''साहित्यसमरसतेने 'माणूस' बांधतात ती छोटी संमेलनेच'' - प्रा. प्रवीण दवणे

विवेक मराठी    01-Jan-2020
Total Views |

गेली चार दशके साहित्य प्रांतात विविध वाङ्मय प्रकारांत विपुल लेखन केलेले व महाराष्ट्रातील व बृहन्महाराष्ट्रातील वाङ्मयीन चळवळींशी सहभागी असणारे ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रवीण दवणे यांची 'छोटया साहित्य संमेलनाची आवश्यकता' हे सूत्र घेऊन केलेली मनमोकळी बातचीत.


dawane_1  H x W

दवणे सर, आपण स्वत: युवक असल्यापासून विविध प्रकारच्या साहित्य संमेलनांशी निगडित आहात. एक युवक म्हणून आपल्या जडणघडणीत साहित्य संमेलनांनी खरेच काही दिले आहे का? अशा प्रकारच्या साहित्य संमेलनांची आवश्यकता काय वाटते?

साहित्य संमेलनांची आणि तीही विविध प्रकारच्या संमेलनांची मला आवश्यकता वाटते, त्यातही छोटया स्वरूपात होणाऱ्या साहित्य संमेलनांची आवश्यकता वाटते, याचे कारण ही संमेलने म्हणजे वर्षभर साहित्यविषयक वेगवेगळया प्रकारचे जे उपक्रम होतात, त्या उपक्रमांचे उद्यापनच असते. त्यातून वाचनाची अभिरुची सशक्त व्हावी व वैचारिक देवाणघेवाण व्हावी, ही अपेक्षा असते. एका परीने आपल्या मायबोलीच्या दृश्य आणि अदृश्य प्रवाहांना कवेत घेण्याचा तो एक प्रयत्न असतो. तो तितक्या प्रभावीपणे होतो का? का तो सवंग प्रकारच्या राजकारणात आणि हलक्या प्रकारच्या लालसेतून निसटून जातो, हा आणखीनच वेगळा विषय आहे. परंतु संमेलनातून साहित्य रसिकांना हे मिळावे, हा चळवळीचा हेतू असतो. म्हणूनच एक चळवळ म्हणून वैचारिक मंथन म्हणून अशा छोटया साहित्य संमेलनांची गरज आहे, असे मला वाटते.

अलीकडे तर ग्राामीण, युवक, शहरी आणि विविध प्रकारच्या बोली भाषांचीही संमेलने होऊ लागली आहेत. खरोखरच समाजासाठी ती का महत्त्वाची वाटतात?

मोठया संमेलनांतून जे निसटून जाते, ते लहान संमेलनात गवसते असे माझे निरीक्षण आहे. वाचनाबद्दल आणि लेखननिर्मिती प्रक्रियेबद्दल उत्सुक असणारा, समाजातील तरल मनाचा घटक अधिक जिवलगतेने जवळ येतो. त्यांच्याशी थेट संवाद साधण्याची, मनातील कुतूहल व्यक्त करण्याची संधी नव्या लेखकांना अशा संमेलनातून मिळते. मी तर असे म्हणेन, 'अशी छोटी संमेलने हीच खरे तर मोठी संमेलने असतात.' जणू अभिरुची डोळस करणारी ती शिबिरेच असतात. पुष्कळदा सर्व सुविधांनी संपन्न असलेल्या शहरांमध्ये जे सातत्याने मिळते, त्यामुळे मिळणाऱ्यालाही त्याचे काही वाटेनासे होते. जणू सुख तेथे गोठले जाते. त्यातही पंचतारांकित शहरांमध्ये समाजातील, केवळ विशिष्ट वर्गच एकवटला जातो. परंतु छोटया संमेलनातून शेवटच्या रांगेत काम करणाऱ्या, सच्च्या साहित्यिक कार्यकर्त्याला मार्गदर्शन होते. त्याचे प्रश्न वेगळे असतात आणि त्यांना मिळणारे उत्तरही साचेबंद नसते. मोठया संमेलनातून भेदरलेला, अतिप्रकाशाने दिपून गेलेला हा नवा संवेदनशील लेखक-वाचकाचा वर्ग छोटया संमेलनात वास्तवाच्या जमिनीवर येतो. त्याला वाटते, हे सर्व माझ्याचसाठी चालले आहे. एका अर्थाने मी असे म्हणेन - छोटी संमेलने म्हणजे साहित्यिक आणि साहित्य रसिक प्रथितयश आणि नवोदित साहित्यिकांच्या मनामनांचे हस्तांदोलन असते.

छोटया संमेलनातून आपली उपस्थिती आवर्जून लावणाऱ्या रसिकांमध्ये गेल्या 40 वर्षांत काही फरक - एक साहित्यिक म्हणून तुम्हाला जाणवला का?

गेली चार दशके महाराष्ट्रातील सर्व स्तरांतील रसिकांमध्येच मिसळण्याची संधी मला मिळाली आहे. विविध स्नेहसंमेलनांना आणि साहित्य उपक्रमांना वेगवेगळया भूमिकांतून अनुभवले आहे. तो, म्हणजे विविध सामाजिक चळवळींमुळे निर्माण झालेला, आर्थिक मानसिक शोषणातून भरडला गेलेला आणि तरीही नवनिर्मितीविषयी सजग ओढ असलेला एक नवा वर्ग मला दिसू लागला आहे. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या विचारवंत क्रांतिकारकांमुळे जी वैचारिक आणि शैक्षणिक क्रांती झाली, परिवर्तनाची एक लाट उसळली, त्यातून नव्या जाणिवांची पहाट झाली. त्या नव्या पहाटेचे नव्या लेखण्यांचे पहाटरंग मला अशा प्रकारच्या छोटया संमेलनातून अधिक जाणवले. स्वत: एक लेखक आणि मातृभाषेचा कार्यकर्ता म्हणून माझा उत्साह दुणावला. आश्चर्याने अवाक व्हावे अशा प्रकारची सशक्त कविता लिहिणारे, आपल्या जखमांतून, अपेक्षेच्या वेदनेतून, धगधगती निर्मिती करणारे युवक मला दिसू लागले. आपले पारंपरिक व्यावसाय जपून, पोटापाण्याचे जगणे सांभाळून व्यक्त होणारा शेकडो माय-भगिनींचा समाज मला माझ्या वाङ्मयीन मुशाफिरीत दिसून आला. जर छोटी संमेलने नसती तर ज्या लेखण्यांना कागद गवसलाच नसता, अशा लेखण्या या नेटक्या आणि औटक्या, आर्थिक कमी खर्चाच्या आणि नवनिर्मितीच्या दृष्टीने अधिक जमेच्या, अशा अनेक गोष्टी मला त्या संमेलनातून गवसल्या, हे वेगळेपण गेल्या दोन दशकांत अधिक ठळक झाले आहे.

सर, थेटच विचारतो, छोटया संमेलनातून नेमके काय साधते जे मोठया संमेलनातून निसटते? मुशाफिरी करणारा आणि युवा पिढीशी सर्वाधिक जवळचा एक लेखक म्हणून तुम्हाला काय वाटते?

पन्नास हजारांच्या सभेमध्ये वक्ता जेव्हा बोलतो, तेव्हा त्यातले ऐकणारे किती नि टिपणारे किती याचा अंदाज येत नाही. जमिनीवर पडून आकाशाकडे तोंड करून बोलल्यासारखे ते आहे. छोटया संमेलनात वक्ता आणि श्रोता यांचे 'ये हृदयीचे ते हृदयी' नाते असते. त्यामुळे आशय श्रोत्यांपर्यंत खऱ्या अर्थांनी पोहोचतो. मोठया संमेलनातून कागदी फुलांचा उत्सव साजरा होतो, तर छोटया संमेलनातून मनाच्या ओंजळीतून रसिक एक नवा विचार घेऊन जातात.

लेखकाच्या भेटीगाठी छोटया संमेलनात अधिक मोकळेपणाने घडतात, हे बरोबरच आहे; पण प्रवीण सर, त्यातून नेमके वाचकांना आणि नव्या लेखकांना काय मिळते?

आवडत्या लेखकाला जवळून बघणे हा एक संस्कार आहे. मला आठवते - पु.ल. देशपांडे, कुसुमाग्रज, दुर्गा भागवत, शांता शेळके यांना भेटण्यासाठी खरे तर दुरून का होईना बघण्यासाठी मी विद्यार्थिदशेत उत्सुक होतो. आजही आजचे वाचकप्रिय लेखक, कवी यांना बघण्यास, भेटण्यास वाचक आणि नवोदित लेखक उत्सुक असतात आणि लेखक कितीही लोकप्रिय असला तरीही त्याला नवा वाचक भेटला की आनंदच होतो. काही वाचक योग्य तो आदर ठेवून निर्भयपणे आपल्या शंका लेखकांना विचारतात. त्यामुळे पुस्तकाच्या पलीकडे जाऊन एक प्रकारचे वैचारिक अभिसरण होते. मी तर म्हणेन की छोटी संमेलने म्हणजे अभिरुची घडवणारी रसशाळाच असते! काही वेळा नवोदित लेखकांना आपले पुस्तक कसे प्रकाशित करावे हे माहीत नसते. योग्य वेळी ही माहिती ग्राामीण आणि तालुका स्तरावरील लेखक कवींना कळायला हवी. लेखक आणि वाचक यांना छोटया संमेलनांचे असे कितीतरी उपयोग होत असतात.

मराठी भाषा जोपासण्यासाठी अशा नेटक्या संमेलनाची काय भूमिका असू शकते?

केवळ भाषा पंधरवाडा किंवा एखादा राज्य भाषादिन औपचारिकपणे साजरा करून भाषा समृध्दीच्या आभासात राहण्यापेक्षा मातृभाषा निसटली तर नेमके काय होईल? हे भान छोटया आणि नेटक्या संमेलनाचे अधिक ठळकपणे देता येऊ शकते. मराठी भाषा जपणे याचा अर्थ फक्त सदाशिव पेठी मराठी जपणे असा नाही - आता तर तीही उरली नाही. सुदैवाने गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातले अव्यक्त घटक भाषेतून व्यक्त होऊ लागले आहेत. त्यामुळे विविध प्रकारच्या बोलीभाषा एकूण मराठी भाषा समृध्द करण्याची शक्यता होऊ लागली आहे. मराठी भाषा जोपासणे याचा अर्थ केवळ दिवाणखान्यातील मराठी भाषा जपणे नव्हे, माजघरातील, शेतमळयातील, रानावनातील, डोंगर-दरीतील मराठी जपणे आणि जोपासणे म्हणजे मराठी भाषा जपणे!राज्यातील सर्व उपेक्षित समाजात जाऊन अशी संमेलने झुणका भाकर खात साधेपणाने साजरी व्हावीत, असे माझे मत आहे.

प्रवीण सर, अलीकडेच मुलुंड येथे भरलेल्या पहिल्या युवक संमेलनाचेही आपण अध्यक्ष होतात. त्यातील आपली निरीक्षणे काय आहेत?

खरे सांगू? मुलुंड येथील पहिल्या युवक साहित्य संमेलनाचा माझा अनुभव कल्पनेहूनही उत्तम आहे. युवकपिढी उत्तमच आहे. त्यांना योग्य ते जीवनसत्त्व देण्यात, साहित्यविषयक आणि वाचनविषयक मार्गदर्शन करण्यात साहित्यिकांची पालक पिढी कमी पडली आहे. या पिढीला आई-बाबांच्या प्रेमाने, जिव्हाळयाच्या उबेने बोलणारे साहित्यिक मोजकेच आहेत. विवेक व्यासपीठ, साहित्य संस्कृती मंडळ आणि मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स या तिघांच्या संयुक्त विद्यमाने साजरे झालेल्या युवक साहित्य संमेलनात संयोजकांनी साहित्याच्या विविध पैलूंवर बातचीत केली. गीतातील, कविता, वाचनाची दिशा, चित्रपट दिग्दर्शनातील सखोलतेसाठी आणि अभिनय करताना व्यक्तिरेखेच्या अभ्यासासाठी वाचन, लेखन आणि चिंतन यांचा नेमका काय उपयोग होतो, याचा रसरशीत वेध घेतला होता. सुमारे साडेतीनशे-चारशे युवक सकाळी नऊ ते संध्याकाळी सातपर्यंत उत्साहाने सहभागी होते. विशेष म्हणजे परिसंवादापासून कविसंमेलनापर्यंत सर्व उपक्रमांचे सूत्रसंचालन युवकांनी केले. आता आम्ही एकमेकांच्या वाढदिवशी पुस्तकच भेट देणार, असा अनेक युवकांनी संकल्प सोडला. सामाजिक परिवर्तन एका रात्रीत होत नसते, परंतु परिवर्तनाचा आरंभ दृष्टीने हीच नव्या क्रांतीची चाहूल असते. त्या दृष्टीने ही छोटी संमेलनेच मोठी आहेत असे माझे मत आहे.

आता एक ह्या संवादातील शेवटचे कुतूहल. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विराजमान झालेल्या साहित्यिकाला अशा छोटया आणि नेटक्या संमेलनात नेमके काय घडवता येईल?

खरे तर, मोठया संमेलनाचा अध्यक्ष हा कोणत्याही अधिकृत अधिकाराचा धनी नसतो. परतुं त्याच्या वाणीत आणि लेखणीत त्याच्या तपश्चर्येचा एक अधिकार असतो. त्या अधिकाराने साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाने नव्या पिढीला शब्दाने जोडणे आवश्यक आहे. भाषेच्या प्राध्यापकांचे एक संमेलन घेऊन युवक पिढीसाठी सकारात्मक दिशा देऊ शकतात. विविध साहित्यिक स्पर्धांचे आयोजन करून ग्रंथ मोहोळ जागे करता येऊ शकते. योग्य ते परीक्षक मंडळ नेमून महाविद्यालयांतील वार्षिकांमधील निवडक साहित्यिकांचे पुस्तक निर्माण करता येऊ शकते. आजही खेडयापाडयात अनेक प्रतिभावंत बहिणाबाई दडल्या आहेत. त्यांच्या ओव्या, म्हणी, वाक्प्रचार वेचण्याचे काम त्यांची तरुण नातवंडे करू शकतात. आपल्याला जन्म देणारी माता आणि जीवन देणारी भाषामाता या दोघींवर राष्ट्रमातेच्याच भक्तीने प्रेम करण्याचे समुपदेशन, या पदावरील मंडळी करू शकतात. परंतु...! एवढे करायला वेळ कोणाकडे आहे? वेळ नाही, कारण आपल्या साहित्य चवळवळीचाही एक भोवरा झाला आहे. परस्परांवरील असूया, औट घटकेच्या मानपानाची हौस आणि गलिच्छ राजकारण यात मोठी संमेलने धावण्याच्या आभासात मातीत रुतून उभी आहेत. आता यापुढे समग्रतेवर आधारलेली आणि समरसतेने माणूस बांधू पाहणारी, छोटी परंतु प्रमाणिक संमेलने नव्या समाजरचनेचा आधार होतील याची मला खात्री आहे.

मुलाखतकार - सचिन बुरंगले

(साहित्य अभ्यास व अध्यापक, श्री ज्ञानेश्वर विद्यालय वडाळा)

शब्दांकन साहाय्यक - साईनाथ वांगडे