ध्यास गुणवत्तापूर्ण विज्ञान शिक्षणाचा !

विवेक मराठी    18-Jan-2020
Total Views |

** विवेक गिरिधारी***

गेले दीड तप ज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून विज्ञान शिक्षण प्रसाराचे प्रयत्न करणारे प्रशांत दिवेकर यांना यंदाचा ‘विवेकानंद युवा पुरस्कार ’ जाहीर झाला आहे. रविवारी १९ जानेवारीला त्यांना तो जाहीर कार्यक्रमात प्रदान केला जाणार आहे. यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा हा सविस्तर परिचय


divekar_1  H x

देऊन जनकल्याण समितीतर्फे नुकतेच सन्मानित करण्यात आले. मानचिन्ह व रु.४१ हजार असे या पुरस्काराचे स्वरूप होते. त्यांच्या कार्याचा हा सविस्तर परिचय

देशभरात स्वातंत्र्यानंतर सुमारे ७० वर्षांपर्यंत शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी व जन्मलेले प्रत्येक मुल शाळेत जाण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्यात आले. त्यात लक्षणीय यशही उशिरा का होईना पण मिळाले. आताचा कालखंड आहे तो गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा. यात गेले दीड तपाहून अधिक काळ महत्वाचे योगदान ज्ञान प्रबोधिनीचे सोलापूरचे माजी प्राचार्य व प्रबोधिनीतील सध्याच्या वा. ना. दांडेकर शिक्षक प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख प्रशांत दिवेकर हे करीत आहेत. शिक्षक प्रशिक्षण व विज्ञान शिक्षण प्रसार याआधारे महाराष्ट्रभर व अन्य निवडक राज्यातही विज्ञान शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. स्वामी विवेकानंदांच्या शिक्षण विषयक विचारांतून प्रेरणा घेत व स्वतः नवनवीन प्रयोग करीत ज्ञान प्रबोधिनीने स्वतःची अशी एक वैशिष्टपूर्ण शिक्षणप्रक्रिया विकसित केली आहे. ती अनेकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न दिवेकर करीत आहे.

अनुकूल व पोषक कौटुंबिक पार्श्वभूमी :

सामाजिक व शैक्षणिक कार्याची मोठी कौटुंबिक पार्श्वभूमी दिवेकर यांना लाभली आहे. त्यांचे एक आजोबा स्वातंत्र्यसैनिक होते तर दुसरे आजोबा ग्रामीण भागात सेवाभावी वृत्तीने वैद्यकीय सेवा देणारे होते. मावशीनेदेखील बेळगावात दिव्यांगांसाठी मोठे काम उभे केलेले आहे. आई व वडील दोघेही माध्यमिक शाळेत शिक्षक होते. याशिवाय वडील कर्वे शिक्षण संस्थेचे आजन्म सेवक असल्यामुळे अध्यापनाव्यतिरिक्त संस्थेच्या कामात सक्रीय होते. त्यांचे बालवाडीपासून विज्ञान शाखेतील पदवीपर्यंतचे शिक्षण वाई येथे झाले. तर्कतीर्थ कै.लक्ष्मणशास्त्री जोशी, लेलेशास्त्री व अनेक प्रतिभावंतांच्या सान्निध्याचा तसेच कृष्णामाई उत्सवाचा वेगळा असा ठसा वाईतील समाजजीवनावर आहे. या वाईतील वास्तव्याचा एक निश्चित संस्कार त्यांच्या मनावर होणे अगदी स्वाभाविकच होते. याच दरम्यान त्यांचा संघ शाखेशीही काही काळ संपर्क आला. पदव्युत्तर शिक्षण मात्र पुढे कोल्हापूर व पुणे येथे झाले.

रामकृष्ण मठाचे भूतपूर्व अध्यक्ष स्वामी रंगनाथानंद हे अध्यापक होऊ इच्छिणाऱ्या युवक-युवतींना स्वामी विवेकानंदांची ‘भारतीय व्याख्याने’ व ‘विवेकांदांची पत्रे’ ही दोन पुस्तके वाचण्याचा आवर्जून आग्रह धरत असत. दिवेकर यांनी या दोन पुस्तकांसह विवेकानंद यांच्या वाड्मयाचेही सविस्तर वाचन केले आहे.

पुण्यातील प्रबोधिनीशी संपर्क :

पुण्यात शिक्षणशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण चालू असतांना वडिलांच्या सूचनेवरून प्रशांत दिवेकर प्रबोधिनीत कामाची माहिती घेण्यासाठी आले असतांना त्यांचा प्रशालेचे तत्कालीन प्राचार्य कै. विवेकराव पोंक्षे यांच्याशी संपर्क आला.१९९९च्या दरम्यान ते पोंक्षे सरांबरोबर प्रथमच ईशान्य भारतात अभ्यासदौऱ्यासाठी सव्वा महिने गेले होते. त्यातूनच त्यांच्या आयुष्याची पुढची दिशा ठरत गेली व पूर्वांचलाशी नाळ कायमची जोडली गेली. लगोलग त्यांनी ज्ञान प्रबोधिनीच्या प्रशालेत विज्ञानाच्या अध्यापनास सुरुवात केली. याच बरोबरीने पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील निवडक गावांमधील मुलां-मुलींमध्ये प्रबोधिनीच्या ग्रामीण प्रज्ञा विकास कार्यक्रमाअंतर्गत अनौपचारिक पद्धतीने विज्ञानप्रसार करण्याचेही काम केले. तीन वर्षे प्रबोधिनीत काम केल्यावर आर्थिक स्थिरतेच्या कारणास्तव त्यांनी काही काळ आदिवासी विभागाच्या पहिल्या कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात विज्ञानाचे अध्यापन करण्यासाठी नोकरी पत्करली. त्यासाठी पुणे जिल्यातील आंबेगाव तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागात त्यांनी तीन वर्षे वास्तव्य केले पण ते तेथे रमू शकले नाहीत. प्रबोधिनीच्या शिक्षणप्रक्रियेच्या ओढीने ते अनेकांना हवीहवीशी वाटणारी अशी शासकीय सुरक्षित नोकरी सोडून पुनश्च प्रबोधिनीत २००५ मध्येआले. पुढे सोलापूरातील ज्ञान प्रबोधिनीच्या बाल-विकास मंदिर प्रशालेचे प्राचार्य म्हणूनही त्यांनी तीन वर्षे निवासी राहून काम केले.

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षक प्रशिक्षण :

नव्याने शिक्षणक्षेत्रात आवडीने उतरू पाहणाऱ्या उपक्रमशील धडपड्या शिक्षकांसाठीरूप पालटू शिक्षणाचेहे राज्यस्तरीय शिबिर शिक्षणतज्ञ कै. विवेकराव पोंक्षे आणि प्रा. महेंद्र सेठिया यांच्या संकल्पनेतून गेली २० वर्षे प्रबोधिनीत घेण्यात येत आहे. गेली १० वर्षे या शिबिराचे मुख्य संयोजक म्हणून दिवेकर काम करीत आहेत. आत्तापर्यंत महाराष्ट्रभरातील सुमारे ६०० ध्येयवादी शिक्षकांचे या शिबिरातून प्रशिक्षण झाले आहे.

अलिकडे गेली तीन वर्षे विवेकानंद केंद्राच्या आसाम व अरुणाचल प्रदेशातील २५ शाळांमध्ये विज्ञानातील संशोधनात्मक प्रकल्पासाठी शिक्षक प्रशिक्षणाचे काम चालू आहे. यात सुमारे २०० विज्ञान शिक्षक सहभागी आहेत. ६०० विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला आहे. यात प्रबोधिनीकडे प्रशिक्षणाची मुख्य जबाबदारी आहे. यातून तेथे ‘आर्यभट्ट अनुसंधानात्मक विज्ञान प्रकल्प स्पर्धा’ याची रचना बसवून देण्यात आली आहे. यात दिवेकारांचा सक्रीय सहभाग असून यानिमित्ताने त्यांचा अनेकदा ईशान्य भारतातही प्रत्यक्ष प्रवास झाला आहे.

प्रबोधिनीतर्फे शिक्षकांसाठी त्यांच्या प्रशिक्षणाचा भाग म्हणून नियमितपणे प्रसिद्ध होणाऱ्या ‘ई -प्रशिक्षक’ मासिकाचे संपादक म्हणून दिवेकर यांच्याकडे जबाबदारी आहे. आज मासिक, ब्लॉग, अॅपच्या माध्यमातून शिक्षक संपर्क आणि संघटन चालू आहे. पुण्यातील विज्ञान अध्यापक संघासोबत ‘तज्ञ मार्गदर्शक’ म्हणूनही त्यांचा सातत्याने सहभाग असतो.


divekar_1  H x  

विज्ञान प्रसारातील महत्वपूर्ण योगदान :

राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचे पुणे जिल्हा समन्वयक म्हणूनही दिवेकर यांनी तीन वर्षे काम केले आहे. सोलापूर येथील बाल विज्ञान परिषदेसाठी विशेष मार्गदर्शन केले होते. प्रबोधिनीच्याछोटे सायंटिस्टया ग्रामीण भागातील उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्वयंसेवकांच्या प्रशिक्षणात दिवेकर यांचा सक्रीय सहभाग आहे. या उपक्रमात सुमारे ६० ग्रामीण शाळांमधील ३५००विद्यार्थी सहभागी आहेत. यात कृती आधारित विज्ञान खेळण्यांतून विज्ञान व त्यातील कार्यकारणभाव शिकविण्याचा प्रयत्न केला जातो.

प्रबोधिनीच्या ज्ञानसेतू उपक्रमामार्फत पूर्वांचल, छत्तीसगड, झारखंड, जम्मू आणि काश्मीर यासारख्या राष्ट्रीय एकात्मतेला आव्हान देणाऱ्या नऊ राज्यात महाविद्यालयीन युवक स्वखर्चाने विज्ञान मेळावे विज्ञान शिबिरे घेण्यासाठी २०१३ पासून नियमितपणे जात आहेत. दरवर्षी सरासरी १५० युवक यात सहभागी होतात तर १०० शाळांमधील ५००० विद्यार्थांना कृतितून व प्रकल्प पद्धतीतून विज्ञान शिकण्याचा नाविन्यपूर्ण अनुभव मिळतो. या उपक्रमाच्या संयोजनात दिवेकर यांचा सक्रीय सहभाग असतो.

प्रबोधिनीच्यावतीने गणेशोत्सवात दरवर्षी एक विज्ञान विषय घेऊन संपूर्ण विज्ञान प्रदर्शनाची मांडणी केली जाते. यात विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकांवर विशेष भर असतो. दरवर्षी हजारो गणेशभक्त या प्रदर्शनाला भेटी देतात. गेली१४ वर्षे या स्वरूपाच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते व त्यास भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. या संकल्पनेच्या मांडणीपासून प्रत्यक्ष प्रदर्शन उभारणीच्या सुरवातीच्या वर्षांच्या टप्प्यात दिवेकर यांचे महत्वाचे योगदान होते.

विविधांगी प्रासंगिक कामात सहभाग :

मराठी विश्वकोशामध्ये विज्ञान विषयासाठीअभ्यागत संपादकम्हणून दिवेकर यांनी प्रासंगिक काम केले होते. अलिकडे झालेल्या सांगली-कोल्हापूर नैसर्गिक आपत्तीमध्ये पूरग्रस्त मदतकार्यातही त्यांचे सक्रीय योगदान होते. समाजशास्त्र अध्यापनातही त्यांना रस आहे. ईशान्य भारतातील प्रश्नांविषयी त्यांना विशेष आत्मीयता आहे व तौलनिक अभ्यासही आहे. महाविद्यालयीन युवकांच्या देशप्रश्नावरील विविध राज्यांच्या अभ्यासदौऱ्यातही त्यांचा हिरीरीने पुढाकार असतो. असे कार्यकर्ता मनोभूमिकेतील त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे.

शिक्षणप्रक्रियेतून समाजात अपेक्षित बदल घडविण्यात शिक्षकांचा तर मोठा वाटा आहेच परंतु त्याही पेक्षा मोठे आव्हान हे असे बदल घडविणारे शिक्षक तयार करणे हे आहे. या दिशेने प्रयत्न करणाऱ्या प्रशांत दिवेकरांचे योगदान नक्कीच दखलपात्र आहे हे या पुरस्काराने अधोरेखित केले आहे.