अध:पतनाच्या दिशेने पुढचे पाऊल

विवेक मराठी    31-Aug-2019
Total Views |


 
‘वॉर अँड पीस’ ही लिओ टॉलस्टॉय यांची जगप्रसिद्ध कादंबरी. नामसाधर्म्याचा फायदा घेत लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणवणारी माध्यमं किती कुटील राजकारण करू शकतात याची प्रचिती नुकतीच आली. या नावाच्या कादंबरीच्या न्यायाधीशांनी दिलेल्या संदर्भावरून, अनेक तथाकथित ‘प्रतिष्ठित’ वृत्तसमूहाच्या ई आवृत्त्यांनी आणि त्यांच्या बातमीदारीवर आंधळा विश्वास ठेवणार्‍या त्यांच्या पुरोगाम्यांनी जी राळ उडवून दिली आणि वस्तुस्थिती समोर आल्यानंतर या सर्वांनी जी मिठाची गुळणी धरली - हे दोन्हीही सर्वसामान्य लोकांनी पाहिले आहे. या घटनेआधीही गेल्या काही महिन्यांमध्ये ठरावीक काळाने समोर येत असलेल्या खोट्या, विशिष्ट समाजगटाला बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक चालवण्यात येणार्‍या बातम्या वर्तमानपत्रांच्या विश्वासार्हतेलाच चूड लावण्याचं काम करत आहेत. 
‘वॉर अँड पीस’ची खोडसाळ बातमी जेव्हा प्रसारमाध्यमातील विशिष्ट वृत्तसमूहांनी सोशल मीडियातल्या त्यांच्या साथीदारांच्या मदतीने चालवली, आगीसारखी पसरवली, अगदी त्याच वेळी कवी विजय तिवारी यांच्या हिंदी कवितेच्या दोन ओळी वाचनात आल्या. त्या अशा,

पहले अखबार लिख के बिकता था

अब अखबार बिक के लिखता है

स्वत:ला लोकशाहीचे आधारस्तंभ म्हणून मिरवणार्‍या आणि ते मिरवताना जबाबदारीचं भान पूर्णपणे हरवलेल्या आजच्या ‘स्वायत्त’ माध्यमांच्या वर्मावर या दोन ओळींनी नेमकं बोट ठेवलं आहे. त्यांचं होत असलेलं हे अध:पतनच त्यांना विनाशाच्या दिशेने घेऊन जात आहे. 
 

मोदी सरकारची पहिली 5 वर्षं आणि त्यानंतरच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय संपादत करत पुन्हा एकदा सत्ता स्थापन करणं यामुळे संतप्त असलेला, अस्वस्थ असलेला खूप मोठा गट या देशात आहे. प्रसारमाध्यमातल्या काही समूहांना हाताशी धरून मोदी सरकारला, इथल्या हिंदू समाजाला कोंडीत पकडायचे निरनिराळे डाव तो खेळतो आहे. मॉब लिंचिंगच्या खोट्या बातम्या प्रसारमाध्यमांना आणि समाजमाध्यमांना हाताशी धरून प्रसृत करणं आणि त्यातलं तथ्य उजेडात आल्यानंतरही तिकडे सोयीस्कर कानाडोळा करणं असे उद्योग गेले काही महिने भारतभर चालू आहेत. मारहाणीच्या वा जीवे मारल्याच्या खोट्या बातम्या, त्याच्या खोट्या क्लिप्स माहितीच्या महाजालात सोडणं, संघकार्यकर्त्यांशी वा एखाद्या हिंदू संघटनेशी त्यांचा संबंध असल्याची आवई उठवणं ही कार्यपद्धती ठरून गेली आहे. जाणीवपूर्वक, नियोजनबद्ध बोभाटा करायचा आणि काही काळाने जी वस्तुस्थिती समोर येते तिच्याकडे मात्र कानाडोळा करायचा, असं तिचं स्वरूप आहे. एखाद्या सराईत गुन्हेगारासारखे हे उद्योग चालू आहेत. हे हेतुपुरस्सर रचलेलं षडयंत्र आहे की निव्वळ योगायोग, ते यथावकाश समोर येईलच. मात्र वृत्तपत्रसृष्टीला याची मोठी किंमत मोजावी लागेल. कारण वरचेवर अशा गोष्टी घडत असल्याने हळूहळू लोकांचा वृत्तपत्र जगतावरचा विश्वास उडत चालला आहे, याची या मंडळींना फिकीरही आहे असं सध्या तरी चित्र नाही. 
}

कोरेगाव भीमा प्रकरणाच्या आदल्या दिवशी पुण्यात जी एल्गार परिषद झाली, त्या परिषदेशी संबंधित आरोपीच्या - व्हर्नन गोन्साल्विसच्या जामिनासंदर्भातील सुनावणीत न्यायालयाने पोलिसांसमोर काही प्रश्न उपस्थित केले. त्यापैकी एक प्रश्न त्याच्याकडे सापडलेल्या ‘वॉर अँड पीस’या पुस्तकासंदर्भात होता. गोन्साल्विस हा देशविघातक कृत्य करणार्‍या माओवाद्यांसाठी काम करत असल्याचा आरोप सिद्ध होऊन त्यासाठीची शिक्षा भोगून आलेला इसम. अगदी अलीकडचा त्याचा हा इतिहास. मात्र त्याचा इतिहास माहीत असतानाही त्याच्याविषयी आत्मीयता, कणव असणारे प्रसारमाध्यमांत खूप जण आहेत. लिओ टॉलस्टॉय यांच्या पुस्तकाविषयी न्यायाधीशांनी आक्षेप घेतल्याची जी बातमी त्यांच्यापर्यंत आली, तिच्याविषयी कोणतीही खातरजमा करून न घेता ती या मंडळींनी वार्‍याच्या वेगाने सगळीकडे पसरवली. न्यायाधीशांची खिल्ली उडवली गेली. त्यांच्या योग्यतेबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले. वास्तविक न्यायाधीशांचा प्रश्न होता तो - थरी रवि - War and Peace in Junglemahal - People, State and Maoists या बिस्वजित रॉय याच्या पुस्तकाविषयी. सत्य काय ते बाहेर येईपर्यंत प्रसारमाध्यमांनी न्यायाधीशांवर ताशेरे ओढले होते. मात्र, झालेल्या चुकीची वा गैरसमजाची कबुली देण्याऐवजी वा त्याबाबत दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी ही प्रसारमाध्यमं पुन्हा मौन धारण करून बसली आहेत, पुढच्या सावजाची वाट पाहत.

स्वातंत्र्याची मागणी करणार्‍या, त्याबाबत सदैव दक्ष असलेल्या प्रसारमाध्यमांनी कर्तव्याची बूज राखायला हवी. वस्तुस्थितीवर आधारित विश्वासार्ह बातम्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं, त्यांना समाजातील घडामोडींविषयी जागरूक ठेवणं हे वृत्तपत्रांचं कर्तव्य आहे. या कर्तव्यापासून जे फारकत घेतात, त्यांच्या हक्कांविषयी समाजालाही मग फिकीर वाटेनाशी होते. ज्या वृत्तपत्रसमूहांनी वाचकांचा विश्वास आणि सहानुभूती गमावली आहे, त्यांनी या गमावण्याची फारशी पत्रास न बाळगता, असे देशहिताला बाधा आणणारे उद्योग चालूच ठेवले तर त्यांचा ‘शेवटचा दिस’ फार दूर नाही. आत्मघातकी पथकं केवळ दहशतवाद्यांच्या पदरीच नसतात, काही वृत्तपत्रसमूहही अशा आत्मघातकी कारवाया करत असतात, हे अशा घटनांमुळे म्हणता येतं.

काही वर्षांपूर्वीपर्यंत लोकांना वर्तमानपत्राविषयी आस्था होती. त्यात छापून येणार्‍या मजकुराच्या सत्यतेविषयी खात्री होती. आज ती स्थिती नाही. मूळ उद्देशापासून भरकटलेल्या, खोट्या बातम्या जाणीवपूर्वक प्रसृत करणार्‍यांना शिक्षा व्हायलाच हवी असं लोकमानस बनत चाललं आहे. त्याला कारण त्यांचे हे कारनामेच आहेत. अभिव्यक्तिस्वातंत्र्य जपायचं असेल तर सत्यनिष्ठाही जपायला हवी, याचं भान वृत्तपत्रांनी, त्यांना साथ देणार्‍या समाजमाध्यमातील मंडळींनी राखायला हवं. व्यवसायिक होण्याऐवजी धंदेवाईक वृत्तीने काम करणार्‍या या मंडळींना याची जाणीव होईल तो सुदिन!