निसर्गसंपन्न हल्द्वानी

विवेक मराठी    14-Jan-2020
Total Views |

नैनितालच्या बरोब्बर पायथ्याशी लगबगलगबग करते. उत्तर भारतीय मैदानी प्रदेश या गावात संपतो आणि हिमालयाच्या उत्तुंग पर्वतरांगा इथून सुरू होतात. भारतीय प्रशासनदृष्टया आणि भौगोलिकदृष्टया उत्तराखंडचे कुमाऊं आणि गढवाल असे दोन भाग पडतात.

Haldwani Tour_1 &nbs

 आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
प्रवासी पत्रे - 2

प्रिय जयराज,

सगळीकडे घनदाट धुके पसरल्याने संक्रातीच्या दिवशी सूर्य पाहता न येणाऱ्या प्रदेशातून हे पत्र लिहीत आहे. उत्तराखंडमधील हल्द्वानी या गावाचे नावही तू कधी ऐकले नसशील. मीही ऐकले नव्हते. परंतु कामाच्या निमित्ताने मला हे गाव माहीत झाले. बस्तान बसले आहे. आजूबाजूचे आणि कामाच्या ठिकाणचे लोक चांगले आहेत. इतक्या दुरून एकटीच आली आहे, हे समजताच त्यांच्या डोळयांत कौतुक आणि आश्चर्य असते. मला गरज असो नसो, पण मदतीचा हात सदैव पुढे असतो. आल्या आल्या मला, आपण कुठल्यातरी निराळयाच देशात आलोत, असे खूप वाटे. घरची आठवण भयानक असे. परंतु आजूबाजूला संपन्न निसर्ग असल्याने इथेही घर तयार झाले आहे. या पहाडी लोकांचा साधेपणा आणि उपजत प्रामाणिकपणा यामुळे मी यांच्यात आता निर्धास्तपणे राहत आहे.

आपल्यासारख्या भरमसाठ मोठी शहरे पाहण्याची सवय असणाऱ्या डोळयांना, 'पहाडों का शहर हल्द्वानी' फार छोटेसे वाटू शकते. मलाही वाटते. पण हे छोटे निसर्गसंपन्न 'शहर'च मला अनेक दृष्टींनी छान वाटत आहे. मांजर पायाशी घुटमळावे तसे हे गाव शिवालिक पर्वतरांगांच्या तोंडाशी, नैनितालच्या बरोब्बर पायथ्याशी लगबगलगबग करते. उत्तर भारतीय मैदानी प्रदेश या गावात संपतो आणि हिमालयाच्या उत्तुंग पर्वतरांगा इथून सुरू होतात. भारतीय प्रशासनदृष्टया आणि भौगोलिकदृष्टया उत्तराखंडचे कुमाऊं आणि गढवाल असे दोन भाग पडतात.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

 

हल्द्वानी हे 'कुमाऊं का प्रवेशद्वार' आहे. इथून वरती पर्वतांमध्ये जात राहिलो की या भागात सगळे ताल (सरोवरे) लागतात. कमलताल - नावाप्रमाणेच सरोवर भरून फुले आणि कमलपत्रे. नौकुचिया ताल - याला नऊ कोपरे आहेत. भीमताल - नावाप्रमाणे अवाढव्य परंतु नितळ. गरुडताल - घनदाट अरण्यात उंच डोंगरांवरून खाली पाहिले की याचा आकार पंख पसरलेल्या गरुडासारखा दिसतो. नैनिताल - डोळयाच्या आकाराच्या या सरोवराकाठी नैनीदेवीचे मंदिर आहे. हे सगळयात लोकप्रिय पर्यटनस्थळ. तुला माहीतच आहे! या सगळया सरोवरांविषयी पुन्हा कधीतरी लिहीन. ही उंच हिमालयातली सगळी सरोवरे म्हणजे मला देवतांचे आरसे वाटतात.

उत्तराखंडचा दुसरा भाग म्हणजे गढवाल - गंगा, भागीरथी, अलकनंदा, मंदाकिनी, पुष्पावती अशा कित्तीतरी नद्यांच्या विलोभनीय संगमांचा हा प्रदेश. यांच्याविषयीच्या गोष्टी मी तुला पुढे लिहून पाठवीन. 2014च्या पुरात या सुंदर भासणाऱ्या नद्यांचे प्रलयंकारक रूप तू पाहिले असशीलच. नद्यांची प्रकृती नीट ठेवणे हे आपलेच काम आहे...

हां, तर हल्द्वानी.... या भागात पूर्वी हल्दूची घनदाट झाडी होती, म्हणून हल्द्वानी हे नाव पडले. मी अनेक ठिकाणी शोध घेतला, परंतु ते झाड काही बघायला मिळाले नाही. आपल्याकडे नाही का पिंपळगाव, वडगाव, आंबेगाव, जांभूळगाव अशा गावांत ती झाडेच नसतात, तसेच हल्द्वानीचे. झाडांच्या नावावरून गावांना ओळख देणारी आपली निसर्गसंपदा इतकी विनाश पावत आहे हे इथेही दिसते, तेव्हा विषाद वाटतो.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

 

इथल्या गोठवणाऱ्या थंडीत सगळे काही चिडीचूप असते. कुणी येत नाही, जात नाही, अगदीच आवश्यक तेवढे व्यवहार चालू असतात. सगळे घराघरात जाडजूड पांघरुणात रात्रंदिवस लपेटून असतात. शाळा-महाविद्यालयांना 'सर्दीयों कि छुट्टी' असते. रस्ते, बाजार, बसेस नाइलाजाने जेवढयास तेवढे धुगधुगतात. पण या प्रचंड शांततेत एक आवाज मात्र सदैव सोबत असतो - नहरमधून वाहणाऱ्या अखंड पाण्याचा! कधीकाळी बांधलेले दगडांचे आणि सिमेंटचे हे नहर गौला नदीचे पाणी हल्द्वानी गाव आणि परिसरात वाहून नेतात. माझ्या घरासमोरच एक मोठी नहर खळाळत जाते. त्यावर टाकलेल्या फळकुटयावरून आम्ही नहर ओलांडतो. मी मात्र कधीकधी त्या फळकुटयावर जरा थांबते, दीर्घ श्वास घेते, दूरवरून खळाळत येणारे, पायांखालून वाहत जाणारे ते जीवनवैभव डोळेभरून पाहते... आणि, आपल्याकडचे वर्षानुवर्षाचे कोरडेठाक दुष्काळ मनात येतात. या जलवाहिन्या म्हणजे जीवनवाहिन्या! किती विपुलता आहे इथे! हे लोक स्वत:च्या भूमीस 'देवभूमी' म्हणतात, अशा वेळी ते सार्थ वाटते. पण या नहरमध्ये कचरा टाकणारे काही अडाणी लोकही आहेत! त्यांना मी आपले मोडक्यातोडक्या हिंदीत 'असे करू नका, नाहीतर देवभूमी रुसायला वेळ लागणार नाही' असे सांगत असते.

Haldwani Tour_1 &nbs

ही आमची हल्द्वानी म्हणजे 'बडी हल्द्वानी'! इथून एका तासाच्या अंतरावर 'छोटी हल्द्वानी' आहे. इंग्रजांच्या काळातला नरभक्षक वाघांची शिकार करणारा, निसर्गप्रेमी, लेखक जिम कॉर्बेट याच्या नावे एक सुंदर वस्तुसंग्राहालय या छोटया हल्द्वानीत आहे. हिवाळयात, इंग्राज आमच्या मोठया हल्द्वानीत राहायला यायचे, तर उन्हाळयात छोटया हल्द्वानीत जाऊन राहायचे. फारच उन्हाळा सहन नाही झालाण् तर वर नैनितालच्या शीतल स्वर्गात पाहायचे. हा सगळा परिसरच सुंदर आहे, समृध्द आहे. जवळच जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान आहे. लुप्त होऊ पाहणाऱ्या वाघांना वाचवण्यासाठी 'प्रोजेक्ट टायगर'ची पहिली अंमलबजाणी या उद्यानात सुरू झाली. आज कितीतरी वाघ, वाघिणी आणि त्यांचे बछडे इथे निर्धास्तपणे वावरतात. तू आलास की आपण परत एकदा त्यांना पाहायला जाऊ.

तू येत्या उन्हाळयाच्या सुट्टीत माझ्याकडे ये. आपण शीतल हिमालयात घनघोर भटकंती करू. हे मी सगळे फार थोडक्यात लिहिले आहे, प्रत्यक्ष येशील तेव्हा तू संपूर्ण निसर्गग्रांथच वाचू शकशील.माझी बिलकुल काळजी करू नका, असे घरातही सांग. कादाचित मी माझ्या आयुष्यातला सर्वात उत्तम काळ इथे घालवीत असेन. पत्राची वाट पाहात आहे.

 
तुझी,

शिवकन्या.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/