गौराईचं माहेरपण

विवेक मराठी    31-Aug-2019
Total Views |

'अतिथी देवो भव!' असं सांगणारी आपली संस्कृती... आणि त्याप्रमाणे आनंदाने आचरण करणारी आपली माणसं... इथे तर साक्षात जगत्जननी गौरी, पाहुणी म्हणून नाही तर लेक बनून 'माहेरपणा'ला आलेली... मग घराघरांत उत्साहाला उधाण न येईल तरच नवल!


'सुंदर, साजिऱ्या श्रावणमासानंतर भादवा येतो... अन् हिरवाईच्या मखमली दुलईत विसावलेला भोवतालचा निसर्ग, सासरी रमलेल्या गौराईच्या मनात माहेरची ओढ जागी करतो. माय, तात आणि अवघ्या गणगोताच्या आठवणी मनात फेर धरू लागतात... मग सुरू होते भोळया शंकराची विनवणी... भोळा असला तरी नवराच तो... इतक्या सहजी बरा बायकोला माहेरी धाडील? आजूबाजूला उमललेली सुगंधी फुलं तिच्या मनाला माहेरच्या वाटेवर घेऊन जातात... झिम्मा फुगडीच्या आठवणी मनात गर्दी करतात... तिला माहेराची लागलेली ओढ, शंकराला काही उमगत नाही... ''तू गेलीस तर मला करमायचं नाही,'' असं सांगत तो तिला नकार देतो... अखेर शंकराच्या नकाराकडे दुर्लक्ष करून आसुसलेली गौराई माहेरा येते... हे माघारपण तरी किती दिवसांचं? इन मिन तीन दिवसांचं... कारण तिच्या विरहाने व्याकुळ झालेला शंकर नदीपल्याड तिची वाट पाहतोय हे तिला कळतं आणि मग जे माहेरपण वाटयाला आलं त्यात समाधान मानून तृप्त मनाने ती पुन्हा सासरची वाट धरते...' भाद्रपदातल्या गौरी आगमनाशी पिढयान्पिढया स्त्रियांनी जोडलेली ही हृद्य कथा. पूर्वीच्या काळी सासरी काबाडकष्ट उपसतानाही, माहेरच्या वाटेकडे डोळे लावून बसलेलं 'स्त्रीमानस' हे या कथेचं उगमस्थान...! या संदर्भामुळं गौरीच्या सणाला बाईच्या भावविश्वात आगळं स्थान आहे. म्हणूनच गणपतीच्या कोडकौतुकांतही, ती या माहेरवाशिणीच्या आदरातिथ्यात जराही उणेपणा येऊ देत नाही... साक्षात् जगन्माता तिच्या घरी माहेरपणाला आलेली असते... हा तिच्यातल्या 'मातृत्वा'चा जगत्जननीने केलेला सन्मान असतो... या 'लेकीचं'ं कोडकौतुक क रायला मिळण्यापुरतं भाग्य तरी कोणतं...?

माहेरवाशीण म्हणून बऱ्याच ठिकाणी पूजली जाणारी गौर, काही घरांत गणपतीची आई म्हणून येते ती आपल्या बाळाचं होणारं कौतुक डोळे भरून पाहण्यासाठी...! तर कधी ही जगन्माता 'ज्येष्ठा-कनिष्ठा' अशा बहिणींच्या रूपात आगमन करते...

महाराष्ट्रात आणि कर्नाटकात भाद्रपद महिन्यात गणेशाच्या आगमनानंतर गौरीपूजनाची परंपरा आहे... ज्ञातीनुसार, प्रदेशानुसार पूजापध्दतीत फरक आहे मात्र कायम देवलोकात वास करणाऱ्या या लेकीबद्दलचा जिव्हाळा, आपुलकी सगळीकडे सारखी! 'लेक' बनून आलेल्या या माऊलीची 'यथाशक्ती, यथामिलितं सेवा करणं,' हाच भाव प्रत्येक गृहलक्ष्मीच्या मनी वसत असतो.

महाराष्ट्रातही गौरीपूजनाची विविध रूपं पाहायला मिळतात... प्रदेशानुसार पूजेची पध्दत बदलते, गौरीचं रूप बदलतं..

 

 
***

कोकणस्थ आणि कऱ्हाडे ब्राह्मणांकडे खडयांच्या गौरी असतात... सकाळी शुचिर्भूत होऊन, पंचोपचारी पूजेचं सामान बरोबर घेऊन नदीकाठी जायचं. तिथले गोलाकार, गुळगुळीत असे पाच किंवा सात खडे कोऱ्या वस्त्रावर ताम्हनांत किंवा चांदीच्या छोटया वाटीत ठेवायचे... त्यासोबत हळकुंड, सुपारी ठेवायची... खडयांना कापसाचं वस्त्र घालायचं, दूध-साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि ही गौर घरी आणायची. गौर माहेरवाशीण म्हणून येत असल्याने तिला घरी आणायचा मान माहेरवाशिणीचा किंवा कुमारिकेचा...(हल्ली घरात माहेरवाशीण असतेच असं नाही आणि असली तरी सहजी येण्याच्या अंतरावर असते असंही नाही. मग अशा वेळी घरातली सासुरवाशीणच गौर घेऊन येते.) कोकणस्थांमध्ये गौर घेऊन येणारीनं तोंडात पाण्याची चूळ ठेवायची असते(याच्यामागचं कारणही मोठं मार्मिक आहे. पूर्वीच्या काळी माहेरवाशिणीचं माहेरी येणं सणावारालाच घडायचं. कधी एकदा आई भेटते आणि तिच्याजवळ आपलं मन मोकळं करतोय, असं तिला झालेलं असे. पण गौरी आणायच्या वेळी तिनं सासरची गाऱ्हाणी गाऊ नयेत, मन:स्वास्थ्य घालविणारे विचारही तिच्या मनात येऊ नयेत, ती साक्षात गौरीचं रूप म्हणून माहेरी आली आहे, याचं भान तिला राहावं यासाठी तिच्या तोंडात पाणी ठेवलं जाई. आजही ती परंपरा चालू आहे) ...पाणवठयावरून वाजत-गाजत मिरवत आणलेल्या गौरीला घराच्या उंबऱ्याबाहेर पायावर दूध-पाणी घालून ओवाळलं जातं... घरात आतल्या दिशेने जाणारी रांगोळीची पावलं रेखलेली असतात, त्या पावलांवरून गौर आत येते... जागेवर स्थानापन्न होण्याआधी तिला प्रत्येक खोलीत नेऊन घरची गृहलक्ष्मी तिला घराच्या समृध्दीचं दर्शन घडवते... स्वयंपाकघर, पैशांची तिजोरी, दागदागिने, पुस्तकांचं कपाट, (आजच्या काळात अगदी कॉम्प्युटरही)दाखवते...'इथे काय आहे?' असा प्रश्न तिला विचारते. यावर तिनं (मनातल्या मनात)'उदंड आहे', असं त्रिवार उच्चारायचं... त्यानंतर गणपतीजवळ ठेवलेल्या आसनावर गौरींची स्थापना होते... मगच माहेरवाशीण तोंडातलं पाणी टाकून घरच्यांशी बोलू शकते.

आगमनाच्या दिवशी गौरीला खिरीचा नैवेद्य असतो... तर दुसऱ्या दिवशी घावन-घाटल्याचा नैवेद्य असतो... कऱ्हाडे ब्राह्मणांकडे दुसऱ्या दिवशी पुरणावरणाचा स्वयंपाक असतो... गौरी घरी परतण्याच्या म्हणजे तिसऱ्या दिवशी ओल्या नारळाच्या (मुरडीच्या) करंज्या केल्या जातात. तीनही दिवस गौरीची खण-नारळ अन् तांदळाने ओटी भरण्यात येते... निरोपाच्या वेळी तिच्यासोबत दही-पोहे दिले जातात...(लांबच्या प्रवासाला निघालेली माहेरवाशीण असते ना ती... 'असं रिकाम्या हाती कसं पाठवायचं तिला?' अशी भावना त्यामागे असते.) अक्षता टाकून तिला स्थानावरून हलविल्यानंतर पुन्हा एकदा संपूर्ण घरातून तिला फिरविण्यात येतं... तिची कृपादृष्टी सगळीकडे फिरावी हा हेतू त्यामागे असतो.


 
 ***

देशस्थांच्या घरी उभ्याच्या गौरी असतात, विदर्भात गौरींना 'महालक्ष्मी' म्हटलं जातं. यांचे मुखवटे पितळयाचे, प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे किंवा चांदीचेही असतात...(या मुखवटयांची, महालक्ष्मी उभी करण्यासाठी खास तयार करण्यात आलेल्या साहित्याची वर्षानुवर्षंजपणूक केली जाते. त्यासाठी लोखंडी पेटारे बनविलेले असतात.) घरातल्या दोन माहेरवाशिणी, त्या नसल्यास सासू-सून सवाष्णी दोन सुपांमध्ये धान्याच्या राशींवर 'महालक्ष्मी'चे मुखवटे ठेवून घरात आणतात... त्यापैकी 'ज्येष्ठा' जी असते तिला देवघरापासून अंगणातल्या तुळशीवृंदावनापर्यंत मिरवत नेलं जातं. तिथे तिची अन् कनिष्ठेची भेट होते... तुळशीला हळदीकुंकू वाहून आणि ज्येष्ठा-कनिष्ठेलाही हळदीकुंकू लावून दोघींना वाजतगाजत घराच्या उंबऱ्यापर्यंत आणतात. उंबऱ्यावर ठेवलेलं माप ओलांडून महालक्ष्मी गृहप्रवेश करते. घरभर काढलेल्या लक्ष्मीच्या पावलांवरून, मुखवटे संपूर्ण घरात फिरविले जातात. ''लक्ष्मी कोणत्या पावलांनी आली?'' यावर, ''सोन्याच्या, चांदीच्या, रुप्याच्या पावलांनी... धनधान्य, समृध्दीच्या सुखाच्या पावलांनी'' असं संपन्नतेचं दर्शन घडविणारं उत्तर दिलं जातं... सगळं घर फिरून आल्यावर महालक्ष्मींची स्थापना करण्यात येते. गणेशमूर्तीशेजारी ठेवताना, ज्या सवाष्णींनी त्यांना मिरवत आणलेलं असतं त्या एकमेकींना हळदीकुंकू लावतात, हातावर साखर ठेवतात... मग लक्ष्मीला तयार करण्यासाठी, खास बनविलेल्या लोखंडी पेटाऱ्यात ज्वारी, गहू असं धान्य भरलं जातं... पैसे ठेवण्यात येतात आणि मुलाबाळांसहित आलेल्या या माहेरवाशिणींना नटविण्याचं काम मोठया उत्साहात करण्यात येतं... खास त्यांच्यासाठी किमती साडयांची खरेदी करण्यात येते, एखादी स्त्री जशी नटेल तसा या देवींचा साजशृंगार केला जातो... आणि सरतेशेवटी त्यावर मुखवटे बसविण्यात येतात... घरागणिक मुखवटयांचं रूप बदललं तरी पंचोपचारे पूजा केलेल्या देवीचं तेज मात्र सगळीकडे तेच असतं. आगमनाच्या दिवशी महालक्ष्मीला भाजी-भाकरीचा साधासुधा नैवेद्य असतो... दुसऱ्या दिवशी असते लक्ष्मीची महापूजा... 16 प्रकारच्या पत्री आणि फुले वाहून षोडशोपचारे पूजा करून तिची प्रतिष्ठापना केली जाते. यावेळी ज्येष्ठा आणि कनिष्ठेला हळद आणि अत्तरामध्ये भिजवून तयार केलेल्या तातूने सोळा वेळा सुतवतात तर त्यांच्या बाळांना आठ वेळा सुतवतात; मोदक, करंज्या, पात्या यांचा फुलोरा महालक्ष्मीच्या डोक्यावर बांधला जातो, पुरणाची आरती केली जाते. वडा आणि पुरणपोळीबरोबरच पंचपक्वानांचा नैवेद्यही दाखवला जातो. विदर्भात या नैवेद्यात समावेश असतो तो ज्वारीपासून तयार करण्यात आलेल्या आंबिलीचा. 16 भाज्या आणि विविध प्रकारच्या चटण्या, कोशिंबिरी असा माहेरवाशिणीचा थाट असतो. तिसरा दिवस हा महालक्ष्मीच्या परतण्याचा दिवस... या दिवशी, मूळ नक्षत्राच्या मुहूर्तावर त्यांची पुन्हा पूजा होते. दहीभात, मुरडीचे कानवले असा नैवेद्य दाखवला जातो... संध्याकाळी अक्षता टाकून विसर्जन होतं, यावेळी 'मम गृहे स्थिरा भव' असं मागणं देवीकडे मागितलं जातं. विदर्भाप्रमाणेच मराठवाडयातही उभ्या महालक्ष्मींची पूजा होते.


 
 ***

कोल्हापूर परिसरातल्या देशस्थांकडे मात्र तांब्यावरच्या गौरी असतात. पूर्वी मातीच्या सुगडाचा वापर होत असे. आता बहुतेक घरांमधून तांब्याचे तांब्ये वापरले जातात. या तांब्याला वरून गेरू लावतात. त्याच्या एका बाजूला गौरीचा चेहरा, तिचे दागदागिने, हात काढले जातात. तर मागच्या बाजूला गोपद्म, चंद्र, सूर्य, शंख, गदा, चुडा, फणी, करंडा इ. शुभचिन्हे काढण्यात येतात. श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारी 'ज्येष्ठा' गौर येते. तिच्या पोटात तांदळाची ओटी घालून घरातल्या मुख्य देव्हाऱ्याजवळ तिची स्थापना होते. पंचामृती पूजा करून, खणाने ओटी भरली जाते. दर शुक्रवारी तिची आणि सवाष्णीची पुरणाची आरती करण्यात येते. 'कनिष्ठे'चं आगमन गणपतीनंतर होतं. तिच्या पोटात गव्हाची ओटी असते, तर तिच्या पाठीवरच्या शुभचिन्हांमध्ये पालखीचा समावेश असतो. या कनिष्ठेबरोबरच 'तेरडा' गौर आणि खडयांची 'गंगा' गौरही येते. तेरडा आणि गंगागौर पाणवठयावरून वाजतगाजत आणली जाते. कनिष्ठेसह या गौरींचं घराच्या उंबरठयावर ओवाळून स्वागत केलं जातं. ही गंगागौर घेऊन येण्याचा मान माहेरवाशिणीचा. आगमन झाल्यानंतर गंगागौरीला आणि तेरडागौरीला संपूर्ण घरात फिरवलं जातं. त्यानंतर चांदीच्या तांब्यात तेरडा गौर आणि या काळात उपलब्ध असणारा फुलोरा; तसंच गंगागौर ठेवण्यात येते आणि त्यानंतर एका चौरंगावर तिघींचीही विधिवत स्थापना होते. आगमनाच्या दिवशी दशमी, लोणी, शेपूची भाजी, कारल्याची चटणी असा बेत असतो; तर दुसऱ्या दिवशी पुरणपोळीसह पंचपक्वान्नं, 16 प्रकारच्या भाज्या आणि कढी-गोळे असा थाट असतो. अक्षता टाकून गणपतीबरोबर गंगागौरीचं आणि तेरडा गौरीचं विसर्जन करण्यात येतं. माहेरपणाला आलेल्या जगन्मातेची पाठवणी करताना तिच्यासोबत शिदोरीचा नैवेद्य अर्थात पाटवडी, कानवले, शेवयांची खीर आणि दोघींसाठी दोन मुदी दहीभात असा शिधा दिला जातो.


 
 
 

***

कोकणात वेंगुर्ले परिसरातल्या सारस्वतांकडे गणपतीची 'आई' म्हणून गौरी पूजली जात असल्याने, लेकाच्या आगमनाच्या एक दिवस आधीच येते आणि तीही महादेवासह... सुपात तांदूळ घेऊन त्यात पाच झाडांच्या फांद्या ठेवतात आणि त्याभोवती महादेव-पार्वतीचं चित्र असलेला कागद गुंडाळला जातो. गणपतीच्याही आधी त्याच्या आईवडिलांची पूजा होते. हळदीच्या पानातल्या पातोळया आणि पाच प्रकारच्या भाज्यांचा नैवेद्य दाखविण्यात येतो... आगमनानंतर आणि विसर्जनाआधीही काकडी, नारळ, खण, तांदळाने गौरीची ओटी भरली जाते. या गौरीचं विसर्जनही तिसऱ्या दिवशी गणपतीच्या आधी झाडाखाली करण्यात येतं.


 
 ***

चांद्रसेनीय कायस्थ प्रभू म्हणजेच सी.के.पी. लोकांकडे तेरडा आणि खडयांच्या गौरी पूजल्या जातात. माहेरवाशीण ही गौर घरात आणते. तेरडा आणि सात खडे सुपात घेऊन आलेल्या माहेरवाशिणीच्या पायावर दूध-पाणी घालून, तिला ओवाळून घरात घेतलं जातं... कुंकवाचं पाणी केलेल्या परातीत पावलं बुडवून मगच तिनं घरात यायचं असतं... संपूर्ण घरात काढलेल्या रांगोळीच्या पावलांवरून लाल पावलांचे ठसे उमटवत माहेरवाशीण चालू लागते. गृहलक्ष्मी प्रत्येक खोलीत तिचं औक्षण करते, हातावर साखर ठेवून विचारते, ''गौरी, गौरी कुठे आलीस?'' मग गौर उत्तरते, ''दिवाणखान्यात...'' ''दिवाणखान्यात तुला काय दिसलं?'' यावर गौर घेतलेली माहेरवाशीण यजमानाच्या वैभवाचं, प्रगतीचं वर्णन करणारी उत्तरं देते... अशा रीतीने सगळं घर पाहून झालं की मग गणरायाच्या शेजारी गौर बसवली जाते... मग तिला मुखवटा लावून साडीचोळी नेसवून शृंगारण्यात येतं... सौभाग्यवाणासह खणानारळाने गौरीची ओटी भरण्यात येते. पहिल्या दिवशी खीर, भाजी, भाकरीचा नैवेद्य असतो, दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य असतो. तिसऱ्या दिवशी खीर आणि मुरड घातलेला कान्होला नैवेद्याला असतो. 'पुन: पुन्हा मुरडून आमच्या घरात ये', असं मागणं गौरीकडे मागितलं जातं...


 

***

कोकणातील शेतकरीवर्गात गौरीचा सण महत्त्वाचा असतो. तेरडयाची पाने एकत्र बांधून त्यांची प्रतिमा बनवितात व त्यावर मातीचा मुखवटा चढवतात. नंतर त्या मूर्तीला साडी नेसवून दागदागिन्यांनी सजवितात.

 महाराष्ट्रातील बहुजन समाजात गौरीपूजनाची निराळी पध्दत आहे. मातीची नवीन पाच लहान मडकी आणून त्यात हळदीने रंगवलेला दोरा, पाच खोबऱ्याच्या वाटया व खारका घालून त्याची उतरंड रचतात आणि त्याच्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवितात. गौरीच्या अशा दोन प्रतिमा तयार करून मग त्यांची पूजा करतात. तिसऱ्या दिवशी ती मडकी उतरवून त्यातील दोरे व खारीक-खोबरे काढून घेतात. मग त्या खारीक-खोबऱ्याचे तुकडे त्या दोऱ्यात बांधून घरातील सुवासिनी व मुले तो दोरा गळयात बांधतात. पुढे एखादा चांगला दिवस पाहून ते दोरे काढतात व ते दह्यादुधात भिजवून शेतात पुरतात.
 

कोकणस्थ मराठा समाजात हळदीचा खांब आणि गौरीचा मुखवटा घेऊन घरातल्या मुली अन् सवाष्णी विहिरीवर जातात. विहिरीच्या बाजूला सारवण करून रांगोळी काढतात, त्यावर मुखवटा अन् हळदीचा खांब ठेवून पूजा करतात... त्यानंतर वाजतगाजत गौर घरी आणतात... गणपतीजवळ तिची स्थापना करून तिला साडीचोळी नेसवली जाते, नटवलं जातं. तिच्या मागे हळदीचा खांब उभा केला जातो. या दिवसांत मिळणाऱ्या फुलोऱ्याचीही गौर म्हणून पूजा होते. पहिल्या दिवशी गौरीला तांदळाची भाकरी अन् भाजीचा नैवेद्य असतो आणि दुसऱ्या दिवशी गोडाचा... तिसऱ्या दिवशी हळदीच्या खांबाचं गणपतीसोबत विसर्जन केलं जातं...

गौरींच्या स्वागताची मोठया उत्साहात तयारी करणारी, तिच्या स्वागतात कोणतीही कसूर राहू नये यासाठी प्रत्येक घरातली गृहलक्ष्मी झटत असते... ''हे सगळं करताना अंगात दहा हत्तींचं बळ येतं... आपण करत नाही तर कुठली तरी शक्ती हे सारं करवून घेते!'' सर्वत्र व्यक्त होणारी ही भावना खूप काही सांगून जाते. साक्षात गौरी आपल्या घरी 'माघारपणा'ला आली, या आनंदापुढे सारे कष्ट फिके ठरतात... आणि माहेरी आलेल्या लेकीचं कोडकौतुक करताना कुठली आई दमल्याचं कधी ऐकलंय?

-9594961865