‘फकिरा’ उत्कट भावप्रत्यय

विवेक मराठी    03-Aug-2019
Total Views |

फकिराही कांदबरी धगधगता सामाजिक, राजकीय इतिहास सांगणारी एक सत्यकथा आहे. अन्यायविरोधातील संघर्षाची प्रेरणा कादंबरीत अतिशय प्रभावीपणे उमटली आहे. पण ही प्रेरणा विध्वंसक नाही. जगण्यातील मूल्यांवर, माणुसकीवर नितांत श्रद्धा ठेवणारी आहे.

 

शाळकरी वयात कधीतरी एक दिवस वडिलांनी अचानकफकिराहातात दिली आणि माझं भावजीवन विलक्षण ढवळून निघालं. जीवनाचं हे नवदर्शन सर्वार्थाने दाहक होतं. संवेदनांना पीळ पाडणारं! कधीही अनुभवलेल्या गावकुसाबाहेरच्या व्यथा-वेदनांची जळजळीत ओळख करून देणारं! आजवरच्या ऊबदार आयुष्याला चरचरीत चटका देणारं! फकिरा आणि त्याच्या अनुषंगाने एका वेगळ्याच भावविश्वाचा, सामाजिक वास्तवाचा परिचय करून देणारे अण्णाभाऊंचे शब्द विलक्षण प्रत्ययकारी होते. गावकुसाबाहेरील उपेक्षितांचं विदारक जीवन मनात रुतविण्याची किती प्रचंड शक्ती शब्दांमध्ये असू शकते, याचा तो झपाटून टाकणारा भावप्रत्यय होता.


उत्तम
साहित्याची खरी ताकद आणि ओळख म्हणजे ते तुम्हा-आम्हाला एकाच जगण्यात अनेक जगण्यांचा अनुभव देऊन जातं. शब्द आपल्या मनाकाशात जणू नवं जग, नवी प्रतिसृष्टी निर्माण करतात आणि आपल्या वाट्याला कधीही येऊ शकणारे इतरांचे हर्ष-विषाद, सुख-दुःख, भोग-उपभोग अलगद आपल्या पदरात टाकून जातात. जणू परजीवन प्रवेश घडवतात. वयाच्या बाराव्या वर्षी हातात पडलेल्या फकिराने माझं भावजीवन असंच गलबलून गेलं. या जन्मात कधीच भोगलेल्या वेदनांची विलक्षण दाहक अनुभूती देऊन गेलं. अशी अनुभूती देणारे शब्द हा केवळ अक्षरांचा लडिवाळ विन्यास नसतो. ते दाहक अनुभूतींच्या धगीतून जन्माला आलेली अग्निपुष्पं असतात. जीवनाचं रणांगण तुडविणार्यांना व्यक्त होण्यासाठी गोमट्या शब्दांची याचना करावी लागत नाही. त्यांच्या ओबडधोबड शब्दांनाही सुभाषितांचं मोल प्राप्त होतं. मग ते शब्द अण्णाभाऊंसारख्या तप:पूत शब्दप्रभूचे असतील, तर? तर ते साहित्य खर्या अर्थाने अजर ठरतं. अमर ठरतं. कचकड्याच्या काल्पनिक कथा कालौघात विरून जातात, मात्र अस्सल वेदनांना शब्दलेणं चढविणारं साहित्य समाजमनावर चिरकाल परिणाम करतं. ते शब्द खर्या अर्थानेअक्षरठरतात, कारण प्रत्यक्ष धगधगतं आयुष्य तारण म्हणून त्या शब्दांमागे उभं असतं.

 

1959मध्ये, म्हणजे तब्बल पन्नास वर्षांपूर्वी अण्णाभाऊंच्या प्रतिभेतून प्रकटलेलाफकिराआजही चिरतरुण आहे, याचं कारण अण्णाभाऊंचं तपस्वी आयुष्य, चळवळीची पुण्याई त्यामागे तारण म्हणून उभी आहे.


फकिरा
ही धगधगता सामाजिक, राजकीय इतिहास सांगणारी एक सत्यकथा आहे. प्रस्तावानेतच अण्णाभाऊ सांगतात - ही कादंबरी केवळ माझ्या प्रतिभेने निर्माण केली नाही. प्रतिभेला सत्याचे - जीवनाचे दर्शन नसेल, तर प्रतिभा, अनुभूती वगैरे शब्द निरर्थक आहेत, असा माझा अनुभव आहे. सत्याला जीवनाचा आधार नसला की प्रतिभा अंधारातील आरशाप्रमाणे निरुपयोगी ठरते. जशी प्रतिभेला वास्तवाची गरज भासते, तद्वतच कल्पनेलाही जीवनाचे पंख असणे आवश्यक असते आणि अनुभूतीला सहानुभूतीची जोड नसेल, तर आपण का लिहितो याचा पत्ताच लागणे शक्य नाही. हाफकिराही माझा होता. जे पाहिले, अनुभवले, ऐकले तेच मी लिहिले आहे. त्यातून हा फकिरा निर्माण झाला आहे.


ही
कादंबरी महाराष्ट्रातील वारणेच्या खोर्यातील एका छोट्याशा खेड्यातील मांग समाजाच्या बापलेकाची चित्तथरारक कथा आहे. ती इंग्रजी राजवटीने उद्ध्वस्त केलेल्या गावगाड्याचं, त्यातून उत्पन्न झालेल्या सामाजिक दुराव्याचं, विषमतेचं, इंग्रजांच्या जुलमाचं, वंचितांच्या विदारक परिस्थितीचं प्रत्ययकारक चित्रण मांडतं. खेड्यांमधील चिवट सामाजिक परंपरा, जातीयतेच्या पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या उतरंडी, त्यातून मानसिकदृष्ट्या विभागलेला समाज, त्याही परिस्थितीत सामाजिक सलोखा राखण्यासाठी जिवाची बाजी लावणारे राणोजी मांग, फकिरा, विष्णुपंत कुलकर्णी, शंकर पाटील, त्याचबरोबर ब्रिटिश सरकारचे हस्तक बापू खोत, रावसाहेब पाटील अशा विशाल पटातून कथानक वेग घेतं.


वारणेच्या
खोर्यातील वाटेगाव आणि शिगाव यांच्यात यात्रेच्या जोगणीवरून संघर्षाची ठिणगी पेटते. शिगावच्या यात्रेतील जोगणी तलवारीच्या जोरावर आपल्या गावात पळून आणल्यास या गावची जमीन सुपीक होईल, सुबत्ता नांदेल या उद्देशाने राणोजी जिवाची बाजी लावून जोगणी ताब्यात घेतो खरा, पण त्यातच आपल्या प्राणाला मुकतो. शिगावचा बापू खोत रिवाज मोडून वाटेगावच्या हद्दीतून राणोजीचं शिर कापून नेतो. राणोजीचा मुलगा फकिरा वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्याचा निश्चय करतो. फकिरा जोगणी पुन्हा पळवून नेण्यासाठी आलेल्या बाजीबा खोताची हातासकट तलवार उडवतो. शक्य असूनही तो त्याला ठार मारत नाही. विंचवाला ठार मारण्याऐवजी त्याची नांगी तोडून त्याला जिवंत ठेवणारा फकिरा पंचक्रोशीत लोकप्रिय होतो. तो आता लहान-थोर सर्वांचा आधार आहे. बापू खोत आणि त्यांचे जावई रावसाहेब पाटील ब्रिटिश सरकारशी संधान बांधून फकिराला आणि त्याच्या साथीदारांना लहान-मोठ्या खोट्या गुन्ह्यांच्या आरोपात अडकवण्यासाठी जिवाचं रान करतात. सावळा मांग आणि सत्तूचं उपकथानक स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश अत्याचाराचं आणि शूर, प्रामाणिक आणि पापभिरू असलेल्या मांग-महार समाजाला माणूस म्हणून जगणं किती कठीण होतं, याचं विदारक दर्शन घडवतं. विष्णुपंत कुलकर्णी मात्र फकिरच्या मागे ठामपणे उभे असतात.


भयानक
दुष्काळ आणि तापाच्या साथीने मांगवाड्यातले जीव जाऊ लागतात. हवालदिल फकिरा विष्णुपंतांजवळ येतो. “जगा, कुत्र्याच्या मौतीने मरू नकाहे त्यांचे शब्द झुंजार फकिराच्या तलवारीला धार आणि मनाला धीर देतात. साथीदारांसह फकिरा माळवाडीच्या मठकरचा वाडा लुटून आणलेलं धान्य गावकर्यांमध्ये समान वाटून देतो. धान्य लुटल्यामुळे फकिराला अटक होते, परंतु अत्यंत निर्णायक क्षणी विष्णुपंत कुलकर्णी फकिराला अटकेतून सोडवतात. विष्णुपंत सातत्याने फकिरच्या पाठीशी आहेत. त्यांचा मांग, महार जमातीवर जीव आहे. पुत्रवत प्रेम आहे. विष्णुपंत हे पात्र ढासळत्या समाजजीवनातील विवेकनिष्ठ सामाजिक नेतृत्वाचं सर्वमान्य प्रतीक म्हणून लेखकाने खूपच ताकदीने उभं केलं आहे. विष्णुपंत, शंकर पाटील ही समरस, एकात्म समाजजीवनाची, सांस्कृतिक जीवनमूल्यांची प्रतीकं आहेत. त्यांच्या रोजच्या जगण्यात समरसता आहे. ते करारी आणि दमदार आहेत. दुष्काळाच्या संकटकाळी सर्वांना धीर देत ते म्हणतात - “माझ्याभोवती आक्रोश सुरू आहे. मीही संकटात आहे. परंतु माझं स्पष्ट मत आहे की तुम्ही जगलंच पाहिजे. मरणापेक्षा आज जगणं महत्त्वाचं आहे. कुत्र्यासारखे मरू नका. हेही दिवस जातील.”

 

गावाचे पाटील बदलतात. खोतांच्या कुरापतीमुळे मांगवाड्यावर पाटलांकडे तीनदा हजेरी लावण्याचं जाचक बंधन येतं. गाव सोडताना प्रत्येक वेळी पाटलांची परवानगी घेणं, दुसर्या गावात गेल्यानंतर तेथील पाटलांना त्याची वर्दी देणं, मध्यरात्री घराबाहेर येऊन हजेरी देणं असल्या अपमानास्पद आदेशाविरुद्ध फकिरा बंड करून उठतो. तो फरार होतो. आपली सेना उभारून सह्याद्रीच्या कडेकपार्यांतून ब्रिटिशांना जेरीला आणतो.

 

बेडसगावच्या सरकारी खजिन्यावर दरोडा घालतो. चवताळलेलं ब्रिटिश शासन मांगवाड्यातील सर्वांना आपल्या छावणीत ओलीस ठेवतं. सत्यासारख्या मित्राकडून मदतीची आशा संपते आणि अखेरीस त्या सर्वांचा प्राण वाचावा म्हणून फकिराला आत्मसमर्पण करावं लागतं.


वि
.. खांडेकरांच्या शब्दात सांगायचं, तर संपूर्ण कादंबरीत फकिरा एखाद्या झगझगीत प्रकाशासारखा पसरलेला आहे. त्याची आई राधाही जिवाचा ठाव घेते. वंचितांच्या अंतःकरणातील आक्रोश, अन्यायविरोधातील संघर्षाची प्रेरणा कादंबरीत अतिशय प्रभावीपणे उमटली आहे. पण ही प्रेरणा विध्वंसक नाही. जगण्यातील मूल्यांवर, माणुसकीवर नितांत श्रद्धा ठेवणारी आहे. नायक फकिराच्या माध्यमातून अण्णाभाऊंनी त्यांना अभिप्रेत असलेल्या सामाजिक विद्रोहाचा नायक अतिशय उत्कटपणे रंगवला आहे. तो स्वाभिमानी आहे, पण संयत आहे, विद्रोही आहे पण विवेकीही आहे, मनाचा निर्मल, निखळ आहे. कुटुंबाची, सग्यासोयर्यांची, सहकार्यांची जिवापाड काळजी घेणारा, धावून जाणारा आहे. बापाच्या हत्यार्याला उदार मनाने जीवदान देणारा आहे. बेडसगावच्या ब्राह्मण खजिनदारालाएकवेळ प्राण देईन, पण परस्त्रीच्या अब्रूस धक्का लावणार नाहीहे सांगणारा आणि तसं वागणारा आहे. इंग्रजी सत्तेविरुद्ध बंड करणारा फकिरा बेडर आहे, पण न्यायवृत्तीचा पूजक आहे. परिसरावर, देशावर त्याचं प्रेम आहे. “मांग-महार, आमची आब्रू, आमची अवलाद, आमची किस्ना दावनीला बांधनाराची छावनी कापून काढीत आपुन मरू. आपुन मरू पर ह्ये मुलुख मरनार न्हाय, ह्यो डोंगूर मरनार न्हाय, ही झाडं ही माती मरनार न्हायअसे उद्गार फकिराच्या तोंडून येतात. अण्णाभाऊंच्या मानवधर्मी प्रतिभेचं ते देणं होत.

फकिरा आणि त्याचे साथी यांचं चारित्र्य दर्शविणारा एक खूप उत्कट प्रसंग कादंबरीत येतो. एका महार महिलेवरील अत्याचार सहन झाल्याने हातून खून घडलेला फकिराचा साथी कुमज गावचा सत्तू आता दरोडेखोर झालाय. आपल्या आईला भेटायला तो गावाकडे चाललाय. रस्त्यात नांदगावच्या गावंदरीत एका बाईचे दळण दळतानाचे स्वर त्याच्या कानावर पडतात -

नसेल जरी माहेर, भाऊ असावा पाठीचा

गरिबांचा वाली, जसा सत्याबा कुमजचा

अण्णाभाऊंचा नायक हा असा अनोळखी स्त्रीलाही भ्रातृत्वाचा बलदंड आश्वासक आधार देणारा आहे.

अतिशय ओघवती आणि प्रभावी भाषा, चित्रदर्शी शैली, गतिमान नाट्यमयता हे अण्णाभाऊंच्या लेखणीचं वैशिष्ट्य. विशेषतः वारणेच्या खोर्याचं निसर्गवर्णन करताना अण्णाभाऊंची प्रतिभा बहराला येते. अनेक कठीण प्रसंगात पात्रांच्या भावावस्थेला अनुरूप जे नेमकं नेपथ्य शब्दातून अण्णाभाऊ उभं करतात, ती सौंदर्यस्थळं कथानकाला वेगळ्या उंचीवर घेऊन जातात.


या
कादंबरीतून सामाजिक अभिसरणाचं एक निलचित्र अण्णाभाऊंनी उभं केलं आहे, हे प्रकर्षाने जाणवतं. तोच या कादंबरीचा महत्त्वाचा सामाजिक संदेशही आहे. कादंबरीत विविध वृत्ती-प्रवृत्तीची पात्रं आहेत. सुष्ट आणि दुष्ट मानवी वर्तन दर्शवणारे प्रसंग आहेत. पण जातिगत कटुता नाही. खरं तर सामाजिक विषमतेचा भुक्त भोगी असलेला एक समाजच कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे. मात्र गुणावगुणांचं रेखाटन पूर्णतः पात्र/व्यक्तिकेंद्रित आहे. सूडाने पेटलेला खोतही इथे आहे आणि फकिराचा आधार असणारे विष्णुपंतही. हजेरीच्या निमित्ताने सूड घेणारा रावसाहेब पाटील जसा आहे, तसाच राणोजीच्या मृत्यूनंतर आपल्या घरचं अन्न मांगवाड्याला पुरवणारा शंकर पाटील आणि मराठा समाजही. सामाजिक विषमतेचे चटके स्वतः सहन केलेल्या, दारिद्य्रामुळे आणि अभावामुळे शिक्षण अर्धवट सोडावं लागलेल्या अण्णाभाऊंच्या लेखणीतून प्रकटलेली सामाजिक सौहार्दाची ही कृतिरूप शिकवण केवळ आणि केवळ नतमस्तक करणारी आहे.


अर्थात
या धारणा समजून घेण्यासाठी अण्णाभाऊ समजून घेणं आवश्यक आहे. साम्यवाद ही अण्णाभाऊंची जीवननिष्ठा होती. त्याचबरोबर डॉ आंबेडकर हेही त्यांचे प्रेरणास्थान होते. फकिरा त्यांनी बाबासाहेबांच्या झुंजार लेखणीस समर्पित केली आहे. शोषणमुक्त, एकसंघ समाजजीवनासाठी झटणारे सारेच त्यांच्यासाठी सहधर्मी होते. उपेक्षितांचा उत्कर्ष व्हावा म्हणून झटणारे माटे - त्यांचा मागोवा मी घेतला आहे असंफकिराच्या कैफियतीत नोंदवून ठेवणारे अण्णाभाऊ, अमर शेखांच्या शाहिरीला कवनं पुरवणारे अण्णाभाऊ, ‘वैर खेळतात त्यांचा शेवट घोर होतोहे शाश्वत सत्य कादंबरीतून मांडणारे अण्णाभाऊ हे एकजात कष्टकर्यांचे आणि देशप्रेमिकांचे साथी होते. जातिभेद, उच्चनीचता, समाजाच्या जातवार गढी आणि त्याआधारे संकुचित राजकारण अण्णाभाऊ आणि त्यांचे सहकारी यांच्या स्वप्नातही नव्हतं. सामाजिक न्याय, प्रतिष्ठा, बंधुभाव आणि स्वाभिमानासाठी जिवाचं रान करणारे ते कृतिशील प्रतिभावंत होते.


आपली
सारी साहित्यसेवा आपण ज्या उपेक्षितांचे प्रतिनिधी आहोत त्यांच्याच उत्थानासाठी आहे, याचं भान कायम जपतानाच संपूर्ण समाज आणि देश हेच ज्यांच्यासाठी आराध्य होतं, ते अण्णाभाऊ आणि त्यांच्या जाणिवा, ज्यांनी छळ केला त्यांच्यासाठीही कल्याणाचं पसायदानच मागणार्या ज्ञानेश्वर माउलीच्या जाणिवांशी तदाकार होत्या.


फकिरात्याचा एक उत्तम आणि उत्कट भावप्रत्यय आहे.

- आशुतोष अडोणी