शेती, पाणी, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रासाठी काम करणार'- डॉ. विनोद कोतकर

विवेक मराठी    10-Sep-2019
Total Views |

'केंद्रात नरेंद्र मोदी व राज्यात देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेवर आल्यापासून एकही भ्रष्टाचाराचे प्रकरण झाले नाही. या दोन्ही सरकारच्या स्वच्छ आणि पारदर्शक कारभाराने प्रभावित होऊन मी सत्तेच्या राजकारणात यायला उत्सुक आहे' असे विचार चाळीसगाव येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. विनोद कोतकर यांनी व्यक्त केले. 'शिक्षक असलेले वडील व आदर्श गृहिणी असलेली आई हे माझे गुरू आहेत' असे आवर्जून नमूद करणाऱ्या डॉ. कोतकरांना सामाजिक क्षेत्रात काम करत असतानाच कामाची व्याप्ती वाढवण्यासाठी सत्तेच्या राजकारणात यायचे आहे. 'शिक्षण आणि आरोग्याच्या समस्या सुटल्यास समाज सुखी होऊ शकतो' या विचारावर दृढ विश्वास असलेल्या डॉ. कोतकर यांनी, प्रामुख्याने या दोन बाबींवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगितले.


डॉ. विनोद मुरलीधर कोतकर यांनी एम.बी.बी.एस., डी.जी.ओ.पर्यंत शिक्षण घेऊन चाळीसगावात आई हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णसेवा सुरू केली. समाजकार्याचा पिंड असलेल्या डॉक्टरांचा आगामी काळात सक्रिय राजकारणात येण्याचा मानस आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी केलेली बातचीत.

राजकीय क्षेत्रात सक्रिय होण्याचा तुमचा विचार आहे. या क्षेत्रातले तुमचे आदर्श कोण?

अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. भ्रष्टाचाराच्या विविध घटनांमुळे राजकारणाची मलीन झालेली प्रतिमा स्वच्छ करण्यास या दोन व्यक्तींनी प्रारंभ केला. त्यामुळेच माझ्यासारखी तरुण व सामाजिक कार्यात रस असणारी मंडळी राजकारणात येऊ लागली. पाच-साडेपाच वर्षांपूर्वी राजकारणात जाण्याची कल्पनाही मला असह्य व्हायची. राजकारण म्हणजे भ्रष्टाचार असेच या क्षेत्राबद्दल माझे मत झाले होते. मात्र मोदी सरकारच्या कारभाराने माझ्यासारख्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व डॉक्टरी पेशा असलेल्याचे मत बदलवून टाकले. त्यामुळे या क्षेत्रातले माझे आदर्श हे दोन नेते व तिसरे आदर्श, कामाचा विलक्षण झपाटा असलेले नितीन गडकरी हे आहेत. तसेच जळगाव जिल्ह्याचा विचार करता दांडगा जनसंपर्क आणि विकासाची दृष्टी असलेले गिरीशभाऊ महाजन व खासदार उन्मेशदादा पाटील हेही माझे आदर्श आहेत. 

वैद्यकीय व्यवसायात असतानाही आपण सामाजिक क्षेत्रात गेली अनेक वर्षं आहात. त्या कामाविषयी, त्यामागच्या प्रेरणेविषयी सांगा.

शिक्षण आणि आरोग्य हे कोणत्याही कुटुंबाचे दोन पाय आहेत असे मी मानतो. दारिद्रयाचे मूळच शिक्षणाच्या आणि आरोग्याच्या अभावात आहे. मागील दहा वर्षांत या दोन क्षेत्रांत विविध उपक्रमांच्या माध्यमातून मी कार्यरत आहे. 

'आरोग्यसंपन्न चाळीसगाव तालुका' ही मोहीम मी अनेक वर्षांपासून संपूर्ण तालुक्यात राबवीत आहे. आतापर्यंत 125 शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना आरोग्याबद्दल मार्गदर्शन केले आहे. तरुणांमधील व्यसनाधीनता कमी व्हावी यासाठी या वर्षी आई हे कॅलेंडर वाटले. साधारणपणे 20 हजार विद्यार्थ्यांपर्यंत हा विषय नेला. विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करून शेकडो रुग्णांवर उपचार केले. मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराच्या आयोजनातून सुमारे 1 हजार जणांवर उपचार झाले. तरुण मुलींसाठी आरोग्यविषयक शिबीराचे आयोजन केले.

पंतप्रधान मोदी यांच्या 'मन की बात'मधील आवाहनानुसार दर महिन्याच्या 9 तारखेला संपूर्ण एक दिवसभर गरोदर मातांचे मोफत परीक्षण करतो.

'प्रत्येक घरात शाम उपक्रम : साने गुरुजी' या उपक्रमाच्या माध्यमातून साने गुरुजी यांच्या 'श्यामची आई'चा आदर्श डोळयासमोर ठेवून श्यामची आई संस्कार स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात 550 महिला सहभागी झाल्या. त्यातून 5 मातांना पैठणी देऊन सन्मानित केले होते.

तरुणांसमोरचा बेरोजगारीचा प्रश्न डोळयासमोर ठेवून चाळीसगावात युवक रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यात 2500 युवकांनी सहभाग नोंदविला. त्यापैकी 10वी, 12वी व ITI उत्तीर्ण 1600 जणांना नियुक्ती पत्र मिळाले.

चाळीसगावातील वरिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना विविध वनस्पतींची माहिती व्हावी, म्हणून डॉ. विनोद कोतकर बोटॅनिकल गार्डन तयार करून कवयित्री बहिणाबाई उ.म. विद्यापीठाचे कुलगुरूंच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले. या ठिकाणी 46 प्रकारच्या दुर्मीळ वनस्पती आहेत.

तालुक्यातील जुनोने या गावात भूगर्भातील पाणीपातळी वाढविण्यासाठी एक पथदर्शक उपक्रम राबविला. या गावात लोकसहभाग व आई फाउंडेशनच्या माध्यमातून 125 शोषखड्डे तयार करवून पाणी जिरविण्याचा उपक्रम केला. गावातील 90 टक्के घरांच्या आवारातील पाणी आता जमिनीत मुरत असून त्यामुळे पाणीपातळी वाढण्यास मदत तर झालीच, शिवाय यातून इतर गावातही पाणी जिरविण्याबाबत सकारात्मक संदेश गेला.

या सगळया उपक्रमांबरोबरच, ई-लर्निंग ही काळाची गरज आहे हे ओळखून ग्रामीण विद्यार्थ्यांना त्याचे ज्ञान मिळावे म्हणून मी ज्या तळवाडे येथील शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले आहे त्या शाळेतील एका वर्गाचे डिजिटायझेशन केले.

तसेच गेल्या चार वर्षांपासून वृक्ष लागवडीचा एक अभिनव उपक्रम आम्ही आई फाउंडेशनच्या माध्यमातून राबवीत आहोत. माझ्या हॉस्पिटलमध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक बाळाच्या घरी जाऊन मी एक वृक्ष लावतो. पुढे त्या झाडाचे संगोपन ते कुटुंब करते. या माध्यमातून आजवर सुमारे 3500 झाडे लावली आहेत. या वर्षी 876 वृक्षांची लागवड केली.

सामाजिक आणि वैद्यकीय कामात तुम्ही इतके व्यग्र असताना राजकीय क्षेत्रात जाण्याचा विचार कसा मनात आला?

वैद्यकीय पेशाच्या माध्यमातून आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून मी सामाजिक काम करतोच आहे. मात्र अशा प्रकारच्या कामाला मर्यादा येतात, याची मला जाणीव झाली. सामाजिक कामाची व्याप्ती आणि प्रभाव वाढविण्यासाठी राजकारण आणि त्यातही सत्तेच्या राजकारणात सहभागी होणे आवश्यक आहे, असे मला वाटते. चाळीसगावच्या ए.बी. हायस्कूलच्या माध्यमातून ते मला जाणवले. या संस्थेत सचिव म्हणून काम करताना, पद असले तर आपण अधिक चांगल्या प्रकारे विकासकामे करू शकतो याचा अनुभव घेतला. स्वच्छ प्रतिमा घेऊन राजकारण करता येते. शासन व प्रशासन सोबत असेल तर अनेक पटींनी कामे करता येतात. भविष्यात सत्तेच्या राजकारणात एखादे पद मिळाले, तर तेही सामाजिक कामासाठीचे प्रभावी माध्यम म्हणूनच वापरण्याची इच्छा आहे.

समाजकारणासाठी राजकारणात सहभाग असा तुमचा विचार आहे हे लक्षात आले. त्यापलीकडे अाणखी काय उद्दिष्टे आहेत?

आई हॉस्पिटलच्या माध्यमातून किंवा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मी काम करतोच आहे. भविष्यात सत्तेच्या राजकारणात सहभागी होण्याची संधी मिळाल्यास शेती, युवा, वीज व पाणी, महिला व आरोग्य, शिक्षण या पंचसूत्रीवर आधारित माझ्या कामाची रचना असेल.

शेतीचे अद्ययावत ज्ञान शेतकऱ्यांच्या दारापर्यंत न्यायचे आहे. वीज व पाणी या नैसर्गिक साधनांवर लक्ष केंद्रित करणे, सौर ऊर्जेच्या अधिकाधिक वापरासाठी उपक्रम आखणे याकडे मी लक्ष देईन. अनेक समस्यांनी शेतीचे क्षेत्र पॅरालाइज झाले आहे. अद्ययावत माहिती, साधने, माती परीक्षण करून शेतकरी शेती करतील यासाठी कार्यशाळा आयोजित करून शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करेन.

पिण्याचे पाणी ही तालुक्याची मोठी समस्या आहे. 140 गावांपैकी 50 गावात आजही टँकरने पाणी पुरविले जाते. पाण्याच्या नियोजनाचा अभ्यास करून आमचा तालुका टँकरमुक्त करण्याचा मी प्रयत्न करीन.

थोडक्यात, राजकारणाच्या माध्यमातून समाजातील अधिकाधिक समस्यांवर तोडगा शोधायचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल.

- मुलाखत : चिंतामण पाटील