total Views |

 ***सौ. धनश्री लाळे****

भविष्यकाळामध्ये पंढरपूर देवस्थान समितीच्या वतीने विविध कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी संत विद्यापीठासह पुढच्या पाच वर्षांच्या कामाचा मास्टर प्लॅन समितीने तयार आहे. या संदर्भात मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांच्याशी केलेली बातचीत.


 

''पंढरपूरची वारी हा वारकरी संप्रदायाचा मुख्य आचारधर्म आहे. वारी ही महाराष्ट्रात ज्ञानदेवांच्या पूर्वीपासून चालत आलेली एक जनप्रथा आहे. जरी ज्ञानेश्वरांमुळे आणि वारकरी संप्रदायामुळे पंढरीच्या वारीला विश्वव्यापकता लाभली असली, तरी मुळात या परंपरेचा आद्य प्रवर्तक भक्त पुंडलिकच ठरतो. पुंडलिकापासूनच या संप्रदायाच्या इतिहासाला सुरुवात होते. शेकडो वर्षांपासून पंढरीला एकत्रित जाणारे वारकरी हे नावच वारीमुळे पडले आहे. वारीतून या संप्रदायाची सामाजिकता आणि समाजाभिमुखता स्पष्ट होते. वारीची परंपरा सर्व एतद्देशीय संतांनी जतन केली आहे'' असे संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे म्हणतात.

 एकतरी वारी अनुभवावी असे वारकरी संप्रदाय म्हणतो. त्यामागे माणसाच्या आध्यात्मिक भक्तीबरोबरच शारीरिक क्षमतेची, शक्तीचीसुध्दा सिध्दता आवश्यक असते. कित्येक हजारो, लाखो लोक आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला विठ्ठलभेटीसाठी येत असतात. 'जेव्हा नव्हते चराचर, तेव्हा होते पंढरपूर' अशी या गावाची माहिती वर्णिली जाते. साहजिकच इथल्या व्यवस्थेवर, प्रशासकीय यंत्रणेवर प्रचंड मोठी जबाबदारी असते ती वारी निर्विघ्न पार पडण्याची आणि पंढरीत आलेल्या भाविकांना, वारकऱ्यांना जास्तीत जास्त चांगल्या सोयी, सुविधा पुरविण्याची.

 याबाबत आम्ही पंढरपूर देवस्थान समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांच्याशी बातचीत केली. त्यावर त्यांनी अत्यंत सविस्तरपणे काही मुद्दे मांडले.

या वर्षीच्या आषाढी वारीसाठी आपण काय काय तयारी केलीय? या वर्षी काय वेगळेपण असणार आहे?

गेल्या वर्षी 15 लाखांच्या आसपास वारकरी पंढरपुरात आले होते. या वेळी त्यापेक्षा जास्त लोक दाखल होतील असा अंदाज आहे. या सर्वसामान्य लोकांची सोय, व्यवस्था चांगली व्हावी या उद्देशाने ज्या ज्या मार्गावरून पालख्या येतात, दिंडया येतात त्या त्या मार्गावर आम्ही पाण्याची व्यवस्था केलेली आहे. त्यानंतर खिचडी वाटपाची व्यवस्था केलेली आहे. जरी पंधरा-साडेपंधरा लाख लोक पंढरपुरात येत असले, तरी सर्वसाधारणपणे प्रत्यक्ष आषाढी एकादशीच्या दिवशी 25 ते 30 हजार लोकच देवाचे दर्शन घेऊ शकतात. त्यामुळे आम्ही यंदा ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था केली आहे. त्यासाठी मागच्या वेळी आम्ही 12 स्क्रीन उभारले होते, या वेळी आम्ही 16 स्क्रीन लावत आहोत आणि ते स्क्रीनसुध्दा मोठया आकाराचे असतील. शिवाय प्रत्येक स्क्रीनच्या खाली पाणी आणि खिचडी वाटपाची सोय करीत आहोत. पत्रा शेडमध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकाला मोफत चांगले जेवण मिळावे, म्हणून आम्ही चार काउंटर उभारत आहोत. आमचा अंदाज असा आहे की एका वेळी 3 ते 4 लोकांना आम्ही जेवण देऊ, असे मिळून आम्ही 20 लाख लोकांना भोजन देऊ शकणार आहोत. मागच्या वर्षी आम्ही 25 लाख लीटर्स पाणी उपलब्ध करून दिले होते, या वेळेस 30 लाख लीटर्स मिनरल वॉटरची व्यवस्था आम्ही मंदिर समितीच्या वतीने पुरवणार आहोत. मागच्या वेळी वारकऱ्यांच्या पायांना इजा होऊ नये म्हणून 8 किलोमीटर अंतराचे कार्पेट टाकले होते. या वेळी त्या कार्पेटची जाडी वाढवणार आहोत, कारण गेल्या वेळी त्यावरून जास्त लोक चालल्यामुळे काही ठिकाणी दाब पडून खड्डे झाले, फाटले. परंतु आता जाडी वाढवल्यामुळे लोकांना ते अधिक आरामदायक वाटेल. सगळयात महत्त्वाचे म्हणजे लोकांना लवकर दर्शन होण्यासाठी टोकन व्यवस्था व्हावी, म्हणून मंदिर समितीने इन्फ्रास्ट्रक्चर उभारायला सुरुवात केलेली आहे. यात आपण पत्रा शेडमध्ये दर्शन मंडप आणि दर्शन मंदिरापासून स्काय वॉक थेट मंदिरापर्यंत आपण प्रस्तावित केला. त्यासाठी 22 कोटी रुपयांचे टेंडर आपण दिले आहे. त्याची पूर्तता झाल्यानंतर त्याचेसुध्दा काम चालू होईल. मंदिर परिसरामध्ये मंदिर समितीने जी भांडवली गुंतवणूक (कॅपिटल इन्व्हेस्टमेंट) केली आहे, त्यात पहिल्यांदा भक्तनिवास, त्यानंतर दर्शन मंडप करायला आपण घेतोय आणि त्यानंतर स्काय वॉक या तिन्ही गोष्टी झाल्यानंतर आपल्या लक्षात येईल की जी भांडवली गुंतवणूक आम्ही प्राधान्यक्रम लावून या तीन गोष्टींसाठी वारकऱ्यांच्या सोयीसाठी आवश्यक होती, ती या निमित्ताने पूर्ण होत आहे आणि लवकरात लवकर या गोष्टीसुध्दा पूर्ण होतील. मागच्या काळात जेव्हा मंदिर समितीचा चार्ज माझ्याकडे देण्यात आला, त्या वेळी समितीचे उत्पन्न 14 ते 15 कोटी रुपयांपर्यंत होते, ते वाढवून 31 मार्च 2019ला दुप्पट, म्हणजे 31 कोटीपर्यंत केले आहे. पुढच्या वर्षी आमचे प्लॅनिंग आहे, आम्ही तशा प्रकाराचे नियोजनसुध्दा केलेले आहे की आमचे आर्थिक उत्पन्न 50 कोटी रुपये होईल. म्हणजे मागच्या तीन वर्षांत हे तिप्पट होणार आहे. म्हणजे असे लक्षात येईल की 1985पासून मंदिर समितीच्या स्थापनेपासून आजपर्यंत प्रत्येक वर्षांची वाढ बघितली, तर इतकी मोठी वाढ कधीही झालेली नव्हती, ती आपण तितक्या झपाटयाने केली आहे. तसे बघायला गेले तर ही वाढ प्रतिवर्षी 100 टक्के इतकी होत आहे आणि हे सगळे होत असताना देशातल्या ज्या 15 मोठया मंदिर समित्या आहेत जेथे फूट फॉल 1 कोटीपेक्षा जास्त आहे, अशांमध्ये आपण आहोत. परंतु उत्पन्नाच्या बाबतीत आपण त्या इतरांच्या तुलनेत कुठेच नाही आहोत. त्यामुळे जोपर्यंत उत्पन्न वाढत नाही, तोपर्यंत आपण जास्तीच्या किंवा अधिकच्या सुविधा लोकांना देऊ शकत नाही. मंदिर समितीने मंदिरासाठी, मंदिर परिसरासाठी, चंद्रभागेच्या घाट सुशोभीकरणासाठी भविष्यकाळामध्ये जो प्लॅन केला आहे, त्याबाबत आमचे असे आर्थिक नियोजन आहे की येणाऱ्या पाच वर्षांत मंदिर समितीचे उत्पन्न 100 कोटींपेक्षा जास्त होईल. ही तीन आणि पुढची दोन असा पाच वर्षांचा प्लॅन आम्ही सादर करणार आहोत. त्यात आपण पंढरपूरमध्ये संत विद्यापीठाच्या निर्मितीचा प्लॅन आहे. हा आराखडाच जवळजवळ 100 कोटी रुपयांचा आहे. विशेष म्हणजे आम्हावर विठ्ठलाची अशी कृपा आहे की प्रकल्प चालू करायच्या आधी आमच्याकडे या 100 कोटी रुपयांचे देणगीदार तयार आहेत. फक्त ते योग्य वेळेला, जसजशा परवानग्या मिळतील तशा आम्ही सुरू करू. पंढरपूरमध्ये वारकऱ्यांच्या सोयीसुविधेसाठीचे कुठलेही काम पैशाअभावी थांबणार नाही, याची पूर्ण खात्री अध्यक्ष म्हणून मला तिथे आलेली आहे. मला राज्य सरकारने खूप मोठी संधी दिली आहे. केंद्रात मोदींचे सरकार आणि राज्यात देवेंद्र फडणवीसांचे सरकार, ही दोन्ही अत्यंत संवेदनशील सरकार आहेत. आपण पाहिले असेल की सामान्य लोकांना, वारकऱ्यांना केंद्रबिंदू मानून 5 वर्षांत काम करीत आहेत. उत्तर प्रदेशात कुंभमेळयात पाहिले असेल, तिथेही तीच परिस्थिती. पंढरपूर असो किंवा त्र्यंबकेश्वर, इथेही तीच परिस्थिती आहे. मुख्यमंत्र्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हात डोक्यावर असल्याशिवाय कुठलीच गोष्ट होऊ शकत नाही. अनेक वेळा मला ते मार्गदर्शन करतात, तिथे सोडवणूक करतात. एकंदरीतच त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन असल्यामुळे अनेक विकासाभिमुख कामे होताहेत. मला खात्री वाटते की येत्या काळात केवळ पंढरपूर तालुक्याचाच नाही, तर संपूर्ण जिल्ह्याचा विकास पंढरपूर देवस्थान समितीभोवती केंद्रित होईल. त्यामुळे याच प्रामाणिकपणे आणि पारदर्शकतेने देवस्थान समितीने काम करत राहिले पाहिजे, ही अपेक्षा मात्र निश्चित आहे.

 ''पंढरपुरात उभारले जातेय
देशातलेच नव्हे, तर जगातले सर्वात मोठे संतपीठ''

- डॉ. अतुल भोसले

पंढरपूरच्या महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या जागेत हे संतपीठ उभारण्यात येणार आहे. तब्बल साडेचार एकर परिसरात हे काम होणार असून त्यासाठी आम्ही 90 कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. त्यातील 25 कोटी रुपयांच्या खर्चाला शासनाकडून नुकतीच मंजुरी मिळालेली आहे. पर्यटन विभाग आता जागा विकू शकत नाही, त्यामुळे मंदिर समिती आणि पर्यटन विभाग यांच्यामध्ये एक जॉइंट व्हेंचर कंपनी तयार करण्यात येणार आहे. सर्व खर्च मंदिर समिती करणार असून ती वास्तू चालवण्याची जबाबदारी मंदिर समिती आणि पर्यटन विभाग अशी संयुक्तपणे राहणार आहे. त्याबाबतचा करार झालेला असून त्यास लवकर तांत्रिक मान्यताही मिळेल. सामान्य नागरिक, पर्यटक येथे येतील तेव्हा वारकरी संप्रदायाविषयीची तसेच विद्यापीठात चालणाऱ्या कार्याची त्यांना ओळख आणि माहिती व्हावी, तसेच प्रत्यक्ष अनुभूतीही मिळावी आणि त्यात त्यांचा स्वतःचा सहभाग असावा अशी एकूणच या संत विद्यापीठाची कल्पना आहे. त्यासाठी वास्तुरचनेतून ही परंपरा व्यक्त व्हावी, तसेच प्रदर्शने, संग्राहालये व परंपरेतील महत्त्वाच्या कृती, विधी यांचाही समावेश असावा. हा परिसर एक जिवंत स्मारक म्हणून ओळखला जावा अशी आमची धारणा आहे. त्यासाठी विद्यापीठ आणि त्याच्या सर्व कार्यासाठीच्या इमारती व जिवंत स्मारकासाठीच्या रचना , अशा दोन भागांमध्ये हा परिसर विकसित केला जाणार आहे. पंढरपूर, देहू , आळंदी, पैठण आणि स्थाने या परंपरेशी निगडित आहेत. यांत पंढरपूर हे आद्य स्थान म्हणता येईल.  इथली प्रमुख स्थाने जी आहेत ती चंद्रभागा वाळवंट, घाट टेकडी आणि मुख्य मंदिर या सर्वांची रूपक स्वरूप या संतपीठाच्या वास्तुरचनेत मांडण्याचा आमचा प्रयत्न राहील. शिवाय आपल्या भागातील पारंपरिक मंदिर योजनेतील बंदिस्त आवार, त्यामध्ये असणारी खुली जागा, दीपमाळा, तुळशीवृंदावन, झाडे-झाडोरे, मुख्य मंदिर आणि इतर छोटी मंदिरे, सभामंडप इत्यादी गोष्टी यात वापरल्या जाणार आहेत.


  पंढरपूरमध्ये आषाढी वारी आणि कार्तिकी वारी या व्यतिरिक्त कोणकोणत्या सण-उत्सवात देवस्थान समितीचा सहभाग असतो?

समिती 24 # 7 तास भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात कार्यरत आहे. पूर्वी एक काळ असा होता की आषाढी आणि कार्तिकी वारी सोडली की इतर वेळी पंढरपुरात फारशी गर्दी नसायची. ती परिस्थिती आम्ही बदलून टाकली. इतक्या सोयी आणि इतक्या सुविधा आज पंढरपुरात उपलब्ध आहेत की आज सहजरीत्या भक्तनिवासात येऊन राहावे म्हणून अनेक लोक येतात. आज भक्तनिवासात बाराशे लोक राहू शकतात. तिथे पंचतारांकित व्यवस्था अत्यंत अल्प दरात उपलब्ध आहे. श्री विठ्ठलाचं दर्शन सुखकर होतेय, श्री रुक्मिणीमातेचे दर्शन सुखमय होतेय. इतर ज्या सोयी सुविधा असतील मग एफ डी आय च्या नियमाप्रमाणे प्रसादाचे लाडू चांगल्या प्रतीचे उपलब्ध करून देणे, अन्नछत्राच्या व्यवस्थेमध्ये सुधारणा करून देण्याबाबतीतला विषय असो, तिथली स्वच्छता असो, चंद्रभागेच्या तटावरची स्वच्छता असो, तिकडे कपडे बदलण्याची व्यवस्था असो, वारकरी जेव्हा येतात तेव्हा सेवकांचा जो ऍटिटयूड किंवा त्यांची मानसिकता आहे, वारकऱ्यांचे  स्वागत करण्याची त्याबद्दलची पध्दत असो, वारकरी युनिफॉर्ममध्ये इथल्या सेवकांना, कर्मचाऱ्यांना पाहतात त्यांच्या मनात इथे शिस्तबध्द कामकाज चालते अशी एक भावना तयार होते किंवा मंदिरामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला आम्ही बायोमेट्रिक चालू केले आहे. आज आमची दानपेटी उघडण्याची प्रक्रियासुध्दा शिस्तीची आहे. तिथे त्या वेळी सीसीटीव्हीचे कव्हरेज आहे, पाच लोकांच्या स्वाक्षऱ्यांशिवाय आपण ती दानपेटी उघडू देत नाही, अशा अनेक छोटया-मोठया गोष्टींत आम्ही शिस्त आणली आहे. आणखी आमच्या समितीची उपलब्धी अशी आहे की आम्ही समिती कुठलेच टेंडरिंग करीत नाही. याशिवाय आम्ही कर्मचाऱ्यांच्या आकृतिबंधाचा विषय, जो मागच्या 30 वर्षांपासून प्रलंबित होता, 270 लोक आज कायमस्वरूपी झाले. मुख्यमंत्र्यांमुळेच हा विषय मार्गी लागला, कारण शेवटी न्याय आणि कायदा खाते त्यांच्याकडेच आहे. त्यांनी मनावर घेतल्यामुळेच हे झाले.

नियोजित संतपीठाबाबत काही सांगाल?

ते आमचे एक आयडियल प्रोजेक्ट आहे. 100 कोटींचा खर्च आहे. पण 10व्या शतकातला आराखडा तयार केला आहे. त्या काळीचे दगड तिथे असतील. वेळ बदलतोय, काळ बदलतोय, 7व्या शतकातला 10व्या शतकातला भाविक आज राहिलेला नाही. काही जण आज चार पावले दिंडीबरोबर चालतात, सेल्फी काढतात आणि घरी जातात. वारीमध्ये माणसांची संख्या वाढतेय पण पूर्वीची देवाबद्दलची आस्था, आध्यात्मिक भावना कुठेतरी कमी होताना दिसतेय. ती वाढवायची गरज आहे, त्या दृष्टीने पंढरपूर हे पथदर्शक आध्यात्मिक विद्यापीठ तयार करायचा संकल्प संतपीठाच्या माध्यमातून करायचा आहे. संत प्रवचन आहेत, भारूड आहेत, कीर्तने आहेत, त्यातून त्या काळाचे वातावरण कसे होते, इमारती कशा होत्या, दगड कसे होते, झाडे कुठली कुठली होती? तशी आता मिळतील का? हे पाहणार आहोत. देशातलेच नव्हे, तर जगातले सर्वात मोठे संतपीठ इथे तयार करायचे आहे. आध्यात्मिक राजधानीच उभारायची आहे. 

निवड झाल्यानंतर आपण पंढरपूरच्या विकासासाठी कॅनडा सरकारकडून मदत घेणार असे जाहीर केले होते, त्याचे काय झाले?

आमची इच्छा होती की मॉडर्न पिलग्रिामेज म्हणून मंदिराचा विकास करावा. त्या दृष्टीने आम्ही कॅनडा सरकारकडे अप्रोच झालो होतो. त्यानंतर सरकारचे काही प्रतिनिधी, आर्किटेक्ट्स यांची भेट पंढरपूरला झाली होती. कॅनडा सरकारचा असा प्रस्ताव होता की केवळ मंदिर परिसर नव्हे, तर संपूर्ण पंढरपूर शहराचाच आम्ही विकास करू आणि ज्या वेळेला देशातून राज्यातून पंढरपूरला लोक येतील, त्यांना पाहायला मिळेल की आर्किटेक्चरली कॅनडा किती साउंड आहे, कॅनेडियन कन्स्ट्रक्शन किती भक्कम आहे आणि त्या धर्तीवर आपण इथे एक आयडियल पिलग्रिामेज तयार करू. स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, नगरपालिका असेल, निवडून आलेले स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोक असतील. अशा अनेक गोष्टींमध्ये या सगळयांचे एकमतसुध्दा होणे गरजेचे आहे आणि ही एक मोठी प्रक्रिया आहे. कारण ज्या वेळी एफ.डी आय. म्हणजे फॉरेन डायरेकट इन्व्हेस्टमेंट होणार आहे, त्या वेळेला पैसे किती टक्के व्याजदराने देणार आहेत? मग सॉफ्ट लोन देणार आहेत की त्यात इन्सेन्टिव्ह काय देणार आहेत का? या सगळया गोष्टी झाल्या नाहीत, परंतु एक गोष्ट निश्चित झाली की आम्ही एक पाऊल टाकू शकलो. बाहेरचे लोक आम्हाला पैसे द्यायला तयार झालेत इतपत आमची रेकग्निशन आम्ही करू शकलो. परंतु विथ किंवा विदाउट कॅनडा गव्हर्नमेंट पंढरपूरचा विकास वेगाने प्रगतिपथावर आहे. आता यात कॅनेडियन गव्हर्नमेंटमुळे गती आली असती, पण त्याबाबत जोपर्यंत काही मजबूत प्रस्ताव तयार होत नाही, तोपर्यंत काही थांबलेले नाही.

याबाबत स्थानिक लोकांचे किंवा लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे की आम्हाला नीट आयडियाच आलेली नाही?

नाही. उलट लोकांसाठीच हे सगळे चालले आहे. एखादी कंपनी किंवा सरकार तुम्हाला तुमच्या गावासाठी, शहरासाठी विकासासाठी काही द्यायला तयार आहे आणि आपण घेत नाही, असे कसे चालणार? उदाहरणार्थ, एखादे शहर आहे कराडसारखे. त्याला तिथे टाटा सर्व्हिस कन्सल्टन्सीसारखी एखादी कंपनी एखादे बेट विकसित करणार असेल, तर आपण त्यांना समजावून सांगायचे असे करा, इकडे करा का त्यांनी आपल्याला समजवायचं ? ते देतो म्हणतात म्हटल्यावर आपणच त्यांना पटवून दिले पाहिजे. उलट कसे ते द्यायला तयार आहेत, आता आपण पाऊल उचलले पाहिजे ना.

आपल्याला काम करताना मंदिर समिती सोडून स्थानिक लोकांचा सपोर्ट मिळतोय का ?

श्री विठ्ठलाचा सपोर्ट आहे, रुक्मिणी मातेचा सपोर्ट आहे, त्यामुळे विषयच नाही. देव आले म्हणल्यावर सगळे आलेच. आणि आपल्या सद्सदविवेकबुध्दीला जे पटेल ते काम आपण तिथे करतोय. एखादी गोष्ट बरोबर की चूक याचे जस्टिफिकेशन आपल्याजवळ असले की मग त्यांची काय रिएक्शन येईल याची फिकीर आम्ही केली नाही, करतही नाही. सर्वसामान्य वारकऱ्याच्या तोंडावर स्मितहास्य बघण्यासाठी, समाधान बघण्यासाठी हा सगळा प्रयत्न आणि उपक्रम चालू आहे. त्यामुळे जर उद्या एखादे कडक पाऊल उचलावं लागलं ज्याच्यामुळं येणाऱ्या भाविकांना फायदा होईल, तर ते आम्ही उचलू. मध्यंतरी काही कठोर निर्णय घेतले. त्यामुळे आम्हाला राजकीय विरोध सहन करावा लागला. पण आम्हाला त्तची फिकीर नाही. आम्हाला मुख्यमंत्र्यांनी कडक सूचना दिल्यात की सर्वसामान्य भाविकांच्या हिताचेच काम करायचे, कुठल्या नेत्याला पटलं नाही तरी चालेल. त्यामुळे तसल्या विरोधाला जुमानयाचे नाही.

 प्रश्न - आपल्या समितीचा केंद्रबिंदू विठ्ठल मंदिर आहे पण परिसरातील अन्य देवांच्या मंदिर विकासाबाबत ...

उत्तर - श्री विठ्ठल मंदिर आणि त्याचा परिवार असा दुहेरी विकास आपण करणार आहोत. पण अडचण अशी आहे की एक हजार वर्षांपूर्वी या मंदिराची उभारणी झालेली आहे.  त्यामुळे आध्यात्मिक महत्त्वाला धक्का पोहोचू नये याची खबरदारी आपण घेत आहोत. एखादी वीट जरी इकडची तिकडे करायची म्हटले, तरी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण या संस्थेची परवानगी घ्यावी लागते. नवीन काहीतरी कन्स्ट्रक्शन केल्यामुळे मंदिराच्या पूर्वीच्या आध्यात्मिक पावित्र्याला कुठेही धक्का लागू नये यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे अगदी टाईल्स जरी बदलायची असेल, तरी पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाची परवानगी आवश्यक आहे. आम्ही तिथं काही करत नाही, करू शकत नाही. त्यामुळे आमचे म्हणणेच असे आहे की, या संस्थेने  मॉनिटरिंग आणि गाईडन्ससाठी तुमचे जास्तीत जास्त लोक आम्हाला द्यावेत. आम्हाला 10व्या शतकात जसे मंदिर दिसत असेल तसे करायचे आहे. तो आध्यात्मिक भक्तीचा फील आम्हाला आता सध्याच्या 21व्या शतकातील पंढरीत आणायचा आहे. त्यासाठी आम्हाला मार्गदर्शन पाहिजे. आजमितीला समितीकडे असे हितचिंतक आहेत, जे एखादी कल्पना बोलून दाखवली तर लगेच पूर्ण करतात. अगदी सहज परवा एकाला मी विचारले, ''तुम्ही एवढा निधी देताय, अगदी लाख लाख रुपये देताय ते कसे काय?'' त्यावर ते गृहस्थ म्हणाले, ''पूर्वी पैसे देताना विचार करायचो की सदुपयोग होईल का?'' पण आता तुम्ही आहात म्हटल्यावर शंकाच नाही. आपला पैसा नेमकेपणाने आणि योग्यच खर्च होणार. त्यामुळे ही मंडळी आमच्या समितीवर जर इतक्या विश्वासाने विसंबली असतील, तर आता आमची जबाबदारी दुप्पट वाढली आहे या विश्वासानेच आम्ही काम करीत आहोत. त्या लोकांचा विश्वास राखणे आमचे परमकर्तव्य आहे. अनेक जण, भाविक विठ्ठलापाशी केवळ मुखदर्शनासाठी आलेले असतात. त्याला बाकीचे काहीही नको असते. अशा लोकांना आपण सुविधा दिल्या पाहिजेत. आलेला पैसा ना पैसा योग्य रितीनेच कारणीभूत ठरला पाहिजे. आम्ही समितीमार्फत शहरभर 5 वॉटर एटीएम बसवलीत. वास्तविक समितीची जबाबदारी नाही. आता आम्ही प्रत्येक मठाला स्वच्छतागृह देण्याची मोहीम राबवली, झाडे लावायची मोहीम राबवली. तुळशीवृंदावन चालवायला घ्यायची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. म्हणजे पूर्वी समिती जो लिमिटेड रोल घेत होती, तो आता आम्ही एक्स्पांड केलाय. तुम्हाला निश्चितपणे पुन्हा एकदा सांगतो, येणाऱ्या काळात सोलापूर जिल्ह्याच्या विकासाचा केंद्रबिंदू हा विठ्ठल रुक्मिणी मंदिर असेल.

येणाऱ्या वारीनिमित्त पंढरपूर नागरवासीयांना आणि जनतेला काय संदेश द्याल ?

ही वारी आनंददायक जावी, समाधानकारक जावी यासाठी सर्वानी सहकार्य करावे. आतापर्यंत पूर्वापार लोकांनी सहकार्य केले आहेच. श्री विठ्ठलाचा आणि रुक्मिणीमातेचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम राहो, हीच प्रार्थना.

7972197482