मंदाताई बखले - समर्पित राष्ट्र सेविका

विवेक मराठी    21-Sep-2019
Total Views |

राष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ सेविका मंदाताई बखले यांचे 12 सप्टेंबर 2019 रोजी निधन झाले. समितीसाठी बनुनी चंदन समितीस्तव काया झिजवून तन मन धन सर्वस्व समर्पण' अशी त्यांची जीवनशैली होती. त्यांच्या निधनाने समितीची कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. 



राष्ट्र सेविका समितीच्या एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सेविका मा. मंदाताई बखले यांना गुरुवार, दिनांक 12 सप्टेंबर रोजी देवाज्ञा झाली आणि समितीच्या सक्षम सेविकांच्या माळेतील एक मणी ओघळला, अशी खंत मनाला जाणवली.

न कळत्या वयापासून नागपूरला मोठया बहिणींबरोबर शाखेत जायला मंदाताईंची सुरुवात झाली आणि तेव्हापासूनच 'समिती असे माझी अन् मी तिची, तिच्या कार्यी माझी तनू जायची' या काव्यपंक्तीनुसारच त्या अखेरपर्यंत जगल्या. रा.से. समितीच्या आद्य संचालिका वंदनीय लक्ष्मीबाई केळकर उर्फ मावशी यांचा त्यांना अगदी जवळून सहवास लाभला. समितीच्या विचारांचे बाळकडू त्यांना मावशींकडूनच मिळाले. चेंबूरच्या अहिल्या शाखेत अगदी सुरुवातीपासून त्या कार्यरत होत्या. त्यामुळे अहिल्या शाखा आणि मंदाताई असे जणू समीकरणच प्रस्थापित झाले होते. ज्या सेविकांना मंदाताईंचा सहवास लाभला होता, त्यांना मंदाताईंशिवाय समिती ही कल्पना पचनी पडायला खूप वेळ तर लागणार आहेच, पण अथक प्रयत्नही करावे लागणार आहेत.

 

त्यांचे मृदू आणि आर्जवी बोलणे सर्वांनाच भुरळ पाडणारे होते. कोणीही बालिका, युवती किंवा महिला भेटल्या की त्यांना शाखेत येण्यासाठी त्या मोठया आग्राहाने निमंत्रण देत असत. त्या नाही आल्या, तर ''उत्सवाला तरी या'' असा फोन त्यांच्याकडे नक्की जाणारच. विशेषतः समितीचे उत्सव असतील, तेव्हा त्यांच्या उत्साहाला जणू उधाण येत असे. फक्त उत्सवाला येणाऱ्या सेविकांची एक वेगळी यादीच त्यांच्याकडे तयार होती. त्यांना फोन करून त्या आग्राहाचे निमंत्रण द्यायच्या आणि मंदाताईंचा मान राखून सेविकाही न चुकता यायच्या. समितीचा प्रचार आणि प्रसार कसा करावा, याचा वस्तुपाठ म्हणजे मंदाताई, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.

लहान मुलामुलींना गोष्टी सांगणे हा मंदाताईंचा आवडता छंद होता. गोष्ट सांगायला चेंबूरच्या बालविकास शाळेत आठवडयातून एकदा जाणे नित्याचेच होते. मंदाताई विशेषतः कृष्णाच्या गोष्टी खूप रंगवून सांगत असत. गोष्ट सांगताना त्यांच्या आवाजातला चढ-उतार, त्यांची देहबोली आणि गोष्टीशी त्यांची असलेली समरसता बालश्रोत्यांबरोबरच थोरांनाही मंत्रमुग्ध करून टाकत असे. तसेच समितीच्या वर्गावर त्यांचे बौध्दिक ऐकणे म्हणजेसुध्दा सेविकांसाठी मेजवानीच असे. मंदाताई उत्तम काव्य करीत असत. भजने, पोवाडे, छोटी नाटुकली फार सुंदर लिहायच्या. एवढेच नाही, तर नातेवाईक किंवा मैत्रिणी यांचे वाढदिवस अथवा काही प्रसंगानुरूप गाणी रचायच्या. एकदा बुधवारच्या शाखेवर एक पाहुण्या आल्या होत्या. त्यांनी देव आणि देवस्थाने या विषयावर एक सुरेख भजन म्हंटले. ते ऐकून मी सहजच मंदाताईंना म्हटले की ''मंदाताई, असंच संतांवर एक भजन लिहा ना तुम्ही.'' त्या म्हणाल्या, ''बघते प्रयत्न करून.'' मी तर खरे म्हणजे विसरूनही गेले होते आठ दिवसात. पण मंदाताईंनी लगेचच्याच बुधवारी 'चला जाऊ संतांच्या गावाला। देवही तेथे प्रकट झाला' असे चार कडव्यांचे सुंदर भजन लिहून आणले, एवढेच नाही, तर त्याला चालही सुचवली. त्यांच्यासमोर अक्षरशः हात जोडले मी. शिवाय त्याचे श्रेय न घेता उलट मला म्हणाल्या, ''तू सांगितले नव्हतेस, तोपर्यंत मला कुठे सुचले होते?'' तुझ्यामुळेच तर लिहिले मी.'' अशा आमच्या मंदाताई समोरच्याला आपलेसे करणाऱ्या.

 

मंदाताईंना होमिओपाथीच्या औषधांची बरीच माहिती होती आणि त्याचबरोबर सेविकांच्या आरोग्याची काळजीही होती. मंदाताईंचे दोन्ही चिरंजीव सून डॉक्टर आणि मंदाताईही घरगुती 'डॉक्टर!'

 

मंदाताईंच्या अशा एक ना दोन, अनेक आठवणी आहेत. पण ही जवळजवळ शेवटची आठवण सांगितल्याशिवाय या लेखाचा शेवट होऊ शकत नाही. 26 फेब्रुवारी 2019ला पहाटे भारताने पाकिस्तानच्या बालाकोट या शहरावर एअर स्ट्राइक करून दहशतवद्यांचा तळ उद्ध्वस्त केला. वार होता मंगळवार. दुसऱ्याच दिवशी शाखेचा दिवस. मंदाताई आता प्रकृतिअस्वास्थ्यामुळे इच्छा असूनही शाखेला नियमित येऊ शकत नव्हत्या. पण 26 तारखेलाच त्यांनी घरी घोषणा करून टाकली की ''काही झालं तरी उद्या मी शाखेत जाणार.'' 27 तारखेला मंदाताईंना त्यांच्या सूनबाई डॉ. वर्षा बखले आणि एक मदतनीस शाखेत घेऊन आल्या. मंदाताईंचा त्या दिवशीचा आनंदाने ओसंडून जाणारा चेहरा आजही जसाचा तसा डोळयासमोर आहे. त्यांनी मोदी सरकारचे तोंड भरून कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या. सर्वांचे तोंड गोड करायला काहीतरी खाऊसुध्दा आणला होता. आम्ही त्यांना चार शब्द बोलायची विनंती केली, पण अत्यंत आनंदामुळे किंवा आजारपणामुळे त्या बोलू मात्र शकल्या नाहीत.

समितीच्या एका गाण्यात थोडा बदल करून मंदाताईंबद्दल असे म्हणता येईल की 'समितीसाठी बनुनी चंदन समितीस्तव काया झिजवून तन मन धन सर्वस्व समर्पण'अशी त्यांची जीवनशैली होती. त्यांच्या निधनाने आम्हा सर्व सेविकांचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. मंदाताईंना विनम्रपणे श्रध्दांजली.

प्रभा आमडेकर

9892534364