शिष्यात् इच्छेत् वैफल्यम!

विवेक मराठी    07-Sep-2019
Total Views |

 

ज्या वेळी आयाराम-गयाराम हे शब्दही भारतीय राजकारणात रूढ नव्हते, तेव्हा पवारांनी काँग्रेस पक्ष फोडून वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडले होते. त्यानंतरही इतर पक्षातील लोकांना ओढण्यासाठीची पवारांची ख्याती होतीच. पवारांनी दाखवलेल्या मार्गानेच आज फडणवीस जात आहेत. पवारांचेच शस्त्र वापरून आपण त्यांना मात देऊ शकतो, हे त्यांना माहीत आहे. त्यातून पवारांचे वैफल्य वाढत आहे.
देविदास देशपांडे 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा 'कधी नव्हे तो' पारा अखेर चढलेला पाहायला मिळायला. 'कधी नव्हे तो' हा माध्यमकर्मीयांचा आणि पवारांच्या प्रियपात्रांचा शब्द आहे. शरद पवार म्हणजे शांततेचा आणि संयततेचा आविष्कार, ते कधीच भडकत नाहीत, ते कधीच असंस्कृत वक्तव्य करत नाहीत अशी अनेक मिथके गेली चार-पाच दशके जाणीवपूर्वक महाराष्ट्रात रुजवण्यात आली. हे असे समज लोकांच्या मनीमानसी खिळवण्यासाठी चार-पाच दशके लागली आणि त्यांचा वर्ख निघण्यासाठी फक्त साडेचार वर्षांचा काळ पुरला आहे. ताजा वर्ख निघाला तो नातेवाइकांशी संबंधित प्रश्न विचारण्याच्या निमित्ताने.

लागोपाठ दोन लोकसभा आणि एका विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव स्वीकाराव्या लागणाऱ्या राष्ट्रवादीला सध्या मोठी गळती लागली आहे. येणारा प्रत्येक दिवस कोणा ना कोणा नेत्याने पक्ष सोडण्याच्या बातमीसह उगवतो किंवा मावळतो. ही गळती थांबावी यासाठी 'विवेकवादी', 'सेक्युलर', 'लिबरल' इत्यादी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला धर्माचाही आधार घ्यावा लागला. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी होमहवन केले आणि प्रभू श्रीरामाला साकडेही घातले. पुरोहितांच्या उपस्थितीत सर्व विधी शास्त्राप्रमाणे करण्यात आले. पुरोगामीपणाचा टेंभा मिरवणाऱ्या राष्ट्रवादीसाठी हे एक अक्रीतच होते. याबाबतची छायाचित्रे आणि बातम्या माध्यमांमध्ये झळकल्या, सोशल मीडियात गाजल्या.

इतकेच नाही, तर खुद्द शरद पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना संघाच्या वाटेवरून चालण्याचा सल्ला दिला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांमध्ये असलेली चिकाटी, शिस्तबध्दता शिकण्यासारखी आहे. त्यांच्यासारखे काम केल्यास यश अशक्य नाही. संघाच्या कार्यकर्त्यांस एखादा भाग नेमून दिला की त्या ठिकाणी तो घरोघरी जाऊन संपर्क साधतो. एखाद्याला पाच घरी जाण्यास सांगितले आणि त्यातील एखादे घर बंद असेल तर तो पुन्हा सायंकाळी त्या घरी जातो, मात्र,त्याचे काम पूर्ण करतोच. ही चिकाटी आपणही शिकायला हवी, असा सल्ला पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला. तरीही जाणाऱ्यांचा ओघ काही राहीना.

शेवटी निरुपाय होऊन राष्ट्रवादीचे धाकले मालक अजित पवार यांनी भगव्याचा आश्रय घेण्याचा निर्णय जाहीर केला. राष्ट्रवादीच्या यापुढच्या प्रत्येक सभेत पक्षाच्या झेंडयाबरोबर भगवा झेंडा फडकेल, असे सांगून पाहिले. हिंदू दहशतवादाचा अपप्रचार करून ज्यांनी मुंब््रयासारख्या भागात देशद्रोह्यांच्या अड्डयांना खतपाणी घातले, त्यांना आता भगव्याची ओढ लागली. तरीही नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनातली धाकधूक काही जायला तयार नाही. बनावट भगवा मिरवण्यापेक्षा अस्सल भगव्याच्या आश्रयाला जाण्यात त्यांना जास्त शहाणपण दिसते.

तब्बल 15 वर्षे महाराष्ट्रात आणि 10 वर्षे केंद्रात सत्ता गाजवलेल्या राष्ट्रवादीची ही अवस्था पाहून कोणालाही कीव आल्यास नवल नाही. गेल्या पाच वर्षांत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांपासून सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत अनेकांनी पक्षाला रामराम करून भाजपाशी किंवा शिवसेनेशी घरोबा केला. रणजितसिंह पाटील यांनी भाजपामध्ये, तर सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. नवी मुंबईतील दिग्गज नेते गणेश नाईक, नगर जिल्ह्यातील आमदार वैभव पिचड आणि मुंबईतील चित्रा वाघ हेही असेच निघून गेले. नाशिकचे छगन भुजबळ आणि मराठवाडयातील भोकरचे बापूसाहेब गोरठेकर यांच्याबाबत दररोज तळयात-मळयातच्या बातम्या येत आहेत.


 

सोशल मीडियावर तर राष्ट्रवादीच्या चेष्टेला ऊत आला आहे. पक्षाची प्रचंड खिल्ली उडवली जात आहे. 'हे असेच चालू राहिल्यास राष्ट्रवादीत केवळ शरद पवार आणि सुप्रिया सुळेच उरतील' अशा स्वरूपाचे विनोदही आता जुने झाले. अनेक ठिकाणी विधानसभेसाठी इच्छुकांच्या मुलाखतींकडेही नेत्यांनी पाठ फिरवली.

ग्राामीण भागातील एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर शरद पवारांचा संताप उफाळून वर आला, त्याला ही पार्श्वभूमी आहे. प्रश्न नेत्यांच्या जाण्याचा नाही किंवा सत्तेत वाटा मिळण्याचा नाही. आतापर्यंत जाणीवपूर्वक उभे केलेले एक थोतांड उघडे पडत आहे, हे त्यामागचे दुःख आहे. गेल्या शुक्रवारी श्रीरामपूर येथील पत्रकार परिषदेत त्या दुःखाला वाट मिळाली. एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने राष्ट्रवादीच्या नेत्यांसह आता नातेवाईकही (डॉ. पद्मसिंह पाटील) सोडून जात असल्याबद्दल विचारले आणि पवारांचा पारा चढला. त्या पत्रकारावर डाफरून पवार चक्क उठून निघू लागले. 'इथे नातेवाइकांचा प्रश्न येतोच कुठे? असे प्रश्न तुम्ही कसे काय विचारू शकता? माफी मागा' असे म्हणत पवार उठून निघाले. बरोबरच्या नेत्यांनी त्यांना व प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला शांत केले (म्हणतात!)


 

वास्तविक पवारांचा असा पारा चढण्याचा किंवा तोल जाण्याचा हा पहिलाच प्रसंग नाही. त्यांच्या समर्थकांकडून किंवा कौतुकबाजांकडून तसे केवळ चित्र रंगवले गेले. विविध वाहिन्यांवर ही बातमी दाखवताना शरद पवार कधी चिडत नसल्याचे किंवा रागावत नसल्याचे आवर्जून सांगण्यात येत होते. मात्र गेल्या दशकभरातील शरद पवारांच्या पत्रकार परिषदांचा किंवा कार्यक्रमांचा आढावा घेतला, तर त्यांचा तोल जाण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते. ज्या-ज्या वेळी प्रश्नांना उत्तर देता येत नाही असे त्यांना वाटते, त्या वेळी पत्रकार परिषदेतून पळ काढण्याससुध्दा ते मागेपुढे पाहत नाहीत. सहा-सात वर्षांपूर्वी मावळ येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार झाला होता. त्या वेळी पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलात एका कार्यक्रमानिमित्त पवार आले होते. तो विषय ताजा असल्यामुळे सगळे पत्रकार तिथे तिष्ठत थांबले होते. मात्र पवारांनी त्यांना उत्तरे न देता पळ काढला, हे मी प्रत्यक्ष अनुभवले आहे. एखाद्या पत्रकारावर डाफरण्याचे प्रसंगही काही कमी नाहीत. एखाद्या व्यक्तीची जात काढण्याचे प्रमाणसुध्दा बऱ्यापैकी लक्षणीय प्रमाणात वाढले आहे. याबाबत सत्तेत असताना आणि नसतानाची दोन-तीन उदाहरणे पुरेशी आहेत.

पवार कृषिमंत्री असताना आणि राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार असताना वीज भारनियमनाचा प्रश्न तीव्र झाला होता. त्या वेळी ज्येष्ठ सनदी अधिकारी माधव गोडबोले यांनी या संदर्भात अहवाल सादर केला होता. या अहवालावर पवारांनी टीका केली असता ''पवारांनी हा अहवाल वाचला आहे की नाही, हीच शंका आहे'' असे गोडबोले म्हणाले होते. त्यावर पवारांची प्रतिक्रिया होती, ''लिहिणे-वाचणे ही आता ठरावीक लोकांची मक्तेदारी राहिलेली नाही!'' त्याच दरम्यान एकदा राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांचे आंदोलन बऱ्यापैकी भरास आणले होते. त्या वेळी साखर कारखानदारांची बाजू सावरून धरताना पवार यांनी राजू शेट्टींची जात काढली होती.

दोन-तीन वर्षांपूर्वी कोल्हापूरचे छत्रपती भाजपामध्ये आले, तेव्हाही पवारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची जात काढली होती. ''पूर्वी छत्रपती पेशव्यांना वस्त्रे प्रदान करत असत, आता पेशवे छत्रपतींना वस्त्रे देत आहेत'' असे ते म्हणाले होते. ही उदाहरणे पाहिली, तर श्रीरामपूरची घटना अगदी आगळीवेगळी होती असे म्हणण्यात काही अर्थ नाही.

आता प्रश्न असा आहे, की हे वैफल्य का येते? याचे कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्षच नाही, तर ती एक सरंजामदारी टोळी आहे आणि या टोळीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. तो प्रसिध्द शेर आहे ना, 'हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहां दम था, मेरी कश्ती वहां डूबी, जहां पानी कम था' - आज पवारांची अवस्था नेमकी तशीच झाली आहे. त्यांची स्वतःची माणसे त्यांना सोडून जात आहेत आणि दुसरीकडे सख्खे पुतणे अजित पवार पक्ष बळकावण्याच्या बेतात आहेत. 'आपल्या 75 वर्षांच्या वडिलांना फायद्यासाठी विचार व पक्ष बदलायला लावणारी मुलं असण्यापेक्षा आम्ही मुली बऱ्या. हे वंशाचे दिवे स्वार्थासाठी आपल्या वडिलांना मान झुकवायला लावतात. बरं झालं बाबा, तुम्हाला मुलगा नाही' असे भावनिक उद्गार खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकतेच काढले. त्याला हा संदर्भ आहे. आणि या घरच्या भांडणात आपल्याला काहीही भवितव्य नाही, हे माहीत झाल्यामुळे राष्ट्रवादीत 'मेगागळती' सुरू आहे. पवारांच्या पक्षात लोक राहायला का तयार नाहीत याचे आत्मचिंतन त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने केले पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले ते म्हणूनच खरे आहे.

आपण एकटे पडलो आहोत आणि तरीही आपल्यालाच लढावे लागणार आहे, हे पवारांना पक्के ठाऊक आहे. या सर्वांमध्ये पवार नावाच्या व्यक्तिमत्त्वावर चढवण्यात आलेल्या अनेक झुली गळून पडत आहेत. एक तर आजच्या घडीला मुख्यमंत्री फडणवीस महाराष्ट्रातील सर्वात प्रभावी नेते म्हणून पुढे आले आहेत. त्यांचा सामना थेट शरद पवार यांच्याशी आहे आणि पवारांच्याच मार्गाने ते त्यांना धोबीपछाड देत आहेत.

भाजपाने पक्ष फोडण्याची हद्द गाठली आहे हे खरे असेलही. मात्र महाराष्ट्रात ही पक्ष फोडण्याची परंपरा सुरू कोणी केली? ज्या वेळी आयाराम-गयाराम हे शब्दही भारतीय राजकारणात रूढ नव्हते, तेव्हा पवारांनी काँग्रेस पक्ष फोडून वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडले होते. त्या वेळी रूढ झालेला 'पवारांनी पाठीत सुरा खुपसला' हा वाक्प्रचार आजही लोकांच्या आठवणीतून गेलेला नाही. त्यानंतरही इतर पक्षातील लोकांना ओढण्यासाठीची पवारांची ख्याती होतीच. आज ज्यांच्या पक्ष सोडण्याची चर्चा आहे, ते छगन भुजबळ आणि गणेश नाईक हे काय राष्ट्रवादीने तळागाळातून आणलेले नेते आहेत का? राष्ट्रवादीची मुलूखमैदान तोफ म्हणून ज्यांचे नाव आहे, त्या धनंजय मुंडे यांना पवारांनी कुठून आणले? संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच एक प्रकारे फोडाफोडीतून आलेला पक्ष आहे, कारण सोनिया गांधींच्या परदेशी मुळाचा बहाणा करून पवारांनी काँग्रेस पक्ष फोडल्यामुळेच तो अस्तित्वात आला आहे. पवारांनी दाखवलेल्या मार्गानेच आज फडणवीस जात आहेत. पवारांचेच शस्त्र वापरून आपण त्यांना मात देऊ शकतो, हे त्यांना माहीत आहे. त्यातून पवारांचे वैफल्य वाढत आहे.

या वैफल्याचाच परिणाम म्हणून पवारांचा हा आतापर्यंत बाळगलेला संयम, सुसंस्कृतता वगैरेंचा मुखवटा गळून पडत आहे. ज्यांनी 'साहेबां'वर शेंदूर फासून-फासून त्याचा देव केला, त्यांना आता शेंदराखालचा दगड पाहायला मिळत आहे. तरीही पडलो तरी नाक वर म्हणतात तसे एवढे भडकले, तरी त्यांची पाठराखण करणारेही कमी नाहीत. पवारांनी यातून काय संदेश दिला, याचीही चर्चा काही जण करत आहेत. करोत बापडे! आजपर्यंत ज्या माणसाने कधीही न बोलता सर्व खेळया केल्या, त्याला संदेश देण्यासाठी काही नाटके करावी लागत आहेत, एवढे तरी खरे! महाराष्ट्राचे राजकारण आपण एकहाती चालवतो या अहंगंडाला तरी धक्का बसला म्हणायचा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीत आले असताना पवार हे माझे राजकीय गुरू असल्याचे सांगून गेले. मोदींचे शिष्योत्तम फडणवीस आज पवारांचीच पध्दती वापरून त्यांना नामोहरम करत आहेत. गुरूची विद्या गुरूला फळते, ती अशी. शिष्यात् इच्छेत् पराजयम् असे आपल्याकडे म्हणतात. पवारांच्या वाटयाला शिष्यात् इच्छेत् वैफल्यम् याचा अनुभव आला आहे.

8796752107