रामायण-महाभारतातील श्रीगणेश

विवेक मराठी    31-Aug-2019
Total Views |

***स्नेहा शिनखेडे***

श्री गणेशाची सगळे रूपे, त्याच्यामागच्या आख्यायिका हे आपले सांस्कृतिक वैभव आहे. रामायण काळातले श्रीगणेशाचे माहात्म्य मोठे आहे. श्रीगुरुचरित्र, शिवपुराण, शिवलीलामृत यासह अनेक पुराण ग्रंथात गणरायाचा उल्लेख आढळतो.



संत तुलसीदासांनी विनयपत्रिकेत प्रथम श्रीगणेशाला वंदन केले आहे. ते म्हणतात,

गाइये गनपति जगबंदन। संकर सुवन भवानी के नंदन॥

मांगत तुलसीदास कर जोेरे। बसहु रामसिह मानस मोरे॥

 

पहिल्याच पदात तुलसीदासांनी गणपतीची स्तुती केली आणि हात जोडून मागणी केली की, रामचरितमानसमध्ये राम आणि सीता यांचा अखंड वास असू दे, ईश्वर तर सर्वांच्याच हृदयात असतो; परंतु तो राम-सीतेच्या रूपात असू दे. रामचरितमानसमध्ये संत तुलसीदासांनी शिव-पार्वती विवाहाची कथा मोठया विस्ताराने आणि बहारीने वर्णन केली आहे. त्यात विवाहप्रसंगी महात्म्यांनी शिव-पार्वतीला गणपतीपूजनाची आज्ञा केली. त्यानुसार त्या दोघांनी सर्वप्रथम गणपतीची पूजा केली. संत तुलसीदासांना असे वाटले की, शिव-पार्वती हे गणपतीचे माता-पिता असल्यामुळे त्यांच्या लग्नात गणपतीची पूजा कशी काय? अशी शंका लोकांच्या मनात येऊ शकते. याचे स्पष्टीकरण देताना तुलसीदास म्हणतात, 'जनहो, शंका घेऊ नका. कारण गणपती हा अनादि देव आहे.' भारतातले ऋषी म्हणतात, 'हे गणपती! आपण कुणाच्या उदरातून जन्म घेत नाही, तर सारे जग आपल्याच उदरात सामावले आहे. म्हणूनच आदिदेवाच्या रूपात शिव-पार्वतीच्या लग्नात गणपतीची पूजा करण्यात आली.'

महाकाव्य रामायणात गणेश

भारताचा श्वास असलेल्या रामायण या महाकाव्यात गणपतीचे फारसे उल्लेख प्रत्यक्षरीत्या सापडत नाहीत; परंतु श्रीगुरुचरित्र, शिवपुराण, शिवलीलामृत या ग्रंथांमध्ये गणपतीने रावणाला चांगलाच धडा शिकवला, याची कथा आहे. गोकर्ण महाबळेश्वर प्रतिष्ठापना या कथेत रावण, कुंभकर्ण, बिभीषण यांनी गोकर्णक्षेत्री मोठे तप, अनुष्ठान केले. हे क्षेत्र म्हणजे भूकैलास आहे. इथे रावणाने कैलासावरून आणलेले शिवाचे निर्वाणलिंग श्रीगणेशाने स्थापित केले. रावणाची माता कैकसी ही निःसीम शिवभक्त होती. लिंगपूजन झाल्याशिवाय ती पाणीसुध्दा पित नसे. तिने केलेले लिंग शुक्राने एक दिवस समुद्रात नेऊन टाकले. यामुळे रावणमातेने अन्नपाणी सोडले. तेव्हा रावणाने आईला वचन दिले की, तुला पूजेसाठी प्रत्यक्ष शिवाचे आत्मलिंग आणून देतो. रावणाने शिवप्राप्तीसाठी घोर तप केले. त्याने आपले शिर कापून त्या तंतूची वीणा केली. अद्भुत असे गायन केले. त्यामुळे शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी रावणाला आत्मलिंग दिले. रावण शिवलिंग घेऊन निघाल्यावर इंद्र, ब्रह्मदेव, विष्णू यांच्यासह सारे देव चिंतेत पडले. स्वत: शंकरालाही या अनुचित कर्माचा पश्चात्ताप झाला. कारण रावणाची मूळ प्रवृत्ती उन्मत्तपणाची होती. त्यात त्याची माता आणि तो यांनी स्वकल्याणासाठी आत्मलिंगाची पूजा करताच त्यांना चिरंजीवित्व प्राप्त होणार होते. यावर उपाय म्हणजे शंकरांनी नारदाकरवी श्रीगजाननाला बोलावून घेतले आणि या संकटातून मुक्त करण्यास सांगितले.

विघ्नहर्ता गणेशाचे एक रूप दुष्टांसाठी विघ्नकर्ता असेही आहे. देवांनी गणपतीला प्रार्थना केली की, रावणाच्या हातून हे दिव्य लिंग सोडवून त्याची अक्षय स्थापना कर. आत्मलिंग देताना शंकर रावणाला म्हणाले, ''हे लिंग तू लंकेस नेताना भूमीवर ठेवू नकोस.'' रावणाने ही आज्ञा मान्य केली व तो आनंदाने निघाला. वाटेत रावणाला लघुशंका लागली. शिवलीलामृतकार श्रीधरस्वामी म्हणतात, 'तव रावणासी मूत्र लागले बहुत। पुढे पाऊल न घालवत। चरफडीत मूत्रभरे॥' रावणाला मोठाच प्रश्न पडला. लिंग हाती घेऊन लघुशंकेस जाणे हे कर्म अनुचित आहे. भूमीवर ठेवू नको, अशी आज्ञा आहे. तितक्यात तिथे गुराखी वेशात गणपती प्रकटला. या सिध्दीबुध्दीच्या दात्याला रावणाने ओळखले नाही. तो गुराख्याला म्हणाला, ''काही वेळापुरते हे लिंग हाती धरशील का?'' गणपती म्हणाला, ''हे जड झाले तर मी तीन वेळा हाक मारीन. तू नाही आलास तर भूमीवर ठेवून देईन.'' रावणाने हे कबूल केले आणि तो लघुशंकेस बसला. अगाध गजमुखाचे चरित्र रावणाला कसे कळावे? रावणाचे मूत्र सरे ना. एक घटिका झाल्यावर गणपतीने हाक मारली, ''माझ्या गायी रानोरानी पळत आहेत. लवकर ये.'' रावणाने हाताने खूण केली. थांब जरा येतोच. दुसरी घटिका झाली. एकदंताने हाक मारली, परंतु रावण उठेचना. शेवटी तिसऱ्या घटिकेला गजानन म्हणाला, ''राक्षसा, आपुले लिंग सांभाळी'' असे म्हणून लिंग भूमीवर ठेवताच ते अभंग झाले. रावण अशौच, अपवित्र, क्रोधभरे धावत आला, परंतु लिंग त्याला उपटता आले नाही. गणपती गुप्त झाला. गाई पृथ्वीत लपल्या. एका गायीचा कान तेवढा रावणाच्या हातात आला. तोही त्याला उपटता आला नाही. गोकर्ण महाबळेश्वर म्हणून हे तीर्थक्षेत्र पावन झाले. गुरुचरित्रात म्हटले आहे - हे गजाननाचे स्थापिलेले आप्तलिंग असल्यामुळे विशेष महत्त्व आहे. इथे जो भक्तिपूर्वक जप, व्रत करेल त्याला त्याचे लक्षगुणी फळ मिळेल. रावणमाता, रावण, बिभीषण, कुंभकर्ण यांनी इथे तप केले. यामुळे रावणाला पत्नी मंदोदरी, इंद्रजितसारखा पुत्र व अपार संपत्ती प्राप्त झाली.

 

मुद्गल पुराणामध्ये रामायणाशी संबंधित वेगळा संदर्भ सापडतो. यात बारा महिन्यातील चतुर्थीव्रताच्या कथा आहेत. गुरू वसिष्ठांनी राजा दशरथास या कथा सांगितल्या. प्रत्येक चतुर्थीच्या श्रेष्ठत्वाविषयी राजा दशरथाने वसिष्ठांना निरनिराळे प्रश्न विचारताच त्यांनी प्रत्येक चतुर्थीची वैशिष्टयपूर्ण कथा दशरथास सांगितली. फाल्गुन कृष्ण चतुर्थी यात रावणाची कथा आहे. रावणाने ब्रह्माचे तप केले, तरी त्याला उत्तम ज्ञान प्राप्त झाले नाही. म्हणून त्याने शंकराचे स्मरण केले. शंकराने नारदमुनींना त्याच्याकडे पाठवले. रावणाने नारदमुनींचे पाय धरून त्यांना विचारले की, मला ज्ञानप्राप्तीसाठी उपाय सांगा. तेव्हा नारद म्हणाले, ''चतुर्विध संकटांच्या नाशासाठी तू संकष्टी चतुर्थीचे व्रत कर.'' चतुर्थीची महती सांगून नारदांनी रावणाला दशाक्षरी गणेशमंत्राचा उपदेश केला. नारदमुनींनी रावणाला सांगितले, ''या मंत्राचा त्याग करशील, तर तुझा बुध्दिभ्रंश होईल, म्हणून त्याचा त्याग कधी करू नकोस.'' नंतर रावणाने फाल्गुन कृष्ण चतुर्थीचे व्रत विधियुक्त आचरले. त्यामुळे त्याला ज्ञान प्राप्त झाले. हे व्रत रावणाने नियमाने तर केलेच, तसेच प्रजाननांसही करायला लावले. पुढे रावण कुसंगतीने बिघडला. अहंकारामुळे मीच गजानन असे त्याला वाटू लागले आणि त्याने संकष्टीव्रत सोडून दिले. त्यामुळे द्विज असून तो राक्षस झाला. या दोषाच्या प्रभावानेच शेवटी रामाने त्याचा वध केला. वसिष्ठ ऋषी म्हणतात, ''दशरथा, प्रत्येक कल्पात राम होतो. तुझा सुत होऊन तो रावणास मारतो.'' चतुर्थीव्रताच्या कथा सांगून वसिष्ठ ऋषींनी राजा दशरथाला चतुर्थीचे व्रत करायला लावले. या व्रतामुळे राजा साक्षात विष्णू झाला. त्याला राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न असे चार थोर, नीतिसंपन्न पुत्र झाले. रामायण काळातले श्रीगणेशाचे माहात्म्य एवढे मोठे आहे.

 

महर्षी व्यासांचा लेखनिक

महाभारताच्या काळाच्या आधीपासून गणपतीने आपल्या प्रत्येक अवतारात दैत्यांचा नाश आणि देवाधर्माची पुन:स्थापना हे कार्य केलेले आहे. महर्षी व्यासांचे महाभारत लिहून घेतले श्रीगणेशानेच. हे महाभारत लिहिताना गणेशाने व्यासांना अट घातली होती की, ज्या ठिकाणी व्यास बोलायचे थांबतील, तिथे गणपती कूटश्लोक रचून महाभारतात त्याचा समावेश करील. गणपतीने महाभारतात असे कूटश्लोक रचले आहेत, जे समजून घेण्यास अतिशय कठीण आहेत. व्यासांनी महाभारतात श्रीकृष्णाच्या मुखाने श्रीमद्भगवद्गीता सांगितली, पण ही गीता महाभारतात लिहिली ती स्वत: गणेशानेच. महाभारतात गणपतीचे मोठे कार्य दिसते.

मुद्गल पुराणातील श्रावण कृष्ण चतुर्थीची कथा महाभारतातील प्रसंगावर आधारित आहे. धृतराष्ट्राने पांडवांना द्यूत खेळण्यास बोलावले आहे हा निरोप घेऊन विदुर युधिष्ठिराकडे गेले, तेव्हा कौरवांच्या कपटनीतीबद्दल अनभिज्ञ असलेल्या युधिष्ठिराला वाटले, धृतराष्ट्र हा थोर राजा असून आम्ही भावंडांनी त्याची आज्ञा पाळायला हवी. विदुराने सावध करूनही पांडव द्यूत खेळले. शकुनीमामाने कपट रचून पांडवांना हरवले अन् त्यांचे राज्य हिरावून घेतले. द्रौपदीची भर सभेत विटंबना केली. त्या वेळी कृष्णाने तिची लाज राखली. युधिष्ठिर वनवासात जाण्यास निघाला, तेव्हा कृष्ण म्हणाला, ''युधिष्ठिरा, दुर्योधनास ठार करून मी तुला राज्यावर बसवीन. तू वनवासात जाऊ नकोस.'' परंतु धर्मप्रिय युधिष्ठिराने हे ऐकले नाही. मग कृष्णाने त्यांना गणेशाची उपासना करण्यास सांगितले. त्याला गणेश दशाक्षरी मंत्र दिला. त्याला चतुर्थीचे व्रत करण्यास सांगितले. युधिष्ठिराने विधिपूर्वक श्रावण कृष्ण चतुर्थीचे व्रत केले. हे व्रतन केल्यामुळे हे संकट ओढवल्याचे श्रीकृष्णाने सांगितले. गणेशभक्ती करून पांडव ब्रह्मभूत झाले. संत नामदेव महाराज आणि श्रीधरस्वामी नाझरेकर यांनी 'यशोदेचे संकष्ट चतुर्थीव्रत' असे गोड, रसाळ, भावपूर्ण पद लिहिले आहे. कृष्णाच्या खोडया खूप वाढल्या, तेव्हा गोपिका यशोदेला म्हणाल्या, ''गणेश देईल उत्तम गुण। मानी आमुचे वचन प्रमाण॥ संकष्टी चतुर्थी व्रत घेई।' यशोदा म्हणाली, मी अवश्य संकष्टी चतुर्थीचे व्रत करीन. यशोदेने गजवदनाला प्रार्थना केली, 'गुण देई माझ्या मुकुंदा। संकष्ट चतुर्थी सर्वदा। न सोडी मी जाण पा।' कृष्णाने हे ऐकले आणि शहाण्यासारखा वागायला लागला. एक महिना त्याने कुणाचीही खोडी केली नाही. यशोदेला आनंद झाला. तिला वाटले, 'आली प्रचिती। धन्य धन्य देव गणपती।' नंतर संकष्ट चतुर्थी आली. यशोदेने दिवसभर उपास केला. चंद्रोदय जवळ आला, तशी पूजेची तयारी करून ती सिध्द झाली. शर्करामिश्रित लाडू आणि मोदक यांचा हारा भरून तिने देव्हाऱ्यात आणून ठेवला. ते बघून कृष्ण म्हणाला, ''लाडू मज कधी देशी?'' यशोदा म्हणाली, ''अरे, गजवदनासी नैवेद्य दाखवून मग देईन. तितक्यात पूजेची आणखी सामग्री आणण्यासाठी ती घरात गेली. कृष्ण एकटाच देव्हाऱ्यात उभा होता. हा एकांत बघून त्याने लाडू, मोदकाचा हारा उचलला अन् क्षणात सर्व स्वाहा केला. नंतर काहीच झाले नाही अशा थाटात मौनात उगाच बसला. धूप, दीप घेऊन यशोदा येऊन बघते तर काय? हारा रिता झालेला. तिला विस्मय वाटला. ती म्हणाली, ''रे घननीळा, नैवेद्य अवघा काय झाला? हारा पडला रिता का?'' छोटेसे मुख करून श्रीकृष्ण म्हणाला, ''अगं आई, तुला काय सांगू? इथे आता एक सहस्र उंदीर आले होते. त्यात एका भलामोठा उंदीर होता, त्यावर विनायक बसला होता. त्याने सगळे लाडू, मोदक सोंडेने उचलले आणि खाऊन टाकले. आई, त्याने सर्वांगाला शेंदूर फासला होता. त्याचे मोठे, थोरले पोट आणि सोंड बघून मी तर घाबरूनच गेलो. त्याला बघून माझी बोबडीच वळली. तोंडाला कोरड पडली. चल, मला भूक लागली. लवकर खायला दे.'' हे ऐकून यशोदेला राग आला. ती म्हणाली, ''कृष्णा, उगीच खोटे बोलू नकोस. दाखव बरे तुझे वदन.'' कृष्ण म्हणाला, ''आई, माझ्या एवढयाशा मुखात एवढे मोठे लाडू मावतीलच कसे, सांग बरे? गणेश लाडू घेऊन गेला आणि आळ माझ्यावर आला.'' यशोदेने हात उगारताच कृष्ण म्हणाला, ''मारू नको मज माते। उघडुनी दावितो वदनाते॥' कृष्ण तोंड उघडताच काय झाले? संत नामदेव महाराज म्हणतात, ''कृष्णनाथे तेव्हा मुख पसरले। ब्रह्मांड देखिले मुखामाजी। असंख्य गणपती दिसती वदनी। पहातसे नयनी यशोदा ते॥' मुखातले गणपती यशोदेला म्हणाले, ''सत्वर तू हरीची पूजा कर'' हे बघून यशोदेला समाधी लागली, तेव्हा हरीने योगमाया पसरून तिला भानावर आणले. यशोदेने हरीला कडेवर घेतले आणि त्याचे मुख चुंबुन ती भोजनाला बसली. यशोदामातेला संकष्टी चतुर्थीला श्रीकृष्णाच्या मुखात ब्रह्मांडदर्शन झाले.

प.पू. गुरुवर्य माया देशपांडे म्हणतात, ''जसे आपण जेव्हा घर बांधतो तेव्हा आधी घराचा नकाशा तयार करतो की आधी घर तयार असते? नकाशामध्ये सर्व योजना तयार करून ठेवलेली असते. इथे देवघर, इथे अमुक खोली वगैरे. त्यानुसारच मग घर बांधले जाते. तसेच ही सबंध सृष्टी कशी घडली? त्या वेळी आपण कोणीच नव्हतो. म्हणजे तेव्हा मानव नव्हते, देवदेवता नव्हत्या, कोणीही नव्हते. तेव्हा फक्त एक परमात्मा होता. तो गणेश. मंगलमूर्ती. त्यानेपाहिले आणि सृष्टी निर्माण झाली.'' म्हणून ज्ञानेश्वर माउली गणेशाला 'ॐ नमोजी आद्या' म्हणतात. श्रीगणेशाचे रामायणातले आणि महाभारतातले रूप, पूजन माणसाला मोठी शिकवण देणारे आहे.

 

स्नेहा शिनखेडे

9823866182