कलम 370 आणि काँग्रेसचा वैचारिक गोंधळ!

विवेक मराठी    10-Aug-2019
Total Views |

*** कुचाळक्या***

लोकसभा निवडणुकांचे काँग्रेससाठी
'धक्कादायक' निकाल आल्यापासून हा पक्ष काही सावरण्याचे नाव घेत नाही. उलट दिवसेंदिवस त्याची अवस्था अधिकाधिक गोंधळलेली होत आहे. अध्यक्षांचा पत्ता नाही, पर्यायी नेतृत्वाची निवड नाही, संघटन नाही आणि आपली नेमकी कोणती वैचारिक भूमिका आहे, हेही कोणालाच समजत नाही. निवडणुकीत जय-पराजय होतच असतात, अगदी प्रत्येक पक्षाला या चढउतारातून जावं लागलं आहे. मात्र नेतृत्वाची विचारसरणी निश्चित असली, तर पक्षाची भूमिका कार्यकर्त्यांपर्यत पोहोचते. पण नेतृत्वाचाच वैचारिक गोंधळ असेल, तर मात्र अवस्था वाईटच होत जाते. गेल्या काही वर्षांत, म्हणजे निश्चित सांगायचं तर युवा नेते राहुल गांधी यांनी पक्षाची कमान हाती घेतल्यापासून ती कमान अधिकाधिक वाकतच चाललीय. त्यामुळे कार्यकर्ते आणि नेते यांची स्थिती 'आधार कुणाचा घ्यावा...' अशी झाल्यास नवल नाही! 


एकेका मुद्दयावरून हा वैचारिक गोंधळ अधिकाधिक गडद होत चालला आहे. हा गोंधळ असह्य होत चाललेला एकेक शहाणा माणूस जरा तरी भानावर येतोय, हे एक चांगलंच लक्षण म्हणावं लागेल. कलम 370 35-अ तसंच जम्मू-काश्मीरच्या विभाजनावर झालेल्या चर्चेत पक्षाचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी आपली 'माती खाण्याची' परंपरा कायम ठेवली. जम्मू-काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा नसून तो युनोमध्ये प्रलंबित असलेला प्रश्न आहे, त्यामुळे भारत त्यावर एकतर्फी (?) निर्णय कसा घेऊ शकतो, असे अकलेचे तारे महाशयांनी तोडले! ते काय बोलताहेत त्याचं त्यांना तर कळत नव्हतंच, पण त्यांच्या मागे बसलेल्या पक्षाच्या माजी (हो ना?) अध्यक्षांनाही काही उमगेना झालं होतं. मात्र हा मूर्खपणा सोनियाबाईंच्या लगेचच लक्षात आला आणि अमित शाहांच्या हाती आयतं कोलीत देणाऱ्या ह्या अधीर बालकाकडे त्या हताशपणे बघू लागल्या! त्यानंतर विद्वान म्हणवल्या जाणाऱ्या शशी थरूर आणि मनीष तिवारी यांनीही काही फार दिवे लावले नाहीतच. 370चे नेमके फायदे काय हे जरी ते सांगू शकले नसले, तरी किमान गोंधळ घातला नाही. 'नेहंरूचे कौतुक आणि मोदी जे करतील त्याला आमचा विरोध' ह्या पक्षाच्या भूमिकेला ते चिकटून राहिले

मात्र कहर केला तो राज्यसभा नेते गुलाम नबी आझाद यांनी! ह्या निर्णयावर विरोधाची भूमिका तर त्यांनी घेतली आहेच, त्याशिवाय ते आता हुर्रियत आणि पाकिस्तानची भाषा बोलू लागले आहेत. स्वत: काश्मिरी असूनही, या निर्णयाचे समर्थन करणारे आपलेच काश्मिरी लोक 'पैसे घेऊन' बोलतात! असा शोध त्यांनी लावला आहे. आपली सर्व मते, वाक्ये आता सहज रेकॉर्ड केली जातात आणि काश्मीरसह जगभरात ती सर्वाना बघता येतात, हेही यांना कळत नाही की काय राव! जनता यांची बौध्दिक दिवाळखोरी तर बघत होतीच, शिवाय लदाखच्या तरुण हिमबिबटयाने 'मै आपकी तरह किताबे पढ़कर नहीं आता, मगर मैं जमीन से जुडा हुआ इन्सान हूँ' या एकाच वाक्यात यांचे बुरखे कसे टराटरा फाडले, हेही जनतेनं नीटच पाहिलं! चिदंबरम यांनीही गुलाम नबी यांना भक्कम साथ दिली! 

सरकारच्या या निर्णयाला देशभरातून मिळणारा पाठिंबा बघून कॉंग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ताबडतोब आपली भूमिका जाहीर केलीय - 'काँंग्रेस सत्तेत आल्यावर 370 कलम पुन्हा लागू करेल!' असं म्हणत स्वत:सह पक्षाच्याही पुढच्या पराजयाची बेगमीच करून ठेवलीय. त्यांच्या आजवरच्या राजकीय समजेला सुसंगतच आहे ही प्रतिक्रिया! आता सिध्दूच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा आहे! 

पक्षाचे जुने-जाणते नेते, ज्यांनी प्रत्यक्ष जमिनीवर काम केलं आहे, त्यांना मात्र काहीतरी चुकतंय याची जाणीव झाली आहे. पक्षाचे राज्यसभेतले प्रतोद भुवनेश्वर कलिकांनी राजीनामा देऊन या विरोधाची सुरुवात केली आणि त्यानंतर जनार्दन द्विवेदी, दीपेंद्रसिंह हुद्दा, राजा हरीसिंह यांचे पुत्र डॉ. करण सिंह यांनी तर उघडपणे या निर्णयाचं समर्थन केलं आहे. पक्षाचे युवा नेते ज्योतिरादित्य सिंदिया, मिलिंद देवरा यांनाही आपल्या राजकीय भविष्याची चिंता आहे, यांना लोकसभेत निवडून यायचं आहे, त्यामुळे जनमानसाचा कौल जाणणं क्रमप्राप्त आहे, त्यामुळे त्यांनीही शहाणपणाची भूमिका घेतली आहे. आता त्याचं बक्षीस म्हणून त्यांची पक्षातून हकालपट्टी झालीच, तर भाजपाची दारं त्यांच्यासाठी खुली असतील! बाकी पक्षाच्या जनेऊधारी माजी अध्यक्षांनी या विषयावर श्रावणात दिलेली खास प्रतिक्रिया अत्यंत उच्च कोटीची आहे. सर्वसामान्यांना त्याचा अर्थ लागणे शक्यच नाही, उच्च बुध्दिमत्तेच्या पुरोगामी विचारवंतांनाच फक्त त्यामागची दूरदृष्टी आणि गहन अर्थ कळू शकतो. 

असो! या निमित्ताने एक बरे झाले.. पक्षाचा गोंधळ दूर व्हायचा तेव्हा होवो बापडा! पण जनतेच्या मनातले उरलेसुरले भ्रम मात्र दूर झालेत. पुढल्या निवडणुकीत कोणाला निवडून द्यायचे, याचे स्पष्ट निर्णय त्यांना घेता येतील. 

जमिनीपासून दूर असलेल्या, भारतीय जनमानसाची नाळ न जाणणाऱ्या उच्चभू्र, बुध्दिजीवी वर्गाला नेहंरूनी छोटी-मोठी आमिषं देत स्वत:भोवती खेळवलं आणि सत्ता राखली होती. त्यांचे वारसदार मात्र स्वत:च या बुध्दिजीवी वर्गाच्या हातातलं खेळणं बनलेत. त्यांनी जो भारत यांना दाखवला, तोच ह्यांनी पहिला. ह्या खेळात सत्ता मात्र गेली आणि आता काश्मीरही हातचं गेलं हो! आता भानावर येण्यासाठी एकदा खरंच अमरनाथला जाऊन भोलेबाबाचा कडक प्रसाद प्राशन करण्याची गरज आहे. त्याशिवाय कोणी यांना वाचवू शकणार नाही.तोपर्यंत लाडूवाटपाचा कार्यक्रम चालू राहू देत!
 - भटकबहाद्दर