हवाई दलाच्या पंखात बळ

विवेक मराठी    07-Sep-2019
Total Views |

 

देशाचे संरक्षण ही बाब विद्यमान केंद्र सरकारने आपल्या प्राधान्यक्रमावर ठेवली आहे. त्यामुळे संरक्षण क्षेत्राच्या तिन्ही दलांमध्ये सातत्याने मोलाची भर पडताना दिसत आहे. भारतीय हवाई दलात नुकतीच सामील झालेली 8 अपाची एएच 64 ई हेलिकॉप्टर्स, याआधीच दाखल झालेली 6 चिनुक हेलिकॉप्टर्स आणि लवकरच ताफ्यात सामील होणारी 26 राफेल विमाने हवाई दलाच्या पंखाचे बळ वाढवणार आहेत.
 
कर्नल (निवृत्त) अभय बाळकृष्ण पटवर्धन 

मंगळवार, दि. 3 सप्टेंबर 2019 रोजी सामरिक शक्ती संवर्धनासाठी बोइंग व लॉकहिड मार्टिन या अमेरिकन कंपनीकडे मागणी केलेल्या 22पैकी आठ अपाची एएच 64 ई हेलिकॉप्टर्स भारतीय हवाई दलात सामील झाली. हवाई दलाच्या जुन्या, एमआय 35 या रशियन हेलिकॉप्टर्सच्या जागी आलेली ही जगातली सर्वोत्तम अत्याधुनिक, बहुद्देशीय अशी 'कॉम्बॅट हेलिकॉप्टर्स' आहेत. अतिचपळ व स्वसंरक्षणसिध्द असणारी ही हेलिकॉप्टर्स सर्व प्रकारच्या भूभागावर, हवामानात आणि चकमकींमध्ये आपल्या रात्रंदिन कार्यरत अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे नावाजलेली आहेत. या हेलिकॉप्टरमध्ये 15,700 फूट सरळ आणि 12,500 फूट वर/खाली, हवेतून हवेत मारा करणारी एआयएम 'स्टि्रंगर' क्षेपणास्त्रे, 8 किलोमीटर्स पल्ल्याची, हवेतून जमिनीवर मारा करणारी 'फायर ऍंड फर्गेट' एजीएम 114 हेलफायर लेझर क्षेपणास्त्रे, 2.75 मि.मी.ची 70 हायड्रा रॉकेट्स असणारी एम 261 रॉकेट लॉन्चर्स आणि 1200 राउंड्स व 1500 मीटर्स पल्ला व 500 मीटर्स प्रभावी मारा करण्याची क्षमता असणारी एक 30 मि.मी. चेन गन बसवलेली असते. या हेलिकॉप्टरमध्ये दोन इंजीन्सबरोबरच अत्युत्तम दर्जाची इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर केपेबिलिटीही असते.

अपाची एएच 64 ई ची वैशिष्टये

या हेलिकॉप्टरमध्ये एक वैमानिक व एक गनर असतात. हवाई दल प्रमुखांच्या म्हणण्यानुसार, 'वन ऑफ द फियर्सेस्ट हेलिकॉप्टर्स इन द वर्ल्ड' असणारी ही मशीन, हवाई दलाच्या पठाणकोटस्थित 125 (ग्लॅडिएटर्स) हेलिकॉप्टर युनिटमध्ये दाखल झाली आहेत. ऍंटी आर्मर (रणगाडाविरोधी) हेलफायर क्षेपणास्त्र बाळगणारी ही हेलिकॉप्टर्स अगदी कमी उंचीवर (ट्री-टॉप लेव्हलवर) वेगाने उड्डाण करून शत्रूच्या रडार्सपासून आपला बचाव करत, पंजाब-राजस्थान क्षेत्रात तैनात पाकिस्तानी रणगाडे व काँक्रीट बंकर्स उद्ध्वस्त करू शकतात. या हेलिकॉप्टरचे कॉकपिट आणि बॉडी यांच्यामध्ये 'रिइन्फोर्स्ड आर्मर' आणि 'बुलेटप्रूफ ग्लास' लावलेली असल्यामुळे हे अनुक्रमे 12.7 आणि 23 मि.मी. बुलेट्सचा मारा सहज झेलू शकतात. डेटा नेटवर्किंगच्या साहाय्याने ही हेलिकॉप्टर्स युध्दक्षेत्रातील छायाचित्रे (बॅटल पिक्चर्स) ट्रान्स्मिट/रिसीव्ह करण्यात (पाठवण्यात, मिळवण्यात) सक्षम असतात. भारतीय वैमानिक 2018पासून अमेरिकेत या हेलिकॉप्टर उड्डाणाचे प्रशिक्षण घेत आहेत. अशीही माहिती आहे की, 1000 तासांचा हेलिकॉप्टर उड्डाणाचा अनुभव असणाऱ्या भारतीय वैमानिकांनाच अपाची हेलिकॉप्टर्सवर वैमानिक म्हणून तैनात करण्यात आले आहे.

या हेलिकॉप्टर्समध्ये असलेल्या मोठा दाब व उचल (ग्रोट थ्रस्ट ऍंड लिफ्ट) संयुक्त संगणकीय कार्यप्रणाली (जॉइंट डिजिटल ऑपरेबिलिटी), सुधारित स्वरक्षण (इम्प्रूव्हड सर्व्हायव्हेबिलिटी), आकलनीय निर्णयक्षमता (कॉग्निटिव्ह डिसीजन मेकिंग) आणि स्वयंनिदान कौशल्याचा (सेल्फ डायग्नोस्टिक एबिलिटी) वर्णपट यांमुळे या हेलिकॉप्टर्सचा टेहळणी (रिकॉनिसन्स), सुरक्षा (सिक्युरिटी), शांततेसाठी कारवाई (पीस कीपिंग ऑपरेशन्स) आणि अचूक मारक क्षमता (लिटल अटॅक केपेबिलिटी) आदींसाठी वापर करण्यात येतो. याची उड्डाणक्षमता तीन तासांची आहे. सामरिक परिभाषेत या हेलिकॉप्टरला 'शत्रूच्या तडाखेबंद मारा झेलत त्याच्यावर फार मोठा आघात करणारे फ्लाइंग मशीन' म्हणतात. अपाची हेलिकॉप्टर एका वेळी 16 हेलफायर मिसाइल्स वाहून नेऊ शकते आणि त्याचे इनबिल्ट रडार एका मिनिटात तब्बल 128 लक्ष्यांचा ठावठिकाणा शोधून त्यांचे वर्गीकरण आणि धोक्यानुसार प्राधान्यता (क्लासिफिकेशन ऍंड थ्रेट प्रायोरिटायझेशन) ठरवू शकते. याची चेन गन, स्थिर राहू शकणाऱ्या गिंबल टरेटमध्ये गनरच्या जागेखाली नाइट व्हिजन डिव्हाइस कॅमेऱ्यासह बसवलेली असते. नाइट व्हिजन कॅमेरा आणि चेन गन यांचा समन्वय गनरच्या डोक्यावरील कॅमेऱ्याच्या दृष्टीशी साधलेला असल्यामुळे गनर जिकडे पाहतो तिकडेच गन फायर करते. या शिवाय अपाची हेलिकॉप्टरची, बियाँड रेंज मिसाइल्स बीआरएम्स कॅमेऱ्याच्या दोन्ही बाजूंना बसवलेली असल्यामुळे, गनर जिकडे पाहील तिकडेच त्याची क्षेपणास्त्रेही डागली जातात. मुख्य वैमानिक हेलिकॉप्टरच्या उड्डाणाचे आणि गनर गन/मिसाइल/रॉकेट डागण्याचे काम करत असतो, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. अपाची एएच 64 ईमध्ये जॉइंट टॅक्टिकल इन्फर्मेशन डिस्ट्रिब्यूशन सिस्टिम (संयुक्त रणनैतिक माहिती वितरण यंत्रणा), शक्तिशाली टी 1700 जीई/701 डी इंजीन्स, नेक्स्ट जनरेशन एल 3 कम्युनिकेशन्स एमयूएम डेटा लिंक आणि रडार्सदेखील बसवलेले असतात. जानेवारी 1991मध्ये स्टॉर्क बरॅक्स, जर्मनीतील 11व्या अमेरिकन एव्हिएशन ब्रिगेडच्या 147 अपाची हेलिकॉप्टर्स कुवेतमधील इराकी आक्रमण परतवून लावण्यासाठी तैनात केली गेली असताना त्यांनी शत्रूचे 245 आर्मर्ड व्हेइकल्स (रणगाडे) उद्ध्वस्त केले होते. ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्ममध्ये या हेलिकॉप्टर्सनी एकूण 278 इराकी रणगाडे उद्ध्वस्त केले होते.


 

'चिनूक'ची चुणूक

2018अखेरीस भारतीय हवाई दलात टि्वन रोटर, हेवी लिफ्ट सीएच 47 एफ चिनूक ट्रान्स्पोर्ट हेलिकॉप्टर्स दाखल झाली. या हेलिकॉप्टरमध्ये हेवी मशीनरी/आर्टिलरी गन्स/हलके रणगाडे/आर्मर्ड पर्सनल कॅरियर्स/150 पूर्णपणे सशस्त्र सैनिकांची वाहतूक करता येते. एका वेळी हे हेलिकॉप्टर 9.6 टन वजन नेऊ शकते. अपाचीप्रमाणेच हेदेखील सर्व प्रकारच्या भूभागावर व हवामानात कार्यरत असते. पर्वतराजींमधील दऱ्यांमध्ये हे हेलिकॉप्टर लीलया संचार करू शकते. हवाई दलाची जड वहन क्षमता (हेवी लिफ्ट केपेबिलिटी) कायम राखण्यासाठी हे अतिशय उपयुक्त वाहन आहे. हे हेलिकॉप्टर भारतीय हवाई दलात असलेल्या एमआय 26 हेलिकॉप्टर्सची जागा घेईल. भारताने अमेरिकेकडे 15 चिनूक हेलिकॉप्टर्सची मागणी केली आहे. त्यापैकी सहा चिनूक हेलिकॉप्टर्स हवाई दलात दाखल झाली आहेत. चिनूक आणि अपाची यांचा व्यवहार 2 अब्ज 50 कोटी डॉलर्सचा आहे. यामुळे भारतामधील संरक्षण सामग्राी निर्मितीच्या आणि विमान उद्योग या क्षेत्रांमधील खाजगी उद्योजकांना यांच्यासाठी सुटे भाग निर्माण करण्याच्या साठ कोटी डॉलर्सच्या ऑर्डर्स मिळतील. ही दोन्ही हेलिकॉप्टर्स भारतासाठी 'गेम चेंजर'चे काम करतील. याआधी भारताकडे जड वहनासाठी एमआय 35 हे रशियन ऍसॉल्ट हेलिकॉप्टर होते, ज्यात सैनिकांची वाहतूक केली जायची. मात्र सैनिक बसलेले असताना हेलिकॉप्टरची मॅन्युव्हरेबिलिटी (गतिमानता) अगदी कमी होत असे. आता अपाची अटॅक हेलिकॉप्टर आणि चिनूक ट्रान्स्पोर्ट हेलिकॉप्टर अशी दोन वेगळी स्पेशलाइज्ड हेलिकॉप्टर्स हवाई दलाला मिळाल्यामुळे भूदलाला कोणत्याही कारवाया करणे सुलभ होईल.

 अपाची आणि चिनूक हेलिकॉप्टर्स कोण ऑपरेट करणार, याबद्दल भूदल आणि हवाई दल यांच्या वाद सुरू आहेत. दोन्ही, विशेषतः अपाची हेलिकॉप्टर भूदलाच्या क्लोज एयर सपोर्टसाठी आवश्यक आहेत. ही हेलिकॉप्टर्स वापरण्यासाठी जर प्रत्येक वेळी हवाई दलाला विनंती करावी लागणार असेल, तर आम्हाला आर्मी एव्हिएशन कोअरसाठी 39 अपाची हेलिकॉप्टर्स देण्यात यावी, ही भूदलाची मागणी आहे. अपाची हेलिकॉप्टर जहाजांच्या डेकवरही उतरू शकत असल्यामुळे भारतीय नौदलानेदेखील सरकारकडे 16 अपाचीची मागणी केली आहे. अर्थात ही पूर्ण करायची की नाही हे सरकार व आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असेल. अपाची हे भारताचे पहिले प्युअर अटॅक हेलिकॉप्टर आहे. दहशतवाद्यांच्या छुप्या गुप्त तळांवर हल्ला करण्यासाठी भूदलाला अपाची हेलिकॉप्टर्स अतिशय उपयुक्त आहेत. दहशतवाद्यांच्या तळांवर, जिथे अन्यथा कारवाई करायची झाल्यास मोठी जीवितहानी झेलावी लागू शकते, तिथे अपाची हेलिकॉप्टर मोलाची भूमिका निभावू शकते. 2018मधील पहिल्या सर्जिकल स्ट्राइकप्रमाणेच पाकिस्तानी सीमेच्या केवळ 3-4 किलोमीटर्स आत असलेल्या आत्मघातकी लाँच पॅड्सवर भारतीय हद्दीतून हल्ला करण्यासाठीदेखील अपाची हेलिकॉप्टर्सचा वापर केला जाऊ शकतो. पारंपरिक युध्दात शत्रूची सशस्त्र वाहने नष्ट करण्यासाठी, भारतीय सेनेच्या भावी इंटिग्रोटेड बॅटल ग्राूपमध्ये (एकात्मिक लढाऊ गटामध्ये) अपाची हेलिकॉप्टर्सचे स्थान अतिशय महत्त्वाचे असेल. बालाकोटमध्ये जसा भारतीय हवाई दलाने 65 किलोमीटर्स आत जाऊन हल्ला केला होता, तशा प्रकारच्या भूदलाच्या सीमापार हल्ल्यासाठी एका चिनूक हेलिकॉप्टरमध्ये 150 शस्त्रसज्ज सैनिक, त्यांची शस्त्रास्त्रे-दारूगोळा आणि यासोबत या हेलिकॉप्टरच्या रक्षणार्थ एक पूर्णतः सज्ज अपाचीची आवश्यकता असेल.

असा हल्ला करताना वैमानिकांना त्यांच्याबरोबर आसपास हवेत सोडलेल्या मानवरहित अथवा मानवविरहित ड्रोन्सच्या माध्यमातून रियल टाइम व्हिडिओ फीड मिळेल. अपाची हेलिकॉप्टर्समध्ये या ड्रोन्सच्या फ्लाइट पाथवर आणि सेन्सर पे लोडवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता आहे. अपाची हेलिकॉप्टरमधील मारक शस्त्रांच्या आणि ड्रोन्समधल्या सेन्सर्समुळे मिळणाऱ्या इलेक्ट्रो ऑप्टिकल/इन्फ्रारेड प्रतिमांच्या साहाय्याने अपाची हेलिकॉप्टरच्या वैमानिकाला दूरवरून डायनॅमिक ऍंड फास्ट मूव्हिंग टार्गेट्सवर लक्ष ठेवून त्यांना नष्ट करणे सोपे होईल. अपाची हेलिकॉप्टर्सच्या वैमानिकांनी इराक/सीरियामध्ये आणि अफगाणिस्तानमध्ये शत्रूच्या लढाऊ विमानांचा, पिकअप ट्रक्सचा आणि अचानक हल्ल्यासाठी लपलेल्या घातकी शत्रुसैनिकांचा नाश करण्यासाठी ह्या मॅन्ड/अनमॅन्ड टीमिंग सिस्टीमचा फार प्रभावी पध्दतीने वापर केला. सतत हालचाल करणाऱ्या शत्रूच्या बदलत्या ठिकाणांवर लक्ष ठेवत 50-60 किलोमीटर्स दूर असणाऱ्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी ड्रोन प्रतिमांचा फार उपयोग होतो आणि अपाची हेलिकॉप्टरच्या वैमानिकाला अकस्मात विस्मयी/आश्चर्यकारक परिस्थितीला सामोरे जावे लागत नाही. भूदलाला क्लोज सपोर्ट देताना किंवा शत्रूचा पाठलाग करताना ते त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून त्याला लगेच नष्ट करू शकतात.

राफेल्स विमाने वाढवणार क्षमता

अपाची व चिनूक हेलिकॉप्टर्सच्या जोडीला भारतीय हवाई दलामध्ये 36000 कोटी डॉलर्सची 36 राफेल फिफ्थ जनरेशन फायटर विमानेही येत आहेत. ध्वनीच्या अडीच पट वेगाने उड्डाण करणारी राफेल ही डीप पेनिट््रेशन, मल्टिरोल फायटर्स असल्यामुळे ती क्लोज सपोर्ट, इंटरडिक्शन, डॉग फाइट, स्ट्रॅफिंग, बाँबिंग आणि अण्वस्त्र वाहून नेण्याच्या कामी येतील. भारतीय इंटिग्रोटेड बॅटल ग्रूपची कारवाई सुरू असताना शत्रूच्या हद्दीत आत घुसून त्यांची संसाधने उद्ध्वस्त करणारी आणि/किंवा आयबीजीवर हल्ला करण्यासाठी येणाऱ्या शत्रू विमानांना स्ट्राइकच्या अधिक आकाशातून पळवून लावणारी राफेल्स भारतीय हवाई दलाच्या मुकुटातील मोरपीस आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. 22 अपाची, 15 चिनूक हेलिकॉप्टर्स आणि 36 राफेल लढाऊ विमाने आल्यावर भारतीय हवाई दलाची ताकद मोठया प्रमाणात वृध्दिंगत झालेली असेल आणि भूदलाला व नौदलालाही त्याचा प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष फायदा होईल. 2022पर्यंत ही सर्व विमाने व हेलिकॉप्टर्स भारतीय संरक्षण दलात पूर्ण क्षमतेने सामील होतील. आक्रमण करणाऱ्या इंटिग्रोटेड बॅटल ग्राूपच्या डोक्यावर 15-20 हजार फुटांवरून बॅटल इंटेलिजन्स देणारी ड्रोन्स, आयबीजींच्या रक्षणार्थ 3-5 हजार फुटांवर उड्डाण करत असलेली अपाची हेलिकॉप्टर्स, शत्रूच्या मागे (रियर ऑफ एनिमी पोझिशन) जाऊन स्पेशल फोर्सेसना ड्रॉप करायला निघालेल चिनूक हेलिकॉप्टर आणि या सर्वांवर नजर ठेवणारा जी-7 उपग्राह या ताफ्याचा सक्रिय हिस्सा असणे हे स्पेशल फोर्समधील सैनिकाचे स्वप्न असते आणि आता लवकरच ते पूर्ण होईल.