स्वातंत्र्यवीर सावरकर, स्त्री स्वातंत्र्यविषयक समतोल , सन्मान्य भूमिका

विवेक मराठी    15-Jan-2020
Total Views |


 जयदेवराव डोळयांनी हा विषय काढला खरा, या निमित्ताने त्यांचे डोळे उघडतील की नाही हे खात्रीने सांगता येत नाही. सामान्य लोकांना, वाचकांना, अभ्यासकांना मात्र सावरकरांचे स्त्रीविषयक विचार काय होते, याबद्दल लिहिण्या-बोलण्याची एक नवी दृष्टी मिळेल, अशी अशा करू या.

sawarkar_1  H x


ज्या माझिनीवर सावरकरांची अपार निष्ठा होती, त्याचे वाक्य ठिकठिकाणी उद्धृत करून सावरकरांनी लिहून ठेवले आहे की पुढील शतकात स्त्रीजाती आपले राजकीय हक्क स्थापित केल्यावाचून राहणार नाही. सावरकरांच्या कल्पनेतील शिक्षित आणि स्वतःच्या पायावर उभी राहिलेली स्त्री निर्माण होण्यास फार वर्षे लागलीही नाहीत. अवघ्या एका शतकाच्या आत त्यांचे शब्द खरे ठरले आहेत. आज घराघरात आणि घराबाहेरही, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्री मोठया अभिमानाने उभी आहे, संकटे झेलते आहे, त्यावर मातही करते आहे. तिच्या प्रत्येक भरारीबरोबर एक नवे आव्हान तिच्यासमोर उभे राहते आहे. बलात्कार, जाळपोळ, मारहाण, हिंसाचार ह्या दृश्य घटना झाल्या, पण अशा कित्येक अदृश्य घटना अजून समोर आलेल्यासुध्दा नाहीत. या मुक्या समस्या समोर येतील तेव्हा काय होईल? कोणते नवे प्रश्न उभे राहतील? यापैकी अगदी सगळयाच नाही, पण यातल्या काही प्रश्नांची उत्तरे या सावरकरी विचारातून मिळोत, अशी अशा करायला काय हरकत आहे!

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

नाटकाच्या संचातील काही कलाकार असे असतात, ज्यांना पिटातील प्रेक्षकांनी वाजवलेल्या सवंगतेच्या टाळयाच फार प्रिय असतात. खऱ्या रसिकाची अस्सल दाद याच्याशी त्यांना काहीच देणे-घेणे नसते. जयदेवराव डोळे त्या पठडीतले कलाकार असावेत बहुधा. त्यांनाही अशा सवंग लोकप्रियतेचे डोहाळे लागावेत, हे पाहून फार वाईट वाटते. बघा ना, ऐतिहासिक संदर्भावर बोलणे सोडून चक्क त्यांनी एका काल्पनिक कथेचा आधार देऊन आपले (अ)ज्ञान प्रकट केले आहे.

 

जाता जाता त्यांनी शिवाजी महाराजांच्या चरित्रातील एका काल्पनिक प्रसंगाचा संदर्भ दिला आहे. मुळात एखाद्या अभ्यासकाने काल्पनिक कथेचा संदर्भ देऊन असली विधाने करणे टाळावे. कल्याणच्या लुटीत कल्याणच्या सुभेदाराची सून हातात सापडली आणि महाराजांनी तिची ओटी भरून तिला परत पाठवले, अशी एक आख्यायिका आहे. यावर सावरकरांचे मत असे की महाराजांनी त्या परस्त्रीला सोडून द्यायला नको होते, तर एखाद्या सरदाराला किंवा त्यांच्या एखाद्या हुजऱ्याला द्यायला हवी होती. शत्रूंची वीण वाढवण्यापेक्षा तिने महाराजांच्या एखाद्या तरी एकनिष्ठ प्रजाजनाला जन्म दिला असता! हा संदर्भ देऊन डोळयांनी असा निष्कर्ष काढला आहे की सावरकर ही घटना मान्य करतात आणि स्त्रियांना अशीच वागणूक द्यावी असे म्हणतात. पण प्रत्यक्षात आपण पुस्तक वाचले तर तो प्रसंग आपल्या नीट ध्यानात येईल. सावरकरांच्या या उत्तरावर श्री.पु.गोखले यांनी सावरकरांना पुन्हा प्रतिप्रश्न विचारला की, ''महाराजांनी हे एक उदात्त कृत्य केले असे तुम्हास खरेच वाटत नाही का?'' यावर सावरकरांनी दिलेले उत्तर फार महत्त्वाचे आहे. सावरकर म्हणतात, ''अरे! ते उदात्त कृत्य होतेच. महाराजांच्या एकूण वागणुकीप्रमाणे आणि धोरणाप्रमाणेच होते. पण मुळात या कल्याणच्या सुनेची घटना घडली आहे का? ऐतिहासिक कागदपत्रात तर अशी सर्वांना उदात्त वाटणारी घटना कधी घडली होती याचा पुरावाच नाही. मग ही कल्पना आली कोठून? तिचा एवढा प्रचार झाला तरी कसा असेल, याचा तुम्ही कधी विचार केला आहेस का?'' सावरकर इतकेच बोलून थांबले नाहीत, तर त्यांनी श्री.पु.ना समजावून सांगितले की जर या घटनेला ऐतिहासिक पुरावा नाही, तर या घटनेचा उगम हा भोळेपणातून झालेला आहे. महाराज उदार वागणुकीचे आणि उदात्त विचारांचे असले पाहिजेत हे मानून आपण महाराजांना ऐतिहासिक पुरुष मानण्यापेक्षा सहिष्णू आणि अवतारी पुरुष मानू लागतो. त्याचा अतिरेक होऊन मग आजच्या काळातही आपण तसेच वागू-बोलू लागतो. कथा, कादंबरी आणि कीर्तनकार रंजनासाठी असे प्रसंग आणतात आणि मग आपण ऐतिहासिक घटनेकडे चुकीच्या दृष्टीने पाहू लागतो. अशा वृत्तीमुळे आपले कसे आणि किती नुकसान झाले, हे सावरकर पटवून देतात. अशाने आपण रामाच्या एकपत्नी व्रताचा उदो उदो करत बसलो आणि त्याने केलेला रावणवध विसरलो, श्रीकृष्णाचा गीतोपदेश लक्षात ठेवला, त्यावर अहिंसक मल्लिनाथी करू लागलो; पण समोर काका-मामा असोत किंवा कुणीही तू युध्द कर हा संदेश कायमचा विसरलो. त्यामुळे मानवता, सहिष्णुता आणि उदात्त विचार यांच्या आधाराने राजकारणाचे खेळ खेळणे हे सर्वथा चुकीचे असते. आज ते लोकांना सांगणे गरजेचे आहे यासाठी मी असे प्रसंग शोधत असतो, असे सावरकर सांगतात. सरतेशेवटी ''महाराजांच्या आयुष्यात जे घडलेच नाही नि ज्याचा भोंगळ कल्पनेतून जन्म झाला ती कल्पना चूक होय. ती खरी असती तरी मी हेच मत दिले असते, कारण माझी विचारसरणी आणि टीकेचा उद्देश मी तुला सांगितलेच आहे'' असेही सावरकर म्हणतात.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

श्री.पु.गोखल्यांनी हा प्रसंग असाच्या असा वर्णन केला आहे. हा संपूर्ण प्रसंग वाचला, तर यावरून सावरकर स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा काही विपरीत विचार करत होते असे अजिबात अढळत नाही. उलट अशा कथांमधून आजच्या लोकांपुढे चुकीचा संदेश प्रस्थापित होऊ नये याची काळजी सावरकर करतात. ज्यांना आणखी सविस्तर संदर्भ हवा असेल, तर त्यांनी 'सावरकरांशी सुखसंवाद' हे श्री. पु.गोखले यांचे हे पुस्तक वाचावे. मात्र डोळयांनी आपले डोळे उघडे ठेवून हा प्रसंग पूर्णपणे तो वाचला नसेल. आजकाल असेच होते - तात्कालिक वाहवा मिळवण्यासाठी, चर्चेत राहण्यासाठी सावरकरांची वाक्ये हवी तशी मोडून ताणून वापरली जातात आणि नवे वाद उकरले जातात. जयदेवरावांनी याच पुस्तकातील सावरकरांच्या या वाक्यानंतर असलेल्या इतर दहा-बारा ओळीही वाचण्याचे श्रम घेतले नाहीत, आणि समोर दिसले त्यावरून हवे ते दिले ठोकून!

 

सावरकर हे राष्ट्र प्रथम या न्यायावे वागणारे होते. राष्ट्राच्या घडणीत कुणीही येत असेल, तरी त्याकडे दुर्लक्ष करून देशाच्या उध्दाराचा विचार त्यांनी समाजाला करायला शिकवला. त्यामुळे शत्रूची संख्या वाढेल असे कृत्य राष्ट्राला बाधक असेल तर ते करू नये हे सांगितले, तर त्यात चूक काय आहे? आणि पुन्हा ज्या त्या काळातले नियम वेगळे असेही सावरकर लिहितात, त्यामुळे शिवाजी महाराजांच्या काळात सांगितलेला उपाय आजच्या काळात तसाच लागू होईल असे सावरकर म्हणतात असा निष्कर्ष काढणे हास्यास्पद ठरेल. असे निष्कर्ष काढतात त्यांची इतिहासाकडे पाहण्याचे ही कोणती काल्पनिक दृष्टी? छे! छे! डोळयांची ही दृष्टी बघून आमच्यातरी डोळयास पाणी आले!!!

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

सावरकरांची स्त्री प्रश्नाबद्दल भूमिका कशी होती, याबद्दल आणखी अनेक घटना, लेख यांचा उल्लेख करता येईल, पण विस्तारभयास्तव त्या सगळयाच घटनांचा किंवा लेखनाचा परामर्श घेणे शक्य नसल्याने त्याचे काही संदर्भ जाता जाता देतो. सावरकर लंडनला असताना भारतात बातम्या पाठवायचे, हे काहींना ठाऊक असेल. 'लंडनची बातमीपत्रे' या पुस्तकात त्या सगळया बातम्या एकत्रित केल्या आहेत. यात 'इंग्लंडातील स्त्रिया आणि हिंदुस्थानातील पुरुष' या शीर्षकाची दि. 4 जानेवारी 1907 रोजी प्रसिध्द झालेली बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. सावरकर हे केवळ स्त्रियांच्या कौटुंबिक आणि सामाजिक स्वातंत्र्याचे नव्हे, तर स्त्रियांच्या राजकीय स्वातंत्र्याचेही कसे आग्राही पुरस्कर्ते होते, याची साक्ष आपल्याला पटते. अभ्यासूंनी ही बातमी अवश्य वाचावी. आक्षेपांच्या संदर्भात बोलायचे झाल्यास ज्यांना 1857चे स्वातंत्र्यसरात कोरडेपणा जाणवतो, स्त्रियांच्या बाबतीत कोरडेपणाने लिहिले आहे असे ज्यांचे म्हणणे आहे, त्यांनी '1857चे स्वातंत्र्यसमर' या ग्रांथातील झाशीच्या राणीवर लिहिलेले प्रकरण वाचावे, सावरकरांचा 'मोपल्यांचे बंड' हा ग्रांथ वाचवा, सावरकरांनी स्त्री प्रश्नाविषयी लिहिलेल्या कविता वाचाव्यात, त्यांनी लिहिलेले 'संगीत उत्तरक्रिया' या नाटकाचा किमान पहिला प्रवेश वाचण्याचे कष्ट घ्यावेत. सावरकर घराण्यातल्या स्त्रियांनी देशाच्या स्वातंत्र्यात कसा भाग घेतला, नाशिकच्या पहिल्या महिला क्रांतिकारक संघटनेच्या प्रमुख सूत्रधार सावरकरांच्या वाहिनी येसूवहिनी होत्या, हेही सखोल अभ्यास करून जाणून घ्यावे. 'तेजस्वी तारे' या त्यांच्या पुस्तकातील काही प्रकरणे भारतीय स्त्री किती प्राणपणाने राष्ट्रासाठी लढली, हेच दाखवण्यासाठी सावरकरांनी लिहिली आहेत. सावरकरांच्या क्रांतिकार्यात त्यांना सर्वथैव मदत करणाऱ्या मादाम कामा यांच्याबद्दल सावरकरांनी काढलेले गौरवोद्गार अत्यंत वाचनीय आहेत. 'प्राचीन, अर्वाचीन महिला' हा त्यांचा ग्रांथ वाचवा. असे कितीक दाखले द्यावेत? दाखले द्यायला आम्ही सुरुवात केली, तर असे तीन-चार लेख पुरणार नाहीत.

जयदेवराव डोळयांनी हा विषय काढला खरा, या निमित्ताने त्यांचे डोळे उघडतील की नाही हे खात्रीने सांगता येत नाही. सामान्य लोकांना, वाचकांना, अभ्यासकांना मात्र सावरकरांचे स्त्रीविषयक विचार काय होते, याबद्दल लिहिण्या-बोलण्याची एक नवी दृष्टी मिळेल, अशी अशा करू या.

सावरकर लहान असतानाच त्यांची आई वारली. आईनंतर त्यांच्या वाहिनीने आईच्याच मायेने त्यांचे पालन केले. सावरकर कुटुंब एकत्र होऊन वाढले, लढलेसुध्दा. सावरकर परदेशात असताना इकडे भारतात त्यांच्या दोन्ही बंधूंना अटक झाली, घरावर जप्ती आली आणि सावरकर कुटुंबातील दोन स्त्रिया उघडयावर पडल्या... अशा अवस्थेत आपल्या वाहिनीला लिहिलेल्या पत्रात सावरकर म्हणतात,

तू धैर्याची अससी मूर्ती माझे वाहिनी, माझे स्फूर्ती

रामसेवाव्रतांची पूर्ती ब्रीद तुझे आधीच

 

सांत्वन काव्यात आपल्या वहिनींचा केलेला आदरपूर्वक उल्लेख आणि इतके घडूनही संकटे येऊनही आपली वाहिनी खंबीरपणे सगळयावर मात करेल हा दाखवलेला विश्वास, सावरकरांचा एक निराळा अस्पर्शित पैलू आपल्यासमोर आणतो. पुरुष संकटात असले की स्त्रीने पुढे होऊन पुरुषालाही बळ द्यावे आणि स्वत: सुध्दा जबाबदारीने संकटाशी सामना करावा, असेच सावरकर सुचवतात, होय ना!

समाप्त

पार्थ बावस्कर

9146014989, 8275204500

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/