माळशिरसचा संघर्षशील 'राम'

विवेक मराठी    17-Jan-2020
Total Views |

**विठ्ठल सातपुते*** जिजाबाई सातपुते***


ram satpute_1  

मराठवाडयाच्या कुशीत आणि बीड जिल्ह्याच्या मुशीत वसलेलं आमचं आष्टी तालुक्यातील डोईठाण गाव. खरं तर या गावामध्ये फार तर मुलं शिकून कसंबसं दहावी/बारावी शिक्षण पूर्ण करून काहीतरी व्यवसाय करून किंवा छोटी-मोठी नोकरी करून आपला उदरनिर्वाह भागवत असत. या सर्व वातावरणामध्ये आमच्या अतिशय गरीब कुटुंबात रामचा जन्म झाला. रामचे वडील गावच्या बस स्टँडवर चपला शिवायचं काम करत असत आणि उर्वरित वेळामध्ये शेतीमध्ये काम करत. या अगोदर कित्येक वर्षं आम्ही दोघांनी (म्हणजेच रामच्या आई-वडिलांनी) माळशिरस तालुक्यातील यशवंतनगर कारखान्यावर ऊस तोडण्याचं काम केलं. त्याचबरोबर तालुक्यामध्ये सालगडी म्हणून काम केलं व या सर्व कठीण परिस्थितीमध्ये रामला सतत परिस्थितीशी संघर्ष करावा लागला. आम्हाला नेहमी वाटायचं की रामने आयुष्यात खूप मोठं व्हावं
, कुठेतरी मोठी नोकरी करावी, काहीतरी सतत चांगलं कार्य करावं. राम लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघचा स्वयंसेवक झाला. त्यामुळे त्याच्यामध्ये देशभक्ती खूप रुजली गेली. लहानपणापासून त्याला कोणावरही अन्याय झालेला सहन होत नसे. त्यामध्ये सर्वसामान्य व्यक्तीला, शेतकरी बांधवाला, समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला न्याय मिळावा म्हणून आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो या अनुषंगाने तो सतत प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहिला.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

 

मुळात रामने राजकारणाची व समाजकारणाची जी काही वाट निवडली होती, ती आमच्या परिचयाची नव्हती. प्रथमतः राजकारणातील आम्हाला एवढं काही कळत नव्हतं. परंतु ज्या वेळी राम गावी आल्यानंतर सांगायचा की ''आई, बाबा, मी या आजारी व्यक्तीला मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून एक लाख रुपयांची मदत केली'' किंवा ''त्या व्यक्तीला मी मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून एेंशी हजाराची मदत केली'', त्या वेळी आम्हाला वाटायचं की आपला मुलगा काहीतरी चांगलं काम करतोय. आपल्या मुलाने जी काही वाट निवडली आहे ती अगदी योग्य आहे.

 
ram satpute_1  
 

खरं तर रामने ज्या वेळी करियर निवडताना सामाजिक क्षेत्रात कार्य करायचा निर्णय घेतला, वंचित घटकाला न्याय देण्यासाठी काम करायचा निर्णय घेतला, त्या वेळी समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम करावं असं तो सतत म्हणायचा. बालपणापासूनच धाडसी वृत्ती व नावीन्याचा ध्यास रामच्या अंगी होता. सतत त्याचा संपर्क राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आला व त्याचे जीवन बदलून गेले. संघाच्या मुशीत राष्ट्रप्रेमाचे व व्यक्तिगत चारित्र्याचे संस्कार झाले. दैनंदिन संघाच्या शाखेत काम करत असताना शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर राम अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता असताना अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत स्वतः काम करून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

खरं तर लहानपणापासून एक आई-वडील या नात्याने आम्ही त्याला वेळोवेळी मार्गदर्शन करत आलो, परंतु खरं तर संघर्षमय वाटचाल करत असताना या प्रवासात जिवाला जीव देणारे अनेक मित्र राम जोडत गेला. जात-पात-धर्म-आर्थिक दरी अशा सगळया तोडणाऱ्या गोष्टींना पुरून उरणारी ऊर्जा मिळाली ती इथेच.. आणि खऱ्या अर्थाने ही ऊर्जा मिळताना अनेक बऱ्यावाईट अनुभवांची शिदोरी सोबत घेऊन बदलाच्या वाटेवर राम चालत राहिला. अनेक आव्हानांना आणि अडथळयांना तोंड देत त्याने त्याचा प्रवास निरंतर चालू ठेवला. जनतेचे प्रश्न घेऊन निःस्वार्थीपणे झगडत राहिला!

 
ram satpute_1  

ज्या वेळेस राम दहावी उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षणासाठी पुण्याला गेला, त्या वेळी त्याने विद्यार्थी परिषदेचे काम सुरू केलं. काम सुरू करत असताना त्याला विद्यार्थी परिषदेमध्ये विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या. त्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा तो महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री झाला. त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश मंत्री झाला आणि त्यानंतर त्याला भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचा प्रदेश उपाध्यक्ष करण्यात आलं व या सर्व जबाबदाऱ्या रामने अगदी योग्यतेने पार पाडल्या. या प्रवासात आमचा नेहमीच त्याला पाठिंबा होता व आमचे आशीर्वाद त्याच्याबरोबर सदैव होते व आहेत.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
 

आज आमचा 32 वर्षेचा राम माळशिरस तालुक्याचा आमदार झाला. खरोखर आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. ज्या माळशिरस तालुक्यामध्ये आम्ही सालगडी म्हणून काम केलं, माळशिरस तालुक्यातील कारखान्यावर ऊस तोडला, आज आमचा मुलगा त्याच तालुक्याचा आमदार झाला ही आमच्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. राम, तू आयुष्यात असाच मोठा हो, तुझी प्रगती करत राहा. समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला न्याय कसा मिळेल, त्याला मुख्य प्रवाहामध्ये कसं आणता येईल यासाठी तू आयुष्यामध्ये सतत प्रयत्न कर. तुझ्याबरोबर आमचे आशीर्वाद सदैव आहेत.

शब्दांकन - लक्ष्मण तरटे
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/