ते हि नो दिवसा गता:

विवेक मराठी    30-Aug-2019
Total Views |

***वर्षा तळवेलकर (माजी अध्यक्षा)***

वर्षाताई तळवेलकर 1985 ते 1994पर्यंत महिला संचालिका म्हणून कार्यरत होत्या. शिक्षिका म्हणून शाळेत नोकरी करत असताना बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून त्यांनी दोन वर्षे जबाबदारी सांभाळली. कोकण नागरी सहकारी बँक्स असोसिएशन व सहकार भारती या संस्थांशीही त्या जोडलेल्या होत्या. कोकण नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या पहिल्या महिला संचालिका म्हणून कार्यरत होत्या. चतुरंग या सांस्कृतिक चळवळीतही त्यांचा सक्रिय सहभाग होता.


 

एक दिवस अचानक बँकेतून विद्यमान अध्यक्षांचा फोन आला. म्हणाले, ''बँकेचं सुवर्ण महोत्सवी वर्ष चालू होतंय, तर तुम्ही संचालक असतानाचे तुमचे अनुभव, आठवणी यावर लेख लिहावा.'' फोन ठेवला आणि तो 10-11 वर्षांचा काळ एखाद्या चलत्चित्रपटासारखा झर्रकन डोळयांसमोरून सरकला! ही त्यातलीच काही क्षणचित्रं...

1970 साली बँकेची स्थापना झाल्यापासून 1985पर्यंत, संचालक मंडळाच्या निवडणुका कधी झाल्या, नवं संचालक मंडळ कधी आलं त्याचा फारसा गवगवा कधी झाला नव्हता. परंतु 1985 साली मात्र निवडणुका अगदी धूमधडाक्यात, प्रचाराच्या गदारोळासह पार पडल्या आणि नवं संचालक मंडळ, ज्यात महिला संचालक म्हणून माझ्याही नावाचा समावेश होता, ते अस्तित्वात आलं. 

तिथूनच माझ्या शिक्षणाच्या वेगळया अध्यायाला सुरवात झाली, असं म्हणता येईल. 

संचालिका म्हणून निवडून येण्यापूर्वी मी अगदी बोटावर मोजता येईल इतक्याच वेळा बँकेत गेले असेन. बाकी बँकेचे व्यवहार माझे पतीच पाहत असत. त्यामुळे बँकिंगविषयी मी अनभिज्ञ होते, असंच म्हणावं लागेल. पण माझा मूळ पेशा शिक्षकाचा होता, आणि शिक्षकाने स्वत: कायम विद्यार्थी राहिलं पाहिजे ही खूणगाठ मनाशी पक्की होती. त्यामुळे नवीन काही शिकण्याचा उत्साह, आवडही असल्याने अनुभवी संचालकांकडून - मा. मधुकरराव भागवत, मा. बापूसाहेब मोकाशी, मा. मधुकरराव चक्रदेव यांच्याकडून प्रत्यक्ष कामकाजाची माहिती, खरं तर प्रशिक्षणच घेतलं. तसंच रिझर्व्ह बँकेकडून आलेली परिपत्रकं काळजीपूर्वक वाचून त्याचा अर्थही लावायला शिकले. 

1985मध्येही बँक तशी छोटीच होती. व्यवसाय बेताचा होता. तेव्हा बँक ही केवळ वित्तीय संस्था नव्हती, तर ते संचालक, कर्मचारी आणि ग्रााहक यांचं एक एकत्र कुटुंब होतं. 

मला आठवतंय, आम्ही निवडून आल्यानंतर बँकेचे कर्मचारी आणि संचालक मंडळ यांची एकत्रित सहलही आयोजित करण्यात आली होती. एकत्र काम करता करता माझे सर्व सहकारी संचालक - उदा. भाई गोरेगावकर, सुरेश पिंगळे, डॉ. चौधरी, अनिल जोशी, दिलीप गोखले, मुकुंदराव आंबर्डेकर इ. सर्वांशी एक अतूट स्नेहाचं, बंधुभावाचं नातं कसं आणि कधी निर्माण झालं, कळलंच नाही. 

आम्ही सर्व नवे-जुने संचालक रोज संध्याकाळी 7-7.30 वाजता बँकेत यायचो. कधी वेगवेगळया समित्यांच्या बैठका असायच्या, तर कधी कर्जदारांच्या भेटी. कर्ज मागायला आलेल्या सभासदांच्या मुलाखती घेणं, त्यांना ठेवी ठेवण्याचा (निदान कणसंचय तरी) आग्रह करणं, कर्जफेड कशी करणार? कर्ज थकित तर होणार नाही ना? याची खातरजमा करून घेणं हा त्यामागचा उद्देश असायचा. सगळं आटपून घरी जायला सहज रात्रीचे नऊ-साडेनऊ वाजायचे. या काळात माझ्या कुटुंबाने, विशेषत: माझ्या सासूबाईंनी मला भक्कम साथ दिली. 

6 सप्टेंबर हा बँकेचा वर्धापन दिन. या दिवशी संचालक मंडळातील ज्यांना जमत असेल ते सर्व संचालक मिळून बँकेच्या सर्व शाखांना भेट द्यायचो. मी त्या 10-11 वर्षांत प्रत्येक वर्धापन दिनी शाळेतून रजा घेऊन शाखांना भेटी दिल्याचं मला स्मरतं. शाखांचं एकूण कामकाज आणि त्या दिवसाचं नियोजन, नवे उपक्रम यांचा विचार करून शाखांना पारितोषिकंही दिली जात असत.

 

माझ्या संचालकपदाच्या कारकिर्दीत भिवंडी, डोंबिवली एम.आय.डी.सी. आणि तलासरी या बँकेच्या तीन नव्या शाखा उघडण्यात आल्या. दर वर्षी विविध समाजोपयोगी संस्थांना अनुदान म्हणून देण्यात येणारी बँकेच्या नफ्यातील 10% रक्कम समारंभपूर्वक देण्याचा प्रारंभ याच काळात झाला. दहावीच्या, बारावीच्या बोर्डाच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या, बँकेच्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुणगौरव समारंभही साजरे करण्याची प्रथाही तेव्हाच सुरू झाली. 

या 10-11 वर्षांच्या कालखंडात आणखी एक महत्त्वाची घटना घडली, ती म्हणजे 'कोकण नागरी सहकारी बँक्स असोसिएशन'ची स्थापना. असोसिएशनच्या पहिल्या संचालक मंडळात महिला संचालिका म्हणून माझी निवड झाल्याने माझ्या अनुभवाचा परीघ विस्तारायला मदत झाली. असोसिएशनच्या बैठकांच्या निमित्ताने कोकणातील 29 बँकांपैकी जवळजवळ सर्व बँकांना भेटी देण्याची संधी प्राप्त झाली. या सर्व अधिवेशनांच्या, बैठकांच्या निमित्ताने ठाणे, डोंबिवली, कल्याण येथील सहकारी बँकांच्या संचालकांशी जवळून परिचय झाला. वामनराव प्रभुदेसाई (ठाणे), मा. वामनराव साठे (कल्याण) अशा ज्येष्ठांकडून खूप शिकायला मिळालं. 

याच कालखंडातील आणखी एक संस्मरणीय घटना म्हणजे मी 'सहकार भारती'च्या कामाशी जोडले गेले. सहकार भारतीच्या निमित्ताने मी काही ठिकाणी प्रवास केला. त्यातला नागपूरचा प्रवास माझ्या विशेष स्मरणात राहिला. अनेक सहकारी संस्था, सहकारी बँका यातल्या संचालक मंडळांसमोर 'सहकार भारती का? कशासाठी?' या विषयावर बोलण्याची संधी मिळाली आणि माझ्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या. 

1992-19931993-1994 अशी दोन वर्षं मला बँकेचं अध्यक्षपद भूषवण्याचं भाग्य मिळालं. त्या संधीचं चीज करण्याचा मी मनापासून प्रयत्न केला, याचं मला समाधान आहे. 

1985 ते 1994 हा कालखंड माझ्या आयुष्यातील अत्यंत व्यग्र परंतु आनंददायक कालखंड होता. दमवणारा होता, पण एक वेगळीच ऊर्जा, उत्साह देणाराही होता. एखाद्या मधुमक्षिकेसारखी मी मिळतील तेथून मधाचे थेंब गोळा करत गेले. माझ्या ज्ञानाचं आणि अनुभवाचं पोळं समृध्द होत गेलं

म्हणूनच माझ्या भावविश्वात डोंबिवलीला आणि डोंबिवली नागरी सहकारी बँकेला अनन्यसाधारण स्थान आहे. 

विद्यमान संचालक मंडळ व कर्मचारी वृंद यांच्या अथक परिश्रमाने बँकेची जोरात चाललेली घौडदौड खरोखर अत्यंत आश्वासक, अभिमानास्पद आहे. या सर्वांचं मन:पूर्वक अभिनंदन करते आणि पुढील दमदार वाटचालीसाठी शुभेच्छा देते.