एपिक्टेटस - स्टॉइसिझम

विवेक मराठी    13-Aug-2019
Total Views |

****रमा दत्तात्रय गर्गे****

 

'स्टॉइसिझम' हा सिध्दान्त मांडणारा तत्त्वज्ञ म्हणजे एपिक्टेटस. स्टॉइसिझममधील सर्वात महत्त्वाचे तंत्र म्हणजे नकारात्मकतेच्या टोकाचे चिंतन. एपिक्टेटस आणखी एक विभागणी करायला सांगतो, ती म्हणजे आपल्या नियंत्रणात असलेल्या बाबी आणि नियंत्रणाबाहेरच्या बाबी! ही यादी तयार असली की मनुष्य परिस्थितीला दोष देत बसत नाही.
  

 

 

काही वर्षांपूर्वी 'पक पक पकाक' नावाचा चित्रपट खूप गाजला. भुत्या आणि त्याला भेटलेला चिखलू यांची ही कथा. नाना पाटेकर यांनी त्यात वैद्याची भूमिका केली होती. नाडीपरीक्षणात अत्यंत कुशल असलेला हा वैद्य पंचक्रोशीत प्रसिध्द असतो. गावच्या पाटलाच्या मुलाला ज्वर होतो, वैद्य त्यावर औषधेही देतो. त्याच रात्री कोणातरी दुसऱ्या गावच्या व्यक्तीला सर्पदंश झाला म्हणून जातो, तो इकडे पाटलाचा मुलगा मरण पावतो. वैद्य गाव सोडून गेलाच कसा म्हणून चवताळलेला पाटील रागाच्या भरात वैद्याचे घर जाळून टाकतो. त्यात त्याची बायको व मुलगा भस्मसात होतात.

 

 

गावात परत आलेला वैद्य हे भयंकर दृश्य पाहून स्तंभित होतो आणि काहीच न सुचून आक्रोश करत पळत सुटतो. माणसांपासून दूर, एका जंगलात येतो. पशु-पक्ष्यांवर उपचार करतो, मैत्र जोडतो. तिथेच 'भुत्या' म्हणून राहतो. चिखलू नावाच्या मुलामुळे तो परत माणसात येतो. गणपत वैदू हे नाव धारण करून जगण्याचे ठरवतो. 

 

 

आता आपल्याला वाटते, की त्या जुन्या गावचा पाटील परत कथेत येईल. सूड किंवा पश्चात्तापाचे नाटय घडेल. पण असे काहीच घडत नाही. अन्याय घडलेला असूनही हा वैदू मात्र शांत राहतो. विधायक काम करीत असतो. पण पाटलाच्या दिशेने काहीच करत नाही. जणू काहीच घडले नाही असे नवीन आयुष्य सुरू करतो. 

 

 

तो गप्प का राहिला? तरीही मनाने स्वस्थ कसा? याचे उत्तर आहे एपिक्टेटसचा स्टॉइसिझम हा सिध्दान्त. हा सिध्दान्त म्हणतो, 'त्याची बाजू बरोबर होती म्हणून तो गप्प राहिला.'

 

 

हा सिध्दान्त व्याख्येनुसार पुढीलप्रमाणे आहे - 'स्टॉइसिझम' म्हणजे मनात येणाऱ्या विनाशकारक भावनांपासून स्वसंरक्षण व दृढता शिकवणारे, मनुष्याला स्पष्ट निर्णय घेण्यास शिकवणारे, आंतरिक शांती प्रस्थापित करणारे तंत्र!

 

 

हा सिध्दान्त मांडला एपिक्टेटस याने. हा एपिक्टेटस इसवीसन 55मध्ये तुर्कस्तानच्या फ्रीजिया भागात जन्मला. हा गुलाम परिवारात जन्मलेला मुलगा! बालपणापासून आपल्या कुटुंबीयांचे, नातेवाइकांचे पिचलेले जगणे, इतरांचे उद्दाम जगणे पाहत मोठा झाला. त्याच्या बुध्दीच्या जोरावर त्याने कष्टाने शिक्षण पूर्ण केले.

 

 

अथेन्समधील स्टॉइक पोर्च या इमारतीमध्ये एपिक्टेटस तत्त्वज्ञान शिकवत असे. त्या काळामध्ये ग्रीक तत्त्वज्ञानाचे मुख्य स्वरूप हे बुध्दिविलास, राजकीय व्यवस्था आणि सामाजिक विचार मांडणे एवढयापुरतेच मर्यादित होते. साधारणपणे कोणतेही तत्त्वज्ञान हे मनुष्याच्या अनुभवांचे व्यवस्थापन करत असते. ग्रीक तत्त्वज्ञानात प्लेटो-ऍरिस्टॉटल यांच्या वैश्विक परिमाण लाभलेल्या प्रतीकात्मक आणि उच्च व अमूर्त अशा चिंतनाची परंपरा होती.

 

 

अशा या परंपरेला झेनो आदी तत्त्वज्ञांनी सुरुवातीला थोडे हादरे दिले. कोणतेही तत्त्वज्ञान हे 'जगता' आले पाहिजे, त्याला मानवी हृदय असले पाहिजे असा विचार पुढे येत गेला आणि पाश्चात्त्य तत्त्वचिंतनात ज्याला 'दर्शन' म्हणता येईल असे तत्त्वज्ञान जन्माला आले, ते म्हणजे 'स्टॉइसिझम' होय.

 

 

एपिक्टेटसचा शिष्य अरियन याने आपल्या गुरूच्या तंत्राचा संकलित ग्रंथ तयार केला, 'द डिस्कोर्सेस' नावाचा.

 

 

यामध्ये मांडलेला हा अनुद्वेगाचा सिध्दान्त खूपच विशेष आहे. जेव्हा आपण योग्य आहोत असे आपल्याला वाटते, तेव्हा आपण स्वाभाविकपणे आक्रमक होतो. बाजू मांडत असताना आपला आवाज चढतो. पण त्याच क्षणी 'आवेगरहित' होण्याची कला जर आपण आत्मसात केली, तर आपली मानसिक ऊर्जा वाचते. त्याचबरोबर मेंदू दिवसभरात होऊ घातलेल्या थकव्यापासून वाचतो.

 

 

एपिक्टेटस म्हणतो, ''काही जणांना तुम्ही समजावून सांगूच शकत नसता. It is impossible for a man to learn, what he thinks he already knows.'' अशा वेळी आपली मन:शांती पणाला न लावणे शिकले पाहिजे. 'स्टॉइसिझम' आपल्याला वाद न घालण्याची कला शिकवतो.

 

 

त्यासाठी वेगवेगळया अध्यायांमध्ये वेगवेगळी तंत्रे सांगितली आहेत. ही तंत्रे अवलंबण्याआधी एपिक्टेटस म्हणतो की, आपण स्टॉइसिझम पाळत आहोत हे पूर्णत: गुपित असले पाहिजे. मित्र, शेजारी, नातेवाईक, सहकारी कोणालाही याविषयी सांगू नये.

 

 

याच नियमाला जोडून आणखी एक नियम म्हणजे स्टॉइसिझमध्ये सांगितलेली सगळी तंत्रे एकदम वापरू नयेत. एका वेळी एक तंत्र, काही ठरावीक काळ अवलंबवावे. त्या विषयीचे अनुभव रात्री उशिरा, सगळे जग झोपल्यानंतर लिहून ठेवावे. स्टॉइसिझममधील सर्वात महत्त्वाचे तंत्र म्हणजे नकारात्मकतेच्या टोकाचे चिंतन - जेव्हा कशाहीविषयी आपल्याला ताण येतो, उद्विग्नता येते, तेव्हा त्याविषयी वाईटात वाईट काय होऊ शकेल याचा विचार शांतपणे करावा. त्यानंतर सद्यःस्थिती कोणत्या बिंदूवर आहे हे पाहावे. या रेषेचे स्पष्ट दर्शन आपल्याला खूप काही शिकवून जाते.

 

 

एपिक्टेटस आणखी एक विभागणी करायला सांगतो, ती म्हणजे आपल्या नियंत्रणात असलेल्या बाबी आणि नियंत्रणाबाहेरच्या बाबी! ही यादी तयार असली की मनुष्य परिस्थितीला दोष देत बसत नाही. जेवढे हातात आहे त्यावर लक्ष केंद्रित करतो.

 

एपिक्टेटस म्हणतो, तुम्ही कोण आहात, काय आहात हे तुमचे तुम्हाला ठाऊक असले की पुरेसे असते. ते सिध्द करण्यामध्ये आपण जो वेळ आणि श्रम वापरतो, तोच एखाद्या विधायक कामामध्ये वापरावा. कारण कोणतीही परिस्थिती तुम्हाला 'स्व-परिचय' करून घेण्याची एक संधी असते, ती इतरांसाठी वाया घालवणे आणि अशांती मिळवणे हे चूक आहे.

 

ईश्वराबाबत एपिक्टेटस म्हणतो, ''ईश्वर असेल तर जगात वाईट गोष्टी का आहेत असा प्रश्न पडतो. ईश्वर वाईटपणा मिटवू शकतो का? की ते त्याला येत नसावे? की ते त्याला करायचेच नसेल? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यापेक्षा कोणत्याही परिस्थितीत 'आत्मशांती' राखता येण्याची शक्ती परमेश्वराने दिली आहे, याकडे लक्ष द्यावे.' भगवान गौतम बुध्दांनी ज्याप्रमाणे आत्मा, पुनर्जन्म, स्वर्ग इत्यादींवर मौन बाळगले आणि केवळ दु:ख दूर करण्याच्या मार्गावर लोकांचे लक्ष केंद्रित करवले, त्याच प्रकारचे सिध्दान्त एपिक्टेटस मांडतो.

 

अंतरंग लिखाणाबाबत एपिक्टेटस म्हणतो, 'लिहित राहा, म्हणजे तुम्ही काय विचार करता ते तुमचे तुम्हाला कळत जाईल.'

 

 

स्टॉइसिझम हे केवळ तत्त्वज्ञान नाही, तर जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करणारे 'दर्शनशास्त्र' आहे. नियतीला शांतपणे स्वीकारणे आणि मनुष्य म्हणून स्वत:ला मर्यादा व शक्तिकेंद्रांना ओळखणे म्हणजे जीवन! संपूर्ण विश्व हे परस्परावलंबी आहे. आपण एकाच नगराचे रहिवासी आहोत. तेव्हा दुसऱ्याचे अहित न करता जगता येणे म्हणजे खरे जीवन.

 

शांती आणि प्रसन्नता हे दोनच मार्ग जीवनातील सर्व समस्यांचे समाधान आहे. कुणी तुम्हाला चूक म्हणत असेल तर स्वत:कडे पाहा. ते खरे असेल तर सुधारणा करा आणि नसेल तर विसरून जा. सिध्द करण्यात वेळ घालवू नका.

 

 

कोणतेही सत्य शोधण्यास निघू नका आणि स्वत:च्या आतही कोणता शोध घेऊ नका. दैनंदिन जीवनातील कर्मे योग्य पध्दतीने करीत राहा. उद्वेगरहित असा. सत्य आणि स्व आपोआप तुम्हाला शोधत येतील. 

 

 

अमेरिकन लेखक मॅन्रॉ लिफचा फर्डिनंडसुध्दा असेच म्हणतो, जेव्हा त्याला लढाईत बळजबरीने उभे केले जाते - 'फर्डिनंडने मनातल्या मनात पक्के ठरवले, या लोकांना काय हवे ते करू द्या. मी तरी कोणालाही मारणार नाही किंवा कोणाबरोबर लढाईसुध्दा करणार नाही. हे वागणे पाहून बँडवाले वैतागले आणि पिकाडोर तर वेडेच झाले. बिचारा मेटाडोर तर भडकलाच. आता कसला तो आपली लाल टोपी घालून तलवारीच्या करामती दाखवणार? काही शक्यच नव्हते.' हा फर्डिनंड म्हणजे स्टॉइसिझमचे खरे उदाहरण.

 

एपिक्टेटस एक वेगळाच दार्शनिक होता. त्याचे चिंतन जीवन जगण्यासाठी जगताना वापरण्यासाठी होते. 'भविष्यात कोठे स्वर्ग आहे की नाही मला माहीत नाही, मात्र भयभीत होऊन जगणे म्हणजे नरकात असणे आणि शांतिपूर्ण जगणे म्हणजे स्वर्गात असणे असे मी मानतो' असे सांगणाऱ्या या दार्शनिकाच्या दर्शनाला मानणाऱ्यांची आज जगात मोठी संख्या आहे.