जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती

विवेक मराठी    02-Jan-2020
Total Views |

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/


'मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास। कठिण वज्रास भेदूं ऐसे' ह्या यथार्थ शब्दांमध्ये श्री संत तुकाराम महाराजांनी वैष्णव संतांचे वर्णन केले आहे. तुकोबांच्या ह्या ओळी मूर्तिमंत जगलेला एक विष्णुदास गेल्या आठवडयात काळाच्या पडद्याआड गेला. उडुपी येथील पेजावरा अधोक्षज ह्या वैष्णव मठाचे 32वे मठाधिपती श्री स्वामी विश्वेश तीर्थ ह्यांचे गेल्या रविवारी 88व्या वर्षी वार्धक्याने निधन झाले. पेजावर स्वामी हे भारतातील प्रमुख हिंदू धर्मगुरूंपैकी तर होतेच, तसेच सामाजिक समरसतेच्या क्षेत्रातले त्यांचे काम डोंगराएवढे होते.


seer vishwesha teertha sw

वयाच्या आठव्या वर्षी संन्यास घेणाऱ्या ह्या असामान्य मुलाने आपले संपूर्ण आयुष्य हिंदू समाजाच्या एकतेसाठी वाहिले. पेजावर अधोक्षज मठ हा बाराव्या शतकातले महान वैष्णव संत आणि द्वैतसिध्दान्ताचे जनक श्री मध्वाचार्य ह्यांनी स्थापन केलेल्या अष्टमठांपैकी एक मठ. उडुपी येथील श्री मध्वाचार्यांनी स्थापन केलेले बाळकृष्णाचे मंदिर हे आठही मठ आलटून पालटून चालवतात. प्रत्येक मठाच्या मंदिर चालवण्याच्या काळाला 'पर्याय' असे नाव आहे. प्रत्येक पर्यायाचा कालावधी दोन वर्षांचा असतो. म्हणजे जवळजवळ 14 वर्षांनी एकेक मठाची पाळी येते. ह्या अष्टमठाधिपतींपैकी पेजावर मठाधीश श्री स्वामी विश्वेश तीर्थ आणि सौदे मठाचे श्री स्वामी ह्या दोनच मठाधिपतींना पाच वेळा पर्याय स्वीकारण्याचे भाग्य लाभले. आपल्या पाच पर्यायकाळांमध्ये स्वामी विश्वेश तीर्थानी उडुपी कृष्णमंदिराद्वारे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले. विशेषत: जातिभेद निर्मूलन हे श्री पेजावर स्वामींचे ध्येय होते आणि त्यासाठी ते आयुष्यभर झटले.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

असे म्हणतात की स्वामीजी फक्त सहा वर्षांचे असताना त्यांच्या गावातल्या डोहात पोहायला गेलेले असताना बुडत होते, आणि त्यांना वाचवले त्यांच्याच गावातल्या तथाकथित खालच्या जातीच्या समजल्या जाणाऱ्या एका मुलाने. स्वामींच्या मनावर बालपणापासून त्या प्रसंगाचा खोल ठसा उमटला असावा, कारण जातिभेद निर्मूलनासाठी आणि हिंदू समाजाच्या एकतेसाठी स्वामी विश्वेश तीर्थानी केलेले कार्य केवळ अतुलनीय आहे. उत्तर कन्नड जिल्ह्यातल्या पुत्तूर गावात एका धार्मिक मध्व ब्राह्मण घरात विश्वेश तीर्थांचा जन्म झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव व्यंकटराम. लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झालेल्या व्यंकटरामाने वयाच्या आठव्या वर्षी आई-वडिलांच्या संमतीने संन्यास दीक्षा घेतली. त्यांचे गुरू म्हणजे श्री भंडारकेरी मठाचे श्री स्वामी विद्यामान्य तीर्थ. स्वामी विश्वेश तीर्थ वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी पेजावर मठाचे मठाधिपती झाले. त्यांचा पहिला पर्याय सुरू झाला 1954मध्ये.


seer vishwesha teertha sw

ह्याच पर्याय काळात सरसंघचालक श्री गोळवलकर गुरुजींशी स्वामी विश्वेश तीर्थांची भेट झाली. श्रीगुरुजी 1955मध्ये उडुपी दौऱ्यावर गेले होते, तेव्हा त्यांची आणि स्वामी विश्वेश तीर्थांची भेट झाली. तेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळून पुरते एक दशकही झाले नव्हते. फाळणीच्या जखमा अजून ताज्याच होत्या. सर्वस्वाचा होम करून जीव बचावून भारतात आलेले लाखो हिंदू निर्वासित आपल्या संसाराची घडी परत बसवण्यासाठी धडपडत होते. स्वामी विश्वेश तीर्थांच्या संवेदनशील मनाला हे सगळे दु:ख दिसत होते, आत गाभ्यापर्यंत भिडत होते, म्हणून त्यांनी श्रीगुरुजींना विचारलेला पहिला प्रश्न म्हणजे ''देशाची फाळणी का झाली? आणि अखंड हिंदुस्थान परत कधीतरी अस्तित्वात येऊ शकेल का?'' उत्तरादाखल श्रीगुरुजींनी विश्वेश तीर्थांना सांगितले की ''जातिभेदाच्या किडीमुळे पोखरला गेलेला, एकतेच्या अभावी विखुरला गेलेला हिंदू समाज एकत्र होऊन फाळणीचा विरोध करू शकला नाही.'' स्वामीजींनाही वस्तुस्थिती समजत होतीच, म्हणून पेजावर मठाचा मठाधिपती म्हणून कार्य करताना स्वामी विश्वेश तीर्थानी सदैव अखिल हिंदू समाजाच्या एकतेसाठी काम केले. श्री गोळवलकर गुरुजींबरोबरची ती भेट पेजावर श्रींच्या आयुष्यातली एक अविस्मरणीय भेट ठरली.

श्री संत तुकारामांनी आणखी एका अभंगात सांगितलेला 'विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद-भ्रम अमंगळ॥' हा वैष्णव धर्म श्री विश्वेश तीर्थ स्वामींनी सदैव आचरणात आणण्याचा प्रयत्न केला. 1965 साली जेव्हा अखिल हिंदू एकता हा उद्देश ठेवून विश्व हिंदू परिषदेची स्थापना झाली, तेव्हा विहिंपच्या संस्थापक मंडळामध्ये स्वामी विश्वेश तीर्थ व स्वामी चिन्मयानंद, दलाई लामा वगैरे दिग्गज होते. स्वामी विश्वेश तीर्थांच्या दुसऱ्या पर्याय काळात 1969मध्ये उडुपीमध्ये विश्व हिंदू परिषदेची धर्मसंसद भरवण्यात आली. त्या संसदेत हिंदू, शीख, बौध्द, जैन आदी सर्व भारतीय धर्मांचे, पंथांचे धर्मगुरू, मठाधिपती उपस्थित होते. कर्नाटकातले पहिले दलित आयएएस अधिकारी भरनैया ह्यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद भरली होती. ह्याच संमेलनामध्ये स्वामी विश्वेश तीर्थांनी हिंदू एकतेसाठी 'हिन्दव: सोदरा: सर्वे, न हिंदू पतितो भवेत' हा मंत्र दिला. सर्व हिंदू एकमेकांचे बंधू आहेत आणि कुणाही हिंदूला दैन्य भोगावे लागू नये हा त्या मागचा विचार होता. ह्याच अधिवेशनामध्ये 15,000 प्रतिनिधींच्या उपस्थितीत सर्व हिंदू धर्मगुरूंनी एकमताने 'अस्पृश्यतेला हिंदू धर्मात स्थान नाही' असा स्पष्ट ठराव केला. त्यामागे स्वामी विश्वेश तीर्थ, स्वामी चिन्मयायानंद आदी थोर हिंदू धर्मगुरूंचे अथक प्रयत्न होते.

ह्या संमेलनामध्ये जेव्हा ह्या ठरावावर चर्चा होत होती, तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या एका जुन्या मताच्या धर्मगुरूंना एका वैष्णव मठाच्या मठाधिपतींनी हे जातिभेद निर्मूलनाचे काम करावे हे आवडले नाही आणि तसे त्यांनी भर सभेत बोलून दाखवले. तेव्हा स्वामी विश्वेश तीर्थानी मठाधिपती म्हणून पायउतार होण्याची तयारी दर्शवली. 'एक भगवी वस्त्रे घातलेला संन्यासी म्हणून मी हे हिंदू एकतेचे काम आयुष्यभर करत राहीन. त्या कामात मठाचे कार्य आड येत असेल तर मी मठ सोडेन, पण जातिभेद निर्मूलनाचे काम सोडणार नाही''' असे तेव्हा स्वामी विश्वेश तीर्थांनी स्पष्ट प्रतिपादन केले होते. आयुष्याच्या अखेरपर्यंत स्वामीजी विश्व हिंदू परिषदेशी जोडलेले राहिले.

केवळ धर्मसंसदेमध्ये ठराव करूनच स्वामी विश्वेश तीर्थ थांबले नाहीत. जातिभेद निर्मूलनाचे त्यांचे काम त्यांनी अखंडपणे, अविरतपणे चालूच ठेवले. गावकुसाबाहेरच्या तथाकथित खालच्या जातीच्या लोकांच्या वस्त्यांमधून त्यांनी पदयात्रा काढल्या. तिथल्या लोकांनी केलेली पाद्यपूजा आनंदाने स्वीकारली. स्वामीजींच्या कार्यातून प्रेरणा घेऊन व्ही.एस. आचार्य जेव्हा उडुपी नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले, तेव्हा त्यांनी 1971मध्ये नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी मैला डोक्यावरून वाहून नेण्याची दुष्ट प्रथा मोडून काढली. उडुपी ही असे करणारी देशातली पहिली नगरपालिका. ह्या कार्याला स्वामीजींचा पूर्ण पाठिंबा होता.

तथाकथित दलित समाजाच्या लोकांच्या प्रश्नांसाठी स्वामी विश्वेश तीर्थांनी सरकारदरबारी तक्रारी नेल्या, आंदोलने केली. शालेय शिक्षणासाठी मठाने कर्नाटकामधल्या अनेक शहरांतून शाळा काढल्या, ज्यामध्ये सर्व जातिधर्मांच्या मुलांना मुक्त प्रवेश आहे. नक्षल हल्ल्यात मारल्या गेलेल्या एका व्यापाऱ्याच्या मुलाच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वामीजींनी उचलली. पेजावर मठाची गरीब विद्यार्थ्यांसाठी चालवलेली अनेक वसतिगृहे आहेत, जिथे नाममात्र शुल्क घेऊन गरजू पण हुशार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. पूर्णप्रज्ञा विद्यापीठ ही स्वामीजींनी हिंदू संस्कृती संवर्धनासाठी उभी केलेली संस्था. आज बंगळुरूसारख्या अनेक शहरांमधून ह्या संस्थेचे काम चालते.

 

स्वामी विश्वेश तीर्थ 2009मध्ये म्हैसूर शहरामध्ये चतुर्मास्य व्रतासाठी आलेले असताना त्यांनी शहरातल्या तथाकथित दलित वस्त्यांमधून पदयात्रा काढली. तेव्हा चित्रदुर्ग तालुक्यातल्या एका ब्राह्मणेतर मठाचे मठाधिपती बसवलिंग मादर चेन्नय्या ह्यांनी असे वक्तव्य केले की दलित वस्तीमधून श्री स्वामींना जो मान, जो आदर मिळाला, तसाच आदर एका दलित संन्याश्याला ब्राह्मण वस्तीत मिळू शकेल का? त्याला उत्तर म्हणून स्वामी विश्वेश तीर्थांनी संघाच्या सहकार्याने म्हैसूरमधल्या उच्चभ्रू ब्राह्मण वस्तीतून स्वामी बसवलिंग मादर चेन्नय्या ह्यांची पदयात्रा आयोजित केली. वस्तीतल्या ब्राह्मण स्त्री-पुरुषांनी स्वामीजींची यथोचित पाद्यपूजा करून त्यांचा सत्कार केला. त्यानंतर स्वामी विश्वेश तीर्थांचा मुक्काम जिथे होता, त्या राममंदिरात स्वामी बसवलिंग मादर चेन्नय्या ह्यांचा स्वत: स्वामीजींनी विधिवत आदरसत्कार केला. खरोखर सामाजिक समरसतेच्या खडतर वाटेवरचे हे स्वामीजींनी उचललेले फार मोठे पाऊल होते


seer vishwesha teertha sw.

स्वामी विश्वेश तीर्थानी कुठल्याही धर्माबाबत द्वेष बाळगला नाही. 2017मध्ये त्यांनी उडुपी मठामध्ये मुसलमान लोकांसाठी इफ्तरचे आयोजन केले होते. त्याबद्दल ते टीकेचे धनीही झाले होते. त्यांनी समचित्ताने ती टीका स्वीकारली, पण आपल्या निर्णयावर ते ठाम होते. पण त्याचबरोबर हिंदू धर्म आणि हिंदू अस्मिता ह्याबद्दलही स्वामी विश्वेश तीर्थांची मते तितकीच ठाम होती. अयोध्येमध्ये रामजन्मभूमी स्थानावर केवळ आणि केवळ भव्य राममंदिरच असावे, ह्याबाबत ते ठाम होते. रामजन्मभूमी आंदोलनाला त्यांनी नेहमीच सक्रिय पाठिंबा दर्शवला होता. सुप्रीम कोर्टाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर शक्य तितक्या लवकर अयोध्येत भव्य राममंदिर उभारले जावे ह्यासाठी नोव्हेंबर 2019मध्ये भरवण्यात आलेल्या जनजागृती रॅलीमध्ये प्रकृतिअस्वास्थ्य जाणवत असतानाही स्वामीजी आवर्जून उपस्थित होते. अशा ह्या कर्मयोग्याला अयोध्येत भव्य राममंदिर उभारणे हीच योग्य श्रध्दांजली ठरू शकेल.

अशा ह्या थोर, लोकोत्तर साधूपुरुषाला भेटायचा सुवर्णयोग माझ्या कुंडलीत होता. गेल्या महिन्यात मी मंगळूर साहित्य संमेलनासाठी मंगळूरला गेले असताना स्वामीजी तिथे होते. मला त्यांचे दर्शन घ्यायची खूप इच्छा होती, म्हणून मी आयोजकांना विनंती करून ते ज्या ठिकाणी पूजेला आले होते, त्या ठिकाणी गेले. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवडयातली ही गोष्ट. स्वामीजी जेव्हा प्रत्यक्ष दिसले, तेव्हा का कोण जाणे माझे डोळे भरूनच आले एकदम. परत एकदा तुकोबांच्याच शब्दांचा आधार घ्यायचा तर स्वामी विश्वेश तीर्थ खरोखरच 'जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टविती, परोपकारे' ही उक्ती सार्थ करणारे होते. जेमतेम साडेचार फुटांचा, अतिकृश देह, वार्धक्याने पाठीला आलेला बाक, डोळयांत शिगोशीग भरून ओसंडणारी अपार अपार करुणा आणि हास्य मात्र लहान मुलासारखे, निर्मळ, निर्व्याज, आनंदाने भरलेले. पहाटे चार वाजल्यापासून सुरू होणार स्वामींचा दिनक्रम, त्यातही नैमित्तिक अनुष्ठाने, तरीही रात्री नऊ वाजता स्वामीजी भेटायला आलेल्या लोकांना न थकता दर्शन देत होते. बरोबरच्या लोकांनी स्वामीजींना माझी ओळख करून दिली, मी मुलांच्या ठरवलेल्या मुंजीबद्दल सांगितले, मंगळूरला का आलेय तेही सांगितले. ते गोड हसले, कन्नडमध्ये म्हणाले, ''चांगलं काम करतेस, अशीच लिहिती राहा.'' मी अडखळत फोटोची विनंती केली, तेव्हा जराही आढेवेढे न घेता ते फोटोसाठी बसले, माझ्या ओटीत दोन फळे दिली, कुंकवाची चिमूट माझ्या हातात टाकली आणि आईच्या मायेने मला आणि माझ्याबरोबर आलेल्या कार्यकर्त्यांना म्हणाले, ''आता जेवूनच जा.'' त्यांच्या मठातला तो कृष्णप्रसाद त्या दिवशी आमच्या नशिबात होता, हे आमचे सौभाग्य.

स्वामी विश्वेश तीर्थ खरोखरच लोकोत्तर संत होते, म्हणूनच गेल्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी त्यांना मुद्दाम दिल्लीला त्यांच्या निवासस्थानी बोलावून घेतले होते. त्यांच्या निधनानंतर शोक व्यक्त करताना पंतप्रधान मोदींनी त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला होता. हिंदू एकता, जातिभेद निर्मूलन, धर्मसंरक्षण आणि संवर्धन ह्या गोष्टींना स्वामीजींनी स्वत:ला वाहून घेतलेले होते. त्यांच्या आयुष्यामधून आपल्या सगळयांना काही बोध घेता आला तर फार बरे होईल.

- शेफाली वैद्य


आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/