स्नेहवन - दुष्काळग्रस्तांचे मायबाप

विवेक मराठी    11-Jan-2020
Total Views |

 

सामाजिक काम हे लष्कराच्या भाकऱ्या भाजण्यासारखंच. अशोक देशमानेने ऐन तारुण्यात आयटी क्षेत्रातली चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. 'स्नेहवन' नावाची संस्था उभारून या मुलांना आधार दिला, त्यांच्यासाठी शिक्षणाची वाट खुली केली. आज त्याचे आई-वडील, पत्नी त्याच्या या कामात त्याला खंबीरपणे साथ देत आहेत. मात्र ही वाटचाल सुरू करताना अशोकच्या आई-वडिलांच्या काय भावना होत्या? जाणून घेऊ या या लेखात.

snhavan_1  H x

  आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगात प्रत्येक जण सुखाच्या आणि यशाच्या मागे लागला आहे. नोकरी मिळणे, आयुष्यात स्थैर्य मिळणे यातच आयुष्याचे यश असल्याचे मानणाराही एक वर्ग आहे. या सगळया प्रस्थापित यशाच्या संकल्पनांना धक्का देत एका तरुणाने वेगळी वाट निवडली. ऐन उमेदीच्या काळात आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून त्याने खडतर मार्ग निवडला, तो म्हणजे समाजसेवेचा. आज हा तरुण अनेकांच्या कौतुकाचा विषय बनला आहे. त्याचे नाव आहे अशोक बाबाराव देशमाने. परभणी जिल्ह्यातील मानवतमधील मंगळूर हे त्याचे मूळ गाव. ऐन उमेदीच्या काळात आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून समाजसेवेचा खडतर मार्ग निवडून त्याने 'स्नेहवन'ची स्थापना केली. आत्महत्या केलेल्या, तसेच गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना आधार देण्यासाठी, त्यांचे शिक्षण सोपे व्हावे, यासाठी त्याने ही संस्था स्थापन केली. 

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

  एक चांगली नोकरी असतानाही अशोकचे मन स्वस्थ बसत नव्हते. महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ दुष्काळात होरपळून निघाला होता. अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांची कुटुंबे वाऱ्यावर पडली. या शेतकरी कुटुंबांसाठी काहीतरी केले पाहिजे, असे अशोकचे संवेदनशील मन सांगत होते. दुष्काळामुळे स्थलांतरित झालेल्या शेतकरी कुटुंबातील मुलांसाठी, तसेच आत्महत्या झालेल्या कुटुंबातील मुलांसाठी काम करायचे त्याने ठरवले. या मुलांनी केवळ शहरात स्थलांतर करून चालणार नाही, तर त्यांचे दारिद्रय संपवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या शिक्षणाची, निवासाची सोय करणे गरजेचे होते. पण नोकरी करत असताना हे काम करणे त्याला शक्य नव्हते. त्याला पूर्ण वेळ काम करायचे होते. त्यामुळे त्याने ऐन उमेदीत (वयाच्या 26-27व्या वर्षी) असताना नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. पण हा प्रवास फार संघर्षमय होता. घरच्यांना पटवणार कसे, हा मोठा प्रश्न होता. पण त्याची तळमळ आणि कामाचे महत्त्व पाहून अशोकच्या कुटुंबाने त्याला पाठिंबा दिला आणि अशोकच्या खऱ्याखुऱ्या संघर्षाला सुरुवात झाली.

  अशोकने घेतलेल्या भूमिकेविषयी अशोकचे वडील बाबाराव देशमाने सांगतात, ''इतर आई-वडिलांप्रमाणेच आमच्याही अशोककडून अपेक्षा होत्या. शिक्षणही झाले, नोकरीही चांगली गलेलठ्ठ पगाराची होती. लग्नाचे वय झाले होते, त्यामुळे आम्ही स्थळे पाहणेही सुरू केले. त्याच्याशी या संदर्भात बोललो, पण त्याच्या डोक्यात वेगळेच चालू होते. दिवाळी सणाला गावी आला, तेव्हा त्याने सांगितले की मी आपल्या भागातील आत्महत्याग्रास्त शेतकऱ्याच्या पोरांना शिकवणार आहे. त्यांच्यासाठी शाळा व काहीतरी समाज उपयोगी करण्याचा मानस आहे. आमच्या काही पचनी पडत नव्हते. आम्हाला न सांगताच त्याने काही मुलांच्या वडिलांना तयार करून पुण्यात भोसरीत त्याच्या कामाला सुरुवातही केली. त्या पोरांच्या आईवडिलांचा विश्वास संपादन केला. हळूहळू आम्हालाही वाटायला लागले की, काहीतरी चांगले करतोय, मग आपणही मदत करायला काय हरकत आहे? नातेवाइकांच्या व इतर लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून आम्हीही त्याच्यासोबतच इथे राहायला लागलो आणि त्याच्या कार्याला हातभार लावत आहोत.''


snhavan_1  H x

  

अशोकने डिसेंबर 2015मध्ये स्नेहवन संस्थेची स्थापना केली. दुष्काळग्रास्त भागातील खरी गरजू मुले शोधण्यासाठी तो वणवण फिरला. मराठवाडयातील आत्महत्याग्रास्त शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार, नंदीसमाज, आर्थिकदृष्टया गरीब शेतकरी यांच्या मुलांचा शोध त्याने घेतला. यातूनच स्नेहवन नावाची संकल्पना आकाराला आली. सुरुवातीला स्नेहवन संस्थेत 18 गरजू मुलांना आधार मिळाला. त्यात नऊ ते 14 या वयोगटातील मुले आहेत. या सर्व प्रवासात अशोकच्या कुटुंबानेही साथ दिली आणि कुटुंबानेही या कार्यात स्वत:ला झोकून दिले. अशोकची आई, पत्नी या मुलांबरोबरच राहतात. त्याचे आई आणि वडील आपल्या मुलाप्रमाणेच 'स्नेहवना'तील चिमुरडयांची काळजी घेतात. अशोकची पदवीधर असलेली पत्नी अर्चना स्वयंपाकाची जबाबदारी सांभाळते. अशोकला अर्चनाचे स्थळ आले, तेव्हा अशोकने अर्चनाला परिस्थिती समजावून सांगितली. अर्चनानेही होकार दिला. अशोकच्या तळमळीने आणि प्रामाणिक धडपडीने अर्चनाच्या कुटुंबाचे मन जिंकले होते.
 आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

 अशोकने निवडलेल्या वेगळया वाटेविषयी बोलताना अशोकच्या आई सत्यभामाबाई देशमाने सांगतात, ''पहिल्यांदा आम्ही हे सर्व ऐकून अचंबित झालो होतो. नोकरी सोडून देऊन याच्या डोक्यात नेमके काय खूळ घुसले, ही चिंता आम्हाला असायची. आपली शेती बऱ्यापैकी असूनही दुष्काळामुळे दयनीय परस्थितीमध्ये त्याचे शिक्षण झालेले. वेळप्रसंगी दुसऱ्याच्या बांधाला जाऊन आम्ही काम करून अशोकचे व त्याच्या बहिणीचे शिक्षण, संगोपन केले. आता कमावत होता, सुखाचे दिवस आले असे वाटत असताना अशोकचा हा निर्णय आम्हाला तेवढा पटला नव्हता. दर वर्षी आळंदीला आम्ही दिंडीला येत असू. त्याही वेळी आलो होतो. इथे येऊन सर्व परिस्थिती पाहिली. एवढी मुले हा सांभाळतोय. त्यांच्या जेवणाचे हाल व अशोकची होणारी कसरत पाहवली नाही आणि इथेच थांबण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा कठीण गेले, पण नंतर आम्ही मुलांमध्ये रमत गेलो. त्यालाही आपला हातभार लागतो या गोष्टीचे आज समाधान आहे.''

  

'स्नेहवन'मधील मुले राज्याच्या वेगवेगळया भागांतील जिल्ह्यांतून आली आहेत. ती उत्तम मार्गदर्शनाखाली शिक्षण घेत आहेत. 'स्नेहवन'मध्ये तीन हजार पुस्तकांचे वाचनालयही तयार करण्यात आले आहे. तेथे अभ्यासासह भरपूर खेळ आणि मूल्यशिक्षणावर भर दिला जातो. तसेच मुलांमध्ये आत्मविश्वास वाढावा व बाहेरच्या जगात त्यांना वावरता यावे म्हणून सूर्यनमस्कार, योग, कराटे आदींचे प्रशिक्षण दररोज देण्यात येते. त्याचप्रमाणे गाणी, चित्रकला, तबलावादन आदी कलांचेही शिक्षण दिले जाते.

  या मुलांचा महिन्याचा खर्च 60 हजारांच्या आसपास आहे. त्यामुळे अशोकला मदतीसाठी नेहमी धावाधाव करावी लागते. अशी बिकट परिस्थिती येणार हे माहीत असतानाही अशोकने मळलेली वाट सोडून आपल्यातील माणुसकीचा ओलावा आणि सकारात्मक दृष्टीकोन जागृत ठेवून आपल्या आयुष्याचेच जणू 'स्नेहवन' करून घेतले आहे. समाजातील अनेक संवेदनशील माणसांचे हात पुढे येत आहेत. गेल्या वर्षी भोसरीतील डॉ. रवींद्र कुलकर्णी आणि स्मिता कुलकर्णी या दांपत्याने कोयाळी गावात स्नेहवनला दोन एकर जमीन दान स्वरूपात दिली. या जागेत संस्थेची नवीन वास्तू उभी राहिली असून 'स्नेहवन' परिवार आता येथेच नांदत आहे. 


 ज्ञानेश्वर भंडारे

9527966225
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/