श्री शिवराय - अवतार नव्हे, महामानव

विवेक मराठी    20-Aug-2019
Total Views |

***डॉ अजित आपटे***

सुमारे सहा वर्षांपूर्वी मला पुणे विद्यापीठाची विद्यावाचस्पती (पीएच.डी.) ही पदवी मिळाली. विषय होता 'छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन शैलीचा चिकित्सक अभ्यास.' या विषयावरची ही पहिली पीएच.डी. शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन कौशल्यावर आधारित असा हा विषय.


 

हा विषय केवळ विद्यापीठाच्या पुस्तकांच्या/प्रबंधांच्या कपाटात बंद पडून राहू नये, म्हणून पुण्याच्या राजहंस प्रकाशनाच्या साह्यातून 'श्री शिवराय : M.B.A. Finance', 'श्री शिवराय : I.A.S.' आणि 'श्री शिवराय : V.P. H.R.D.' अशी तीन पुस्तकेही प्रसिध्द केली. त्यावर आजपर्यंत 200हून अधिक व्याख्यानेही दिली, यापुढेही देणार आहे. तथापि ह्या विषयाचा व्यापक प्रसार होण्यासाठी साप्ताहिक विवेकच्या संपादकांनी (दिलीप करंबेळकर व अश्विनी मयेकर यांनी) सुचविल्यानुसार ही लेखमालाही लिहितो आहे. ह्यात जे उत्तम, उदात्त आढळेल तर ते महाराजांचे आहे व काही न्यून असले तर ते मात्र माझे, ह्याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरची आणखी एक लेखमाला असे या मालिकेचे स्वरूप नसेल, तर शिवचरित्राची एक अलक्षित, दुर्लक्षित बाजू प्रकाशात आणणे हे तिचे प्रमुख उद्दिष्ट असेल. हातात भवानी तलवार घेऊन भगव्याचे रक्षण करणारी शिवप्रतिमा आज संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहे. काही प्रमाणात भारताच्या इतर राज्यांमध्येही ती माहीत आहे. शिवरायांचे हे एक रूप खरे आणि बरे असे दोन्ही आहे, पण तरीही ते अपूर्णच आहे. महाराजांच्या शतपैलू व्यक्तिमत्त्वाला ते संपूर्ण न्याय देत नाही. यातून 'स्वराज्यकर्ता' हे महाराजांचे रूप ठसठशीतपणे समोर येत असले, तरी 'सुराज्यकर्ता' हे त्यांचे अंतिम व परिणत रूप त्यातून समोर येत नाही आणि तिथेच ग्यानबाची मेख आहे!

शिवरायांनी साकारलेले 'स्वराज्य' आणि आताच्या भारताचे 'स्वराज्य' ह्या 'सिध्द' झालेल्या गोष्टी आहेत. त्यामुळे त्यासाठी नव्याने काही करण्याची गरज नाही. पण ह्या 'स्वराज्याचे' 'सुराज्य' जर झाले नाही, तर मात्र असलेले हे 'स्वराज्य' गमावण्याचा मोठा धोका आहे. तो कायमचा टाळायचा असेल, तर 'सुराज्य'कर्त्या महाराजांचा ध्यास घेणे अनिवार्य आहे. ह्या लेखमालिकेतून आपण तेच जाणून घेणार आहोत.

हिंदवी 'स्वराज्य' निर्माण करण्यासाठी आणि बळकट करण्यासाठी, वाढविण्यासाठी महाराजांनी जी काही कृत्ये केली, ती सर्वांना माहीत आहेत, कारण गेली कैक दशके त्यावर अनेकांनी अनेक मार्गांनी प्रकाश टाकलेला आहे. त्याचे स्मरण आजही आवश्यक आहे. तथापि ते करतानाच त्यांच्यातील 'सुराज्यकर्ता ' मात्र दुर्लक्षिला जातो. उदा., जावळीचे खोरे ताब्यात घेऊन मोऱ्यांचे निर्दालन करणारे शिवाजी महाराज सर्वांना माहीत असतात, पण जावळी ताब्यात आल्या आल्या तेथील प्रशासकीय व्यवस्था तातडीने सुरळीत करणारे महाराज सहसा कोणालाच माहीत नसतात. आज एकविसाव्या शतकात ह्या 'सुराज्यकर्ता' महाराजांचीच आपल्याला गरज आहे, कारण राजकीय 'स्वराज्य' असलेल्या आपल्या देशात प्रशासकीय 'सुराज्य' नाही, ही वस्तुस्थिती आहे.

महाराजांचे लष्करी पराक्रम अनन्यसाधारण होते यात काही शंका नाही, पण त्यांचा पिंड हा लष्करी मोहिमांपेक्षा रचनात्मक काम (Constructive) करण्याचाच जास्त होता. त्यांच्या एकूण 35 वर्षांच्या कारकिर्दीत सात ते सव्वासात वर्षांचा काळच लढाया, लढायांची पूर्वतयारी, लढायांचे परिणाम निस्तरणे यात गेलेला दिसतो. बाकीचा सुमारे 28 वर्षांचा काळ हा कुठल्या ना कुठल्या व्यवस्था बसविणे, सुधारणे, बळकट करणे ह्यातच गेला आहे. त्यामुळेच की काय, मराठयांच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक सुरेंद्रनाथ सेन असे म्हणत असत की, 'शिवाजी महाराजांच्या युध्दकौशल्यावर एकवेळ शंका घेता येईल, पण त्यांच्या प्रशासकीय कौशल्याबद्दल मात्र नाही.' ह्याच सेनांनी 'Military Systems of the Marathas', 'Administrative Systems of the Marathas' आणि 'Judicial Systems of the Marathas' असे तीन अभ्यासपूर्ण ग्रांथ लिहिले आहेत, हे इथे आवर्जून सांगितले पाहिजे. सुरेंद्रनाथ सेन यांना जे जाणवले, ते आपल्याला का नाही? हा प्रश्न मला पडल्यानंतर मी त्याची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पुढील दोन कारणे मला सापडली - शिवाजी महाराजांचे दैवतीकरण आणि समाज म्हणून आपल्याला असलेले त्यांचे रोमँटिक/भाबडे आकर्षण. त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये 'अफझलखानाच्या पोटापासून शाहिस्तेखानाच्या बोटापर्यंत, व्हाया आग्रा' एवढीच शिवचरित्राची जाण दिसते. (काही मूठभर अपवाद अर्थात आहेत, पण त्यांची संख्या व प्रभाव नगण्य आहे.)

महाराजांच्या हयातीतच त्यांना शिवाचा वा विष्णूचा अवतार मानायला सुरुवात झाली होती. ती समजूत आजही कायम आहे. त्यांना अवतार मानण्यास व्यक्तिश: माझी काहीही हरकत नाही. तथापि अवतारत्वामुळे किंवा देवत्वामुळे कोणाचाही अभ्यास होणे बंद होते, ही खरी समस्या आहे. शिवाजी महाराजांसारख्या लोकोत्तर माणसांचा सतत अभ्यास होणे त्यांच्यासाठी नाही, तर आपल्यासाठी फार गरजेचे आहे. पण कुठल्याही देवदेवतांचा/अवतारांचा 'अभ्यास' होत नाही (कारण तशी सवयच नाही), तर होते भक्ती. ह्या भक्तीमुळे ज्ञानाची एक खिडकी आपण 'श्रध्दापूर्वक' बंद करतो. त्यामुळे शिवजयंती-पुण्यतिथीचे Event जोरदार होतात आणि त्यासाठी चे पैसे संपले की पुढील वर्षापर्यंत शिल्लक राहते ती वांझोटी शांतता!

शिवाजी महाराजांना 'अवतार' न मानता 'महामानव' (Great Man) मानले, तरच वरचे दोष टाळतील. महाराजांना 'महामानव' असे समजूनच ही लेखमाला लिहिली जाईल. ही लेखमाला लिहिताना महाराजांचे आर्थिक व्यवस्थापन, प्रशासन आणि त्यांचे मानव संसाधन विकासाचे धोरण ह्यावर प्रामुख्याने भर असेल, त्याचबरोबर जनसंपर्क, न्यायव्यवस्था, अभिप्रेरणा (Motivation) ह्यातील महाराजांचे कौशल्यही दाखविले जाईल. 'राष्ट्र निर्माणक' हे त्यांचे रूप समोर ठेवून लिखाण होईल. पर्यावरण, स्वच्छता, महिला सबलीकरण, सामाजिक सुरक्षा योजना इ.चा समावेशही त्यात असेल. आजची अनेक सरकारे वरील विषयांबाबत अनेक योजना आणत असल्यामुळे त्यात महाराजांचे नेमके काय योगदान होते, ते स्पष्ट होईल.