जगपती गणपती

विवेक मराठी    31-Aug-2019
Total Views |

 

हजारो वर्षांपूर्वीपासून गणपतीबाप्पा हा ग्लोबल आहे आणि तो आजही आहे. म्हणूनच त्याला साऱ्या विश्वाचा अधिपती म्हणून ओळखले जाते. गणेशाच्या अन्य देशांतील मूर्ती आणि गणेश उपासनेविषयीच्या खुणा यांविषयी माहिती देणारा हा लेख.


भारताबाहेरील गणपतींचा विचार करताना भारताबाहेरचा म्हणजे नक्की कुठला, हे ठरवायला हवे. त्यासाठी आधी भारत कशाला म्हणायचे, इथून सुरुवात करणे इष्ट होईल.

ब्रिटिशराजच्या काळातील भारतात आजच्या पाकिस्तान, बांगला देश, म्यानमार आणि श्रीलंका यांचा समावेश होता. त्या आधीच्या काळात, साधारण 17व्या शतकात अफगाणिस्तान, तिबेट, नेपाळ, जावा, सुमात्रा, कंबोडिया, व्हिएतनाम या प्रांतालासुध्दा भारतच म्हटले जात असे. युरोपीय लोकांनी अफगाणिस्तानपासून व्हिएतनामपर्यंतच्या भागाला 'ईस्ट इंडिया' याच नावाने ओळखले. काही भाग वगळता हा संपूर्ण प्रांत युरोपीय देशांनी जिंकून घेतला व त्याला डच ईस्ट इंडिया, फ्रेंच ईस्ट इंडिया, ब्रिटिश ईस्ट इंडिया, पोर्तुगीज ईस्ट इंडिया अशी नावे दिली. त्याहीपूर्वीच्या काळात, म्हणजे रोमन-ग्राीक काळापासून वास्को-द-गामा भारतात पोहोचेपर्यंत, भारताचे दोन भाग केले जात - अफगाणिस्तानपासून गंगेपर्यंतचा प्रदेश Intra Gangem व गंगेपासून पार पलीकडे पॅसिफिक महासागरापर्यंतचा प्रदेश Extra Gangem - अर्थात गंगेच्या अलीकडचा भारत आणि गंगेच्या पलीकडचा भारत. (त्यामध्ये चीन, कोरिया व जपान यांचा समावेश नव्हता.)

गणपती मूर्तीच्या खुणा

तर, जेव्हा महाकाय भारत असा अस्ताव्यस्त पसरला होता, त्या 8व्या शतकात आदि शंकराचार्यांनी पंचायतन पूजा पध्दती घालून दिली. काहींच्या मते शंकराचार्यांच्या आधीच ही पध्दत सुरू झाली होती. पंचायतनमध्ये विष्णू, शिव, शक्ती, सूर्य आणि गणपती या पाच देवतांना एकत्र आणले गेले. यावरून 8व्या शतकाच्या कितीतरी आधी गणपती लोकप्रिय देव होता, हे कळते. म्हणजे त्या वेळेपासूनच गणपतीबाप्पा 'Top 5' देवतांपैकी एक होता. आणखी एक लक्षात घ्याला हवे की, गणपती सर्वांचाच इतका लाडका होता की बौध्द आणि जैन धर्मांनीसुध्दा त्याला आपापल्या देवतांमध्ये स्थान दिले. बौध्द धर्म जेथे पसरला, तिथेसुध्दा गणपती पोहोचला. काही ठिकाणाचा गणपती हिंदूंनी तिथे नेला की बौध्दांनी हे कळत नाही. सार असे की गजाननाचे भक्त सर्वत्र पसरले होते. मग आजच्या अफगाणिस्तानमध्ये किंवा व्हिएतनाममध्ये गणपतीची मूर्ती किंवा गणपतीच्या उपासनेच्या खुणा मिळणे यामध्ये खरे तर काहीच आश्चर्य नाही.

भारताबाहेरच्या गणपती

असो. आजचा भारत म्हणजे स्वातंत्र्योत्तर नवीन सीमा आखलेला भारत. फाळणी झाल्यानंतर केवळ 70 वर्षांत आपण ब्रिटिशराज काळातील भारताच्या सीमा पूर्णपणे विसरलो आहोत. आणि ब्रिटिशराजच्या आधीच्या काळातील विस्मृतीविषयी तर काही बोलणेच नको. या लेखातून आजच्या भारताच्या बाहेरच्या गणपतीच्या काही मूर्तींची एक झलक पाहू. एखादा जुना अल्बम काढल्यावर जसे विस्मृतीत गेलेली माणसे, जुने प्रसंग डोळयासमोर उभे राहतात, तसे या मूर्ती पाहून आपल्याच जुन्या आठवणींना उजाळा मिळेल.

भारताबाहेरील गणपती पाहण्यास सुरुवात करू या 'श्री गणेशाय नम:' या मंत्राने.

देवनागरी लिपीत लिहिलेले हे संस्कृत भाषेतील शब्द आहेत. कुठले? तर अझरबैजान येथील एका अग्नी मंदिराच्या शिलालेखाचे! अझरबैजानच्या बकू शहराजवळ सूरखाणी नावाचे गाव आहे. या गावात अतेशगाह (अतेश अथर अथर्वन् अग्नी + गाह गृह) अर्थात 'अग्निगृह' नावाचे मंदिर आहे. या ठिकाणी नैसर्गिक वायूचे स्रोत असून शेकडो वर्षे जमिनीतून काही ज्वाला सतत पेटलेल्या असत. (आता ज्वाला तेवत ठेवण्यासाठी पाइपने गॅस आणला जात आहे.) या ज्वाळांच्या भोवतीने मंदिर उभे केले गेले होते व हिंदू, पारसी आणि शीख समुदायाचे लोक या ज्योतींची पूजा करत असत. अठराव्या शतकात तिथे राहणाऱ्या हिंदू व्यापाऱ्यांनी मंदिराचा जीर्णोध्दार केला/नवीन मंदिर बांधले. या मंदिरात कैक संस्कृत, दोन पंजाबी व एक पारसी भाषेतील शिलालेख आहे. संस्कृत शिलालेख गणेशवंदनेने सुरू होतो व लेखाची तारीख विक्रम संवत 1802, म्हणजेच इ.स. 1745 सांगतो. एकोणिसाव्या शतकापर्यंत येथे हिंदू व शीख व्यापाऱ्यांची मोठी वसाहत होती. आता हे मंदिर एक जागतिक वारसा स्थळ आहे.


अफगाणिस्तानमधील महाविनायकाची मूर्ती

अझरबैजानमधून पूर्वेकडे निघालो की इराण ओलांडून आपण अफगाणिस्तानमध्ये येतो. अफगाणिस्तानमध्ये गणपतीच्या तीन संगमरवरी मूर्ती मिळाल्या आहेत. सकर दरा (जुने नाव - शंकर धारा) येथील मूर्ती दोन बुटुकल्या यक्षांच्या डोक्यावर हात ठेवून उभी आहे. गार्देझ येथील मूर्ती महाविनायकाची होती. ही मूर्ती खिंगल नावाच्या राजाने करवून घेतली होती, हे त्यावरील लेखावरून कळते. महाविनायकाची मूर्ती काबुलच्या संग्राहालयात होती. परंतु 1980नंतर आलेल्या तालिबानी राजवटीत या संग्राहालयाची नासधूस केली गेली. त्यानंतर या मूर्तीचा ठावठिकाणा कळला नाही. तिसरी मूर्ती सिंहासनवर बसलेली असून ती डॉ. जिओवान्नी वेरार्दी यांना एकदा काबुलच्या बाजारात फिरताना दिसली. सिंहासनावर आरूढ गणपती, मागे प्रभावळ आणि कपाळावर तिसरा डोळा असलेली ही मूर्ती आहे. वेरार्दीनी या मूर्तीचे फोटो काढले, पण ती मूर्ती आली कुठून आणि नंतर गेली कुठे, हे कळले नाहीये.

रावळपिंडीचे गणेश मंदिर

अफगाणिस्तानमधून आणखी पूर्वेला पाकिस्तानमध्ये आलो की येथे अक्षरश: शेकडो हिंदू, बौध्द, जैन व शीख मंदिरे पाहायला मिळतात. कृष्ण मंदिर, राम मंदिर, शिव मंदिर, दुर्गा मंदिर, गुरुद्वारा, स्तूप, विहार यांची गणती नाही. पण सर्वच मंदिरांची आबाळ झाली आहे. स्वातंत्र्यानंतर कित्येक मंदिरे बंद आहेत. कितीतरी मंदिरांची पडझड झाली आहे. मंदिरांच्या भिंतींवर झाडे-वेली चढल्या आहेत. अशाच अवस्थेतील एक मंदिर आहे रावळपिंडीचे गणेश मंदिर. मंदिराच्या कळसावर बाहेरील बाजूस सिंहासनावर बसलेला, चतुर्भुज गणपती पाहायला मिळतो.

मध्य आशियात गणेशाचे दर्शन

पाकिस्तानमधून उत्तरेला काश्मीरच्या पलीकडून आपण मध्य आशियात पोहोचतो. इथेसुध्दा आपल्याला गणेशाचे दर्शन होते. तिबेट, खोतान, शिनझियांग (Xinjiang), तुर्फान, चीनमधील दुनहुआंग गुंफा आणि मंगोलिया या सर्व ठिकाणी 5व्या शतकापासून गणेशमूर्ती/चित्र दिसतात. खोतान व मंगोलियामध्ये आधीच शिवाचे उपासक होते. त्यामुळे शिवपुत्र गणेशाचे या ठिकाणी स्वागतच झाले. चीनमध्ये मात्र गणेश आणि शिव हे बौध्द धर्माबरोबर आलेले दिसतात.

चीनमधला गणेश

 

चीनमध्ये दुनहुआंग येथे जवळजवळ 500 गुंफा आहेत. यामधून बुध्दाची अतिशय सुंदर चित्र व शिल्प आहेत. यामध्ये दिसणारे गणेशाचे एक चित्र -

चीनच्या पलीकडे मंगोलियामध्ये तिबेटमधून बौध्द धर्म गेला. तिबेटमध्ये भारतातून शेकडो बौध्द ग्रांथ पोहोचले होते. ते सर्व संस्कृत भाषेतील होते. तसेच काही संस्कृत ग्रांथांची चिनी भाषांतरे उपलब्ध होती. या सर्व संस्कृत व चिनी ग्रांथांची तिबेटी भाषांतरे केली गेली. या ग्रांथाच्या संचांना कांजूर व तांजूर असे म्हणतात. कांजूरमध्ये बुध्दाची वाक्ये आहेत, तर तांजूरमध्ये सूत्र, सूक्त, तत्त्वज्ञान, देवतावर्णन, प्रार्थना आदींचे ग्रांथ आहेत.


जागतिक दस्तऐवजात गणेश ग्रंथाचा समावेश

अठराव्या शतकात या ग्रांथाच्या संचाचा मंगोलियन भाषेत अनुवाद केला गेला. मोंगोल 'तांजूर'मध्ये 226 ग्रांथ आहेत. प्रत्येक ग्रांथ चंदनाच्या लाकडी पट्टयांमध्ये बांधला आहे. चिनी जाड कागदावर सुंदर अक्षरात बौध्द साहित्य लिहिले आहे आणि पानापानावर सुरेख चित्रे आहेत. मंगोल तांजूरला UNESCOने 'जागतिक दस्तऐवज' म्हणून मान्यता दिली आहे. या जागतिक दस्तऐवजात 14 ग्रांथ केवळ गणपतीविषयी आहेत!

जपानमध्ये गणेशाची रूपे

चीनमधून गणेश जपानमध्ये पोहोचला आणि चीनपेक्षा जपानमध्ये अधिक लोकप्रिय झाला. जपानमध्ये विनायक-तेन आणि कांगी-तेन अशी गणेशाची दोन रूपे दिसतात. सातव्या-आठव्या शतकात जपानमध्ये आलेल्या गणपतीची पूजा आजही केली जाते. हा देव सुख देणारा आहे. त्याला 'अवलोकितेश्वर' असेसुध्दा म्हटले जाते. अवलोकितेश्वर हा सर्वांचे हित करणारा, संकटात मदत करणारा बौध्द देव. आणखी एक विशेष असे की कांगीतेनला चक्क तळलेल्या मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो!

 

इकडे नेपाळ, बांगला देश आणि श्रीलंका या सख्ख्या शेजाऱ्यांकडे गणपतीच्या सुरेख मूर्ती व मंदिरे आहेत. नेपाळ व श्रीलंका येथे गणेश आजही पूजला जातो, अशी कैक मंदिरे आहेत. नेपाळ व तिबेटमध्ये बौध्दांच्या तांत्रिक मार्गातील गणेशही दिसतो.

 

आग्नेय देशांमध्ये गणेशाचे मंदिर

 
आग्नेय देशांमध्ये म्यानमार, थायलंड, कंबोडिया, मलेशिया, इंडोनेशिया, लाओस आणि व्हिएतनाम या देशांचा समावेश होतो. या देशांमध्ये इ.स. पहिल्या शतकाच्या दरम्यान हिंदू पोहोचले होते. त्यांच्याबरोबर हिंदू धर्म, ग्रांथ व देवताही पोहोचल्या होत्या. काही शतकांनंतर येथे बौध्द धर्माचे आगमन झाले. या सर्व ठिकाणी विष्णू, शिव आणि बुध्द यांची अगदी सरमिसळ झालेली दिसते. या सर्वांच्या बरोबर गणपतीही दिसतो. येथे गणपतीच्या चिक्कार मूर्ती पाहायला मिळतात. दगडाच्या आणि धातूच्यासुध्दा. गणेशाच्या इतक्या मूर्ती आहेत, आपण उदाहरणदाखल म्हणून एक बघू. व्हिएतनाममध्ये मिसोन या ठिकाणी 67 मंदिरांचे संकुल (complex) होते. त्यापैकी काही मंदिरे गणपतीची असावीत.

या देशांमध्ये गणेशप्रेम किती मुरले आहे, हे खालील उदाहरणांवरून लक्षात येईल. थायलंडच्या शासकीय कला विभागाच्या मुद्रेवर 64 कलांची देवता असलेला गणेश आहे. हा विभाग चित्र, शिल्प, नृत्य, नाटक, गायन, वादन, सांस्कृतिक वारसा आदींचा विकास करण्यासाठी बध्द असतो. तसेच इंडोनेशियाने 'शिक्षण' या themeवर जेव्हा नवीन नोट काढली, तेव्हा त्यावर बुध्दिदाता गणपतीचे चित्र छापले.

या देशांच्या पोस्टाच्या कैक तिकिटांवर गणपतीचे चित्र दिसते. यामध्ये नेपाळच्या, श्रीलंकेच्या तिकिटाबरोबरच झेक रिपब्लिकने 10 वर्षांपूर्वी शिव-पार्वती-गणेश हे दैवी परिवाराचे काढलेले तिकीटदेखील देखणे आहे.

सर्वांचा लाडका देव गणेश

देशोदेशी बाप्पाची प्रतिमा 'सुखकर्ता, दुःखहर्ता' अशीच आहे. त्यामुळे विशेषकरून लांबचा प्रवास करणाऱ्या व्यापाऱ्यांना तो रक्षण करणारा म्हणून जवळचा आहे. तो बुध्दिदाता आहे, म्हणून देशोदेशीच्या विद्यार्थ्यांचा लाडका आहे. कलांचा देव आहे, तंत्राचा देव आहे, विद्येचा देव आहे ... त्यामुळे तो कलाकारांचा, वैज्ञानिकांचा, तंत्रज्ञांचा, लेखकांचा आवडता देव आहे.

विविध देशांतील गणेशाच्या मूर्ती, मंदिरे, ग्रांथ व चिन्हे आपण पहिली. ही गणेशाच्या उपासनेचे अगदी छोटीशी झलक देतात. एक मूर्ती सापडण्याच्या आवतीभोवती खूप काही येते. उदा., मूर्ती आहे त्या अर्थी मंदिर होते, मंदिर बांधणारे स्थपती होते, Sponsor करणारे राजे - श्रेष्ठी होते, पूजाअर्चा करणारे पुजारी होते. त्या देवाचे गुणगान करणारे साहित्य लिहिले गेले होते. त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारे संत होते. मंदिरात राहणारे साधक होते. मंदिरात नित्य चालणारे - पूजा, आरती, प्रसाद, भजन, कीर्तन, उपासना असे कार्यक्रम होते, तसेच नैमित्तिक कार्यक्रम - वार्षिक मेळा, वारी, परिक्रमा, जत्रा, उत्सव, मिरवणूक, यज्ञ-याग, होम-हवन असेही काही कार्यक्रम होते. याशिवाय मंदिरात चालणारे इतर कार्यक्रम - उदा., कीर्तन, प्रवचन, पुराणकथन चालत असणार. गायन, वादन, नृत्य व नाटकाचे खेळसुध्दा मंदिरात होत असणार. लग्न-मुंजीसारखे कार्यक्रम होत असणार. मंदिराला एखादे गाव किंवा जमीन लावून दिलेली असणार. हार-फुले, दिवाबत्ती, देवाचे कपडे, दूध-फळे, धूप-वाती, अभिषेकाचे समान... असे अनेक गोष्टींचे कंत्राट ठरावीक कुटुंबांना दिलेले असणार. एक मंदिरावर कितीतरी कुटुंबे, नट, कलाकार, कीर्तनकार, पुजारी यांच्या अनेक पिढयांची उपजीविका चालली असणार.

त्यावरून आपल्याला हेसुध्दा कळते की मंदिरात नेमाने दर्शनाला येणारे भक्त होते. देवाजवळ नवस बोलणारे आणि नवस फेडायला येणारे भक्त होते. त्याची उपासना करणारे भक्त होते. त्याला प्रसन्न करायला ठरावीक दिवशी, किंवा कैक दिवस उपास करणारे भक्त होते. गणेशाला प्रसन्न करून घेण्यासाठी मंदिरातून अन्नदान करणारे, गोरगरिबांना जेवणावळी वाढणारे भक्त होते. बाप्पासाठी व्रत वैकल्ये केली जात असणार. त्या बाप्पाने किती जणांना संकटाला तोंड देण्यासाठी धैर्य दिले असेल, किती जणांना आत्महत्येपासून परावृत्त केले असेल, किती जणांना प्रेम दिले असेल, किती जणांना वाईट कर्म करतांना त्याचा धाक वाटला असेल, कितींना त्याने अभ्यासासाठी प्रवृत्त केले असेल, कितींना त्याने चांगल्या कामासाठी स्फूर्ती दिली असेल, कितींनी आपले यश त्याच्या चरणी वाहिले असेल, किती जणांनी त्याच्या पायाची शपथ घेतली असेल, किती जण केवळ त्याला पाहण्यासाठी शेकडो मैल चालून आले असतील, किती जणांच्या प्रेमाश्रूंनी त्याच्या चरणावर अभिषेक केला असेल, कितींच्या मनात हा बाप्पा भरून राहिला असेल... देशोदेशीच्या गणेशाच्या मूर्ती पाहून त्यामागच्या प्रेमकहाणीची आपण थोडीफार कल्पना करू शकतो.

दीपाली पाटवदकर

9822455650

 

संदर्भ -

1. श्रीगणेश आशियाचे आराध्य दैवत - डॉ. म.के. ढवळीकर

2. काबुल महाविनायक - आनंद कानिटकर

3. Omkara, the creation of Ganesha - Nanditha Krishna

फोटोओळ

फोटोओळ - PC: नंदिता कृष्ण, डॉ. जिओवान्नी वेरार्दी

PC: Shiraz Hasan

थायलंड कला विभागाचे चिन्ह

इंडोनेशियाच्या नोटेवरील गणेश

दाईशोइन बुध्द मंदिरातील गणपती

कांगीदान (Kangi dan) तळलेला मोदक