पळा पळा... कोण पुढे पळे तो

विवेक मराठी    17-Jan-2020
Total Views |

अतिशय सवंगपणे चर्चा घडवून आणणं, त्या आपल्याला पाहिजे त्याच दिशेने चालवणं, आपल्याला हवे तेच निष्कर्ष प्रेक्षकांच्या माथी मारणं म्हणजे पत्रकारिता, अशी पत्रकारितेची एक नवी व्याख्या वृत्तवाहिन्यांच्या कर्तृत्वामुळे तयार होते आहे. लोकजागर आणि लोकप्रबोधन या मूळ हेतूला हरताळ फासणाऱ्या पत्रकारितेच्या या नव्या रूपामुळे सर्वसामान्यांच्या मनात या क्षेत्राविषयी अविश्वास, घृणा निर्माण होते आहे. विविध विचारधारांमधून आलेल्या, पत्रकारिता धर्माशी एकनिष्ठ राहून काम केलेल्या अनेक पत्रकारांच्या कामगिरीमुळे या क्षेत्राला जे वलय होतं, ते आजच्या या सनसनाटीत रमलेल्या, उठवळ आणि उथळ पत्रकारांमुळे लयाला जातं आहे. 

 
editorial_1  H
 

काही राजकीय पक्षांचे वाचाळवीर
, बहुतेक वृत्तपत्रांमध्ये आणि इलेक्ट्रॉनिक वृत्तवाहिन्यांमध्ये लागलेली वाचाळपणाची अहमहमिका हताशपणे पाहणं, हे सध्या महाराष्ट्राच्या जनतेच्या नशिबी लिहिलं आहे. बेलगाम वक्तव्यं करण्याची आणि या वक्तव्यांच्या आधारावर येनकेनप्रकारेण चर्चेत राहण्याची जणू त्यांच्यात स्पर्धा चालू आहे. ही चर्चा नकारात्मक दिशेने चालू ठेवून त्यायोगे समाजात अस्वस्थता निर्माण करणं हे यांचं सामूहिक काम झालं आहे. हे कमी म्हणून की काय, समाजमाध्यमांना हाताशी धरून ही विद्वेषाची आग अधिक वेगाने पसरवली जात आहे.

निष्णात कसरतपटूलाही लाजवेल इतक्या कसरती करत, सर्व प्रकारचे विधिनिषेध खुंटीला टांगत आणि पक्षाभिमान वगैरे क्षुल्लक बाबींचं श्राध्द घालत स्वत:ला राज्याभिषेक तर करून घेतला. पण त्यापुढे काय? प्रत्यक्ष राज्यकारभार कसा करायचा याची माहिती नसल्याने आणि त्यासाठी दोन रिमोट वापरण्याची नामुश्की अटळ असल्याने, मूळ मुद्दयाला बगल देत चर्चेत राहावं लागतं याची जाणीव असलेला सूत्रधार रोज वेगळया विषयावर आपल्या बेलगाम वक्तव्याचे नवनवे आविष्कार घडवत आपल्याच शीर्षस्थ नेतृत्वाला तोंडघशी पाडतो आहे. एका दैनिकाचं दीर्घकाळ संपादकपद सांभाळलेली ही व्यक्ती, अशा व्यक्तीकडून जे वर्तन सर्वसाधारणपणे अपेक्षित आहे त्याच्या विपरीत वागून या पदाला असलेली गरिमाही घालवते आहे. 

बहुतांश इलेक्ट्रॉनिक वृत्तवाहिन्यांनी तर सर्व प्रकारचे विधिनिषेध गुंडाळून ठेवले आहेत. समाजात अस्वस्थता माजवू शकतील, दुही निर्माण करू शकतील, कलहाचं वातावरण निर्माण करू शकतील असे विषय हेच फक्त बातमीच्या योग्यतेचे विषय असल्याप्रमाणे त्याचाच अहोरात्र मारा चालू असतो. आणि त्यांच्या दुर्दैवाने एखाद्या बातमीत सनसनीखेज काही नसलं, तरी तिला त्या पध्दतीने सादर करण्यात ही माध्यमं वाकबगार झाली आहेत. पार्श्वसंगीतापासून सादरीकरणापर्यंत सगळंच बटबटीत, अंगावर येईल असं, मेंदूला विचार करण्याची मुभा न देता तो बधीर होईल अशी बातम्यांची/चर्चांची गिरणी अव्याहत चालू ठेवणं म्हणजे पत्रकारितेचा धर्म निभावणं अशा समजुतीने हे सगळं चालू आहे. अशांच्या वाढलेल्या प्रमाणामुळेच आताआतापर्यंत लोकशाहीच्या या आधारस्तंभ समजल्या जाणाऱ्या पत्रकारितेवर सर्वसामान्यांचा विश्वास गमावण्याची वेळ आली आहे. 

स्वत:च्या हृदयावर बेतलेल्या दुखण्याचीही पर्वा न करता राजसत्ता हस्तगत करण्यासाठी झटणारा हा सैनिक, पाहतापाहता अंगाभोवती घट्ट लपेटलेली स्वाभिमानाची शाल गुंडाळून ठेवत मुजरेकरी झालेला जनतेने पाहिला. केवळ राज्यासाठीच नव्हे, तर देशाचा अभिमान असणाऱ्या महापुरुषाचं नाव लावून इतके दिवस आपली पोळी भाजून घेतली. आता त्या महापुरुषाच्या नावाबरोबरच त्याच्या विचारांनाही सहजपणे सोडचिठ्ठी देताना लोकांनी पाहिलं. देवाच्या काठीला आवाज नसतो, तसा सर्वसामान्यांच्या सामूहिक मनाचा थांगही भल्याभल्यांना लागत नाही. राजकारणातल्या माणसांना जोखायचे जनतेचे मापदंड असतात, त्यानुसार कळत-नकळत एका सामूहिक निर्णयाप्रत ती येत असते आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी योग्य वेळी करत असते. या सगळयाचा विसर पडल्यासारखी राज्यातल्या सत्ताधाऱ्यांची उक्ती आणि कृती चालू आहे. 

जनतेने दिलेला कौल धुडकावून लावत, सत्ता काबीज केल्यानंतर राज्य कारभार नीट करून जनतेचं मानस आपल्या दिशेला वळवून घेण्याचं शहाणपण दाखवणं तर दूरच, उलट जनतेला ज्या विषयांशी काही देणंघेणं नाही, अशा विषयांच्या आधारे चर्चेत राहणं हे फक्त आत्मघातकीच ठरू शकतं. केंद्र सरकारच्या जनहितकारक अशा विविध निर्णयांविरोधात पांढरं निशाण सातत्याने फडकवायला आणि येताजाता त्यांचा उपमर्द करायला मर्दमुकी लागत नाही. ती लागते ज्या राजाचं नाव घेऊन राजकीय पक्षाने वाटचाल सुरू केली, त्याचं जाणतेपण व्यवहारात उतरवायला. अर्थात, अभद्र आघाडी करताना जो पक्ष त्या आघाडीच्या नावात आपल्या नावाचा आग्रहही न धरण्याएवढा लाचार होतो, त्याच्याकडून ही अपेक्षा करणंही व्यर्थच आहे.

 

भाजपाचा आणि त्यातही मोदी-शहा जोडीचा दुस्वास हा एककलमी अजेंडा आणि त्यांच्या विरोधात मन मानेल तशा बातम्या पेरणं, अतिशय सवंगपणे चर्चा घडवून आणणं, त्या आपल्याला पाहिजे त्याच दिशेने चालवणं, आपल्याला हवे तेच निष्कर्ष प्रेक्षकांच्या माथी मारणं म्हणजे पत्रकारिता, अशी पत्रकारितेची एक नवी व्याख्या वृत्तवाहिन्यांच्या कर्तृत्वामुळे तयार होते आहे. लोकजागर आणि लोकप्रबोधन या मूळ हेतूला हरताळ फासणाऱ्या पत्रकारितेच्या या नव्या रूपामुळे सर्वसामान्यांच्या मनात या क्षेत्राविषयी अविश्वास, घृणा निर्माण होते आहे. विविध विचारधारांमधून आलेल्या, पत्रकारिता धर्माशी एकनिष्ठ राहून काम केलेल्या अनेक पत्रकारांच्या कामगिरीमुळे या क्षेत्राला जे वलय होतं, ते आजच्या या सनसनाटीत रमलेल्या, उठवळ आणि उथळ पत्रकारांमुळे लयाला जातं आहे. टीआरपी नामक कुठली तरी आभासी आणि जीवघेणी स्पर्धा एकमेकांच्यात लावून समाजस्वास्थ्याला चूड लावण्याचं काम ही मंडळी करत आहेत.

 

काल-परवा उदयाला आलेल्या सोशल मीडियाबद्दल तर काही न बोललेलंच बरं. आपल्यामुळे राज्यक्रांती होते, राजसत्ता उलथू शकते या भ्रमातून हा मीडिया बाहेर पडेल तो सुदिन! या माध्यमातून होते ती क्रांती नसते, तर तो क्रांतीचा आभास असतो आणि म्हणून तो अळवावरच्या पाण्याइतका अल्पजीवी असतो, हे काळाच्या ओघात सिध्द हंोऊनही त्याकडे दुर्लक्ष करत, समाजात फूट पाडण्याच्या कामात हे माध्यम महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे.

 

एखादी गाडी जेव्हा तीव्रउताराला लागते, तेव्हा आतल्या चक्रधारीकडे ब्रेक लावायचं कौशल्य नसेल, तर घसरण ठरलेली आणि आतल्या सर्वांसह गाडीचा कपाळमोक्ष ठरलेला असतो. ताळतंत्र गमावलेले राजकारणी, सारासार विवेक खुंटीला टांगलेली प्रसारमाध्यमं आणि अंगभूत ताकदीचा गैरवापर करणारी समाजमाध्यमं... एकमेकांना मागे सारत, अधोगतीच्या घसरणीवरून वेगाने पुढे चालली आहेत.