कल्याण कोणाचं होवो?

विवेक मराठी    10-Jan-2020
Total Views |

फक्त 'सगळयांचं कल्याण होवो' एवढं म्हणणं पुरेसं नाही फादर, ख्रिश्चन नसलेल्यांचं कल्याण होऊ शकतं वा नाही? यावर तुमचं मत काय, हे फार फार महत्त्वाचं ठरतं. सर्वशक्तिमान चर्चचे तुम्ही प्रतिनिधी आहात. तुमच्या मुखाने ही गोष्ट स्पष्ट व्हायला हवी... श्रीपाद कोठे यांचे संमेलनाध्यक्ष फादर दिब्रिटो यांना जाहीर पत्र.

 
sahitya sammelan_1 &


श्री. फादर फ्रान्सिस दिब्रिटो
,

सप्रेम नमस्कार...

फादर, या पत्राच्या पहिल्या शब्दालाच अडखळलो बघा. एक तर तुम्हाला पहिल्यांदाच पत्र लिहितो आहे. अन दुसरं म्हणजे, मायना काय लिहावा म्हणून बुचकळयात पडलो. असं वाटलं, 'प्रभुपुत्र फादर फ्रान्सिस दिब्रिटो' लिहावं. एकदम भारी वाटलं. पण लगेच मनात आलं, 'अरे, हे चुकीचं होईल. कारण प्रभुपुत्र तर जिझस आहेत. अन प्रभुपुत्र एकच असू शकतो ना?' हा पेच काही सुटला नाही. म्हणून मग फक्त श्री. असं लिहिलं. तुम्ही फादर असल्याने रागावणार नाहीच. हो ना?

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

फादर, तुम्हाला पहिलंच पत्र लिहितो आहे. तेही व्यक्तिगत परिचय नसताना. पण त्यात मला वावगं काही नाही वाटत. मराठीच्या शब्दप्रांतात स्वच्छंद भटकणारा मी एक लहानसा भटक्या आहे. अन त्याच मराठीच्या शब्दप्रांतात होऊ घातलेल्या एका सोहळयाचं सर्वोच्च पद, अध्यक्षपद तुम्ही भूषवणार आहात. त्यामुळे माझं मन तुमच्याजवळ मोकळं करण्याचा कणभर अधिकार तर मला मिळतोच ना!

तर... सर्वप्रथम तुमचं अभिनंदन. अगदी खूप खूप मन:पूर्वक अभिनंदन. तशी मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाला कारकिर्द वगैरे नसतेच, पण त्या कारकिर्दीसाठीही शुभेच्छा. तुम्ही ख्रिश्चन आहात, पांढरा झगा घालता, त्याच वेशात मंचावर असाल. त्यामुळे एक वेगळं चित्र या वेळी पाहायला मिळेल. ख्रिश्चन लोक फक्त इंग्लिश बोलतात किंवा ख्रिश्चन लोकांना फक्त इंग्लिश बोलावं लागत असेल असा एक समज मला काही लोकांनी बोलून दाखवला होता. ख्रिश्चन माणूस अन मराठीत लिहितो हे अजून मराठी मनात ठसलेलं नाही. ते चित्र बदलायला तुमच्या अध्यक्षपदाने मदत होईल बघा. अन भविष्यात एखादी भगवी कफनी घालणारी व्यक्ती समजा अध्यक्ष म्हणून लाभली, तर फारशी खळखळ पण होणार नाही. एखादी धर्मोपदेशक व्यक्ती मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी राहू शकते. मराठी साहित्याला धर्माचं वावडं नाही, हेही तुमच्या निवडीने सिध्द झाले आहे. हां, तुमचा क्रमांक पहिला लागला. पण त्यात काय ना? 'अतिथी देवो भव' ही तर आपल्या भारताची परंपरा आहेच. ख्रिश्चन उपासना पंथ या देशात पाहुणा म्हणूनच आलेला आहे. त्यामुळे त्याच्या उपदेशकाला पहिला मान मिळाला असं समजू या. संमेलनाची ग्रांथदिंडी, सरस्वतीपूजन, सरस्वती स्तवन, दीपप्रज्वलन हे सगळे उपचार तुम्ही मनापासून करालच. मला हा विश्वास आहे. हा विश्वास तुटला तर मात्र फादर मला वाईट वाटेल.

फादर, तुमचं साहित्य, त्याचा दर्जा, त्याची गुणवत्ता हे काही माझे विषय नाहीत. त्यावर भाष्य करण्याचा माझा अधिकारही नाही. तुमच्या साहित्याचं मूल्यांकन अधिकारी मंडळी करतीलच, यापूर्वीही त्यांनी केलेलं आहे. त्याचं उत्तर ऐकण्याची मात्र मला उत्सुकता आहे. तुमच्या अध्यक्षीय भाषणातून ही उत्सुकता पूर्ण होईल अशी आशा आहे. तुमच्या लिखाणातील ख्रिश्चन प्रतिमा, शब्दावली, भाव यातही मला आक्षेपार्ह काही नाही वाटत. तुम्ही स्वतः ख्रिश्चन आहात. वर धर्मोपदेशक आहात. तुम्ही स्वीकारलेली, जगजाहीर अशी ती भूमिका आहे. अन लेखक असला तरी तो माणूसच असतो ना! त्याच्या जीवनाचा, विचारांचा, बांधिलकीचा गंध त्याच्या लिखाणात राहणारच. तो समजून घेता येतोच. पण फादर, काही असे विषय आहेत, जे मला समजून घ्यायचे आहेत. तुम्ही ते टाळणार नाही असं मी समजू का?

 130 Crore India As Hindu

फादर, ख्रिश्चन चर्चला ख्रिश्चनांची संख्या वाढवायची आहे. ते चर्चचं जाहीर धोरण आहे. तुम्ही फादर असल्याने त्याच्याशी सहमत असालच. तुमच्या स्वीकृत कामाचाही तो भाग असणारच. तेव्हा तुमचं लिखाण तो हेतू मनात ठेवून नसेलच असं म्हणता येईल का? तुमच्या लेखनाचा तो हेतू नाही, हे तुम्ही नि:संदिग्धपणे सांगणार ना फादर? तुम्ही तसं सांगावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. तुमची ख्रिश्चन शब्दावली, प्रतिमा या मानवीय विचार, व्यवहार, भावना मांडण्यापुरत्या आहेत, ख्रिश्चन संख्या वाढवण्याचा त्यात अजिबात हेतू नाही, हे स्पष्ट व्हायला हवं फादर.


ख्रिश्चन लोकांची संख्या वाढवण्यामागील तर्क आणि तत्त्वज्ञान याबाबतही स्पष्टता व्हायला हवी आहे खरं तर. म्हणजे ख्रिश्चन नसलेले लोक यांच्याबद्दल चर्चला काय वाटतं
? ख्रिश्चन नसलेल्या लोकांना मुक्ती मिळू शकते की नाही? त्यांच्यावर प्रभूचा आशीर्वाद असतो की नाही? प्रभूने निर्माण केलेल्या या पृथ्वीवर त्यांचा काही अधिकार आहे की नाही? ख्रिश्चन नसलेल्या लोकांचं कल्याण करण्यासाठी त्यांना ख्रिश्चन करणं आवश्यक आहे का किंवा आवश्यक का आहे? चर्चची सेवा करुणेतून असते की संख्या वाढवण्याच्या हेतूने? फादर, तुम्ही या मुद्दयांवर बोलायला हवं. फक्त 'सगळयांचं कल्याण होवो' एवढं म्हणणं पुरेसं नाही फादर, ख्रिश्चन नसलेल्यांचं कल्याण होऊ शकतं वा नाही? यावर तुमचं मत काय, हे फार फार महत्त्वाचं ठरतं. सर्वशक्तिमान चर्चचे तुम्ही प्रतिनिधी आहात. तुमच्या मुखाने ही गोष्ट स्पष्ट व्हायला हवी. तुम्हाला ठाऊक असेलच म्हणा की, महात्मा गांधीजींनीदेखील हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यांना त्या वेळी नाही, किमान त्यांच्या 150व्या जयंती वर्षात तरी उत्तर मिळू देत. आणि तुम्हाला सांगू फादर, ही फक्त माझ्या वा गांधीजींच्या मनातील शंका नाही बरं. करोडो करोडो भारतीयांच्या मनातील ही शंका आहे. त्यांनाही 'सर्वेपि सुखीन: सन्तु' अशीच शिकवण मिळते, पण सोबतच 'एकं सत... विप्रा: बहुधा वदंती' हेही बाळघुटीतूनच पाजलं जातं. कोणाच्या कल्याणाची भावना बाळगणं, त्यासाठी प्रार्थना करणं, तसा प्रयत्न करणं यासाठी तो माणूस आपलं कोणी तरी असण्याची, आपल्या उपासना मार्गावर त्याने चालण्याची गरज नसते. सगळयांच्या कल्याणाची भावना हा आपल्या मनाचा विस्तार असतो, ही या मातीची शिकवण. इथल्या संविधानानेही या मातीचा हाच भाव उचलून धरलेला आहे. तुम्हाला ज्ञानोबा-तुकोबांच्या नावाचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी आणि त्यांच्या पूर्वसुरींनी अन नंतरच्या मांदियाळीनेही यात संदिग्धता ठेवली नाही. चर्चने मात्र यावर मौनच बाळगलं आहे. तुमच्या अध्यक्षपदाच्या निमित्ताने तुम्ही याबद्दल स्पष्टता करायला हवी फादर. तुमची भूमिका या देशाचं संविधान, या देशाची संत परंपरा, या देशाची चिंतन परंपरा यांच्यासारखीच आहे की नाही, हे कळल्यावर सामान्य माणसालाही बरं पडेल ना. त्याला ठरवता तरी येईल आपलं कल्याण कसं करायचं ते.

फादर, गोड शब्दांचं महत्त्व मला पटतं, पण विचारांची आणि भूमिकांची स्पष्टतादेखील असायला हवीच ना हो! तुमच्याकडून ती अपेक्षा आहे बघा.

आम्ही खूप सहिष्णू आहोत एवढं म्हणून उपयोग नाही ना फादर. सहिष्णू असायला दुसरं अस्तित्व मान्य असायला हवं. अस्तित्व फक्त आमचं राहील, तर सहिष्णू कोणाबद्दल अन कसं राहायचं? हे दुसरं अस्तित्व चर्चला मान्य आहे? ख्रिश्चन लोकांचा God सोडून बाकी सगळे God हे false God आहेत, हे ख्रिश्चन पंथाचं मत अजून कायम आहे का? अन तुम्ही त्याच्याशी सहमत आहात का? फादर, चर्चशी असहमत होण्याचा अधिकार ख्रिश्चन व्यक्तीला, त्यातही धर्मोपदेशकाला असतो का हो? नसेल तर घुसमट होत असेल ना? तुमची झाली आहे कधी अशी घुसमट? होत असेल तर काय करता अशा वेळी? फादर, हे सगळं खूप महत्त्वाचं आहे हो.

 

प्रिय फादर - जसे मतांतर, अन्य उपासना पंथ, अन्य देवदेवता मान्य करणं (मी मान्यता देणं म्हणत नाही बरं), हे विषय आहेत, तसेच आणखीनही काही विषय मला अस्वस्थ करतात. त्यावर तुमच्याशिवाय कोण फुंकर घालेल बरं? चर्च व्यवस्थेत होणारा अनाचार आणि अत्याचार हेदेखील पुष्कळदा कानी पडतात. कधी उघडपणे, तर कधी कुजबुजत. त्याबद्दलची सत्यता काय आहे? अन त्या सगळया प्रकरणांची सुनावणी कुठे अन कशी होते? न्याय कसा मिळतो? फादर, एक नाजूक प्रश्न आहे. या अनाचार, अत्याचार विषयाला धरूनच आहे. मानवी मनातील कामभावना याविषयी चर्चला काय वाटतं हो? हिंदूंनी तर त्याला मानवी पुरुषार्थ या रूपात मान्य केलं आहे. त्या भावनेला योग्य असं स्थान समाजव्यवस्थेत दिलेलं आहे. पवित्र बायबल मात्र त्या भावनेला अपवित्र म्हणतं, पाप म्हणतं. ऍडम आणि इव्ह यांनी हेच पाप केलं होतं ना? खूप महत्त्वाचा विषय आहे फादर हा. खरं तर स्त्रिया हासुध्दा मोठा विषय. स्त्रीला आत्मा असतो की नसतो हो फादर? ख्रिश्चन मतातील स्त्रीबद्दलच्या धारणेने सगळया जगभरच्या स्त्रीवादाला एक विशिष्ट वळण दिलेलं आहे. ते खूप चांगलं आहे असंही नाही. बरंच एकांगी आहे. आजच्या स्त्री-पुरुष समानतेच्या युगात तर टाकाऊच ठरेल ते. विश्वव्यापी आणि विश्वकल्याणाचा वसा घेतलेल्या पंथाने यावर स्पष्ट विचार मांडायला हवेत ना फादर. तुम्हाला काय वाटतं?

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/


फादर, तुम्ही वसईत पर्यावरण चळवळ चालवली आहे. ही अभिनंदनीय अशीच बाब आहे. पण आज जो पर्यावरणाचा विनाश होतो आहे आणि आजवर झालेला आहे, त्यालासुध्दा कुठेतरी ख्रिश्चन विचार परंपरेने हातभारच लावला आहे ना? ही पृथ्वी माणसाच्या उपभोगासाठी आहे हेच आहे ना चर्चचं मत? माणूस हा काही वेगळा नाही. तोही निसर्गाचाच एक घटक आहे. पशू, पक्षी, कीटक, झाडंझुडपं, लता-वेली, आकाश, पाणी... सगळं सगळं... हे सारे मानवाचे सहप्रवासी आहेत की, मानवासाठी ईश्वराने निर्माण केलेला कच्चा माल आहे. जिझसच्या मुलांनी यावर खणखणीत भूमिका घ्यायला हवी असं माझ्यासारख्या सामान्याला वाटतं.

आधुनिक विज्ञान, बदललेली जीवनपध्दती, माहितीचा स्फोट, इतिहास-भूगोल-कला-संस्कृती-व्यापार-विचार यांची सुरू असलेली सरमिसळ, बदलत्या मानवी इच्छा-आकांक्षा, विस्तारती क्षितिजं या सगळयातून ख्रिश्चन धारणा, ख्रिश्चन इथॉस यांना जे धक्के बसत आहेत, त्यांना चर्च कसं सामोरं जाणार? हादेखील विचारी लोकांना सतावणारा प्रश्न आहे फादर. पण चर्च तर एखाद्या व्यक्तीला संत पदवी देण्यासाठी अजूनही चमत्कार करण्याची अट घालतं. आजच्या मानवाला नाही हो पटत हे.

आपल्या मराठी माणसांना चर्च, ख्रिश्चन जीवन, ख्रिश्चन माणसं, ख्रिश्चन भाव समजावून सांगण्याचा प्रयत्न तुम्ही करता. त्याच प्रकारे ख्रिश्चन बांधवांना ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, रामायण, महाभारत, भागवत, भगवद्गीता हे समजावून सांगायला काय हरकत आहे? दोन्ही समूहांनी एकमेकांना समजून घेण्याने सौहार्द वाढायला मदतच होईल, नाही का? तुम्ही या दिशेने काही करावं ही माझी इच्छा आहे. यासोबतच फादर, इस्लाम आणि मुस्लीम समाज यांच्याबद्दलसुध्दा तुमची मतं जाणून घ्यायला आवडेल. इस्लाम ही आज जगातील मोठी शक्ती आहे. आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा सगळया अर्थाने. पण जग आज त्या शक्तीने भयग्रास्त झालेलं आहे. तुम्ही तर करुणा, प्रेम यांची महती गाणाऱ्या पंथाचे आहात. तुमच्या पंथाचीही ताकद फार मोठी आहे. इस्लाम या दुसऱ्या शक्तिमान पंथाविषयी तुम्हाला, चर्चला काय वाटतं, हे जाणून घ्यायला लोक उत्सुक आहेत, बरं का!

फादर, बायबलमधील 'गिरीप्रवचन' फार सुंदर आहे. मला आवडतं ते. त्यात म्हटलंय की, परमेश्वरकृपा आणि धनतृष्णा एकाच वेळी शक्य नाहीत. जमिनीवरील धनदौलतीची इच्छा करू नका. दुसऱ्यांच्या बाबतीत तुम्ही निर्णय करू नका, असंही त्यात सांगितलं आहे. तुम्ही कोणाचे पोषक, रक्षक नाही, असाही त्या प्रवचनाचा उपदेश आहे. आणखीनही बरंच काही आहे त्यात. मग चर्चचा व्यवहार का हो त्यापेक्षा वेगळा दिसतो? कशासाठी अब्जावधींची संपत्ती आणि मोठाल्या जमिनी हव्यात? आपल्या मीराबाई तर अकिंचन, अनिकेत फिरत राहिल्या जगाला शहाणं करत आणि प्रभूवर प्रेम करत. चर्चनेसुध्दा धनाकांक्षा सोडावी असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं?

फादर, या विश्वाचं कल्याण व्हावं, या पृथ्वीचं नंदनवन व्हावं, या भूतलावर सुख-शांती-सौहार्द नांदावं, कोणी कोणाचा द्वेष करू नये, हिंसा-अनाचार- दांभिकता-अत्याचार-अन्याय संपून जावेत हीच सगळयांची इच्छा असते. सगळयांच्या या सामूहिक भावनेचा सूर्य कोणाच्या कोंबडयाच्या आरवण्याने उगवेल हे महत्त्वाचं नाही. त्याचं श्रेय हिंदूंना मिळावं, मुस्लिमांना मिळावं, ख्रिश्चनांना मिळावं की ईश्वर न मानणाऱ्यांना मिळावं, हा वादच उथळ आणि अयोग्य वाटतो मला. यासाठीचा संघर्ष आणि त्यातील डावपेच हे तर आक्षेपार्हच. पण कोणते विचार, कोणते मार्ग, कोणते प्रयत्न, कोणत्या समजुती, कोणत्या धारणा या विश्वाचं कल्याण करू शकतात, मानवी ज्ञान आणि अनुभव यांच्या कसोटीवर उतरतात यांची खुली, स्पष्ट, साधकबाधक चर्चा तर व्हावी. फादर, चर्च आणि ख्रिस्तनीती यासाठी तयार आहे? चर्च आणि ख्रिस्तनीती हे साचलेलं डबकं आहे की वाहती नदी? मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून तुम्ही या व्यापक विषयांना हात घालाल आणि या मंथनातून मानवजातीला पुष्ट करणारं नवनीत प्राप्त होईल, त्या नवनीताचा लाभ मराठी जनांना होईल, अशी आशा करू ना फादर? तुम्ही अपेक्षाभंग करणार नाही अशी आशा बाळगतो.

स्नेहाकांक्षी

श्रीपाद कोठे

नागपूर
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/