देशाच्या मजबुतीसाठी समान नागरी कायदा हवाच - सय्यदभाई

विवेक मराठी    16-Jan-2020
Total Views |

चतुरंग प्रतिष्ठानचे दोन दिवसीय रंगसंमेलन नुकतेच नाशिक येथे पार पडले. या सोहळयात मुस्लीम सत्यशोधक समाजाचे सय्यदभाई यांना प्रतिष्टानतर्फे जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. तिहेरी तलाकच्या विरोधात लढा देण्यात सय्यदभाई अग्रेसर होते. रंगसंमेलन सोहळयातील त्यांच्या मनोगताचा संपादित अंश येथे देत आहोत.


sayyad bhai speech_1 

माझा सत्कार झाला. सन्मान झाला. चार वर्षांपूर्वी माझा एक अपघात झाला. खुब्यातील काहीतरी मोडले. त्यामुळे हातात काठी आली. माझे कोणतेच काम थांबलेले नाही. माझी पत्नी येथे बसलेली आहे. ती मला लहान मुलाप्रमाणेच समजते. मी मनानेही थकलेलो नाही आणि शरीरानेही थकलेलो नाही. समान नागरिकत्वासाठी मी देशभर फिरत आहे. महिलांना आपल्या घराच्या चार भिंतीच्या आत माणूस म्हणून न्याय मिळाला पाहिजे, त्यांना मोलकरीण म्हणून वागवू नये, अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आम्ही करीत आहोत.

मी पंतप्रधानांना भेटलो आणि त्यांना समान नागरी कायद्याबाबत निवेदन दिले. हे काम टप्प्याटप्प्यांनी करू, असे त्यांनी आश्वासन दिले आहे. त्यांचे आमच्यावर फार उपकार आहेत. समाजात रोज नवीन नवीन प्रश्न उभे राहतात. समान नागरी कायदा भले शंभर वर्षांनी येऊ देत. या देशाची एकात्मता महत्त्वाची आहे. सर्व धर्मांतील माणसांनी त्यांच्या त्यांच्या धर्मात काम केले पाहिजे. मी जसे माझ्या मुलाला समजावून सांगतो, तसे प्रत्येक समाजातील पुढाऱ्यांनी वाटेल ते झाले तरीही मातृभूमीबाबत कोणतीही तडजोड करणार नाही हे आपल्या समाजबांधवांना समजावून सांगितले पाहिजे. ही गोष्ट त्यांना जीव तोडून सांगितली पाहिजे आणि हे तत्त्व अमलात आणले पाहिजे. तरच तुम्हाला जगात मान मिळू शकेल. आम्ही ही गोष्ट करीत आहोतच, पण ती प्रत्येकाने केली पाहिजे. कारण ही आई माझ्या एकटयाची आई नाही, ती एकशेतीस कोटी लोकांची आई आहे.

मला तर मातृभूमीबद्दल आदर बाळगण्याचा धडा माझ्या आईने लहानपणीच दिला आहे. लहानपणी मला पाय आपटत चालण्याची सवय होती. तेव्हा एके दिवशी मला आईने जवळ घेऊन मला तसे न करण्याविषयी समजावून सांगितले. मी तिला कारण विचारले तेव्हा आई म्हणाली, ''बेटा, यह हमारी माँ है। हमारी मातृभूमी है! पाँव पटककर चलोगे तो उसको तकलीफ होगी।'' हे मला माझ्या आईने शिकविले आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलाला हे शिकवायला हवे. बाकीच्या विषयांत कोणतीही तडजोड होऊ शकते, पण मातृभूमीच्या बाबतीत कोणतीही तडजोड होता कामा नये.

जेव्हा ब्रिटिशांनी गुन्हेगारीविषयक कायदा केला, तेव्हा तो त्यांनी सर्वांसाठी समानच केला. काही कडक कायदे सौम्य केले. ते लोकांनी पटकन मान्य केले. त्याप्रमाणेच एक समान नागरी कायदा करावा. मुस्लीम समाजात व अन्य समाजांत पुरुषांना जे काही अतिरिक्त अधिकार दिले आहेत, ते रद्द करून समतेवर आधारित एक समान नागरी कायदा या देशात करण्याची गरज आहे. तो जेवढा लवकर होईल, तेवढया लवकर या देशाचे भले होईल. याचसाठी माझी चळवळ चालू आहे. मी लोकांशी बोलणे करतो आहे. सरकारकडून ही गोष्ट होणे आम्हाला अपेक्षित आहे. ज्या तलाकपीडित महिला आहेत, त्यांच्याशी तुम्ही बोलून बघा. तेव्हा तुम्हाला कळेल.

माझ्याआधी माझ्याबद्दल खूप काही बोलले गेले. ते काही खरे नाही. मी एक सामान्य माणूस आहे. माझ्या बहिणीचा तलाक जेव्हा ती अठरा वर्षांची होती तेव्हा झाला. त्या वेळी तिला दोन मुले होती. त्या वेळी मी वीस वर्षांचा होतो. तिचा तलाक झाल्यानंतर मी अनेकांना विचारले की, ''हा काय प्रकार आहे?'' त्याने माझ्या बहिणीला तलाक देऊन टाकला आणि मग तो दुसरे लग्न करून मोकळा झाला. 'यह अल्लाताला की मर्जी है' असे मला तेव्हा सांगण्यात आले. म्हणजे हीच परमेश्वराची इच्छा आहे. मग ही इच्छा पुरुषांसाठी कशाला आहे? महिलांनी काय करावे? तेव्हा मला सांगण्यात आले, ''आता तू लहान आहेस. तुला हे कळणार नाही.''

''अरे, जिचा तलाक झाला ती तर माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान आहे! तिला दोन मुले आहेत. तिने काय करावे?''

'यह तो नासूर हो गया मेरे सीने में!' माझ्या काळजाला या गोष्टीमुळे खोल जखम झाली. माझी अठरा वर्षांची बहीण घरात बसली होती. मी तिला विचारले, ''तू दुसरे लग्न करणार का?'' तेव्हा ती म्हणाली, ''अजिबात नाही. मी दुसरे लग्न केल्यावर मला आणखी दोन मुले होतील आणि मी तुझ्या घरात पुन्हा येऊन बसेन. मला ही लग्नाची भानगड सांगू नकोस.'' मग मी तिला शिवणकाम शिकविले. जी प्रत्यक्षात घडली आहे, ती गोष्ट मी तुम्हाला सांगतो आहे.


मी तिला शिवणकाम शिकविले आणि शिलाई मशीन घेऊन दिले. ती शिवणकाम करून चार पैसे कमवू लागली आणि आमच्या घरखर्चात आपला खारीचा वाटा उचलू लागली. माझ्या घरात ती मानाने राहायला लागली.


मला तेव्हा वाटले की ज्यांचा तलाक झाला आहे
, अशा कितीतरी महिला या समाजात असतील. हा तोंडी तलाक बंद झाला पाहिजे, असे मी ठरविले. हेच माझ्या जीवनाचे एकमेव ध्येय बनले. मी नमाज पढायला जात असे. तेथे मुल्लामौलवींना आणि मुतवल्लींना मी विचारत असे, ''माझ्या बहिणीचा तलाक झालेला आहे. आपल्या समाजात पुरुषांना इतके अनिर्बंध अधिकार का देण्यात आले आहेत?'' लग्नाच्या वेळेस 'कबूल आहे का?' असे मुलीला तीनदा विचारण्यात येते. आमचा मुस्लीम कायदाच असे सांगतो. हे लग्न तुला मान्य आहे का? असे तीनदा नवऱ्या मुलीला विचारण्यात येते आणि मग नवऱ्या मुलाला विचारण्यात येते. मात्र तलाक देताना त्या बायकोला एकदाही विचारण्याची आवश्यकता नाही. आमचा कायदाच असे सांगतो. सर्व पुरुषांना विनाकारण लाडावून ठेवले आहे. लहानसहान कारणाने बायकोला ते तलाक देतात. माहेरहून लवकर आली नाही - दिला तलाक! पण पुरुषाने कसेही वागावे. ते सर्व चालवून घेतले जाते. अशा प्रकारचा अन्याय थांबायला हवा. कारण विषाची परीक्षा कधी घेऊ नये. पीडितांची परीक्षा तर अजिबात घेऊ नये. नवीन सरकार सत्तेवर आले आहे. त्याने ही गोष्ट मनावर घ्यावी. समतेवर आधारित असा महिलांना न्याय देणारा कायदा बनविण्यात आला पाहिजे. हुंडा संपला पाहिजे. पैशांची देवाणघेवाण संपली पाहिजे. तेव्हाच महिलांची प्रगती होऊ शकेल. याच्यातून काहीतरी चांगलेच बाहेर येईल.

 
cca_1  H x W: 0

समान नागरी कायदा झाला की पुष्कळच प्रश्न सुटणार आहेत. यामुळेच माणसामाणसांतील दुरावा कमी होऊ शकणार आहे. आता तलाकचा प्रश्न सुटला आहे, त्याप्रमाणे समान नागरी कायद्याचाही प्रश्न लवकर सोडवावा. त्यामुळे आपला देश मजबूत होईल.

या ठिकाणी माझा गौरव करून मला पुरस्कार देण्यात आला आहे. हा तीन लाख रुपयांचा पुरस्कार आहे. मी आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतो की, समान नागरी कायद्याबाबत लोकांची मानसिकता अनुकूल करण्यासाठी मला आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन देशभर जो प्रवास करावा लागणार आहे, त्यासाठी यातील प्रत्येक पै आणि पैचा वापर होणार आहे. यातील एक पैसाही मी आपल्यावर खर्च करणार नाही. पूर्वी जनता सहकारी बँकेने मला एक लाख रुपयांचा पुरस्कार दिला होता. ते पैसेसुध्दा मी संघटनेच्या कार्यासाठीच खर्च केले. माझ्या कार्यासाठीच हे पुरस्कार दिले जातात.


तात्या मराठे यांचे माझ्यावर खूप उपकार आहेत. मी तेरा वर्षांचा होतो
, तेव्हा त्यांनी मला त्यांच्या कारखान्यात झाडू मारण्याची नोकरी दिली होती. आपले घर चालविताना संघटनेच्या पैशाला अजिबात हात लावला जात नाही. आता जो पुरस्कार मिळाला आहे, त्याचा सर्व पैसा संघटनेसाठीच खर्च होणार आहे. तलाकपीडित महिलांबाबत मला म्हणायचे आहे की, शासनाने त्यांचेही मत विचारायला हवे. त्याऐवजी पुरुषांना विचारून काय उपयोग?


लग्न करताना मुस्लीम युवतीला तीन-तीनदा विचारले जाते
, पण तलाक देताना एकदाही विचारायचे नाही, हे योग्य नाही. हा धर्माचा कायदा कसा म्हणता येणार? धर्मानेही पुरुषालाच झुकते माप दिले आहे आणि महिलांची मुळीच पर्वा केलेली नाही. म्हणून मला अशा महिलांसाठी काम करायचे आहे.


मी आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. माझा अगरबत्तीचा कच्चा माल तयार करण्याचा कारखाना आहे. अगरबत्ती बनविण्यास शिकविणारा सय्यदभाई म्हणून मी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिध्द आहे. तुम्ही मला विचाराल की पुण्याचे ठीक आहे
, पण महाराष्ट्रभराचे तुम्ही काय सांगता? तर मी तुम्हाला सांगतो की, मी त्यांना फोनवरून माहिती देत असतो. सामग्रीचे मिश्रण कसे करायचे, पाणी किती प्रमाणात घालायचे इत्यादी माहिती जाणून घेण्यासाठी कुणालाही मला भेटायला पुण्याला येण्याची गरज नाही. ते मी त्यांना फोनवरून सांगू शकतो. शेकडो लोकांना मी अगरबत्ती बनविण्यास शिकविले आहे. औद्योगिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्रीय मनुष्य खूप मागे आहे, हे मी पाहिले आहे. तो स्वतःहोऊन धंद्याच्या भानगडीत पडणार नाही. तो नोकरीच करणार. पण मी अगरबत्ती बनविण्याचा उद्योग अनेकांना शिकवितो आणि त्याचे काही पैसेही घेत नाही. कारण समाजाचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. शेकडो आयाबहिणींना मी अगरबत्ती बनविण्याचे प्रशिक्षण दिलेले आहे. माझ्या कारखान्याचे दरवाजे त्यांच्यासाठी कायम उघडे असतात. माझ्याकडे ज्या तरुण मुली आणि महिला येतात, त्यांचे मी गट तयार केले आहेत. अगरबत्ती हा तर 'सेक्युलर आयटम' आहे. कारण सर्व जातिधर्माचे लोक अगरबत्ती वापरतात. कोणी जन्मले त्या वेळीही घरात अगरबत्ती लावतात, वाढदिवसाला अगरबत्ती लावतात, लग्नात अगरबत्ती लावतात आणि कोणी गेले तरी अगरबत्ती लावतात. हा तर 'सेक्युलर आयटम' आहे, येथे तुम्हाला धर्म आडवा येणार नाही.

 

मला शेवटी एकच सांगायचे आहे - मी गेली पन्नास वर्षे सामाजिक कार्य करीत आहे. माझे लग्न होऊन सत्तावन्न वर्षे झाली आहेत, पण या सत्तावन्न वर्षांत केवळ दोनच चित्रपट मी थिएटरमध्ये जाऊन पाहिले आहेत आणि ते दोन्हीही सामाजिक चित्रपट होते. आम्ही कोठेही फिरायला गेलेलो नाही की ताजमहाल पाहायलाही गेलेलो नाही. दिल्लीसुध्दा फिरून पाहिलेली नाही. हो, कामासाठी दिल्लीला अवश्य गेलो आहोत. पण हिंडण्याफिरण्याची चैन करण्यासाठी कधीच गेलो नाही. या माउलीचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. ती माझ्या पाठीशी सदैव उभी आहे. माझ्या मनात तिच्याबद्दल समाधानाची आणि अभिमानाची भावना आहे.