जनहितासाठी कार्य करणार - डॉ. संजीव पाटील

विवेक मराठी    10-Sep-2019
Total Views |

भडगावपासून दहा-बारा कि.मी. अंतरावरील आडवळणाच्या अंचळगाव येथील भूमिपुत्र डॉ. संजीव कृष्णराव पाटील हे समाजसेवेच्या भावनेने भारलेले व्यक्तिमत्त्व. हजार-दीड हजार लोकवस्तीच्या गावात एम.बी.बी.एस., एम.एस. पर्यंत शिकून ते चाळीसगाव व पाचोरा या दोन्ही ठिकाणी वैद्यकीय व्यवसाय करतात. यात व्यवसायापेक्षा त्यांचा सेवाभावच अधिक दिसून येतो. तरुणपणापासूनच ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते. स्व. दीनदयाळ उपाध्याय, स्व. अटलजी व स्व. उत्तमराव पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झालेले. भाजपाच्या सक्रिय कार्यकर्त्यापासून भडगाव तालुका उपाध्यक्ष ते आजचे जळगाव भाजपाचे जिल्हाध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास झाला आहे. त्यांचा राजकीय प्रवास व त्यांचे सामाजिक कार्य याबाबत त्यांच्याशी केलेली बातचीत.


तुमचे राजकारणातले मार्गदर्शक कोण?

मी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना स्व. नानासाहेब उत्तमराव पाटील आमच्या गावी यायचे. त्या वेळी नानासाहेबांचा आमच्या घराशी संपर्क आला. तोपर्यंत आमच्या घराचा राजकारणाशी कधीच संबध आला नव्हता. नानासाहेब हे माझे खऱ्या अर्थाने पहिले मार्गदर्शक. पुलोद सरकारमध्ये नानासाहेब मंत्री असताना आंचळगावला आले होते. आमच्या गावाला मंत्री म्हणून भेट देणारे ते पहिलेच. नानासाहेबांच्याच मार्गदर्शनाखाली एम.के. अण्णा पाटील यांच्यासाठी लोकसभा निवडणुकीचा प्रचार केला. त्या वेळी अनेक सभांमध्ये मी नानासाहेबांसोबत होतो. भाजपाचे अतिशय शिस्तप्रिय ज्येष्ठ कार्यकर्ते स्व. मुरालीधरजी दाणेज हेदेखील मला गुरुस्थानी आहेत. बापू पूर्णपात्रे यांनी माझ्यावर सेवाव्रताचा संस्कार केला आहे. अलीकडच्या काळात नाथाभाऊ खडसे, गिरीशभाऊ महाजन, डॉ. बी.एस. पाटील, डॉ. तिवारी, आ. घोडे, ऍड. काळकर यांचे मार्गदर्शन मला मिळाले आहे. जळगाव जिल्हा हा गेल्या अनेक वर्षांपासून भाजपाचा गड मानला जातो. या सर्व मार्गदर्शक नेत्यांचा माझ्यावरचा विश्वास सार्थ ठरविण्याचा प्रयत्न मी माझ्या कामातून करीत आहे.

प्रत्यक्ष राजकीय जीवनाची सुरुवात कशी झाली?

तसा माझ्यावर 1980पासून भाजपाचा वैचारिक प्रभाव होता. 1990मध्ये चाळीसगावमध्ये भाजपाचा सदस्य झालो. 1995मध्ये अधिक सक्रिय झालो. त्या वेळी पक्षाने भडगाव तालुका उपाध्यक्ष अशी जबाबदारी दिली. पुढच्याच वर्षी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत मी आमडदे-गिरड गटातून निवडून आलो. एका वर्षांनतर मी जि.प.चा उपाध्यक्ष झालो. भाजपा वैद्यकीय आघाडीची जबाबदारी मी दोन टर्म सांभाळली. दरम्यानच्या काळात पक्षाने देलेली विविध संघटनात्मक कामे करीत राहिलो. पक्षाचे निरपेक्ष भावनेने काम करीत राहिल्याने आज मी भाजपाचा जिल्हाध्यक्ष आहे.

 

आपल्या सामाजिक दायित्वाविषयी जाणून घ्यायला आवडेल...

वैद्यकीय क्षेत्रात असल्याने मी स्वत:ला रुग्णसेवेला वाहून घेतले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मी चाळीसगाव येथील इंडियन मेडिकल असोसिएशनचा अनेक वर्षे अध्यक्ष होतो. जन्मगाव आंचळगाव येथील श्रीकृष्ण शिक्षण प्रसारक संस्था संचालित माध्यमिक शाळेत मी अध्यक्ष आहे. येथीलच विविध कार्यकारी सहकारी सोसायटयांचा मी चेअरमन आहे. जळगाव जिल्हा दूध संघाचा संचालक असल्याने मी तालुक्यातील दुग्धोत्पादकांसाठी विविध उपक्रम राबवितो. भडगाव तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीचा अध्यक्ष असून शासकीय योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मी सतत प्रयत्न करीत असतो.

आंदोलने व विविध उपक्रमातील आपला सहभाग कोणत्या स्वरूपात राहिला आहे?

भडगाव येथे वीज मंडळाचे 132 के.व्ही. उपकेंद्र झाले पाहिजे, यासाठी 2002मध्ये भडगावात मी शेकडो लोकांच्या सहभागाने मशाल मोर्चा काढला होता. हे उपकेंद्र व्हावे यासाठी 2002नंतरही सतत पाठपुरावा केला. त्याला आता यश आले असून सध्या या उपकेंद्राचे बांधकाम सुरू आहे.

 

याशिवाय पक्ष सत्तेत नव्हता, त्या काळातही जनहितासाठी पक्षाने हाती घेतलेल्या विविध आंदोलनांत मी सक्रिय सहभाग घेतला आहे.

 

* स्व. दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दीनिमित्त विविध गावांत आरोग्य शिबिरे घेतली. सुमारे 5 हजारापेक्षा अधिक लोकांनी त्यांचा लाभ घेतला.

* अवयवदानासंदर्भात शासनाने केलेल्या आवाहनानुसार शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांच्या कार्यक्रमांत जाऊन आवाहन केले.

* शिवशाही ते लोकशाही हा शासनाचा उपक्रम गावोगावी जाऊन पोहोचविला.

* स्वामी विवेकानंदांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजावेत म्हणून निबंध स्पर्धेचे आयोजन केले. त्यात भडगाव-पाचोरा तालुक्यातील 104 शाळांमधील 30 हजार विद्यार्थी सहभागी झाले. या सर्व विद्यार्थ्यांना विवेकानंदांचे जीवनचरित्र मोफत देण्यात आले.

* शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांनी दुग्धोत्पादनाकडे वळावे, म्हणून ग्राामीण भागात जनजागृती केली.

* चाळीसगाव येथे सहकारी डॉक्टरांनी मिळून बापजी रुग्णालयाचे पुनरुज्जीवन केले. या रुग्णालयात 10 वर्षे मोफत सेवा दिली.

* डॉ. संजीव पाटील फाउंडेशनतर्फे स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र चालविले जाते. यातून असंख्य विद्यार्थ्यांना फायदा होतो.

* भडगाव येथे दर वर्षी गणपती आरास स्पर्धेचे आयोजन केले जाते. याद्वारे विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन केले जाते.

* समाजात सामाजिक समरसता व सद्भावना रुजावी म्हणून गावोगावी महापुरुषांच्या प्रतिमा नागरिकांना वितरित केल्या. त्यात शिवाजी महाराज, डॉ. आंबेडकर, म. फुले, सावित्रीबाई फुले, रामदेवबाबा यांच्या प्रतिमांचा समावेश आहे.


याशिवाय दर वर्षी शेकडो वृक्षांची लागवड व त्यांचे संगोपन करण्याचा वसाच मी घेतला आहे. आतापर्यंत तालुक्यातील
35 गावांमध्ये 3 हजार झाडांची लागवड केली आहे. नुसती झाडे न लावता त्यांचे व्यवस्थित संगोपन व्हावे, याकरिता झाडांना ट्री गार्ड लावले आहेत. तसेच जेव्हा झाडांना गरज असते, त्या वेळी टँकरद्वारे पाणी दिले जाते.

राजकारणातील पुढचे उद्दिष्ट काय?

 

मी अनेक वर्षे तालुक्याच्या व जिल्ह्याच्या राजकारणात आहे. गावपातळीवरून राजकारणाला सुरुवात केली असल्याने मला ग्रामीण भागातील जनतेच्या गरजांची, समस्यांची जवळून ओळख आहे. तालुक्याच्या व जिल्ह्याच्या राजकारणाच्या अनुभवाच्या बळावर आता मला राज्याच्या राजकारणात उतरायचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हात बळकट करण्यासाठी व जिल्ह्याचे नेते गिरीशभाऊ यांची ताकद वाढविण्यासाठी मला विधानसभा निवडणूक लढवावी असे वाटते.

 

पाणी आणि रोजगार या भागातल्या प्रमुख गरजा आहेत. सध्याच्या राज्य व केंद्र सरकारने या दोन्ही विषयांना प्राधान्य दिलेले दिसते. गिरणा ही या भागातून वाहत जाणारी सगळयात मोठी नदी. तिच्यावर मोठे एकच धरण आहे. त्या धरणाच्या खाली काही बलून बंधारे प्रस्तावित आहेत. ते मार्गी लागून या भागातून पाणी समस्या हद्दपार व्हावी यासाठी मी प्रयत्न करीन. नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पामुळे गिरणा धरण दर वर्षी भरू शकते. हा नदीजोड प्रकल्प त्वरित व्हावा, यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. त्यासाठी या सत्तेच्या राजकारणात माझा प्रत्यक्ष सहभाग असावा असे वाटते.

या भागात चाळीसगाव आणि जळगाव वगळता इतर तालुक्यांना एम.आय.डी.सी. नाही. त्यामुळे पाचोरा-भडगाव या ठिकाणच्या तरुणांना रोजगार मिळावा, म्हणून या तालुक्यांच्या ठिकाणी एम.आय.डी.सी. उभारल्या जाव्यात, असे मला वाटते.

गेल्या अनेक वर्षांपासून भडगाव-पाचोरा व चाळीसगाव या भागात वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून मी समाजाशी जवळीक साधून आहे. केवळ राजकारणच नाही, तर सामाजिक उपक्रम राबविण्यावर माझा सतत भर राहिला आहे. आता आपले स्वत:चे क्षेत्र विस्तारित त्याला राज्यपातळीवर न्यावे, असे मला वाटते.

 

मुलाखत - चिंतामण पाटील