रा.स्व. संघ गैरसमजांचे आघातलक्ष्य

विवेक मराठी    22-Jan-2020
Total Views |

***ल.त्र्यं. जोशी****

संघ स्थापनेपासून ते आतापर्यंत संघाविषयी समाजात सतत विषपेरणी होत असल्याचे चित्र बघायला मिळते. तसे पाहिले तर संघाचे डाव छुप्या मार्गाने चालतात अशीही ओरड ऐकायला मिळते. याचेच एक ताजे उदाहरण द्यायचे झाल्यास हल्ली फेसबुकवर 'नये भारतका संविधान' या शीर्षकाखालील एक फेक पोस्ट व्हायरल करण्याचा प्रयत्न होत आहे. या निमित्ताने संघाचे विरोधक कोणत्या मर्यादेपर्यंत जाऊन देशभक्तांच्या या संघटनेविरुध्द अपप्रचार करायला लागले आहेत, हे उघडकीस येते.
 RSS_1  H x W: 0

केवळ आजच नाही, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 1925मधील स्थापनेपासूनच ही संघटना तिच्याबद्दल हेतुपूर्वक गैरसमज पसरविणाऱ्यांसाठी आघातलक्ष्य बनली आहे व ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे. खरे तर या संघटनेचे कार्य खुल्या मैदानावर चालते. संघाच्या शाखा - मग त्या सायं शाखा असोत, प्रभात शाखा असोत वा रात्र शाखा असोत, खुल्या मैदानांवर भरतात. तेथे आबालवृध्द जमतात, खेळ खेळतात, कवायती करतात, गाणी म्हणतात आणि त्याच खुल्या मैदानांवर भाषणादी बौध्दिक कार्यक्रमही खुलेपणानेच पार पडतात. पण वैषम्य या गोष्टीचे वाटते की, तिचे विरोधक तिचे कार्य गुप्ततेने चालत असल्याचा आरोप करण्यास विसरत नाहीत.


आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

या संदर्भातील अगदी ताजे उदाहरण द्यायचे झाल्यास हल्ली फेसबुकवर 'नये भारतका संविधान' या शीर्षकाखालील एक फेक पोस्ट व्हायरल करण्याचा प्रयत्न होत आहे. सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत यांच्या रंगीत छायाचित्राचा वापर करून जणू काय संघाने ती प्रसृत केली असे भासविण्याचा प्रयत्न करून संघाविषयी केवळ गैरसमजच नव्हे, तर चीड उत्पन्न होईल अशी तिची शब्दरचना आहे. इतःपर भारत हे हिंदू राष्ट्र म्हणून ओळखले जाईल व त्याला पूरक असे नव्या भारताचे संविधान असेल, असे त्यातून सूचित करण्यात आले आहे. विशेषतः दलित बांधवांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील व भारतीय संविधानावरील श्रध्देला तडे जातील अशा प्रकारची शब्दयोजना त्यातून संघाच्या नावाने खपविण्याचा प्रयत्न त्या पोस्टवरून स्पष्टपणे दिसून येतो. हे एक बरे झाले की, ही पोस्ट लक्षात येताच संघाच्या नागपूर विदर्भातील पदाधिकाऱ्यांनी तत्काळ पोलीस स्टेशन गाठले व या उपद्वयापाच्या विरोधात तक्रार सादर करून संबंधितांविरुध्द कठोर कारवाईची मागणी केली. या निमित्ताने संघाचे विरोधक कोणत्या मर्यादेपर्यंत जाऊन देशभक्तांच्या या संघटनेविरुध्द अपप्रचार करायला लागले आहेत, हे उघडकीस येणे ही या प्रकाराची फलश्रुती म्हणावी लागेल; पण ती तेव्हाच, जेव्हा सरकारी यंत्रणा त्या गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्याविरुध्द कठोर कारवाई करेल.

 
RSS_1  H x W: 0

संघाविरुध्दच्या अशा उचापती तशा नवीन नाहीत. 1925मध्ये संघाची स्थापना झाल्यापासूनच हितसंबंधी मंडळी आपल्या डोक्यातून एकाहून एक भन्नाट कल्पना काढून संघासंबंधी हेतुपुरस्सर गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. या बाबतीत प्रस्थापित सरकारेही मागे राहिलेली नाहीत. इंग्राजी राजवटीत संघाचा गणवेश लष्करी धाटणीचा असल्याचे खुसपट काढून तत्कालीन सरकारने संघाच्या गणवेशातील सदऱ्याच्या खाकी रंगावर आक्षेप घेतला होता. इंग्राजांना वाटले की, असे करून आपण संघाच्या विस्ताराला रोखू शकू. पण घडले उलटेच. संघाने गणवेशातील आपल्या सदऱ्याचा खाकी रंग बदलून पांढरा केला आणि तरीही संघ वाढतच गेला.

 

संघ ब्राह्मणांचा आहे असा गैरसमज पसरविण्याचा महाराष्ट्रातील विरोधकांनी चंगच बांधला होता. महात्माजींची हत्या करणारा नथूराम गोडसे हा योगायोगाने ब्राह्मण निघाल्यामुळे तर या विरोधकांना संघाविरुध्द विषपेरणी करण्याची आयतीच संधी मिळाली व त्यांनी तिचा उपयोगही करून घेतला. पण त्यामुळे ते संघातील बहुजन समाजातील बांधवांचा संघातील सहभाग मात्र रोखू शकले नाहीत. कारण त्या वेळी आणि आताही संघाचे बहुसंख्य पदाधिकारी बहुजन समाजातील कार्यकर्तेच आहेत. पण एक वेळ अपप्रचारच करायचा असे ठरल्याने वस्तुस्थितीची शहानिशा करावी असे कुणाला वाटणे शक्यच नव्हते.

 
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/  
 

वास्तविक संघ म्हणजे जातिभेद निर्मूलनाची एक यशस्वी प्रयोगशाळा आहे आणि महात्मा गांधी यांनी स्वतः याचा अनुभव घेतला आहे. डॉ. हेडगेवारांच्या काळात बापूजींनी वर्धा येथील संघशिबिराला स्वतः भेट देऊन आणि स्वयंसेवकांजवळ जातीसंबंधी शहानिशा करण्याचा प्रयत्न त्यांनी केला असता संघात जातिभेद पाळला जात नाही आणि मानलाही जात नाही याची त्यांनी खात्री करून घेतली होती. पण जातिभेदाबाबतचा सर्वात गंभीर आरोप जर कुणावर केला जात असेल तर तो संघावर, असा आपला अनुभव आहे. खरे तर निवडणुकीच्या या काळात जवळपास सर्वच राजकीय पक्षांना जातिभेदांच्या रोगाने अक्षरशः ग्राासले आहे. किंबहुना विशिष्ट जातीचे विशिष्ट पक्ष बनले आहेत. निवडणुकीतील तिकीटवाटपही जातींच्या आधारावर होऊ लागले आहे. अशा लोकांनी केवळ संघाविषयी गैरसमज करण्याच्या दुष्ट हेतूने बेछूट आरोप करावेत हे केवळ दुर्दैव म्हणावे लागेल. वस्तुस्थिती तर अशी आहे की, वर्षानुवर्षे संघात वावरणाऱ्या स्वयंसेवकांना परस्परांची जातच माहीत नसते. कारण कुणी कुणाला त्याबाबत विचारतच नाही.

 
RSS_1  H x W: 0

श्रीगुरुजींच्या काळात 'दैनिक नवाकाळ'चे, नुकतेच दिवंगत झालेले संपादक निळूभाऊ खाडिलकर यांनी त्यांची मुलाखत घेतली होती. तिला पहिल्या पानावर प्रसिध्दीही देण्यात आली होती. प्रश्नोत्तरे अशा रितीने सादर करण्यात आली होती की, कुणाला संघ चातुरर््वण्याचा जणू पुरस्कर्ताच आहे. त्या प्रसिध्दीवरून महाराष्ट्रात संघाविरुध्द वातावरण तापविण्याचाही प्रयत्न झाला. वास्तविक त्या काळात संघाने त्या संदर्भात खुलासा प्रसिध्द करून आपली भूमिका स्पष्ट केली. पण ज्यांना संघाविषयी गैरसमज कायम ठेवायचा होता, त्यांना त्याचे काय? नंतरचे सरसंघचालक स्व. बाळासाहेब देवरस यांनी तर अस्पृश्यता हा हिंदू समाजावरील कलंक असल्याचे घोषित केले. अस्पृश्यता जर वाईट नसेल तर या जगात काहीच वाईट असू शकत नाही, इतक्या स्पष्ट शब्दात संघाची भूमिका विशद केली. संघाविषयी ज्यांच्या मनात प्रामाणिक गैरसमज होते ते दूरही झाले, पण शंकासुरांचे समाधान कोण व कसे करणार?

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/  
 

या सगळया स्थितीची संघाला जाणीव असली, तरी अशा लोकांच्या तोंडी लागण्याच्या भानगडीत संघ सहसा पडत नाही. कारण अनुभवाच्या आधारे लोकांचे गैरसमज आपोआप दूर होतील, यावर त्याचा विश्वास आहे आणि अनुभवही तसाच आहे. संघकार्याचा जसजसा विस्तार होत आहे, राष्ट्रजीवनाच्या विविध क्षेत्रात संघस्वयंसेवकांच्या निःस्वार्थी सेवेचा समाजाला जसजसा साक्षात्कार होत आहे, तसतसा लोकांचा संघकार्यावरील विश्वास वाढून त्याचे श्रध्देत रूपांतर होत आहे आणि याच पध्दतीने गैरसमज दूर होतील, अशी संघाची दृढ धारणाही आहे.

 

 9422865935
ज्येष्ठ पत्रकार, नागपूर