माहीमकरांच्या मनात घर करणारा जनसेवक सचिन शिंदे

विवेक मराठी    20-Aug-2019
Total Views |

स्वयंसिध्द झाल्यानंतर आपण समाजाचं काही देणं लागतो या भावनेतून लोकांसाठी सतत काहीतरी करत राहणं ही ज्यांची निरंतर ओळख बनली आहे, ती व्यक्ती म्हणजे माहीममधील प्रसिध्द उद्योजक आणि भाजपाचे कार्यकर्ते सचिन शिंदे. आज या मराठी उद्योजकाने मुंबईच नव्हे, तर महाराष्ट्राचीही वेस ओलांडून देशाच्या दक्षिणेकडील आणि उत्तरेकडील राज्यांमध्येही आपल्या व्यावसायिक कौशल्याची छाप पाडली आहे, ती पाहिली की अथक मेहनत करून आणि बुध्दिकौशल्याचा यथायोग्य वापर करून त्यांनी हे शिखर कसे गाठले असेल याच्याविषयीची उत्सुकता वाढते. या उस्तुकतेपोटीच साप्ताहिक विवेकच्या टीमने त्यांच्या एकूणच सामाजिक आणि राजकीय जडणघडणीविषयी त्यांच्याशी संवाद साधण्याचे ठरवले.


वरळी, माहीम, प्रभादेवी या भागातली वस्ती संमिश्र आहे. एकीकडे उच्चमध्यमवर्गीय, टॉवरमधील श्रीमंत वर्ग आहे. दुसरीकडे आजही अनेक चाळीत मध्यमवर्गीय माणूस प्रगतीच्या आशेने दिवस कंठत आहे. इथल्या समस्या वेगळया आहेत. वातावरण वेगळे आहे. वर्षानुवर्षे हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन असे विविध धर्मांचे लोक येथे एकोप्याने राहत आहेत. सर्वधर्मीय सण, उत्सव येथे मोठया उत्साहाने साजरे होतात. या सर्व सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांत लागेल ती मदत करण्यास सचिन शिंदे ही व्यक्ती नेहमी पुढे असते. या भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ते कायम त्यांच्या संपर्कात असतात आणि सोडवण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न करतात.

संघर्षाचे दिवस आणि जडणघडण

80-90च्या दशकात मुंबईतला काळ कठीण होता. आजघडीला उद्योग क्षेत्रासाठी अनेक नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. भाजपाच्या कार्यकाळात तर स्टार्टअपला प्रोत्साहन मिळत असल्याने अनेक तरुण मुलं उद्योगाकडे वळत आहेत, पण आमच्या तरुणपणी असं वातावरण नव्हतं, असं सचिनजी आवर्जून सांगतात. मराठी तरुणाने व्यापार करायचा म्हटलं की त्याला घरातूनच विरोध असायचा. नोकरीसाठी आईवडिलांचा, नातेवाइकांचा दबाव असायचा. पण या बाबतीत आपण थोडं सुदैवी असल्याचं ते आवर्जून सांगतात. बालमोहनसारख्या उकृष्ट दर्जाच्या शाळेत त्यांचं शालेय शिक्षण झालं. तिथे शिक्षणाबरोबरच उद्योग क्षेत्राविषयीचे कुतूहलही त्यांच्या मनात रुजलं. कारण बालमोहनमधील अनेक वर्गमित्रांचे पालक उद्योजक होते. त्यांच्याशी बोलताना, त्यांच्यासोबत वावरताना आपणही उद्योग क्षेत्रात काही तरी केलं पाहिजे अशी सुप्त इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली होती. अर्थातच हे एका रात्रीत साध्य होणार नाही याची जाणीव सचिनजींनाही होती.

उद्योग झेप

'कोल्ड चेन मॅनेजमेंट' हे आपलं कार्यक्षेत्र सुरुवातीलाच निश्चित करून त्यांनी या क्षेत्रातच आपले सर्व शिक्षण पूर्ण केलं. 10 ते 5 या नोकरीत रमणारा त्यांचा स्वभाव नव्हता, आपण स्वतः रोजगार निर्माण करावा अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे अल्पावधीतच त्यांनी स्वतःचा उद्योग सुरू केला. आज त्यांची फमएफएमसीजी कंपन्यांना कोल्ड चेन मॅनेजमेंटच्या सर्व सुविधा पुरवून त्याविषयी मार्गदर्शन करून त्यांच्या गरजेनुसार योग्य पर्याय उपलब्ध करून देते. एखादं उत्पादन तयार झाल्यापासून ते वितरकांकडे पोहोचेपर्यंत आणि तिथून ग्रााहकाच्या हातात जाईपर्यंत त्याचं तापमान संतुलित ठेवण्याची सर्व जबाबदारी सचिनजींची कंपनी सांभाळते, यालाच कोल्ड चेन मॅनेजमेंट म्हणतात, मग ते एखादं महागडं चॉकलेट असो किंवा कोल्ड्रिंक. ते योग्य तापमानात ग्रााहकाला सर्व्ह झालं नाही, तर त्याचा काय उपयोग? म्हणूनच या क्षेत्रातले बारकावे जाणून ते कन्सल्टन्सी देतात आणि त्यासाठी त्या कंपन्यांचे ऍसेट मॅनेजमेंटही करतात.

आज एफएमसीजी क्षेत्रातील अनेक मोठमोठया कंपन्या त्यांच्या ग्रााहक आहेत. उद्योग सुरू झाल्यापासून आजतागायत त्यांच्या व्यवसायाचा विस्तार कैक पटींनी वाढला आहे, अर्थातच त्यामुळे होणाऱ्या रोजगार निर्मितीतही मोठी भर पडली आहे. मराठी माणसाचा स्वभाव प्रामाणिकपणे बिझनेस करण्याचा आहे आणि त्यामुळे अनेक चांगल्या मल्टिनॅशनल कंपन्याही मराठी उद्योजकांसह काम करण्यास उत्सुक असल्याचं ते आवर्जून सांगतात.

अभाविपचा कार्यकर्ता ते भाजयुमोचं दक्षिण मुंबई अध्यक्षपद

पहिल्यापासूनच अंगात समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ होती. आपल्यासारखंच लोकांना सक्षम करण्याची धडपड होती, या ना त्या कारणाने लोकांच्या मदतीला धावून जाण्याचा स्वभाव होता आणि मुख्य म्हणजे अंगात नेतृत्वगुण होता, गुणग्रााहकता आणि दानतही होती. 23 वर्षांपूर्वी आयुष्यात राजकारणाचा '' गिरवला गेला तो अभाविपच्याच माध्यमातून. अभाविप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा यांच्या विचारांशी नाळ जोडली गेली आणि समाजकारणाचा नवा अध्याय सुरू झाला. अभाविपच्या माध्यमातून कॉलेजवयीन तरुणांच्या अनेक छोटयामोठया समस्या त्यांनी हाती घेतल्या. मग त्यांच्या प्रवेशासंबंधीच्या अडचणी असोत वा प्रवेश घेतल्यानंतरच्या. वरिष्ठ नेतृत्वाने त्यांच्यातील हे गुण हेरले. तरुणांना, सच्च्या कार्यकर्त्यांना संधी देण्याची भूमिका पक्षामार्फत नेहमीच सचोटीने राबवली जात असल्याने भाजयुमोच्या दक्षिण मुंबई अध्यक्षपदावर त्या काळी सचिनजींची नियुक्ती करण्यात आली. कामाची जबाबदारी आणखी वाढली.


''अभाविपमुळे आम्ही महाविद्यालयीन जीवनात इतर विद्यार्थ्यांपेक्षा वेगळं असं काहीतरी विधायक काम करत असल्याची जाणीव झाल्याने त्याचा अभिमानही वाटत होता. त्या वेळच्या त्या छोटया छोटया गोष्टीतून खूप आनंद, समाधान मिळत असे'' असं सांगताना, जुन्या आठवणींनी त्यांचा चेहरा आजही खुलून जातो.

देणाऱ्याने देत जावे

कॉलेजनंतरच्या आयुष्यात असे समाधान देणारे क्षण दुर्मीळ होतात. पण सचिनजींनी नंतरच्या आयुष्यातही लोकांना आनंद देऊन हे समाधानाचे क्षण मिळवले. गिरणगावातील उत्सवी आणि सांस्कृतिक वातावरणात ते कायमच आपल्या मित्रमंडळींसह सहभागी असायचे. दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्र यांसारख्या उत्सवांमध्ये कार्यकर्त्यांची मोठी फौज जशी आवश्यक असते, तशी आर्थिक भार पेलणाऱ्या सक्षम हातांचीही गरज असते. कधी दहिहंडीसाठी आर्थिक साहाय्य कर, तर कधी गणेशोत्सवाच्या सजावटीच्या खर्चासाठी मदत कर, असे करता करता सचिनजी या उत्सवांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांशी जोडले गेले ते आजतागायत. केवळ गणपती, नवरात्र यासारख्या सणापुरते ते मर्यादित राहात नाहीत, तर मंगळागौर वा हळदीकुंकू असो, क्रिकेट, कबड्डी अथवा मुंबईस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धा असो, किंवा ब्रास बँड वा नृत्य-नाटय महोत्सव अनेक कल्पक उपक्रम ते हाती घेतात, सांस्कृतिक-सामाजिक उपक्रम करत राहणाऱ्यांना जी लागेल ती मदत करतात. अशा अनेक माध्यमांतून त्यांची दानशूरता अनुभवायला मिळाल्याचे माहीम, प्रभादेवीमधला कोणीही कार्यकर्ता सांगेल. त्यांची देण्याची वृत्ती पाहून कोणी गरजू मुलांच्या वह्या-पुस्तकांसाठी, शाळेची-कॉलेजची फी भरण्यासाठी मदत मागायचे. सचिनजींनी स्वत: हा संघर्ष पाहिला होता. काही पालकांसाठी एक-दोन हजार रुपये फी भरणंही कठीण असतं याची जाणीव त्यांना होती. ते सढळ हस्ते अशांना मदत करत राहिले. आपल्या परिसरात शक्य होतील ती लोकोपयोगी कामं निरपेक्षपणे करायची, हेच त्यांचं गेल्या कित्येक वर्षांपासून ध्येय बनलं आहे.

ही देण्याची वृत्तीच आजकाल हरवत चालली आहे आणि द्यायचे असेल तरी त्यात गरजूंना मदतीच्या भावनेपेक्षा स्वतःच्या नावाचा गजर करण्याची धारणाच अधिक दिसते. सचिनजींची भूमिका मात्र प्रसिध्दीपासून दूर राहून, पडद्यामागून कार्य करण्याची होती. इतकंच नाही, तर जे करायचं ते गुणात्मकदृष्टया उच्च दर्जाचं आणि निर्हेतुकपणे ही त्यांची भावना खरंच कौतुकास्पद आहे. दर वर्षीप्रमाणे या वर्षीसुध्दा त्यांनी जवळपास 20 हजार लाँग नोटबुक्स विभागातील मुलांना वाटल्या. पण त्यासाठी कोणताही मोठा समारंभ आयोजित केला नाही, तर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या विभागात विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचून, त्यांच्या घरी जाऊन त्या वह्या वितरित केल्या. यामुळे दोन गोष्टी होतात - ती मदत घेणाऱ्याचाही सन्मान राखला जातो, शिवाय पक्ष हा घराघरापर्यंत, घरातल्या प्रत्येकापर्यंत पोहोचतो.


सचिनजी सांगतात
, ''वह्यांच्या निर्मितीमूल्याविषयीसुध्दा आम्ही जागरूक राहिलो. मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ आम्ही आकर्षकरीत्या डिझाइन करून घेतले होते. खाकी कव्हरच्या मुखपृष्ठावर प्रेरणादायक किंवा रंजक वाक्य दिली आहेत, जेणेकरून वापरणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या मनापासून आवडतात.''

 

'मला जग जिंकायचंय', 'चला, दिल से अभ्यासाला लागा', 'भोपळा दिसायला सुंदर दिसतो, पण उत्तरपत्रिकेवर नाही' अशी वाक्य कोणाला बरं आवडणार नाहीत? अनेकांनी त्याविषयीच्या चांगल्या प्रतिक्रिया सचिनजींना दिल्या. कोणतीही गोष्ट देताना गुणवत्तेच्या बाबतीत तडजोड करायची नाही आणि ती स्वीकारताना समोरच्याच्या मनात कुठेही कमीपणाची भावना निर्माण होऊ नये या दोन बाबतीत ते कायम जागरूक राहतात. त्यामुळेच दिवाळीला त्यांनी भेट म्हणून दिलेले बॉक्स माहीमकरांना मनापासून भावले. काय होतं त्या बॉक्समध्ये? चांगल्या दर्जाचं उटणं, अभ्यंगस्नानाची ओळख बनलेला मोती साबण, रांगोळयांची पाकिटं आणि दोन दिवे.

 

सचिनजी सांगतात, ''भेटवस्तू देताना समोरच्या व्यक्तीचा सन्मान कसा राखला जाईल याची आवर्जून काळजी मी घेतो.'' उदाहरणादाखल ते म्हणतात की ''दिवाळीच्या काळात दरवाजातून फेकलेल्या उटण्याच्या पाकिटाचा अनुभव आपल्यापैकी प्रत्येकाने घेतला असेल. अशा गोष्टी या ती भेटवस्तू घेणाऱ्याला अपमानास्पद वाटतात. मला स्वतःला या गोष्टीचा प्रचंड तिटकारा आहे. त्या फेकण्यातून नकारात्मक भावना घेणाऱ्याच्या मनात तयार होते. मी त्यावर वेगळया प्रकारे विचार केला आणि हा आकर्षक डिझाइन असलेला बॉक्स तयार करून घेतला. हा बॉक्स आम्ही माहीममध्ये घरोघरी जाऊन वाटला. हजारो घरांमध्ये ही भेटवस्तू गेली. हजारो माणसं यातून आपुलकीच्या दिव्याने जोडली गेली. या वेगळया संकल्पनेचे सगळयांनी स्वागत केले. लोक प्रत्यक्ष भेटून तो बॉक्स आवडल्याचे सांगत होते.'' अशा शब्दात सचिनजींनी ही आगळीवेगळी दिवाळी भेट देण्याचा आनंद व्यक्त केला.

 

क्लीन वॉटर प्रोजेक्ट


सचिनजींच्या कल्पक विचारातून सुचलेल्या वेगवेगळया उपक्रमांत सगळयात लोकप्रिय ठरला तो
'क्लीन वॉटर प्रोजेक्ट'. बहुतेकदा आजारांना कारणीभूत ठरते ते दूषित पाणी. सचिनजींना जेव्हा या दूषित पाण्यामागचं एक महत्त्वाचं कारण लक्षात आलं, तेव्हा त्यांनी त्याच्या निवारणार्थ मोहीमच सुरू केली. ही मोहीम म्हणजे सोसायटीची पाण्याची टाकी स्वच्छ करण्याची. अनेक सोसायटयांमध्ये अंडरग्रााउंड तसंच ओव्हरहेड अशा पाण्याच्या टाक्या असतात. पण वर्षानुवर्षं त्या शास्त्रशुध्द पध्दतीने साफच झालेल्या नसतात. टाक्या बंद असतात, त्यात कचरा जाणार नाही अशी लोकांची समजूत असते. पण पाण्याच्या माध्यमातून थोडा थोडा गाळ जाऊन टाकीच्या तळाशी घाण तयार होते, याकडे अनेकदा दुर्लक्ष होतं. सिमेंटच्या टाक्या नियमित स्वच्छ न केल्यास अनेकदा त्यावर काही रोपटी उगवतात. त्यामुळे टाकीला तडा जाऊन गळती होऊ लागते. अशा अनेक समस्या मग यावरच्या अभ्यासाने समोर आल्या. सचिनजींनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून माहीममधील अनेक सोसायटयांशी संपर्क साधला. त्यांना कळवले की जर तुम्हाला सोसायटीची पाण्याची टाकी साफ करून घ्यायची असेल, तर त्याबाबतचे एक निवेदन द्या. त्याला सोसायटयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कामाचा व्याप एवढा वाढला की क्लीन वॉटर प्रोजेक्टसाठी खास दोन एजन्सी नेमाव्या लागल्या. दिवसाला दोन ते तीन ठिकाणी या पावसाळयापर्यंत हे काम सुरू होते. सचिनजी सांगतात, ''लोकांनी जेव्हा त्यांच्या सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या साफ होत असताना त्यात किती कचरा असतो ते पाहिले, तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. आम्ही या टाक्या साफ करण्याच्या प्रक्रियेचे व्हिडिओ बनवले आणि ते सोशल मीडियावर प्रसिध्द केले. ते पाहिल्यानंतर लोकांमध्ये या विषयाविषयी जागृती निर्माण झाली. आता लोक स्वत:च सहा महिन्यांनी फोन करून टाकी साफ करण्याविषयी आठवण करून देतात. या उपक्रमामुळे दूषित पाण्यामुळे त्या भागात होणाऱ्या आजारांचं प्रमाणही खूप कमी होत आहे. माहीममधल्या आतापर्यंत सुमारे 90 सोसायटयांतून हे काम झालं आहे आणि अजूनही त्याबाबत विचारणा सुरूच असते. अनेक सोसायटयांचे अध्यक्ष, सेक्रेटरी मला येऊन भेटले आणि या कामाचं कौतुक केलं, तर काहींनी पत्राद्वारे कळवलं.''


लोकोपयोगी उपक्रम

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाच्या अनुषंगाने त्यांनी माहीम, प्रभादेवी परिसरात काही उपक्रम हाती घेतले. बऱ्याच सोसायटयांमध्ये कचऱ्याचे डब्बे नसतात. मग त्यांनी अशा सोसायटयांना ओला कचरा आणि सुका कचरा व्यवस्थापनासाठी मोठया आकाराच्या हिरव्या आणि निळया अशा दोन रंगांच्या कचरा कुंडयांचं वाटप केलं.


पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने त्यांनी वृक्षारोपणाबाबत जनजागृती केली. केवळ वृक्षारोपणावर भर न देता वृक्षसंवर्धनाची मोहीम राबवली. तसेच ज्या ठिकाणी जागेअभावी नवी झाडं लावणं शक्य नसेल
, तेथील लोकांनी आहे त्याच वृक्षांना जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे, याबाबत ते सातत्याने प्रबोधन करतात.

माहीम, प्रभादेवी परिसरातील पार्किंगची समस्या ही रोजचीच डोकेदुखी बनली होती. सचिनजींनी त्यासाठी पुढाकार घेतला. गल्ली-बोळात जिथे डबल पार्किंग केलं जात होतं, तिथे सिंगल पार्किंगसाठी त्यांनी आरटीओशी संपर्क साधला. सातत्याने पाठपुरावा करून काही खाजगी बांधकाम व्यावसायिकांनी बांधलेल्या इमारतीत पालिकेच्या मध्यस्थीने आजूबाजूच्या लोकांसाठीही पार्किंगची व्यवस्था होऊ शकते का, ते पाहिलं. तसंच माहीममधील टोलेजंग टॉवर्सच्या व मॉलच्या बेसमेंटमध्येही बाहेरच्यांसाठी पार्किंगची व्यवस्था कशी करता येईल याचा विचार केला. या विषयीचे काही प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून नजिकच्या काळात त्याला वेग येईल.


'मैत्री फाउंडेशन' या आपल्या संस्थेच्या माध्यमातून सचिनजी रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करतात. तसंच वनवासी भागांसाठीही ही संस्था काम करते. वाडा, जव्हार या भागात आजही आरोग्य व्यवस्थेची परिस्थिती फारशी बदलललेली नाही. त्यामुळे या संस्थेचे कार्यकर्ते प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी या भागात जाऊन आरोग्य सेवा उपलब्ध करून देतात. त्यांच्याबरोबरचे डॉक्टर तेथे रुग्णांना तपासतात. माहीम भागातील मेडिकलमध्ये येणारी औषधांची फ्री सॅम्पल्स येथील रुग्णांना वाटली जातात.

अन्य सामाजिक संस्थांनाही ते सहकार्य करतात. अस्तित्व संस्थेतर्फे शिवाजी पार्कवर राबवण्यात आलेल्या 'अवयवदान जागरूकता'विषयक मोहिमेला त्यांनी मोठं सहकार्य केलं. तसंच 'जय फाउंडेशन' ही संस्था शनिवार-रविवार दोन दिवस दादर चौपाटीवरचं प्लास्टिक जमा करण्याचं काम करते. सचिनजींनी या उपक्रमात त्यांना भरघोस सहकार्य केलं.

पावसाळयातील सुरक्षेसाठी

पावसाळयाच्या दिवसांत सचिनजींची अनेक समाजोपयोगी कामं सुरू असतात. अनेक ठिकाणी वेडीवाकडी वाढलेली मोठी झाडं असतात. पावसाळयात ती कोसळून जीवित किंवा वित्तहानी होण्याचा धोका असतो. त्याबाबत पालिकेकडे निवेदन दिल्यास त्यांचे कर्मचारी येऊन त्या फांद्यांची छाटणी करते. सचिनजींनी अनेक सोसायटयांसाठी असं निवेदन देऊन फांद्यांची छाटणी करून घेतली. त्यासाठी जे काही नाममात्र शुल्क असतं, तेही त्यांनी स्वत:हून भरलं.

आपल्या परिसरात त्यांनी 'डेंग्यूमुक्त-मलेरियामुक्त माहीम' अभियान त्यांनी हाती घेतले. डेंग्यू, मलेरिया यांसारखे आजार पसरू नयेत यासाठी काय काळजी घ्यावी याबाबत पालिकेकडून एक माहितीपत्रक येतं. त्याच्या प्रती काढून त्या संपूर्ण परिसरात वाटल्या. या काळात ते वेगवेगळया वॉर्डमध्ये आरोग्य शिबिरांचेही आयोजन करतात.

मनं जिंकणारा समाजसेवक


एरव्ही स्वत:ला सामाजिक कार्यकर्ते म्हणवणारे लोक आपल्या ऑफिसात बसतात आणि लोक त्यांच्याकडे आपल्या समस्या घेऊन जातात. सचिनजींच्या बाबतीत मात्र प्रकार वेगळा असतो. सचिनजी लोक त्यांच्यापर्यंत येण्याची वाट कधीच बघत नाहीत. लोकांच्या समस्या जाणून घेऊन स्वत: लोकांपर्यंत पोहोचतात आणि त्यांना लागेल ते सहकार्य करतात.

सचिनजींचं वैशिष्टय म्हणजे ते करत असलेल्या गोष्टी दिसायला छोटया दिसत असल्या, तरी सामान्य माणसाच्या आयुष्यात मोठा परिणाम करणाऱ्या ठरतात. त्यातून केवळ संपर्क म्हणून माणसं जोडली जात नाहीत, तर ती मनानेही जोडली जातात. त्याचं एक छोटं उदाहरण म्हणजे काही ठिकाणी ज्येष्ठ नागरिक संध्याकाळी फिरायला जातात. त्यांना खूप वेळ बसायला जागा नसते. अशा ठिकाणी सचिनजींनी बसायला बेंचेसची व्यवस्था केली. मग काही ज्येष्ठ नागरिक त्यावर बसल्यानंतरचा सेल्फी काढून सचिनजींना पाठवतात. ही त्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया म्हणजे समाधानाची पावतीच असते.

अलीकडेच त्यांनी माहीममधील 'शिवाजी पार्क लायन्स स्कूल फॉर डेफ' या कर्णबधिर मुलांच्या शाळेत एका कलाविषयक संस्थेच्या माध्यमातून आठवडयाला एक याप्रमाणे वर्षभर कलावर्गाचा उपक्रम हाती घेतला आहे. समाजाच्या सर्वच प्रवाहातील प्रत्येकासाठी काही ना काही करत राहण्याचा त्यांचा स्वभाव आणि उमेद नक्कीच मनाला भावणारी आहे.

भाजपासारख्या लोकांसाठी झटणाऱ्या पक्षाचं सहकार्य आणि कार्यकर्त्यांची सेवाभावी वृत्ती या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. खूप काही करण्याची इच्छा असूनही अनेकदा त्याला मर्यादा पडतात, याची खंत मात्र सचिनजींना आहे. कारण अनेक कामं प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातूनच शक्य असतात, याचा अनुभव सचिनजींना आहे. तरीही लोकांसाठी ज्या गोष्टी करणं आपल्या हातात आहेत त्या करत राहायचं, या स्थितप्रज्ञ वृत्तीतून सचिनजींची ही वाटचाल अविरत सुरू आहे.