एका शांतिदूताचा अस्त

विवेक मराठी    16-Jan-2020
Total Views |

**शिवकन्या शशी***

Sultan Qaboos of Oman die

 

ओमानचे सुलतान काबूस बिन सईद यांचे 10 जानेवारी 2020ला देहावसान झाले. त्यांनी शांतता आणि प्रगतीचे राजकारण दीर्घकाळ टिकते हे आजच्या अस्थिर जगाला दाखवून दिले. शिया-सुन्नी या कट्टरपंथात सामील न होता पूर्वापार चालत आलेल्या इबादी या मध्यममार्गी इस्लामचा अंगीकार केला. अनेक शांतता करारांचा शिल्पकार झालेला हा राजा म्हणजे सतत युध्दग्रास्त म्हणून ओळखल्या जाण्याऱ्या अरब राष्ट्रांतील शांतिदूतच! 

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
 

 

 

सदैव देशी-परदेशी लोकांनी गजबजलेले मत्राह मार्केट गप्पगार उभे आहे.. हजारो किलोमीटर्सचे कोरीव रस्ते आज भरल्या कंठाने सुलतान मशिदीकडे कसेबसे जात आहेत.. आकाशाला भेदणारे उंच राखाडी पर्वत आज नम्र होऊन जरासे झुकलेत.. वाहिबाचे वाळवंट आतून गहिवरले आहे.. दूर दक्षिणेतील बखुरची झाडे जड अंत:करणाने आपला सुगंध पोटातच घेऊन उभी आहेत.. घरोघरी भरल्या डोळयांनी प्रार्थना चालल्या आहेत.. मशिदीतून बांग देणारे स्वर आज कधी नव्हे ते रुध्द झाले आहेत.. लष्करी पोशाखातले भक्कम तट एका क्षणी डोळयांतून ढासळतात, लगेच सावरून पुन्हा छाती काढून उभे राहतात, ताठपणे उभे असणारे सुरक्षारक्षक शेवटी ढसाढसा रडू लागतात... आमच्यासारखे बाहेर देशातून इथे आलेले हज्जारो लोक घरातले माणूस गेल्यासारखे दिवसभर अस्वस्थपणे येरझाऱ्या मारतात, चूल थंड राहते... आपल्याला या राजाने काय काय दिले, याची ओल्या डोळयांनी आठवण काढत राहतात!
  
ओमानचे सुलतान काबूस बिन सईद यांचे 10 जानेवारी 2020ला देहावसान झाले आणि घरातला कर्ता 'बाबा काबूस' गेल्यासारखे वाटले. हे लोक प्रेमाने राजाला 'बाबा' म्हणायचे. ते ऐकून आधी मला अतिशयोक्त वाटायचे, पण इतकी वर्षे इथे राहिल्यावर, अनुभव घेतल्यावर एक बाप आपल्या घरासाठी जे जे करतो, तेच एक कर्तव्यदक्ष राजा आपल्या प्रजेसाठी करत राहतो, तेही प्रसिध्दीपासून दूर राहून शांत, प्रसन्न चित्ताने, हे प्रत्ययास येत गेले.
  
मुंबईच्या ओमान वकिलातीच्या ऑफिसमध्ये पहिल्यांदा मी लष्करी गणवेशातील करडया चेहऱ्याच्या सुलतानाचा फोटो टांगलेला पाहिला, तेव्हा सदा लोकशाही पाहिलेल्या माझ्या मनाला ते विचित्र वाटले होते. हे मुस्लीम देशातील सुलतान म्हणजे असे लष्करी हुकूमशाही प्रवृत्तीचेच असायचे, आपण बरोबर देशात तर चाललोय ना, असे क्षणभर मनात येऊन गेले. पण जेव्हा मस्कतमधल्या तेव्हाच्या आटोपशीर विमानतळावर पाऊल टाकले, तेव्हा अंत:करणापासून हसणारा एक आश्वासक चेहरा आमच्यासारख्यांचे स्वागत करताना फोटोत दिसला. तो दिवस आणि ते हसू कायमचे मावळले तो दिवस यामध्ये त्याची प्रजा म्हणून आम्ही उपभोगलेले सौख्य आहे, शांतता आहे आणि म्हणूनच तो गेल्यावर डोळे भरून पाणीच आहे! 

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

  

साधारण पन्नास वर्षांपूर्वी खुद्द मस्कतमध्येच केवळ दहा-पंधरा किलोमीटर एवढाच पक्का रस्ता होता, बाकी सगळीकडे कसेबसे कच्चे रस्ते. शिक्षणाचा गंध नाही, तेल सापडून त्याची निर्यात व्हायची ती अगदी सुरुवातीची वर्षे होती. सुलतान काबूस यांचे प्रतिगामी विचारांचे वडील साईद बिन तैमुर मनमानी कारभार हाकत. त्याला कंटाळून बहुसंख्य ओमानी देश सोडून टांझानिया, झांझिबार (हे आधी ओमानच्या आधिपत्याखाली होते), सुदान, केनिया अशा आफ्रिकन देशांत पोटापाण्यासाठी निघून गेले. उरलेली प्रजा मासेमारी आणि पारंपरिक शेती करीत कसेबसे आयुष्य कंठीत होती. मस्कत म्हणजे सर्वार्थाने एक मध्ययुगीन राज्य वाटावे अशी परिस्थिती होती. तशातही काबूस राजपुत्र म्हणून त्यांना सुदैवाने आधुनिक शिक्षणासाठी आपल्या भारतात आणि नंतर इंग्लंडमध्ये पाठवण्यात आले. या दोन देशांतल्या जडणघडणीचे त्यांच्या मनावर, बुध्दीवर आधुनिक संस्कार झाले आणि आपला देश आपण खातेऱ्यातून बाहेर काढावा, असे या तरुण, प्रागतिक विचारांच्या राजपुत्राला वाटू लागले. देशात परतताच आपल्या बुध्दिचातुर्याने आणि अमेरिका, ब्रिटन आणि इराणच्या मित्रसत्ताधाऱ्यांच्या मदतीने त्याने वडिलांना राजवाडयातच नजरकैदेत टाकले आणि सत्ता हस्तगत केली. लगोलग अंतर्गत बंडाळया मोडून संयुक्त अरब अमिरातीच्या दक्षिणेपासून ते खाली येमेनच्या उत्तरेपर्यंतचा सगळा भूभाग एक करून त्याचे 'सल्तनत ऑफ ओमान' असे नामकरण करून त्यात भौगोलिक, प्रशासकीय आणि राजकीय एकसंधता आणण्याचे मोठे काम केले. परागंदा झालेल्या देशवासीयांना परत येण्याचे आवाहन केले, त्यांना प्रगतीचे स्वप्न दाखवले, सुरक्षेची हमी दिली. कारण, देश म्हणजे प्रजा याची जाणीव त्यांना होती. त्यानंतर त्यांनी राष्ट्रबांधणीचे जे काम हाती घेतले आणि अथक परिश्रमाने तडीस नेले, त्याची देखणी छबी म्हणजे आजच्या ओमानचे आधुनिक रूप.

 
Sultan Qaboos of Oman die

शेजारी अत्यंत सनातनी विचारांचा, मक्का-मदिना ही मुस्लिमांची दोन पवित्र स्थळे आपल्या देशात आहेत, म्हणजे आपण करू ते सगळे पाकइस्लाम असा विचित्र धार्मिक गंड असलेला आणि तेलाचे अवाढव्य साठे असल्याने पेट्रोडॉलरच्या बळावर बाकीच्यांना तुच्छ लेखण्याचा अहंगंड असणारा सौदीसारखा देश. मात्र त्या देशाच्या कोणत्याही दबावाला बळी न पडता आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणे, टिकवणे हे नैतिक धैर्याचे काम या राजाने शेवटपर्यंत करून दाखवले. याचे अगदी ठळक उदाहरण म्हणजे मुलींच्या आधुनिक शिक्षणाला दिलेले महत्त्व, उपलब्ध करून दिलेल्या सुविधा, परदेशातील शिष्यवृत्ती, रोजगाराच्या समान संधी, सगळीकडे वावरण्याचे, गाडी चालवण्याचे स्वातंत्र्य, सभासंमेलनांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने सहभागी होऊन व्यासपीठावरून आपले विचार मांडणे, शुरा कौन्सिलमध्ये (संसदेतमध्ये) निवडणुकीला उभे राहणे, निवडून येणे, लोकांचे प्रश्न राजदरबारी मांडणे, ते अग्राक्रमाने सोडवणे यांचे स्वातंत्र्य. हे सगळे 'महिला सबलीकरण' हे शब्द न उच्चारताही, आपल्या देशातील स्त्री ही देशबांधणीत तितकीच महत्त्वाची आहे, तिला नागरिकाप्रमाणे सगळे हक्क आणि अधिकार असावेत आणि ते प्रदान करणे हे राज्यकर्ता म्हणून आपले नैतिक कर्तव्य आहे, हे उमजून केले आहे. म्हणून ओमानी मुस्लीम स्त्री बाहेरच्या जगात मोठया आत्मविश्वासाने वावरताना दिसते, तेव्हा एकीकडे फार समाधानी वाटते. पण त्याच वेळी पुन्हा सनातन विचारसरणीकडे झुकणाऱ्या तुर्कस्थान, इराण इत्यादी देशांतील स्त्री-स्वातंत्र्याचा होणारा संकोच पाहून मन अस्वस्थही होते. जिथे राज्यकर्ते उदार विचारांचे असतात, तिथे स्त्री स्वावलंबी होण्याची शक्यता शतपटींनी वाढते आणि जिथे उदार दृष्टीकोनाचा अभाव असतो, तिथे पहिली गदा स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर येते. इथे, राजेसाहेबांनी निर्माण केलेल्या व्यवस्थेने हे कधीही होऊ दिले नाही.

 आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

मुस्लीम हा राष्ट्रीय धर्म असला, तरी बहुसंख्येने राहणाऱ्या हिंदूंची जुनी-नवी दोन मंदिरे जतन केली आहेत, चर्चेस आहेत, आपापले सणवार करण्याचे स्वातंत्र्य आहे. दारू, पोर्क मुस्लिमांना निषिध्द आहे, म्हणून ते बाद न ठरवता इतर धर्मियांसाठी त्याची कायदेशीर दुकाने आहेत. स्वत: राजाने शिया-सुन्नी या कट्टरपंथात सामील न होता पूर्वापार चालत आलेल्या इबादी या मध्यममार्गी इस्लामचा अंगीकार केला. कुठल्याही प्रकारच्या कट्टरतेला चार हात दूर ठेवून सर्वसमावेशकतेचे धोरण ठेवले आणि तेच ओमानचे बलस्थान ठरले.

 

 

लष्कर सुसज्ज ठेवले, पण कधी कुणाच्या बाजूने वा विरुध्द शस्त्र उचलेले नाही. सदा दादागिरी करणारी अमेरिका असो, अजूनही साम्राज्यवादाचा टेंभा मिरवणारा ब्रिटन असो, शेजारचा अतिश्रीमंतीने वाह्यात झालेला सौदी असो, चकचकीत दुबईच्या जिवावर ग्लोबल म्हणून शायनिंग मारणारे शेख असोत, हिंसेने त्रस्त झालेला सीरिया असो, अरब अस्मितेत भरडलेला पालेस्तीन असो की अण्वस्त्रांची निर्मिती करून अमेरिकेशी उघडउघड वैर पत्करणारा इराण असो, ओमानच्या या राजकीय शहाणपण असलेल्या राजापाशी सगळयांचे स्वागत असे. तसेच, ओमानचे भौगोलिक स्थान व्यापार आणि सामरिक दृष्टीने मोक्याचे आहे, त्यामुळे ओमानच्या परकीय धोरणांना विशेष महत्त्व आहे. प्रश्न कितीही अटीतटीचा असो, तो चर्चेने सोडवता येतो, तहसमेट करता येतात, पण युध्द नको, हानी नको, हिंसा नको हा आणि हाच विचार पुढे घेऊन जाणारा, पटवून देणारा, अनेक शांतता करारांचा शिल्पकार झालेला हा राजा म्हणजे सतत युध्दग्रास्त म्हणून ओळखल्या जाण्याऱ्या अरब राष्ट्रांतील शांतिदूतच! 2014मध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात समेट घडवून आणण्यात राजेसाहेबांनी मोठी भूमिका बजावली होती आणि तोच इराण-अमेरिका संघर्ष पुन्हा उफाळून येत असतानाच त्यांचे कालवश होणे मनात भय निर्माण करते. नवीन सुलतान हैदम बिन तारिक अल सईद यांनी ''आपल्या सुलतानांचा शांततेचा वारसा पुढे चालवू'' असे आपल्या राष्ट्राला उद्देशून केलेल्या पहिल्याच भाषणात म्हटले आहे. परंतु ही त्यांची सुरुवात आहे. जगाचे राजकारण झपाटयाने बदलत आहे, गणिते बदलत आहेत, या सगळया पार्श्वभूमीवर नव्या अननुभवी राजासमोर अनेक आव्हाने आहेत. समस्या जितकी जटिल, अंगावर येणारी, तितके अनुभवातून आलेले शहाणपण जास्त उपयोगाला येते आणि अशा वेळी बापाचीच आठवण जास्त येते!

 

 

सुलतानासाहेबांची कारकिर्द आणखी एका बाजूने फार धवल आहे. ती म्हणजे, त्यांनी कधीही कुठल्याही अतिरेकी संघटनेला कसलाही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पाठिंबा दिला नाही. मुस्लीम राष्ट्र म्हणजे दहशतवादाला खतपाणी घालणारे राष्ट्र ही प्रतिमा सरसकट बाहेरच्या जगात तयार होते. परंतु ओमान हा एकमेव मुस्लीम देश याला अपवाद आहे. सुलतानाने अशा बाबतीत सीमांवर कडेकोट बंदोबस्त तर ठेवलाच, तसेच आपली तरुण पिढी यात ओढली जाणार नाही, यावरही कटाक्ष ठेवला. त्यासाठी शिक्षण, रोजगार, इतर धर्मीय लोकांशी, बाहेरच्या प्रगत जगताशी संपर्क अशा अनेक दीर्घकालीन उपाययोजना केल्या. दहशतवादाविरुध्दचे कायदे आणि अंमलबजावणी आणखी कठोर केली. ओसामा बिन लादेनचा खात्मा केल्यानंतर त्याच्या ज्या डायऱ्या सापडल्या, त्यात त्याने नोंद केली होती की संघटनेच्या बांधणीसाठी त्याला ओमानसारखे मोक्याचे ठिकाण हवे होते. परंतु अनेक प्रयत्न करूनही त्याला ना या भूमीवर पाय ठेवता आला, ना कुठला ओमानी नागरिक गळास लागला! जिथे ओसामाच्या आक्रमक जिहादला बहुतेक अरब आणि अरबेतर मुस्लीम देशांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला, तिथे ओमान हे असे एकमेव मुस्लीम राष्ट्र आहे, ज्याने त्याला आसपासही फिरकू दिले नाही. याचे श्रेय जसे राजाच्या सजगतेला जाते, तसेच ते इस्लाममधील इबादीपंथाच्या सहिष्णुतेच्या शिकवणीलाही जाते.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/


 

राजा असो वा रंक असो, येतो तो जातो. पण जाताना तो जगाला काय देऊन गेला, हे जग त्याची आठवण कशी काढते, यावर ठरते. या राजाने ज्या पध्दतीने आपल्या प्रजेचे पालन केले, आमच्यासारख्या बाहेरच्यांना आपलेसे केले, शांतता आणि प्रगतीचे राजकारण दीर्घकाळ टिकते हे आजच्या अस्थिर जगाला दाखवून दिले. त्यामुळे त्यांना आधुनिक जगातला 'जाणता राजा' म्हटले तर गैर होणार नाही. अशा पुण्यात्म्याला चिरशांती लाभो हीच प्रार्थना.