'एक दिवस साहित्यिकांच्या सहवासात'

विवेक मराठी    06-Sep-2019
Total Views |


 

भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री केशवराज शैक्षणिक संकुलाचा सुवर्णमहोत्सव सोहळा लातूर येथे दि. 28 ऑॅगस्ट 2019 रोजी साजरा झाला. शिक्षण विवेक व भारतीय शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळयासाठी 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे या प्रमुख पाहुण्या होत्या.

संमेलनाध्यक्ष काही ठोस कार्य करू शकत नाही या समजुतीला छेद देत डॉ. अरुणा ढेरे यांनी राज्यातील शिक्षकांशी, तसेच विद्यार्थ्यांशी कार्यशाळांच्या माध्यमातून संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. मराठी भाषा हा या संवादाचा केंद्रबिंदू असणार आहे. संमेलनाध्यक्षांकडून प्रथमच अशा प्रकारचा उपक्रम होत असून लातूरच्या भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री केशवराज शैक्षणिक संकुलापासून त्याचा आरंभ झाला. भारतीय शिक्षण प्रसारक मंडळासाठी हा दुग्धशर्करा योगच होता.

य कार्यक्रमाची पूर्वतयारी म्हणून शिक्षक, विद्यार्थी तसेच संस्थेचे पदाधिकारी यांनी खूपच मेहनत घेतल्याचे जाणवले. संपूर्ण शाळा व परिसर अरुणामय झालेला होता. सुमारे महिनाभर आधीपासून विद्यार्थी-विद्यार्थिनी अरुणा ढेरे यांच्या साहित्याचे वाचन, यू-टयूबवरील व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या मुलाखती पाहणे-ऐकणे, कविता पाठ करणे, त्यांच्या साहित्यकृतीवर आधारित नाटयछटा, पथनाटय, मूक अभिनय बसवणे, कवितांना चाली लावून गीतरूपात त्या सादर करणे अशा कार्यक्रमांच्या तयारीत रंगून गेले होते.

डॉ. अरुणा ढेरे व नीलिमा गुंडी या विदुषींचे आगमन होताच ढोल-ताशांच्या गजरात, मंगल आरती ओवाळून त्यांचे स्वागत केले गेले.

शिक्षण विवेकच्या पुणे कार्यालयातील उपक्रम प्रमुख रूपाली निरगुडे, उपक्रम साहाय्यक शुभदा कुलकर्णी, तसेच संपादन साहाय्यक स्वाती यादव या तिघीही जणी या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.

पहिल्या सत्रात प्रवेशद्वाराजवळ अरुणाताईंचे छायाचित्र मध्यभागी ठेवून मुलींनी भोवती सुंदर रांगोळी रेखाटली होती. अरुणाताईंच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचीही सुंदर रांगोळी काढली होती. अरुणाताईंच्या हस्ते तुळशीच्या रोपाला पाणी घालून प्रदर्शनाचे उद्धाटन केले गेले. व्यंकटेश माने व ग्रंथपाल पांडुरंग चाफेकर यांच्या मेहनतीतून व कल्पनेतून साकारलेल्या या अनोख्या प्रदर्शनात अरुणाताईंच्या साहित्यातील कविता, कथेतील उद्बोधक वाक्ये, उतारे मुलांनी सुलेखानातून भित्तिपत्रके प्रदर्शित केली होती. त्यांची ग्रंथसंपदा, कवयित्री व समीक्षक डॉ. नीलिमा गुंडी यांची पुस्तके प्रदर्शनात मांडली होती. विद्यार्थ्यांचे शिक्षण विवेक अंकामधील प्रकाशित साहित्य, त्याचप्रमाणे संस्थेने प्रकाशित केलेली पुस्तकेही या प्रदर्शनात मांडली होती. यानंतर 'एक दिवस साहित्यिकांच्या सहवासात' या प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुनील वसमतकर यांनी प्रास्ताविक परिचय व स्वागत केले. संस्थेचे कार्यवाह नितीन शेटे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. या वेळी कल्पनाताई चौसाळकर, भा.शि.प्र. संस्था अंबाजोगाईच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्य विशेष निमंत्रित म्हणून हजर होत्या.


 

या प्रसंगी मुकुंद मिरगे व विद्यार्थिसंचाने कविता गेयरूपात सादर केली. तसेच अरुणाताईंच्या कथेवर आधारित नाटिका विद्यार्थ्यांनी सादर केली. 'वाट पाहताना' या पाठासंबंधी विद्यार्थ्यांशी हितगुज करताना अरुणाताईंनी वाट पाहण्यातली हुरहुर, मजा कशी अनुभवायची हे सांगितले. ''तुम्हाला भेटण्याची मीही वाट पाहत होते आणि माझ्या स्वागताची तुम्ही जी भव्य तयारी केलीत, ती पाहून त्या वाट पाहण्याचे सार्थक झाले'' असे त्या आवर्जून म्हणाल्या. क्षमा कुलकर्णी यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले. मुकुंद मिरगे यांनी म्हटलेल्या शांतीमंत्राने सत्राची सांगता झाली.

द्वितीय सत्रात मराठी भाषा विषयाच्या शिक्षकांसाठी, भाषाप्रेमी लेखक-साहित्यिकांसाठी उद्बोधन वर्ग आयोजित केला होता. बबन गायकवाड (संस्था, मराठी विषय प्रमुख) यांनी प्रास्ताविक परिचय व स्वागत केले. मान्यवरांनी पु.ल. देशपांडे व ग.दि. माडगूळकर यांच्या प्रतिमांचे पूजन केले. या वेळी व्यासपीठावर संथेचे कार्यवाह नितीन शेटे, शालेय समितीचे अध्यक्ष आनंदराज देशपांडे, स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष यशवंतराव देशपांडे-तावशीकर, कार्यवाह जितेश चाकसी उपस्थित होते.

मुकुंद मिरगे यांनी कविता सादर केली. या प्रसंगी मार्गदर्शन करताना अरुणाताई म्हणाल्या की, ''आपण शिक्षक असलो, तरी आयुष्यभर आपण शिकतच असतो. कवीच्या शब्दांचा वाच्यार्थ व कवीच्या मनातला अर्थ समजण्याची मर्मदृष्टी देणे ही शिक्षकांची कसोटी असते. यासाठी चाकोरीत न अडकता व्यापक विचार करायला शिकणे महत्वाचे आहे.''

डॉ. नीलिमा गुंडी मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, ''भाषा ही जीवनाला व्यापून उरणारी असते. भाषा नुसती येऊन उपयोगी नाही, तर भाषेच्या माध्यमातून माणसाचे मन ओळखता आले पाहिजे. भाषा जोडणारी असते. भाषेसाठी भावनात्मक पूर्वतयारी आवश्यक असते आणि भाषा हीच आपली ओळख असते. शिक्षण व्यवस्थेच्या पलीकडे जाऊन मुलांना भाषेची गोडी लावणे, साहित्याची जाण त्यांच्यात रुजवणे महत्त्वाचे आहे.'' या वेळी शिक्षकांसाठी एका प्रश्नमंजुषेचे आयोजन केले होते. शैला सांगवीकर यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले. मुकुंद मिरगे यांच्या शांतीमंत्राने या सत्राची सांगता झाली. तिसऱ्या सत्रात अरुणा ढेरे यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली.


 

उमेश सेलूकर यांनी परिचय स्वागत व प्रास्ताविक केले. अरुणाताईंच्या स्वागतासाठी संतोष बीडकर यांनी त्यांच्या कवितेला चाल लावून गाऊन सादर केली.

प्रसिध्द गझलकार अजय पांडे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर किरण भावटणकर, यशवंतराव देशपांडे-तावशीकर उपस्थित होते. संपदा देशपांडे यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले.

प्रा. मनीषा टोपरे व नीता मोरे यांनी प्रकट मुलाखत घेतली. अरुणाताईंनी त्यांच्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली. बालपण, शाळा, जडणघडण, आई आणि आत्याकडून शिकलेले विणकाम, भरतकाम, वडिलांचे लोकसंस्कृती संशोधनाचे कार्य, भावंडांशी कपाटातली पुस्तके शोधण्याचे खेळलेले खेळ यांबद्दल सांगताना अरुणाताई जुन्या काळात हरवून गेल्या. बदललेला काळ तंत्रज्ञानाचे आक्रमण आणि माणसाच्या गुणसूत्रात उतरलेले आदिम संस्कृतीचे धागे यांचा गुंता त्यांनी छान उलगडून दाखवला. थेट व चपखल प्रश्न आणि सविस्तर मनमोकळी उत्तरे यांमुळे ही मुलाखत छानच रंगत गेली.

 

आभाळाएवढया उंचीच्या साहित्यिक असूनही अरुणाताईंच्या साधेपणाने, सच्चेपणाने व प्रांजळपणाने लातूरकरांच्या मनावर गारूड केले आहे. संस्थेने विद्यार्थी-विद्यार्थिनींना तर ही आयुष्यभर लक्षात राहणारी भेटच दिली आहे.