ध्येयाने पछाडलेले दोन दर्यावर्दी

विवेक मराठी    12-Sep-2019
Total Views |

***मानसी कोकिळ***

अंटार्क्टिका खंडात जाण्याची आणि त्यातही किनाऱ्यावरच न थांबता अगदी थेट आतमध्ये शिरून दक्षिण ध्रुवावर पोहोचण्याची इच्छा कोणाला कशाला होईल? होय, 19व्या शतकाच्या प्रारंभी हे साहस केले आहे दोन दर्यावर्दींनी. रोआल्ड अमुंडसेन आणि रॉबर्ट स्कॉट असे त्यांचे नाव. दक्षिण धु्रवावर पहिल्यांदा पोहोचून तिथे आपल्या देशाचा झेंडा फडकवण्याचा मान त्यांनी मिळवला.


पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवावरील एक प्रचंड मोठा खंड. अंटार्क्टिका. सुमारे 8 लाख चौरस किलोमीटर्स क्षेत्रफळ असलेल्या या साम्राज्याचा अनभिषिक्त सम्राट फक्त एकच... बर्फ, बर्फ आणि बर्फ. 600 फूट खोल जाडीच्या बर्फाचं साम्राज्य. वर्षाचं सरासरी तापमान वजा 55 अंश सेल्सिअसच्या आसपास. वाळवंटात वाळूची वादळं जसं थैमान घालतात, तसंच इथे हिमवादळांचं थैमान. इथली भौगोलिक परिस्थितीदेखील चमत्कारिकच. ऑक्टोबर ते मे या तथाकथित उन्हाळयाच्या काळात इथे सूर्य मावळतच नाही. बर्फावरून परावर्तित होणारे होणारे किरण एवढे तीव्र असतात की माणूस आंधळाच व्हावा. सूर्याचा प्रकाश एवढा भगभगीत की शेकडो किलोमीटर्स लांब असलेले बर्फाचे डोंगरही साध्या डोळयांना सहज दिसतील. त्यामुळे अगदी थोडया अंतरावर दिसणारी गोष्ट प्रत्यक्षात अनेक किलोमीटर्स लांबवर असते. त्यात आणखीन भर पडते ती मृगजळासारख्या चित्रविचित्र भासांची. कधी आकाशात चित्रविचित्र आकार दिसतात, कधी सूर्य-चंद्राभोवती खळं पडलेलं दिसतं. अनेक महिने चालणाऱ्या हिवाळयात सूर्य नसतानादेखील क्षितिजावर विविधरंगी प्रकाशाचा पिसाराच फुललेला दिसतो. मे महिन्यानंतर सूर्य मावळल्यावर बर्फाचं हे साम्राज्य काळोखात जे बुडून जातं ते ऑक्टोबरमध्येच परत जागं होतं. बर्फाची वादळं नसतील, तेव्हा इथे असते फक्त भयाण स्मशान शांतता. 

अशा अंटार्क्टिका खंडात जाण्याची आणि त्यातही किनाऱ्यावरच न थांबता अगदी थेट आतमध्ये शिरून दक्षिण ध्रुवावर पोहोचण्याची इच्छा कोणाला कशाला होईल? पण मानवी मनाचा थांग हा अंटार्क्टिकातील बर्फाइतकाच खोल असावा. त्याच्या तळाशी पोहोचून काय चाललंय हे समजून घेणं तसं अवघडच. अशा काही साहसी, उत्सुक, धैर्याने आणि शौर्याने भारलेल्या मनांच्या प्रवासाची आणि दक्षिण ध्रुवाच्या शोधाची ही कथा.

जगातील अनेक अज्ञात भूप्रदेशांच्या शोधांच्या 15व्या ते 17व्या शतकांच्या काळातील अनेक साहसी, अद्भुत कथा आपल्याला ऐकायला मिळतील. या शोधांचं मूळ आहे ते युरोप खंडातील जग समजून घेण्याच्या आणि नंतर काबीज करण्याच्या, अतिरिक्त महत्त्वाकांक्षेमध्ये. पण असा कुठलाही तथाकथित मोठा फायदा पदरी पडण्याची कुठलीही शक्यता तेव्हा ज्ञात नसताना, केवळ दक्षिण ध्रुवावर पहिल्यांदा पोहोचून तिथे आपल्या देशाचा झेंडा फडकवण्याच्या ध्येयाने पछाडलेले दोन दर्यावर्दी म्हणजे नॉर्वेचा रोआल्ड अमुंडसेन आणि इंग्लंडचा रॉबर्ट स्कॉट. 

चित्तथरारक मोहीम

समुद्रसफरींचं प्रचंड आकर्षण असलेल्या अमुंडसेनच्या नावावर उत्तर ध्रुवाजवळील अनेक यशस्वी-अयशस्वी मोहिमांचा अनुभव होताच. उत्तर ध्रुवावर सर्वात पहिल्यांदा पोहोचण्याचा मान मिळवण्यात असफल झालेला अमुंडसेन आता एकाच ध्येयाने पछाडलेला होता आणि ते म्हणजे दक्षिण ध्रुवावर सर्वात पहिल्यांदा नॉर्वेचा झेंडा रोवणं. यातूनच 3 जून, 1910 रोजी अमुंडसेनच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचण्याच्या मोहिमेची सुरुवात झाली. त्या वेळी अमुंडसेनने केवळ बर्फाच्या गाडया ओढणाऱ्या 120 कुत्र्यांवर भरवसा टाकला होता. 

रॉबर्ट स्कॉट हा मूळचा इंग्लंडच्या नौदलातील अधिकारी. सुरुवातीपासूनच समुद्रातील साहससफरींचं आकर्षण असलेला. अमुंडसेनप्रमाणेच त्यालाही दक्षिण ध्रुवावर सर्वात पहिल्यांदा युनियन जॅक फडकावा असं वाटत होतं. स्कॉटने 1905मध्ये केलेल्या अंटार्क्टिकामधील 'डिस्कवरी' मोहिमेनंतर स्कॉटला इंग्लंडमध्ये इतकी प्रसिध्दी मिळाली की तो जवळजवळ इंग्लंडचा 'राष्ट्रीय हीरो'च बनला होता. त्यामुळे त्याच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचण्याच्या मोहिमेसाठी जेव्हा त्याने तरुणांना आवाहन केले, तेव्हा जवळपास 8000 तरुणांनी नावं नोंदवली. त्या काळामध्ये एकुणातच साहसाचं असलेलं वेड किती तीव्र होतं, याची कल्पना या आकडयावरून सहज येऊ शकते. जून 1910मध्ये जेव्हा 60 नाविक, काही शास्त्रज्ञ, तीन इंजिनं असलेल्या गाडया, बर्फावर घसरणाऱ्या गाडया ओढण्यासाठी सायबेरियातून आणलेले घोडे आणि 34 कुत्रे यांच्यासह रॉबर्ट स्कॉटचं 'टेरा नोव्हा' जहाज जेव्हा टेम्स नदीतून मोहिमेवर निघालं, तेव्हा दोन्ही काठावरच्या व्यापारी जहाजांनी त्यांना बिगुल वाजवून जणू सलामीच दिली. अमुंडसेनच्या मोहिमेबद्दल अनभिज्ञ असलेला स्कॉट त्याच्या ध्येयपूर्तीच्या प्रवासाला निघाला. मेलबोर्नच्या मुक्कामी रॉबर्ट स्कॉटच्या हाती एक तार पडली. त्यात लिहिलं होतं - 'मीही दक्षिणेकडेच निघालो आहे - रोआल्ड अमुंडसेन'. स्कॉटच्या ध्येयाचं स्वरूप या तारेने बदलूनच टाकलं. आता हा प्रवास म्हणजे दक्षिण ध्रुवावर सर्वात पहिल्यांदा पोहोचण्याची एक चित्तथरारक आणि जीवघेणी स्पर्धाच बनली

अनेक अडचणींशी सामना

पहिल्याच दिवशी स्कॉटच्या मोहिमेवर संकटांची सावली पडली. वादळाच्या आणि वाऱ्याच्या प्रचंड जोरातून जहाज इतक्या वेडयावाकडया पध्दतीने हलू लागलं की एकदा तर लाटेच्या एका फटकाऱ्यात जहाजावरचा एक कुत्रा बाहेर फेकला गेला आणि दुसऱ्या फटकाऱ्यात परत जहाजावर येऊन पडला. जहाजावरचा पाणी उपसून टाकणारा पंपच नादुरुस्त होणं, हिमनगांचा सामना करावा लागणं अशा अनेक अडचणींना तोंड देत जहाज अंटार्क्टिकाला पोहोचलं, तेव्हा त्याच्या घोडयांच्या आणि कुत्र्यांच्या (आणि खरं तर माणसांच्यादेखील) अवस्थेची कल्पनाच केलेली बरी. जानेवारी 1911मध्ये 'टेरा नोव्हा' जहाज अंटार्क्टिका खंडाच्या किनाऱ्यावरील मॅकमर्डो जागेपाशी येऊन पोहोचलं. इथून तीन किलोमीटर्सवर स्कॉटच्या टीमने सहा दिवस अविश्रांत काम करून त्यांचा पहिला तळ उभारला, ज्याचं नाव होतं - 'हट पॉइंट'. इथूनच स्कॉटची टीम 800 मैलावरील दक्षिण ध्रुवाकडे कूच करणार होती. अशा मोहिमांमध्ये सगळं सामान घेऊन सगळयांनी अंतर कापायचं नसतं. परत येतानाची सोय म्हणून जातानाच ठिकठिकाणी तळ उभारत तिथे साधनसामग्राी ठेवत पुढे जायचं असतं. स्कॉटच्या टीममधील जे संशोधनाच्या उद्देशाने आले होते, त्यांना पुढे घेऊन जाण्याची काहीच गरज नव्हती. तळ उभारत पुढे जाताना हळूहळू एकेक गट परत पाठवायचा आणि शेवटचा तळ उभारल्यावर पुढे जाणारी अखेरची टीम केवळ 4 जणांचीच ठेवायची, अशी स्कॉटची योजना होती. शेवटचा तळ उभारला गेला, ज्याचं नाव होतं - 'वन टन डेपो'. आता दक्षिण ध्रुवापर्यंत जाणारी 4 जणांची टीम स्कॉटने जाहीर करणं अपेक्षित होतं. रॉबर्ट स्कॉटने 5 नावं जाहीर केली - रॉबर्ट स्कॉट, डॉ. विल्सन, इव्हान्स, कॅप्टन ओट्स आणि लेफ्टनंट बॉवर्स.


अमुंडसेनच्या गटाला वैज्ञानिक संशोधनाला महत्त्व द्यावंसं वाटलं नाही. त्याचं एकमेव लक्ष्य होतं - दक्षिण ध्रुव. प्रवासात कमजोर पडलेल्या कुत्र्यांना मारून त्याने इतर कुत्र्यांना जगवलं होतं. अमुंडसेनच्या गटातही काटक, अनुभवी आणि साहसी माणसं होती. नॉर्वे उत्तर ध्रुवाच्या जवळ असल्याने बर्फात राहण्याची त्याला चांगलीच सवय होती आणि सगळयात महत्त्वाचं म्हणजे अमुंडसेनने उभारलेला तळ दक्षिण ध्रुवापासून स्कॉटच्या तळाच्या तुलनेत 60 मैल पुढे होता. आणि प्रवासामध्येदेखील अमुंडसेन स्कॉटच्या टीमच्या 100 किलोमीटर पुढे होता. 

शेवटच्या टीमचा प्रवास म्हणजे वेगवेगळया अडचणींची एक जंत्रीच होती. वादळाने तंबू उडून गेल्याने एक आख्खी रात्र कुडकुडत काढणारे डॉ. विल्सन आणि बॉवर्स, ढकलगाडयांची दुरुस्ती करताना हाताला झालेल्या जखमा लपवणारा इव्हान्स, स्की जोडे नसताना साध्या बुटांवर प्रवास करणारा बॉवर्स आणि या सगळयाच्या जोडीला आपल्या मनावरचा ताण आणि धास्ती लपवत सर्वांना पुढे घेऊन जाणारा रॉबर्ट स्कॉट... या सगळयांचा धीर पहिल्यांदा खचला तो 16 जानेवारी 1912ला. बर्फावरच्या घसरगाडयांच्या खुणा पाहताच त्या पाचही जणांना कळून चुकलं की आपल्या युनियन जॅकला जो मान देण्यासाठी आपण इतक्या खस्ता खाऊन इथवर आलो, त्या दिमाखात 5 किलोमीटर्सवर असलेल्या दक्षिण ध्रुवावर आपल्याला दुसराच झेंडा फडकताना दिसणार आहे.

 

असाही एक प्रसंग

18 जानेवारी, 1912 - स्कॉटची टीम दक्षिण ध्रुवावर पोहोचली. तिथे उभारलेल्या एका तंबूवर नॉर्वेचा झेंडा फडकत होता. स्कॉटच्या तब्बल 35 दिवस - आधी 14 डिसेंबर 1911ला अमुंडसेन तिथे येऊन गेला होता. मोठया जड अंत:करणाने त्यांनी आपला झेंडा फडकवला. फोटो काढले. डॉ. विल्सनने काही चित्रं काढली. स्कॉटच्या डायरीत या दिवसाची नोंद सापडते - 'आणि आम्ही आमच्या अलेक्झांड्रा राणीने मोठया मानाने आमच्या जवळ दिलेला, पण अपमानित झालेला आमचा युनियन जॅकही फडकवला.'

परतीच्या प्रवासातही संकटांनी स्कॉटच्या टीमवर स्वारी केलीच. खचलेल्या मनांना ही संकटं पेलवणं जड गेलं. बर्फावरून परावर्तित होणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे विल्सनची दृष्टी गेली. त्याच्या पायाच्या शिराही सुजल्या. स्वत: स्कॉट दोन वेळा बर्फात पडला. इव्हान्सला हिमवादळाने चेहऱ्यावर अनेक जखमा झाल्या. त्याच्या दोन बोटांची नखंही गळून पडली. त्याला काहीच करणं जमेना. त्यातही त्याने आपलं संशोधन चालू ठेवलंच होतं, हे खरोखरच अचंबित करणारं आहे. 10-11 फेब्रुवारीला, म्हणजे त्या वर्षी जरा लवकरच हिमवर्षावाला सुरुवात झाली. खुणेसाठी वापरलेले त्यांच्या गाडयांचे आणि पावलांचे ठसे बुजायला लागले. स्कॉट लिहितो - 'आज तीन तास आम्ही रस्ता शोधण्यातच घालवले. आपल्याला बरोबर रस्ता सापडलाच नाही तर...? हा विचार जरी मनात आला तरी भीतीने काळजाचं पाणी पाणी व्हायचं.'

आता गटात मतभिन्नतेला आणि कुरबुरींना सुरुवात झाली होती. पुढे अन्न पुरावं, म्हणून स्कॉटने रेशनमध्ये कपात केली होती. 17 फेब्रुवारी - स्कॉटच्या टीमसाठी अशुभ दिवस. जखमा, अपुरं अन्न, अशक्तपणा, बिघडलेली मानसिक अवस्था या सगळयामुळे इव्हान्स मरण पावला. उरलेल्या चारही जणांचं खच्चीकरण करणारी ही घटना होती. अजूनही 'वन टन डेपो' 115 किलोमीटर्स लांब होता. 

कॅप्टन ओट्सच्या भेगाळलेल्या पायांच्या जखमा आता चिघळायला लागल्या होत्या. आपल्यामुळे आपल्या टीमचा वेग मंदावतोय याची त्याला जाणीव झाली, तेव्हा त्याने स्कॉटकडे अशा प्रसंगांसाठीच राखून ठेवलेल्या विषाच्या कुप्या मागितल्या. स्कॉटने नकार दिला, तेव्हा एके दिवशी सकाळी उठून त्याने स्कॉटच्या नावे चिठ्ठी लिहिली - 'माझा शोध घेण्याचा प्रयत्न करू नका.' ओट्स आपल्या सहकाऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी हिमवादळात परत कधीही न येण्यासाठी निघून गेला.

22-23 मार्चपर्यंत त्या तिघांनाही आपल्या अंताची कल्पना आली होती. टीमचा कप्तान म्हणून स्कॉटने तीन जबाबदाऱ्या पार पाडायच्या ठरवल्या. त्याने तीन पत्रं लिहिली. एक विल्सनच्या बायकोला. त्यात त्याने लिहिलं - 'विल्सन नेहमीच उत्साही आणि इतरांना मदत करणारा होता. तुझं सांत्वन करायला माझ्यापाशी शब्दच नाहीत. मी एवढंच म्हणेन की तो शूरासारखा जगला आणि शूरासारखा मरण पावला.

बॉवर्सच्या आईला त्याने लिहिलं - 'तुमचा मुलगा मोहिमेच्या अखेरच्या क्षणापर्यंत माझ्यासोबत होता. माझ्या आयुष्याची सांगता दोन शूरवीरांच्या संगतीत झाली आणि मला सांगायला अभिमान वाटतो, आई, या दोन शूरांमधला एक तुमचा मुलगा होता.'

त्याच्या बायकोला लिहिलेल्या पत्रात तो लिहितो - 'तुला शक्य झालं तर आपल्या मुलाला निसर्गाचा अभ्यासक बनव. त्याला आळशी बनू देऊ नको. त्याला कष्टाळू बनव.'

 

26 मार्च, 2012 - स्कॉटच्या डायरीतली शेवटची नोंद - 'आम्ही डेपोपासून केवळ 11 मैलांवर आहोत. बाहेर वादळाचं थैमान चालू आहे. आमचा शेवट जवळ आला आहे. देवा, माझ्या माणसांना सुखी ठेव.' आज या तिन्ही धाडसी भूसंशोधकांची समाधी दक्षिण ध्रुवावर 'वन टन डेपो'पाशी उभारलेली आहे. 

रॉबर्ट स्कॉट आणि त्याची टीम - तथाकथितदृष्टया अपयशी ठरलेली माणसं... कदाचित स्कॉट तर एखाद्याच्या दृष्टीने सगळयांचाच जीव (आणि तेही उगाचच) धोक्यात घालणारा वेडा माणूसही असेल... आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपलं संशोधन चालू ठेवणारा इव्हान्स काय किंवा आपल्या सहकाऱ्यांसाठी आपला हिमवादळात निघून जाणारा ओट्स काय किंवा अशा परिस्थितीतही आपण सुरक्षितपणे पोहोचू याच्या शक्यता कमी आहेत हे माहीत असूनदेखील आपल्या टीमचं मनोबल सांभाळू पाहणारा स्कॉट काय.... यशापयशाच्या पलीकडे ही माणसं काही सांगू पाहताहेत, ते समजून घेण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. आयुष्यात किमान एक क्षण तरी आपल्याला मिळवता यायला हवा, जेव्हा मी फक्त श्वास घेत नाहीये, तर 'जगतोय/तेय'.... खऱ्या अर्थाने 'जगतोय/तेय'.... जगावं कसं आणि कशासाठी आणि त्याहीपेक्षा मरावं कसं आणि कशासाठी याचा विचार आपण या निमित्ताने करू शकू का? योग्य-अयोग्य, यश-अपयशाच्या व्याख्या आपल्या स्वत:शीच पुन्हा एकदा तपासून पाहता येईल का? आणि ज्यासाठी आपल्याला जगावंसं (किबहुना मरावसंदेखील) वाटतं असं काही ध्येय आपल्याला आपल्या आयुष्यात शोधता येईल का? स्कॉट आणि त्यांच्या सहकाऱ्यांसाठी यापेक्षा मोठी श्रध्दांजली ती काय असणार?