बुडत्याला 'ईडी'चा आधार

विवेक मराठी    27-Sep-2019
Total Views |

 

गेल्या आठवडयात शरद पवार यांना सक्तवसुली संचालनालयाची नोटिस जारी झाल्याची बातमी प्रकाशित झाली आणि महाराष्ट्रात या बातमीच्या आधाराने अनेकांनी सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न केला. स्वतः शरद पवार यांनी
''महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकणार नाही'' अशी घोषणा केली आणि दोन दिवसांतच बोलावणे आले नाही तरी आपण स्वतः ईडीच्या कार्यालयात हजर होणार असल्याचे पत्रकार परिषद घेऊन सांगितले. अर्थात ईडीचे बोलावणे आल्याशिवाय स्वतः इतक्या घाईने हजेरी लावण्यासाठी शरद पवार का तयार झाले? पवारांना ईडीची नोटीस अशी बातमी आल्यावर आधी बारामती बंदची घोषणा करून आणि मुंबईत निवासस्थानी कार्यकर्त्यांची जमवाजमव करून शरद पवार आपली राजकीय ताकद दाखवू पाहत आहेत का? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात.

केवळ बातमीचा आधार घेऊन चौकशीसाठी हजर होतो म्हणायला शरद पवार निर्बुध्द नाहीत. गेल्या साठ वर्षांत त्यांनी अनेक राजकीय चढउतार पाहिले आहेत आणि याहीपेक्षा मोठे धक्के पचवले आहेत, हा सारा इतिहास माहीत असलेला कोणताही माणूस म्हणेल की शरद पवार उतावीळ का झालेत? काही दिवसांपूर्वी अमित शाह यांच्या वर टीका करताना ते म्हणाले होते, ''मी तुरुंगात नाही गेलो.'' आता या निमित्ताने शरद पवारांना तुरुंगात जाण्याची घाई झाली आहे का? शरद पवार केवळ बातमीचा आधार घेऊन स्वतःला प्रकाशझोतात ठेवण्याचा प्रयत्न करू पाहत आहेत का? असेही प्रश्न या निमित्ताने विचारले जात आहेत.

शरद पवारांना शिखर बँकेच्या आर्थिक घोटाळयाबाबत ईडीकडून नोटिस जारी झाल्याची बातमी प्रकाशित झाली आणि त्यांच्या आसपासच्या मंडळींनी गलका केला. ''राजकीय सूडबुध्दीतून ही कारवाई होत असून भाजपा सरकार सूडाचे राजकारण खेळते आहे'' याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिल्यावर तो विषय तेथेच थांबयला हवा होता. पण तसे झाले नाही. उलट राष्ट्रवादीच्या उरल्यासुरल्या कार्यकर्त्यांनी या नोटिशीचा आधार घेत ठिकठिकाणी वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी स्वतःला जाणता राजा म्हणवून घेणाऱ्या शरद पवारांनाच मैदानात उतरावे लागले. आधी पत्रकार परिषद घेऊन ''मी ईडीच्या कार्यालयात जाणार'' अशी घोषणा करणाऱ्या शरद पवारांनी दबावतंत्र अंगीकारून आपली राजकीय शक्ती आजमावण्याचा प्रयत्न केला. बहुधा त्यांना आपल्या अल्पस्वल्प शक्तीचा अंदाज येताच त्यांनी एका दिवसात आपला रंग बदलला आणि आपण ईडीसमोर हजर होणार नाही, अशी घोषणा केली.

महाराष्ट्रात उथळ राजकारण करणाऱ्या एका नेत्याला ईडीची नोटिस आली, तेव्हा त्याने शांतपणे तिचा सामना केला. मात्र संयमी आणि परिपक्व नेतृत्व म्हणून गौरव होणाऱ्या शरद पवारांचा तोल ढळला. केवळ ईडीच्या नोटिशीमुळे हा तोल गेला की आजवर ज्याच्या आधाराने राजकारण केले आणि राजकारणाबाहेर आपले साम्राज्य उभे केले, तेच निवडणुकीच्या तोंडावर साथसोबत सोडून गेल्यामुळे हा तोल ढळला आहे, या गोष्टीचा विचार करायला हवा. शरद पवार म्हणजे संयम आणि शालीन राजकारणी अशी त्यांच्या चाहत्यांनी प्रतिमा उभी केली आणि कसोशीने जपलीही. आता स्वतः शरद पवारच या प्रतिमेचे भंजन करत आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेसला जी ओहोटी लागली आहे, त्यामुळे पवारांची शालीनता आणि संयम यांची परीक्षा सुरू झाली होती. या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा जोरदार ओहोटी सुरू झाल्यावर शरद पवार यांच्या संयम आणि शालीनताही वाहून गेली आहे. उस्मानाबादचे सगेसोयरे भाजपामध्ये दाखल झाल्यावर पवारांनी पत्रकाराला शिकवलेली सभ्यता हे या ओहोटीचे उदाहरण आहे. आपले सहकारी शिलेदार खूप मोठया प्रमाणात सोडून जाताना, ''## मारायला जा'' अशी असभ्य भाषेतील प्रतिक्रिया हे पवारांचा तोल ढळल्याचे लक्षण नाही का?

गेली साठ वर्षे बेरजेचे राजकारण करण्याच्या नावाखाली नवी सरंजमशाही उभी करून जागोजागी आपले शिलेदार नेमणाऱ्या शरद पवारांच्या राजकारणाची आता उतरण सुरू झाली आहे. फुले-शाहू-आंबेडकरांचे केवळ नाव घेऊन पुरोगामीपणाचा बुरखा पांघरून राजकारण करण्याचे दिवस आता संपले आहेत. राज्यात आणि देशात मतदार जागृत झाल्यामुळे 2014पासून जे परिवर्तन सुरू झाले, त्यात शरद पवार आणि त्यांच्या शिलेदारांची दाणादाण होताना दिसत आहे. अनेक जण आपल्या भविष्याचा विचार करून पवारांची साथ सोडताना दिसत आहेत. आता उरल्यासुरल्या साथीदारांना घेऊन आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचे आणि पक्षओहोटीमुळे आलेली मळगळ दूर करत सोबत असणाऱ्या शिलेदारांना चैतन्य देण्याचे काम पवारांना करायचे होते. पण तेही नैराश्याच्या गर्तेत बुडत असताना त्याच्या हाती ईडीची काडी लागली आहे. आता या काडीचा आधार घेऊन पवार आपल्या पक्षाला कशी उभारी देतात आणि खिळखिळा झालेला पक्ष कसा बांधतात, हे पाहावे लागणार आहे.