उद्योगाला मानवी चेहरा देणारे अश्विनभाई श्रॉफ

विवेक मराठी    20-Jan-2020
Total Views |

मानवी मूल्यांनी औद्योगिक संस्कृती कशाप्रकारे समृध्द करता येते याचा आदर्श घालून देणारी यशस्वी उद्योजक म्हणजे एक्सेल इंडस्ट्रीज लि.चे अश्विनभाई श्रॉफ. अश्विनभाईंच्या पंचाहत्तरी निमित्त त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कार्याचा परिचय करून देणारा लेख.

Excel Industries Limited

भारताच्याच नव्हे, तर जगाच्या औद्योगिक नकाशावर 'एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड' या उद्योग समूहाचे एक वेगळे स्थान आहे. कारण या उद्योग समूहाने औद्योगिक रसायने, कीटकनाशके यांची उत्पादने व संशोधन, विक्री, नफा एवढेच साध्य न करता माणसे घडवणारा उद्योग समूह म्हणून नाव मिळवले आहे. उद्योगाला मानवी चेहरा देण्याचे प्रयत्न एक्सेलने केले आहेत. अशा या एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन अश्विनभाई श्रॉफ यांचा जन्म 22 जानेवारी 1945 रोजी मुंबईत झाला. 1965 साली मुंबई विद्यापीठाची रसायनशास्त्रातील पदवी घेऊन त्यांनी एक्सेल इंडस्ट्रीजमध्ये आपल्या भावी आयुष्याची सुरुवात केली व आज या समूहाची सर्वोच्च धुरा ते वाहत आहेत. बडोदा येथील ट्रान्सपेक इंडस्ट्रीज लिमिटेड व ट्रान्सपेक-सिलॉक्स इंडस्ट्री लि.चेही ते सध्या चेअरमन आहेत.

श्रॉफ परिवाराने एक्सेलच्या छोटया रोपटयाचे वटवृक्षात रूपांतर केले. त्याच्या सावलीत आज कित्येक सहकारी, कामगार, लघुउद्योजक, भागधारक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. इथे एकदाही संप झालेला नाही, कारण व्यवस्थापनाचा चेहराच मानवी व सेवाभावी आहे. अश्विनभाईंनी एक्सेलच्या औद्योगिक संस्कृतीची परंपरा पुढे नेऊन आज त्यांची तिसरी पिढी कार्यरत आहे.

तसा एक्सेलचा विस्तार देशभर आहे. रोहा, लोटे परशुराम, अहमदाबाद इ. ठिकाणी शाखा आहेत. सामाजिक बांधिलकी एक्सेल प्रारंभापासूनच करीत आहे. ज्या ठिकाणी आपला उद्योग उभा आहे, तिथल्या तरुणांना रोजगार देणे एवढेच काम न करता त्यांना सक्षम बनवणे, तसेच तेथील रहिवाशांच्या अडचणी सोडवणे आणि तेही स्थानिक जनतेला बरोबर घेऊन योजना राबवणे असे अश्विनभाईंचे धोरण असते. मराठवाडयात पडलेला दुष्काळ असो, पूरपरिस्थिती असो, महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न असो, शहरातील सांडपाण्याचा प्रश्न असो, पर्यावरण व ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्या असो - ते स्वत: त्यांचा वेध घेतात आणि लोकसहभागातून प्रश्न सोडवतात. अशी अनेक सेवाभावी कामे करण्यात ते अग्रेसर असतात. म्हणूनच सेवाभावी उद्योगपती म्हणून या परिसरातील लोक त्यांचा आदर करतात. रोहा व लोटे परशुराम येथे आरोग्य, शिक्षण, काळानुसार शेती, पशुपालन यांचे प्रशिक्षण देऊन अनेक गावांना स्वावलंबी केले आहे. कच्छसारख्या कमी पावसाच्या ठिकाणी स्वामी विवेकानंद रिसर्च ऍंड ट्रेनिंग इन्स्टिटयूटच्या माध्यमातून कमीत कमी पाण्यात शेती कशी करावी याचे उत्तम उदाहरण समोर आहे. शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतीमध्ये शिक्षण घेऊन, नोकरी न करता शेतीमध्येच संशोधन केले पाहिजे, यासाठी त्यांचा आग्रह असतो. उत्तन कृषी संशोधन संस्थेचे चेअरमन म्हणून ते विद्यार्थ्यांना हाच संदेश देतात.

गेल्या अनेक वर्षांपासून अश्विनभाई रसायन उद्योगाच्या विविध संस्थांशी निगडित आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील समूह चर्चांतून, परिषदांतून या विषयाचे वाचन, चिंतन, सेमिनार आदींमधून त्यांचा सहभाग असतो. ते भारतीय रसायन उद्योगातले तज्ज्ञ मानले जातात. तसे ते इंडियन केमिकल काउन्सिलचे अध्यक्षही होते. त्यांच्या या कार्याची नोंद म्हणूनच या संस्थेने त्यांना 'लाइफ टाइम ऍचिव्हमेंट अवॉर्ड' प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. रोहा इंडस्ट्रीज असोसिएशन फिक्की, सी.सी.आय., रामकृष्ण मिशन, ग्लोबल भाटिया फाउंडेशन, आयआयएम शिलाँग इ. अनेक संस्थांना त्यांच्या अनुभवाचा व मार्गदर्शनाचा फायदा झाला आहे.

 

अश्विनभाईंकडून शिकण्यासारखे बरेच आहे. साधी राहणी, उच्च विचारसरणी, जबाबदार नागरिकांनी आपली कर्तव्ये कशी पार पाडावीत, नीतिमूल्यांचे पालन, विनम्र, हसतमुख व्यक्तिमत्त्व, चांगले काम करणाऱ्यास पारखून त्यास कामाची पावती देणे व स्तुती करणे, सर्वांचा योग्य तो सन्मान करणे, बैठकीमध्ये ताणतणावाचे विषय हसतखेळत व सोप्या पध्दतीने हाताळण्याचे कसब, 'कम बोलो, मीठा बोलो, धिमा बोलो' याचे तर ते मूर्तिमंत उदाहरणच आहेत. उद्योगाला मानवी चेहरा देण्यासाठी स्वावलंबन, स्वदेशी तंत्रज्ञान अधिक महत्त्वाचे कारण या विचारानेच भारतासारखा ग्रामीण कृषी देश संपन्न होईल, असे अश्विनभाईंचे म्हणणे असते.

 

एक्सेल उद्योग समूहाचे व्यवस्थापन आजही मालकाप्रमाणे न राहता, एक विश्वस्त - ट्रस्टी म्हणून ते काम करताना दिसतात. या विश्वस्तपणाला त्यांनी बळ देऊन एक्सेलची ख्याती वाढवली. मा.श्री. अश्विनभाईंच्या मार्गदर्शनाखाली या उद्योग समूहाने घेतलेली यशाची उत्तुंग भरारी ही त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष आहे. आपण उद्योग क्षेत्रात काम करीत असताना या मातीशी जे अतूट नाते निर्माण केलेत, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

 

चंद्रहास मधुकर देशपांडे

9820426989