एक प्यार का नगमा है

विवेक मराठी    20-Sep-2019
Total Views |

 हे गाणे विखुरलेल्या, बरेच काही गमावलेल्या कुटुंबाला एकत्र बांधणारा धागा आहे. आनंद, आपत्ती, आशा, दुःख, आजारपण, अगदी मृत्यूच्या आघातातसुद्धा हे गाणे त्यांची सोबत करते. जीवनातील आनंदाचे गाणे हे असेच गाता आले पाहिजे

  

 

 शिवाजी पार्क येथील लेडी जमशेटजी रोड, नेहमीचा रस्ता आहे माझा. दुतर्फा झाडे आहेत या रस्त्यावर. कडक उन्हाळ्यात सावली मिळण्याएवढी उंच वाढली आहेत. तरीही मुंबई धुळीने एवढी माखलेली असते की कोणत्याही ऋतूत हिरवेगार, प्रसन्न वगैरे वाटत नाही. आपण आपल्याच कामात एवढे गर्क असतो की बोलता मायेची पाखर घालणार्या या झाडांकडे कधी लक्षसुद्धा जात नाही.

  

आज गेले, कारण या तीन मजली तरी उंच, भरभक्कम झाडावर एक वेल चढली होती. त्याच्या आधाराने, त्याला धरून आणि हे करताना तिने ते झाड पूर्ण व्यापून टाकले होते. आता त्याच्यावर सुंदर जांभळी फुलेही आली होती. त्या झाडाचे अस्तित्व या नाजुकशा वेलीने अधोरेखित केले खरे, पण मजा अशी की त्याला त्याचे काही वैषम्य असावे असे वाटत नव्हते. तिला, तिच्या नखर्यासकट अलगद पेलून उभा होता तो. परस्परांना इजा करता, एकमेकांच्या सोबतीने, आधाराने बहरलेले हे वृक्षवल्लीचे सहजीवन खर्या अर्थाने सार्थक ठरले होते. ती त्याच्या जीवनरसावर वाढत होती आणि त्याच वेळी त्याचे सौंदर्य वाढवत होती. अत्यंत गोड नाते होते ते. नाजूक आणि कणखर अशी ही दोन भिन्न व्यक्तिमत्त्वे मायेच्या, विश्वासाच्या पाशात अडकली आहेत तोवर हे नाते टिकणार, फुलणार, बहरणार. पण जर या झाडालाच कीड लागली तर! तर मात्र ही वेलसुद्धा नष्ट होणार.

 

 

अनेकदा वेलीचा विळखासुद्धा एवढा घट्ट बसतो की वृक्षालाही काच सलते. त्याचीही घुसमट होते. एकमेकांच्या वाढीसाठी पूरक ठरणारे सिम्बायॉसिस गरजेचे आहे इथे.
 

हेच समीकरण पुरुष आणि स्त्री या नात्यातसुद्धा आहे.

एक प्यार का नगमा है

मौजों की रवानी है

जिंदगी और कुछ भी नहीं

तेरी मेरी कहानी है

 

 

भोग भोगून, जीवन समजलेली दोन माणसे जेव्हा एकत्र येतात, तेव्हा जे गीत गातील त्या गाण्यातील असोशी या गीतात आहे. प्रेमाचा अतूट बंध बांधणे आपल्याच हातात असते. स्वप्नाच्या मनोर्याखाली एक विश्वासाचा पाया असतो. तो असेल, तर एका साध्या झोपडीतसुद्धा स्वर्ग निर्माण करता येतो.

 

 

जिंदगी और कुछ भी नही, तेरी मेरी कहानी हैहा साक्षात्कार जेवढा लवकर होईल, तेवढे आयुष्य सुखात जाते.

 

शोर या सिनेमाचा गाभा आहे पती आणि पत्नी यांच्यातील प्रेम, तसेच वडील आणि मुलगा यांच्यातील बंध. जीवनातील खडतर प्रसंगातसुद्धा एकमेकांचा हात घट्ट पकडून ठेवणार्या कुटुंबाचे हे गीत आहे. एका अपघातात शंकरच्या (मनोज कुमार) पत्नीचा (नंदा) मृत्यू होतो. आपल्या मुलाला वाचवताना ती प्राण गमावते, पण त्या धक्क्यानेे मुलाची वाचा जाते.

 

ऑपरेशनच्या साहाय्याने मुलगा बोलू शकतो, हे डॉक्टरांनी सांगितल्यावर प्रयत्नांची शर्थ करून शंकर पैसे जमवतो. ऑपरेशन यशस्वी होते. त्याच वेळी त्याच्या कारखान्यात एक अपघात होतो आणि त्यात शंकर मात्र आपली ऐकण्याची शक्ती गमावून बसतो.

 

हे गाणे विस्कटलेल्या, बरेच काही गमावलेल्या कुटुंबाला एकत्र बांधणारा धागा आहे. आनंद, आपत्ती, आशा, दुःख, आजारपण, अगदी मृत्यूच्या आघातातसुद्धा हे गाणे त्यांची सोबत करते.

 

कुछ पाकर खोना है, कुछ खोकर पाना है

जीवन का मतलब तो, आना और जाना है

दो पल के जीवन से, इक उम्र चुरानी है

ज़िंदगी और कुछ भी नहीं,

तेरी मेरी कहानी है

 

जन्म आपल्या हातात नसतो, मृत्यू तर नकोसा असूनही टाळता येत नाही. मग आपल्या हातात काय उरते? हातात असते ते या दोन क्षणांतील असंख्य क्षण. त्यातूनच आपले जीवन घडवायचे असते, जगायचे असते. प्रत्येक क्षणाची किंमत जगूनच द्यायची असते. मग तो क्षण सर्वार्थाने का जगू नये! बरेच काही गमावले असले, तरी जे मिळाले आहे त्याची कृतार्थता आणि कृतज्ञता या गीतात आहे.

 

संसारात जेव्हा दोन माणसे एकत्र येतात, तेव्हा त्यांच्यातील अहंकाराचा संघर्ष, त्यांच्या स्वभावातील मूलभूत फरक, परिस्थितीला तोंड देण्याच्या भिन्न पद्धती ह्या सर्व गोष्टी असतातच; परंतु एकमेकांना समजून घेण्याची इच्छा, एकमेकांबद्दल विश्वास हा या नात्याचा आधार असतो. जगण्याच्या सगळ्या पातळ्यांवर अनुभव वाटून घेण्याची धडपड त्यांना एकत्र ठेवते.

 

तू धार है नदिया की, मैं तेरा किनारा हूँ

तू मेरा सहारा है, मैं तेरा सहारा हूँ

आँखों में समंदर है, आशाओं का पानी है

ज़िंदगी और कुछ भी नहीं,

तेरी मेरी कहानी है

 

ह्या गीताचे चित्रण म्हणजे स्वप्न आणि सत्य यांचा कोलाज. गाण्यात भूतकाळाची आणि वर्तमानकाळाची दृश्ये एकमेकांत मिसळली आहेत. हा चित्रपट सत्तरच्या दशकातला, हे पाहिले तर उपलब्ध असलेल्या टेक्नॉलॉजीचा अतिशय हुशारीने वापर करून हे गीत चित्रित केले आहे. गाण्याच्या चित्रीकरणात नायिकेच्या दोन प्रतिमा एकमेकांच्यात मिसळून परत वेगवेगळ्या दिशेने गेलेल्या दाखवल्या आहेत. सुख-दुःखाच्या क्षणांनीच आयुष्य समृद्ध होते. तसेही उन्हाने पोळल्याशिवाय सावलीचे महत्त्व समजत नाहीच. महत्त्वाचे असते ते एकमेकांच्या संगतीने कोणत्याही परिस्थितीचा सामना करणे.

 

तूफ़ान तो आना है, कर चले जाना है

बादल है ये कुछ पल का, छा कर ढल जाना है

परछाईयाँ रह जाती, रह जाती निशानी हैं

जिंदगी और कुछ भी नहीं,

तेरी मेरी कहानी है

 

अडचणी येतातच, पण मन साफ ठेवून हातातला हात घट्ट पकडला तर निघूनही जातात. एकदा हे आयुष्य तुझे आणि माझे आहे असे उमगले, तर त्यांच्या खुणा जरी राहिल्या तरी त्या एकत्र राहायला मदत करतात. आयुष्यातील आनंदाला क्षणभंगुरतेचा शाप असतोच, म्हणून जगण्यासाठी महत्त्वाची असते ती कधीही सुटणारी साथ.

 

 

एक प्यार का नगमा है हे गीत संतोष आनंद यांनी लिहिलेले असून, चित्रपटाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मुकेश आणि लता मंगेशकर यांनी ते गायलेले आहे. तुमचे सर्वात आवडीचे गीत कोणते आहे? या प्रश्नाला उत्तर देताना लक्ष्मीकांत यांनी सांगितले होते, पहिल्या तिन्ही क्रमांकांवर या गीताचा अधिकार आहे. भावनांची तीव्रता सुरात आहे, शब्दात आहे, पण लक्ष देऊन ऐका. आनंद आणि उदासीनता या दोहोंचा प्रत्यय गीत ऐकताना येतो. लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या सांगीतिक कारकिर्दीत शोर हा चित्रपट मैलाचा दगड आहे.