बँकेला सामाजिक चेहरा देण्याचा प्रयत्न- बापूसाहेब मोकाशी (माजी अध्यक्ष)

विवेक मराठी    30-Aug-2019
Total Views |

श्री. उपेंद्र दत्तात्रय मोकाशी उपाख्य बापूसाहेब मोकाशी हे बँकेचे संस्थापक संचालक.बापूसाहेब या नावानेच डोंबिवलीत परिचित. व्यवसायाने उद्योजक असलेले बापूसाहेब 27 वर्षे बँकेचे संचालक होते. या काळात बँकेचे अध्यक्ष व जनसंपर्क संचालक म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. कोकण नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या स्थापनेतही त्यांचा पुढाकार होता. ते त्याचे संस्थापक अध्यक्ष होते. रा.स्व. संघाचे कोकण प्रांताचे मा. संघचालक म्हणूनही जबाबदारी सांभाळलेले बापूसाहेब डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी समितीचे कोषाध्यक्ष होते.



1965-1966चा सुमार असेल. अनेक नागरी सहकारी बँकांचे प्रणेते, सांगली येथील माधवराव गोडबोले यांनी नागरी सहकारी बँकांमध्ये काम करणाऱ्या संघपरिवारातील संचालकांना सांगली येथे एकत्रित केले होते. अर्थात त्या वेळी हातावर मोजण्याइतक्याच सहकारी बँका कार्यरत होत्या. कसे ते आता आठवत नाही, पण या एकत्रीकरणाला मी, स्व. मधुकरराव भागवत व अन्य काही जण गेलो होतो. तिथे डोंबिवलीमध्ये सहकारी बँक काढण्याची सूचना माधवराव गोडबोलेंनी केली. हा या बँकेचा उगमबिंदू म्हणता येईल.

त्या वेळी स्व. मधुकरराव भागवत संघचालक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली मधुकरराव चक्रदेव, केशवराव खंडकर, रामभाऊ शेंबेकर, आप्पा दातार, डॉ.वळामे, आबासाहेब पटवारी, मी व अन्य काही जणांनी भागभांडवल गोळा करायला सुरुवात केली. त्या वेळी प्रत्येकी फक्त 50 रुपयांचा एक शेअर घ्यायचा होता. आणि एकूण फक्त 50,000 रुपयांचे भागभांडवल जमवायचे होते. पण तेही त्या वेळच्या - काळाच्या दृष्टीने आव्हानच होते. संघविचारांची पार्श्वभूमी, तरुण कार्यकर्त्यांची फळी आणि आमची जिद्द यामुळे हे आव्हान पेलता आले. सर्व आवश्यक बाबींची पूर्तता झाली आणि 6 सप्टेंबर, 1970 रोजी बँक सुरू करण्याची अनुमती मिळाली.

सुरुवातीच्या काळात मधुकरराव भागवतांच्या घरीच आमच्या सभा होत असत. बँक सुरू करण्याची परवानगी तर मिळाली, पण जागेचा प्रश्न होता. डॉ. रावांनी त्यांच्या हॉस्पिटलची जागा उपलब्ध करून देऊन तो प्रश्नही चुटकीसरशी सोडवला. त्यानंतर वर्षभरातच डोंबिवली पश्चिमेला शाखा सुरू केली. त्या वेळी पश्चिमेला सहकारीच नव्हे, तर कोणतीच बँक नव्हती. त्यामुळे बँकेला चांगला प्रतिसाद मिळू लागला. (आपल्या बँकेच्या प्रारंभानंतरच अनेक राष्ट्रीयकृत बँका पश्चिमेला सुरू झाल्या.)

डोंबिवली म्हणजे संघाचा बालेकिल्ला. ही बँक म्हणजे संघाची बँक हे लोकांच्या मनात ठसल्याने अल्पावधीतच पूर्वेकडील शाखेला जागा कमी पडू लागली. त्यामुळे डॉ. रावांच्या जागेतून सहस्रबुध्देंच्या बाजीप्रभू चौकातील सुभाष भवनमधील जागेत शाखा सुरू केली. त्या वेळी मनीषा मोहिदेकर, आठल्ये, रमेश हळबे, गोगटे इ. कर्मचारी/अधिकारी काम करत होते. बँकेच्या वाढीबरोबर बँकिंग जाणणारे, सहकारी चळवळीविषयी माहिती असणारे कर्मचारी-अधिकारी बँकेच्या सेवेत असले पाहिजेत, याची जाणीव व्हायला लागली. त्यानुसार मग राज्य सहकारी बँकेच्या सेवेचा अनुभव असलेले दादा प्रधान कार्यकारी संचालक म्हणून, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अनुभव असलेले जव्हारकर, बँक ऑफ इंडियाच्या सेवेत दीर्घकाळ असलेले सतीश मराठे सरव्यवस्थापक म्हणून बँकेच्या सेवेत रुजू झाले. त्यांच्या अनुभवांचे बँकेच्या वाढीत निश्चितच मोठे योगदान आहे.

 

केशवराव खंडकर बँकेचे काम शिस्तीत आणि खूपच तळमळीने करत. एका खाजगी कंपनीत नोकरीला असूनही त्यांची बँकेत येण्याची वेळ कधीही चुकली नाही. त्यांच्या येण्यावर खरोखरच घडयाळ लावून घ्यावे, इतके ते वेळेबाबत काटेकोर होते. शेवटपर्यंत त्यांनी बँकेचे काम केले. दिल्ली येथे नॅफकबच्या अधिवेशनाला उपस्थित राहिलेले असतानाच, हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे दु:खद निधन झाले. त्यांचे स्मरण म्हणून 30 सप्टेंबर हा दिवस खंडकर स्मृती दिन (आता कृतज्ञता दिन) म्हणून साजरा करण्यात येऊ लागला.

डोंबिवली हे खरे तर तालुक्याचेही ठिकाण नाही. तरी विश्वासार्हता, सचोटी आणि प्रामाणिकपणा यांच्या जोरावर बँकेने अनेक चांगले ग्रााहक मिळविले होते. त्यापैकीच एक म्हणजे डी.पी. म्हैसकर - आय.आर.बी. या बांधकाम क्षेत्रातील सुप्रसिध्द कंपनीचे संस्थापक. म्हैसकर साहेबांना सगळयात पहिले कर्ज आपल्या बँकेने दिले होते. ''त्यामुळेच मी मोठा झालो'' असे तेही अभिमानाने आणि आवर्जून सांगत असत. भिवंडी-कामण हा आय.आर.बी.ने बांधलेला रस्ता खाजगीकरणातून (BOT) बांधला गेलेला पहिला प्रकल्प आणि त्या रस्त्याच्या उभारणीसाठी बँकेने अर्थसाहाय्य केले होते. जेव्हा बँकेच्या कर्ज देण्याच्या क्षमतेपेक्षा अधिक कर्जाची गरज त्यांना लागली, तेव्हा अन्य सहकारी बँकांच्या सहकार्याने (consortium) त्यांच्या गरजेची पूर्तता करण्यात आपण पुढाकार घेतला. आपली बँक शेडयूल्ड नव्हती, त्यामुळे त्यांना हवी असलेली बँक गॅरंटी सांगली अर्बन को. ऑप. बँकेच्या सहकार्याने मिळवून दिली. त्या वेळी, ''आय.आर.बी. डोंबिवली बँकेचे ग्राहक आहेत ना, मग त्यांना ताबडतोब गॅरंटी द्या'' असे माधवराव गोडबोले यांनी सांगितले. त्यांचे हे उद्गार म्हणजे बँकेला मिळालेले मोठे प्रशस्तिपत्र होते.

कोकण असोसिएशनची स्थापना

ठाणे जिल्ह्यात नागरी सहकारी बँकांचे जाळे वाढत होते. ठाणे जनता, कल्याण जनता, वसई जनता या बँका सुरू झाल्या होत्या. कोकणातही काही सहकारी बँका कार्यरत होत्या. या बँकांचे प्रश्न मांडायला एकच व्यासपीठ होते, ते म्हणजे महाराष्ट्र सहकारी बँक्स असोसिएशन - जिचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रभर विस्तारलेले आहे. म्हणून कोकणातील नागरी सहकारी बँकांचे स्वतंत्र व्यासपीठ असावे असा विचार पुढे आला. पेण अर्बन को-ऑप. बँकेचे आप्पासाहेब धारकर याबाबत प्रयत्नशील होते. महसूल विभागाच्या रचनेप्रमाणे 1986 साली कोकण नागरी सहकारी बँक्स असोसिएशनची स्थापना झाली. 15 जणांचे संचालक मंडळ बिनविरोध गठित होऊन त्याचे नेतृत्व सर्वसंमतीने माझ्याकडे आले. पुढे दहा वर्षे कोकण नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून मी जबाबदारी सांभाळली. प्रारंभी असोसिएशनचे कार्यालयही आपल्या बँकेतच होते.

 

सहकार भारतीचे अधिवेशन

डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या कामामुळे संपर्क कक्षा रुंदावत होत्या. सहकारी क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे, संस्थांचे संघटन करणारी संस्था म्हणजे सहकार भारती. सहकार भारतीच्या स्थापनेतही डोंबिवली बँकेचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. सहकार भारती स्थापनेसंदर्भात व नंतर कार्यवाढीसंदर्भातील बैठका आपल्या बँकेतच होत असत. त्यामुळे सहकार भारतीच्या कामाशीही संबंध आला. बँकेच्या सर्व स्तरांतून मिळालेल्या सहकार्यामुळे, मदतीमुळे सहकार भारतीचे एक अधिवेशन डोंबिवलीत उत्कृष्टरीत्या आयोजित केले.

सार्थकतेची भावना जागवणारी वाटचाल

आम्ही लावलेल्या वेलीचे आज खरोखरच वटवृक्षात झालेले रूपांतर पाहून मनापासून आनंद वाटतो. बँकेच्या तरुण संचालक मंडळाला, तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांना सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या शुभेच्छा. बँकेची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहील, यात तिळमात्रही शंका नाही.