उस्मानाबादच्या साहित्य संमेलनाने काय कमावलं? काय गमावलं?

विवेक मराठी    18-Jan-2020
Total Views |

***निमेश वहाळकर****

उस्मानाबाद येथे पार पडले 93 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन आयोजन, कार्यक्रमांचा दर्जा, प्रतिसाद अशा अनेक बाबतीत यशस्वी ठरले. मात्र फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची अध्यक्षस्थानी झालेली वादग्रस्त निवड, अभिव्यक्तिस्वातंत्र्याची सोयीची ओरड आणि पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न अशा वादांनी या संमेलनालाही गालबोट लागलेच.

sahity_1  H x W

'साहित्याची वारी, गोरोबांच्या दारी' असं चपखल घोषवाक्य घेऊन मराठी साहित्य आणि साहित्यिकांचा मेळा - अर्थात 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन' यंदा मराठवाडयातील उस्मानाबादमध्ये दि. 10, 11 आणि 12 जानेवारी असे तीन दिवस साजरं झालं. मराठी साहित्यिकांनी एका व्यासपीठावर येणं, भाषा-साहित्य-संस्कृतीविषयक त्या-त्या वेळच्या प्रश्नांवर आपलं मत मांडणं, त्यावर चर्चा घडवून आणणं, त्याकडे समाजाचं व सरकारचं लक्ष वेधून त्याबाबत आवश्यक तो पाठपुरावा करणं या व अशा अनेक कारणांसाठी सुरू झालेली ही साहित्य संमेलनाची परंपरा कालसुसंगतपणे विकसित व नियोजित स्वरूपात पुढे प्रवाहित झाली.

यंदा या मालिकेतील 93वं पुष्प गुंफलं गेलं आणि आता ही परंपरा शतकमहोत्सवाकडे वाटचाल करत आहे. कोणत्याही मराठी भाषाप्रेमी व साहित्यप्रेमीला अभिमान वाटावा अशी ही गोष्ट. परंतु याचबरोबर आज ही परंपरा पुढे जात असताना, त्यामागील मूळ हेतू व उद्दिष्ट यांची कितपत पूर्तता झाली वा होते आहे, याचाही गांभीर्याने विचार व्हायला हवा. विखुरलेल्या समाजाला एकत्र आणण्यासाठी, एकसंध एकात्म समाजाच्या निर्मितीसाठी आपल्याकडे सुरू झालेल्या अनेक परंपरांची आजची अवस्था पाहिली, तर या गोष्टीची गरज आपल्या लक्षात येईल. मग ते धार्मिक सण असतील किंवा नेते-महापुरुषांच्या जयंत्या-पुण्यतिथ्या असतील. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आज साहित्यिक खरंच एकत्र येत आहेत का, साहित्यप्रेमी-वाचक व साहित्यिक यांच्यात संवाद घडतोय का, माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सबंध देश व पर्यायाने मराठी समाजदेखील एका निर्णायक अवस्थेतून मार्गक्रमण करत असताना त्यातून उद्भवलेले बरेवाईट परिणाम मराठी साहित्यात प्रतिबिंबित होत आहेत का, त्याबाबत साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून काही भाष्य होतंय का, युवकांच्या जाणिवांना, आशाआकांक्षांना साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर प्रतिनिधित्व मिळतंय का, वेगवेगळया राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक घटना व त्याचं मराठी साहित्यात पडलेलं प्रतिबिंब यावर वेगवेगळया विचारसरणींच्या प्रतिनिधी साहित्यिकांत निकोप मोकळी चर्चा घडतेय का? आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, जगाच्या कानाकोपऱ्यात घडलेली घटना दोन-चार सेकंदात आपल्या हातातील स्मार्ट फोनद्वारे आपल्यापर्यंत पोहोचण्याच्या काळात साहित्य संमेलनासारखे तीन दिवसीय उपक्रम कालसुसंगत रहावेत, यासाठी आवश्यक ती पावलं उचलली जात आहेत का? या व अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं शोधण्याची गरज आज निर्माण झालेली दिसते. उस्मानाबादमध्ये झालेल्या 93व्या संमेलनाबाबत बोलायचं झालं, तर सर्वप्रथम उस्मानाबादसारख्या मराठवाडयातील ग्राामीण भागात यंदा साहित्य संमेलन आयोजित केल्याबद्दल आयोजकांचं अभिनंदन करायला हवं. आणि याही पुढे जाऊन, मुंबई-पुणे-नाशिक पट्टा व राज्यातील इतर मोठी शहरं - उदा. नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, सोलापूर इ. व्यतिरिक्त उर्वरित ग्राामीण, निमशहरी भागांत असे जे जे उपक्रम भविष्यात घडतील, त्यांचं स्वागत करायला हवं. परंतु याचबरोबर वर उल्लेखलेल्या मुद्दयांबाबत काही भरीव, सखोल असं या संमेलांनातून मिळालं का? तर त्याचं उत्तर खेदाने नाही असंच द्यावं लागतं.

 

साहित्याच्या वारीतील 'फादर'

वाचकांचा, साहित्यप्रेमींचा लक्षणीय प्रतिसाद हे उस्मानाबादच्या साहित्य संमेलनाचं प्रमुख वैशिष्टय. उद्धाटन वा समारोप कार्यक्रम, तीन दिवसांत झालेली वेगवेगळी चर्चासत्रं, परिसंवाद व इतर कार्यक्रम यांना उस्मानाबादेतल्या व आसपासच्या प्रदेशातील रहिवाशांचा मोठा प्रतिसाद लाभलाच, शिवाय प्रत्येक साहित्य संमेलनातील आकर्षणाचं केंद्र असणाऱ्या पुस्तकविक्री स्टॉल्सनाही वाचकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. कडाक्याच्या थंडीच्या दिवसांत दुपारचं भरपेट भोजन झाल्यानंतर दुपारी दोन-अडीच ते चार-पाच अशा वामकुक्षीच्या वेळेत होणाऱ्या परिसंवाद कार्यक्रमांनाही रसिकांचा लक्षणीय प्रतिसाद मिळवा, हे चित्र आज मुंबई-पुण्यात अभावानेच पहायला मिळेल, परंतु ते उस्मानाबादमध्ये पाहायला मिळालं. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ख्रिस्ती धर्मोपदेशक व ज्येष्ठ मराठी साहित्यिक फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड करण्यात आली होती. तथापि पहिल्या दिवशी सायंकाळी झालेला संमेलनाच्या उद्धाटनाचा कार्यक्रम वगळता त्यांनी प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव संमेलनात कुठेच हजेरी लावली नाही व पहिल्या दिवसानंतर तर ते थेट मुंबईलाच रवाना झाले. यामुळे अध्यक्षाविनाच संमेलन व समारोप कार्यक्रम असा अभावानेच घडणारा प्रकार या साहित्य संमेलनात घडला. अर्थात, संमेलनाला स्थानिकांच्या मिळालेल्या प्रतिसादावर याचा कोणताही परिणाम झाला नाही, हेही तितकंच खरं.


93rd Akhil Bharatiya Mara 

फ्रान्सिस दिब्रिटो यांची अध्यक्षस्थानी निवड अपेक्षेनुसार वादाच्या भोवऱ्यात सापडली होती आणि त्याचे पडसाद स्वाभाविकच संमेलनातही उमटले. दिब्रिटो यांनी उद्धाटन कार्यक्रमात केलेल्या भाषणावरही बरीच टीका झाली. दिब्रिटो यांच्या निवडीनंतर व संमेलनादरम्यान 'दिब्रिटो यांना होणारा विरोध हा केवळ ते ख्रिश्चन आहेत म्हणून होतो आहे' असा समज करून किंवा जाणीवपूर्वक तसा अर्थ काढून अनेक जण त्यावर टीकाटिप्पणी करत होते. अगदी उद्धाटन समारंभात उद्धाटक म्हणून उपस्थित असलेले ज्येष्ठ साहित्यिक ना.धों. महानोर यांनीही अशाच भूमिकेतून मत मांडलं. 'साहित्यिकाची जात व धर्म केवळ साहित्य हाच असतो. इथे विषय केवळ माणुसकीच्या धर्माचा असतो' वगैरे वगैरे. दुसरीकडे, अध्यक्ष दिब्रिटोंनीही 'काही जण मला विरोध करत आहेत, परंतु मी येशूचा उपासक आहे. येशूने मला सर्वांना क्षमा करायला सांगितलं आहे' वगैरे म्हणून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. या प्रचारतंत्राला कदाचित बरेच जण भुलले असतीलही, परंतु त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की फ्रान्सिस दिब्रिटो यांना झालेला विरोध हा ते केवळ ख्रिश्चन आहेत म्हणून नव्हता, तर ख्रिश्चन धर्मोपदेशक म्हणून त्यांनी घेतलेल्या सोयीस्कररीत्या घेतलेल्या व वेळोवेळी बदललेल्या भूमिकांना होता. मानवतेच्या, व्यक्तिस्वातंत्र्याच्या आणि इतर मूल्यांच्या नावाने एरवी गळे काढत असताना केरळमधील नन्सवरील अत्याचारांवर मौन बाळगणं, चर्चद्वारा जगभरात शेकडो वर्षं केल्या गेलेल्या अत्याचार-बळजबरीच्या धर्मांतरांवर मौन बाळगणं, चमत्कार दाखवून 'संतपद' मिळवणं व इतर अनेक विवादास्पद बाबतींतही मौन बाळगणं आणि ख्रिस्ती धर्म-समाजाला सोडून अन्य कोणत्याही बाबतीत इतरांना मानवता, अभिव्यक्तिस्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता वगैरेंचं उपदेशामृत पाजणं, अशा अनेक कसरती 'फादर' फ्रान्सिस दिब्रिटो करत असतात. अर्थात, असं करणारे ते एकटेच नाहीत, चर्चच्या आदेशानुसार व पगारावर काम करणारे असे असंख्य प्रतिनिधी आहेत. चर्चचा इतिहासच तसा आहे. त्यामुळे दिब्रिटो यांना असलेला विरोध हा ते ख्रिश्चन असण्यावर नव्हता, तर त्यांच्या या प्रकारच्या लबाडीवर होता.

 
93rd Akhil Bharatiya Mara

महामंडळातील मंडळी

'साहित्यिकाची जात, धर्म केवळ 'साहित्य' असतं' असं महानोर म्हणाले ते खरंच आहे. परंतु फ्रान्सिस दिब्रिटो या व्याख्येत बसत नाहीत, म्हणून त्यांना विरोध होता. संमेलनापूर्वी व संमेलनादरम्यानही विरोधी भूमिका घेणाऱ्यांकडून हीच भूमिका मांडण्यात आली. परंतु अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे सध्याचे स्वरूप व विशिष्ट दोन-चार व्यक्तींचा त्यावर असलेला ताबा लक्षात घेता त्यांच्यापर्यंत ही बाब पोहोचणं अशक्यच बाब होती. दिग्गज साहित्यिक-विचारवंतांचा वारसा सांगणाऱ्या या महामंडळाची आज तिथे चालणाऱ्या राजकारणासाठीच अधिक चर्चा होते. याशिवाय, या मंडळातील मंडळींचे राजकीय लागेबांधे व हितसंबंधही गेल्या काही वर्षांत लपून राहिलेले नाहीत. अशा महामंडळाच्या नेतृत्वाकडून विवेकाची अपेक्षा करणं योग्य नव्हतंच. स्वाभाविकच, व्हायचे ते वाद-विवाद झालेच. परिणामी 'एक ना धड..'प्रमाणे सर्वत्र गोंधळलेलं वातावरण निर्माण झालं. प्रत्येक साहित्य संमेलनाच्या परंपरेनुसार मांडल्या जाणाऱ्या ठरावांत काही मंडळी जाणीवपूर्वक राजकीय वादग्रास्त विषय घुसवून 'साहित्यिकांचं मत' अशा गोंडस नावाखाली स्वतःची राजकीय पोळी भाजून घेणार, अशी कुणकुण यंदाही लागली होतीच. सीएए-एनआरसीला विरोध, मॉब लिंचिंगचा निषेध, अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याबाबत निषेध वगैरे ठराव 'निवडक' उदाहरणांचा दाखला देऊन मांडण्यात येणार, अशी चर्चा होती. त्यामुळे मग अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर बोलणार असाल तर केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांना इरफान हबीब यांनी बोलू न देण्याच्या घटनेचाही निषेध करा, मॉब लिंचिंगचा निषेध करत असाल तर त्यात देशभरात हिंदू समाजावर विविध ठिकाणी झालेल्या हल्ले, अत्याचार यांचाही निषेध करा अशी खमकी भूमिका अनेकांनी घेतली. परिणामी आयोजकांनी 'कोणतेही वाद नकोत' अशी बोटचेपी भूमिका घेत या सगळयाच मुद्दयांना बगल दिली. 'अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे संरक्षण व्हावे' अशी साधी मागणी करणारा एक मिळमिळीत ठराव वगळता उर्वरित ठरावांत या कोणत्याच मुद्दयांना प्रतिनिधित्व मिळालं नाही. याशिवाय, 1938 साली मुंबईत झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवलेल्या व क्रांतिकारक-नेता-समाजसुधारक याचसह एक थोर साहित्यिक अशीही ओळख असलेल्या स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्याबाबत काँग्रोस अध्यक्ष राहुल गांधी व अन्य काही जणांकडून केल्या गेलेल्या अवमानाचाही निषेध साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून करण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली होती. आयोजकांकडून वा महामंडळाकडून याही मागणीकडे कानाडोळा करण्यात आला.

93rd Akhil Bharatiya Mara

संमेलनातील कार्यक्रमांच्या निवडीत व रचनेतही हीच बाब प्रकर्षाने जाणवली. उदा. संतसाहित्य आणि बुवाबाजीशी संबंधित विषय परिसंवादासाठी ठेवण्यात आला. परंतु यामध्ये ख्रिश्चन व मुस्लीम समाजातील बुवाबाजीबाबत काही भाष्य व्हावं, असं यापैकी कुणाला वाटलं नाही. विशेषतः एक ख्रिस्ती धर्मोपदेशक - साहित्यिक अध्यक्षस्थानी असताना ख्रिस्ती बांधवांतील अंधश्रध्दा, बुवाबाजी, त्यातून त्यांचं होणारं नुकसान याबाबत चर्चा ठेवली गेली असती, तर ते खरं पुरोगामी पाऊल ठरलं असतं. एखादा खरोखरच कुणी सच्चा पुरोगामी आणि धर्मचिकित्सक असता, तर त्याने ही पर्वणी मानून धर्म, संतसाहित्य, बुवाबाजी व अंधश्रध्दा अशा मुद्दयांवर सखोल चर्चा, चिंतन घडवून आणलं असतं. परंतु ते घडलं नाही. कारण, आपल्याकडे हिंदू धर्माच्या चिकित्सेच्या नावाखाली काहीही बोललं तरी ते पुरोगामित्व ठरतं आणि इतर धर्मांच्या चिकित्सेबाबत एक शब्द जरी काढला तरी ते प्रतिगामित्व, जातीयवादी ठरतं, हे वास्तव आहे.

'त्या' दोघी

सोयीस्करपणे भूमिका घेण्याच्या वा भूमिकांना बगल देण्याच्या मांदियाळीमध्ये मराठी साहित्यात मोठं योगदान देणाऱ्या दोन महिला साहित्यिकांचा निर्भीडपणा व स्पष्टवक्तेपणा पुन्हा एकदा उठून दिसला. त्या दोघी म्हणजे डॉ. अरुणा ढेरे व प्रतिभा रानडे. यापूर्वी यवतमाळमध्ये झालेल्या 92व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरूणा ढेरे यांनी 'देश कुठल्याही हिटलरशाहीच्या उंबरठयावर नाही' असं संगत साहित्य वर्तुळात काही मोजक्या व्यक्तींनी आपल्या राजकीय हितसंबंधांपोटी आणलेली धुंदी खाडकन उतरवली. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर, एवढया साऱ्या गोंधळाच्या परिस्थितीत आणि आवतीभोवती 'आम्ही म्हणू तेच खरं' असं मानून चालणाऱ्या झुंडीच्या झुंडी अस्तित्वात असताना त्या सर्वांसमोर उभं राहून हे असं विधान निर्भीडपणे करणं, हे खरं अभिव्यक्तिस्वातंत्र्य. अरुणा ढेरे यांनी मागील वर्षी विद्यमान अध्यक्ष म्हणून उपस्थितांची मनं जिंकली होतीच आणि आता या वर्षीही मावळत्या अध्यक्ष म्हणून जिंकली, असं म्हणावं लागेल. ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांचंही करावं तेवढं अभिनंदन थोडंच ठरेल. नागरिकत्व सुधारणा कायद्याचं समर्थन थेट संमेलनाच्या व्यासपीठावर आपल्या मुलाखतीमध्ये करण्याचं धैर्य रानडे यांनी दाखवलं. साहित्यिक होणं म्हणजे नुसतं पुस्तक लिहिणं आणि समारंभ-सोहळयांत मिरवणं एवढयापुरतं मर्यादित नसतं. त्यासाठी जी मूल्य आपण लिहितो, बोलतो, ती प्रत्यक्षात जगावी लागतात आणि त्यांच्याशी प्रामाणिक राहावं लागतं. अरुणा ढेरे आणि प्रतिभा रानडे या दोघींनीही हीच बाब यानिमित्ताने ठळकपणे अधोरेखित केली.

 

प्रसारमाध्यमे आणि आयोजक

या संमेलनात पत्रकारांशी संबंधित काही घटना घडल्या, ज्या केवळ दुर्भाग्यपूर्ण म्हणता येतील. संमेलनाच्या पहिल्याच दिवशी, पहिलं सत्रदेखील सुरू होण्यापूर्वी हिंदुस्थान प्रकाशन संस्था - विवेक व दै. मुंबई तरुण भारतच्या संयुक्त पुस्तकविक्री स्टॉलवर मुंबई तरुण भारतचे पत्रकार सोमेश कोलगे यांना पोलिसांनी कोणत्याही पुराव्यशिवाया, वॉरंटशिवाय अटक करून घेऊन जाण्याचा प्रयत्न झाला. परंतु स्टॉलवरील प्रतिनिधींनी एकजूट दाखवत या प्रकाराला विरोध केल्यानंतर पोलिसांनी नरमाईचं धोरण स्वीकारलं. परंतु, हे अशा प्रकारे हात धरून पत्रकाराला साहित्य संमेलनस्थळावरून 'उचलण्याचं' कृत्य कशासाठी, यामागील बोलवते धनी कोण, या कारवाईमागील आधार-पुरावे काय, याचं उत्तर पोलीस प्रशासन देऊ शकलं नाही. जेएनयूमधील घटनेच्या निमित्ताने देशातील हिटलरशाहीबाबत गळे काढणाऱ्या संमेलनाध्यक्षांना त्याच दिवशी, त्याच संमेलनात सुरू असलेल्या या हिटलरशाहीबाबत मात्र एक चकार शब्दही काढावासा वाटला नाही. साहित्य संमेलन अध्यक्षांना त्यांच्या भूमिकांविषयी प्रश्न विचारणं, त्याबाबत प्रतिवाद करणं, काही वेगळं मत मांडणं आणि ते लोकांपर्यंत पोहोचवणं हा गुन्हा ठरतो काय? राज्यघटनेतील लोकशाही, अभिव्यक्तिस्वातंत्र्याची मूल्यं केवळ विशिष्ट लोकांपुरतीच मर्यादित आहेत काय? असे कितीतरी प्रश्न हा सर्व प्रकार पाहून आपल्याला पडतील. परंतु याची उत्तरं ना पोलीस प्रशासन देऊ शकेल, ना साहित्य महामंडळ देऊ शकेल, ना संमेलनाध्यक्ष देऊ शकतील व ना राज्य सरकार देऊ शकेल. कारण, त्यांच्याकडे ती उत्तरं नाहीत आणि जरी असलीच त्यांना ती द्यायची नाहीत.


93rd Akhil Bharatiya Mara

बरं, एवढी पोलीस सुरक्षा असतानाही, आयोजकांपैकी कुणी स्थानिक पुढाऱ्याने संमेलनस्थळी सुरक्षेकरिता चक्क खासगी 'बाउन्सर्स' आणले. बार-पबमध्ये दारू पिऊन झिंगलेल्यांना उचलून बाहेर घेऊन जाणारे बाउन्सर्स अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर आणण्यात आले. त्यातून व्हायचं ते झालंच. या सगळयात झी 24 तासच्या पत्रकाराला धक्काबुक्की झाल्याची घटना घडली. शिवाय, या सगळयाबाबत प्रश्न विचारणाऱ्या मुंबई तरुण भारतच्या पत्रकाराला दमदाटी करण्याचाही प्रयत्न आयोजकांपैकी काही जणांकडून झाला. या संपूर्ण तीन दिवसांच्या कालावधीत हिंदुस्थान प्रकाशन संस्थेच्या व मुंबई तरुण भारतच्या प्रतिनिधींच्या विरोधात एकूणच संशयाचं वातावरण जाणीवपूर्वक निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने होत होता. याचाच हाही भाग असावा कदाचित, त्यामुळे मग 'तुम्ही न्यूट्रल राहा, आमच्या गावात एवढा मोठा कार्यक्रम होतो आहे, त्याला गालबोट लावू नका, हे संमेलन व्यवस्थित व्हायला हवं आहे, तुम्ही बाहेरून आलेली मंडळी काही करू नका' अशा प्रकारचं उपदेशामृत 'मुंबई तरुण भारत'च्या पत्रकाराला देण्यात आलं, जेणेकरून ही 'बाहेरून आलेली मंडळी' जणू काही संमेलन उधळायलाच निघाली आहेत, अशी हवा निर्माण व्हावी आणि ज्यातून मूळ मुद्दयांना बगल मिळावी. या सगळयात एक लक्षात घेतलं पाहिजे, ते म्हणजे साहित्य संमेलनासारखे मोठे कार्यक्रम एखाद्या छोटया गावात येतात, तेव्हा ते 'यशस्वी' करून दाखवण्यात अनेकांचे भविष्यकालीन हितसंबंध दडलेले असतात. अनेकांना आपली 'करिअर्स' घडवायची असतात. त्यातून मग 'साहित्य संमेलनात कोणताही वाद झाला नाही म्हणजे ते यशस्वी ठरलं' अशी चुकीची समजूत करून घेतली जाते आणि मग एखाद्या मुद्दयावर कुणीही काहीही बोललं तरी त्याचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होतो. मुळात अ.भा. मराठी साहित्य संमेलनासारखा एवढी प्रदीर्घ व अभिमानास्पद परंपरा असलेला कार्यक्रम 'उधळून' वगैरे देण्याचा भ्याडपणा हिंदुस्थान प्रकाशन संस्था, विवेक वा मुंबई तरुण भारत कधीही करणार नाही. या संस्था प्रसारमाध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यांचं मत मांडण्यासाठी त्यांच्याकडे त्यांची माध्यमं आहेत आणि ती पुरेशी आहेत. या माध्यमांतून लिहिणं, बोलणं, आपली भूमिका मांडणं, जे चूक वाटेल त्यावर प्रश्न उपस्थित करणं आणि आपली भूमिका प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवणं, हेच या संस्थांचं काम आहे आणि हे काम मात्र कुणीही कितीही दबाव आणला तरी थांबणार नाही.

 

साहित्य संमेलन यशस्वी व्हावं, हीच हिंदुस्थान प्रकाशन संस्थेची व मुंबई तरुण भारतची आधीपासूनची भूमिका आहे. आयोजक जरी 'हे बाहेरून आलेले लोक' म्हणून संशयाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत असले, तरी याच मायमराठीची सेवा करणारीच ही माध्यमं आहेत, ती काही पाकिस्तानातून आलेली नाहीत. वेगवेगळया भूमिका मांडल्या जाणं, त्यावर वाद-प्रतिवाद होणं, चर्चा होणं, वेगवेगळया मुद्दयांवर सहमती वा विरोध होणं, तो वाचक-साहित्यप्रेमींपर्यंत पोहोचणं हे साहित्य संमेलनाचं खरं यश असतं. कुणी विरोधात बोलल्यास त्याला चूप करून इथे कसं सगळं छानछान आहे तेवढंच 'बाहेरील मंडळींना' दाखवणं म्हणजे यशस्वी होणं नव्हे. अ.भा. मराठी साहित्य संमेलन उद्या अन्यत्र कुठे होईल, किंवा उस्मानाबादमध्ये असे इतर काही मोठे कार्यक्रम होतील, तेव्हा आयोजक व्यक्तींनी या गोष्टीची जाणीव ठेवल्यास तो कार्यक्रम अधिक 'यशस्वी' ठरू शकेल.