प्रारंभीचे दिवस- मधुकर चक्रदेव (माजी अध्यक्ष)

विवेक मराठी    30-Aug-2019
Total Views |

 

बँकेचे संस्थापक संचालक असलेले मधुकरराव चक्रदेव हे डोंबिवलीतील सुपरिचित असे दानशूर व्यक्तिमत्त्व. उद्योजक असलेले मधुकरराव बँकेच्या संचालक मंडळावर 27 वर्षे कार्यरत होते व या कार्यकाळात काही वर्षे त्यांनी बँकेचे अध्यक्षपद भूषविले होते. आजही त्यांचा डोंबिवली शहरातील अनेक सामाजिक संस्थांमध्ये सक्रिय सहभाग असतो. मा. जिल्हा संघचालक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.
 

 

 

कल्याण पीपल्स को.ऑप. बँक बुडाल्याच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली नागरी सहकारी बँक स्थापन करण्यासाठी लोकांचा विश्वास संपादन करणे हे आमच्यासमोरचे सगळयात मोठे आव्हान होते. रा.स्व. संघाचे त्या वेळचे जिल्हा संघचालक मधुकरराव भागवत यांच्या नेतृत्वाखाली ते सुरू झाले आणि त्यात यशही मिळाले.

 

दि. 6 सप्टेंबर, 1970 रोजी डोंबिवली नागरी सहकारी बँकेचे उद्धाटन करून व्यवहारास रीतसर सुरुवात झाली. 1970 साली पहिल्या दिवशी 25,000 रुपयांच्या ठेवी जमा झाल्या. काही दिवसातच ठेवी वाढत गेल्या, भागधारक वाढायला लागले आणि पहिल्याच वर्षी बँकेला 384 रुपयांचा निव्वळ नफा झाला. त्यातील 10% रक्कम अनुदान वितरणासाठी ठेवायचे ठरले. विशेष बाब म्हणजे नफ्यातील 10% (सध्याच्या नियमाप्रमाणे 01%) रक्कम अनुदान म्हणून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध संस्थांना वितरित करणे ही सुरू झालेली पध्दत आजही विनाखंड चालू आहे.

कामाचा व्याप वाढल्याने दोनच वर्षांत बँकेने बाजीप्रभू चौकातील जागेत स्थलांतर केले. 1971 साली पश्चिमेकडील लोकांच्या मागणीनुसार दुसरी शाखा सुरू केली. अल्पावधीतच ग्राहकांचा संपादन केलेला विश्वास आणि बँक कर्मचाऱ्यांचे तसेच संचालक मंडळाचे परिश्रम यामुळे बँकेचा व्यवसाय चांगला वाढायला लागला.

यानंतरच्या काळात ग्रामीण आणि शहरी भागांतील नागरिकांना आपल्या बँकेच्या सेवा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने, डोंबिवलीनजीकच्या गावांमध्ये व डोंबिवलीच्याही अन्य भागांत शाखा सुरू करण्यात आल्या. कुळगाव-बदलापूर, अंबरनाथ, शहापूर, वनवासी परिसरातील नागरिकांसाठी तलासरी येथे सुरू झालेली शाखा, तसेच भिवंडी येथील शाखा - या सर्वांमुळे बँकेचे जाळे विस्तारायला सुरुवात झाली. त्या भागातील व्यापाऱ्यांसाठी आणि इतर उद्योजकांसाठी आपली बँक सेवा देऊ लागली. ग्रामीण आणि शहरी भागात वेगवेगळया योजना राबविण्यात आपण चांगलेच यशस्वी होऊ लागलो आणि बँकेच झपाटयाने विस्तार होऊ लागला. लौकिकही वाढू लागला. ग्रामीण भागात शाखाविस्तार करून तेथील गरजांचा विचार करून समाजाभिमुख होत लघुउद्योगांच्या आणि इतर व्यावसायिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बँकेने प्रयत्न केले. सर्व ठिकाणी व्यवसायवृध्दीसाठी त्याचा उपयोग झाला.

1988-89 या आर्थिक वर्षापासून सलग 3 वर्षे व नंतर पुन्हा 1994-95 या वर्षी अध्यक्षपदावर कार्यरत राहण्याचा बहुमान मिळाला, हे मला नमूद करावेसे वाटते. वरील कालावधीत झालेली अनेक चांगली कामे सर्वांच्या सहकार्याने करता आली. त्यातील विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे जानेवारी 1990मध्ये बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांची अधिकारी व संचालक मंडळाबरोबर एक प्रदीर्घ बैठक होऊन जून 1991पर्यंत आपल्या बँकेची डिपॉझिट्स 35 कोटींवरून 50 कोटी करण्याचे उद्दिष्ट ठरवून ते पूर्ण करण्यात आले. या उद्दिष्टपूर्तीसाठी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांपासून बँकेच्या अध्यक्षांपर्यंत सर्वांनी मेहनत घेतली होती, हे विशेष. 1991मध्ये 50 कोटी हे खूप मोठे उद्दिष्ट होते. आज कदाचित त्याचे महत्त्व वाटणार नाही, कारण आज आपण नवीन शाखेच्या उद्धाटनाच्या दिवशीच काही कोटी रुपये जमा करू शकतो. पण 1990-91चा काळ अगदी वेगळा होता. आणि या सर्वांच्या मेहनतीचे फलित म्हणजे आर्थिक वर्ष 1990-91 या कालावधीत महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट बँक म्हणून आपल्या बँकेस गौरविण्यात आले. जळगावच्या अधिवेशनात सुरेशदादा जैन यांच्या हस्ते हा गौरव स्वीकारण्याची संधी अध्यक्ष या नात्याने मला प्राप्त झाली.

बँकेच्या स्थापनेपासून - म्हणजे 1970पासून ते बँकेला शेडयूल्ड बँकेचा दर्जा प्राप्त होईपर्यंत - म्हणजे 1996पर्यंत, सलग 27 वर्षे संचालक मंडळावर काम करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी सर्वांचा कृतज्ञ आहे. तसेच नागरी सहकारी बँकांचे प्रणेते सांगलीचे माधवराव गोडबोले यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा या वाटचालीत मोठा वाटा आहे, याचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो.

गेल्या 20-22 वर्षांत बँकेची खूपच चांगली प्रगती होत आहे. सुमारे 8 हजार कोटींपर्यंत पोहोचलेला मिश्र व्यवसाय हे त्याचेच द्योतक आहे. अलीकडची 3-4 वर्षे सर्वच सहकारी बँकांसाठी खूप आव्हानात्मक ठरत आहेत. या कालखंडातही बँकेचा जो चढता आलेख दिसतो आहे, त्याचे श्रेय सर्व कर्मचाऱ्यांच्या, अधिकाऱ्यांच्या व संचालक मंडळांच्या अथक परिश्रमांना, परस्पर सहकार्याला जाते. ग्राहकोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या विद्यमान संचालक मंडळाचे अभिनंदन करावे तितके थोडेच आहे. यापुढेही कर्मचारी आणि संचालक मंडळ, सभासद, खातेदार, कर्जदार यांच्या सहकार्याने बँक प्रगतिपथावर नेण्याचे काम निरंतर सुरू ठेवतील, असा विश्वास वाटतो.