रोजच्या जगण्यातलं संविधान

विवेक मराठी    23-Jan-2020
Total Views |

नागरिकांना उत्तम जगण्याची हमी ज्याद्वारे मिळणार तो कायदा म्हणजे संविधान. तसं पाहिलं तर आपल्या रोजच्या जगण्यातंही आपण संविधानाची मूल्ये जगत असतो. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही राज्य घडवणं हा आपल्या संविधानाचा उद्देश आहे. आपण त्या तत्त्वांची सुरुवात कुटुंबातूनच करीत असतो. आपल्या कुटुंबाचाही एक उद्देश आहे की सर्वांची आर्थिक, सामाजिक प्रगती व्हावी. समाजवादाचा हाच नियम आहे. यासाठी आपणही आपल्यासाठी स्वतःहून काही नियम घालून घेतो. म्हणजे आपणही आपल्या रोजच्या आयुष्यात संविधान जगत असतो. 

 


 Everyday living constitu

 

 

''आई, ह्या परीक्षेला सिविक्स म्हणून इतिहासाबरोबर वेगळा पेपर असणार आहे. हे काय नवीनच?'' शाळेतून लेक अशी जराशी तणतणतच आली. गणित, विज्ञानापेक्षा तिचा सामाजिक शास्त्रांचा अभ्यास घ्यायला मला नेहमीच आवडतं, त्यामुळे ह्यावर अवांतरही जरा अधिकच बोललं जातं. आणि मग शाळेत शिकवायला सुरुवात केल्यानंतर तिचे प्रश्न अधिकच वाढत गेले. ''आई, संविधान म्हणजे तू म्हणाली होतीस की त्या कायद्याने दिल्लीत किंवा राज्यात सरकार चालतं. जर तो देशाचा कायदा, तर तो आत्ताच आम्ही शिकून काय होणार?'' म्हटलं, ''अगं केवळ तेवढंच नाही, तर आपलं संविधान चांगले नागरिक घडवण्याचंही काम करतं. नागरिकांना त्यांचे अधिकार देतं, त्यांची कर्तव्ये काय आहेत हे सांगतं आणि चांगली मूल्यही शिकवतं.''

 

 

तिला अजून पुरेसं पटत नव्हतं. म्हणाली, ''अगं, पण ते तर आपण इथे कुटुंबात शिकतो म्हणालीस ना तू! मग असं पूर्ण देशाचं असं एक काही असण्याची काय गरज आहे?'' 

 

तिच्या दृष्टीने प्रश्न बरोबरच होता. पण काही शाश्वत मूल्य, नैसर्गिक अधिकार हे तर सर्वमान्य आहेत. ज्या नागरिकांच्या संदर्भातील तरतुदी संविधानात आहेत, तीच मूल्यव्यवस्था हजारो वर्षं माणूस म्हणून उत्क्रांत होताना आपण जपली आहे. ती आपल्या कुटुंबात असतेच, तशीच ती आपल्या रोजच्या जगण्यातही असते. शेवटी देश म्हणजे केवळ भूभाग नाही. तो पुढे नेणारी माणसंच आणि तो ज्या तत्त्वांवर पुढे जाणार तो कायदा म्हणजे संविधान, ज्यामुळे नागरिकांना उत्तम जगण्याची हमी ज्याद्वारे मिळणार तो कायदा म्हणजे संविधान. ह्यावर आणखी थोडा विचार केला आणि ''पुढचे काही दिवस आपल्या जगण्यातलं संविधान शोधू या'' असं तिला म्हटलं. म्हणजे रोजचे लहान लहान प्रसंग घ्यायचे आणि त्यामध्ये कोणती मूल्यं, कोणते अधिकार वा कर्तव्यं आहेत किंवा संविधानाची इतर कोणती तत्त्वं सापडतात असा खेळ खेळायचा ह्यासाठी तिला तयार केलं. अर्थात सुरुवातीला काही उदाहरणं दिली.

 
constitution of india boo

 

''हे बघ, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही राज्य घडवणं हा आपल्या संविधानाचा उद्देश आहे. आपण त्या तत्त्वांची सुरुवात कुटुंबापासूनच करू शकतो. आपल्या कुटुंबाचाही एक उद्देश आहे की सर्वांची आर्थिक, सामाजिक प्रगती व्हावी. समाजवादाचा हाच नियम आहे. त्यासाठी आपण काही नियम केले आहेत. नियम बदलायचे झाले तर आम्ही एकत्र येऊन ठरवतो. तू लहान असलीस तरी तुझं मत विचारतो. हीच ती लोकशाही! काही नियम अगदी घट्ट आहेत जे कधीच बदलले जात नाहीत. काही मात्र वेळेप्रमाणे बदलतो. अगदी आपल्या देशाच्या संविधानासारखे. जातपात पाळत नाही, मोठयांचं ऐकतो, नवी खरेदी करताना, पैसे खर्च करताना सगळे विचार करून करतो, घरात सण नेमाने साजरे करतो, तुझा अभ्यास, बाबांची नोकरी, माझी कामं, आजोबांची पूजा-अर्चा हे अगदी फिक्स नियम झाले. पण येण्याजाण्याच्या वेळा, टीव्ही बघणं, मित्र-मैत्रिणी बोलावणं ह्यामध्ये सोयीनुसार बदल करतो. आपल्या घरातली ही व्यवस्था आपण निर्माण केली आहे. ती काही इतर कोणी आपल्याला दिली नाहीय. सार्वभौमचा अर्थ असाच तर होतो.''

 

 

''ओह! म्हणजे आपण एक मिनी संविधानच जगत आहोत म्हण ना मम्मा!'' माझं शांतपणे ऐकून घेतल्यावर ती म्हणाली. 

 

''हो आणि फक्त कुटुंबंच नाही, तर आपली सोसायटी, तुझे मित्र-मैत्रिणी ग्राूप याबद्दल तू असाच विचार करून बघ ना! तिथेही थोडयाफार फरकाने हेच दिसेल.''

 

काही दिवस संविधानातील स्वातंत्र्य, समता, प्रतिष्ठा, एकता, एकात्मता आणि बंधुता यांची ओळख करून दिल्यावर तिला पुन्हा एकदा आमचा खेळ लक्षात आणून दिला आणि एकदा शाळेतून आल्या आल्या, ''शाळेतर्फे एका स्पर्धेसाठी नाटक बसवायचं आहे, म्हणून सगळया इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ऑडिशन्स झाल्या'' असं म्हणाली. मुलं निवडण्यामध्येच पूर्ण वेळ गेला. हीच तर संधीची समानता. त्यामधली काही मुलं कदाचित पुन्हा कधीच नाटक करणार नाहीत, काही कलाकारही होतील. आत्ताच जर त्यांना संधी मिळाली तर आपल्याला काय आवडतं, काय करायचं आहे हे शोधण्याचा वाव मिळेल. प्रत्येकाला अशी फुलण्याची सारखीच संधी उपलब्ध असणं म्हणजे समानता. मग त्यामध्ये मुलगा, मुलगी, वेगवेगळया जाती, वेगवेगळे धर्म असा फरक न करणं म्हणजे समानता. आता मुलगी म्हणून आपल्याबरोबर फरक केला जाऊ नये हे आपल्याला कळतं, पण आपणही इतरांबरोबर असा कुठल्याच बाबींवर फरक न करणं ही सवय लावून घ्यायला पाहिजे. तुम्ही एका चांगल्या शहरातल्या चांगल्या शाळेत आहात, त्यामुळे हा फरक अजून लक्षात येत नसेल. पण मोठं झाल्यावर लक्षात येतं, अजूनही घरातही मुलींचं स्थान दुय्यमच आहे. तिला तिच्या इच्छा, अपेक्षा ह्यांना प्राथमिकता देता येत नाही. तीही स्वतःला बरेचदा कमीच लेखते, स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष नसतं, स्वतःची स्वतंत्र मतं नसतात. अगदी साधं उदाहरण आहे, तिला एकाच कामाचे पैसेही पुरुषाहून कमी मिळतात.''

 
constitution of india boo

''पण मग आपण काय करू शकतो?'' समज्ञाच्या ह्या प्रश्नावर लेक्चर थांबवून म्हणाले, ''आपले हक्क आणि कर्तव्यं माहीत असणं हे सर्वात महत्त्वाचं. ते आपल्याला आपलं कळलं की मग आपण इतरांच्याही हक्काचा आदर करतो आणि कर्तव्यांची जाणीव करून देऊ शकतो. संविधानातील ह्या सगळया मूल्यांचं रक्षण आणि संवर्धन करायला आपलं सरकार आणि न्यायालय जबाबदार आहेच, पण एक जागरूक नागरिकच ह्या मूल्यांचं रक्षण अधिक चांगल्या पध्दतीने करू शकतो. पुढे जाऊन एखाद्या आस्थापनेमध्ये, समूहामध्ये काम करत असताना वैयक्तिक पातळीवर झालेली रुजवण फार महत्त्वाची असते.''

 

ही वेळ होती तिला आरक्षण, राखीव जागा ह्यांबद्दल कल्पना द्यायची. तसं सर्वच तिच्या लक्षात आलं नसावं असं वाटलं. पण बालगोकुलमच्या ट्रेकवरून आली आणि म्हणाली, ''आई, अगं तिकोना गडाच्या पायऱ्या खूप स्टीप होत्या. ट्रेक छोटा होता, पण अवघड होता. शरूची आई, सोहम आणि आणखी काही जण वरपर्यंत आलेच नाहीत. नेहा, मल्हार यांच्या सॅक्स योगेशकाकांनी घेतल्या, मग ते आले. मला वाटतं जे जरासे वीक आहेत, त्यांना असा मदतीचा हात द्यावा लागतो ना? मला तू परवा सांगितलेलं रिझर्वेशन आठवलं.'' तिच्या एवढया विचारावर मला सार्थक झाल्यासारखं वाटलं आणि मग समोरच्या काकूंच्या घरातून फिशचा वास आल्यावर आपल्या घरात हवं ते खाणं-पिणं हा त्यांचा खाजगीपणाचा अधिकार, जेएनयू संदर्भातील बातम्या बघताना सभ्यतेच्या, सुव्यवस्थेच्या मर्यादा पाळूनच आपली मतं प्रदर्शित करणं हा आपल्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा अधिकार अशा गोष्टी आम्ही शोधत राहिलो. अजंठा-वेरूळच्या लेण्या बघताना, ''आई, इथे सगळयांचेच देव एका ठिकाणी आहेत असं नाही का तुला वाटत?'' असं म्हटल्यावर, ''आपल्याला योग्य वाटेल त्या अध्यात्मिक वाटेनं जाण्याचा आणि आपला विश्वास असेल ती उपासना करण्याचा अधिकार आपल्याकडे प्राचीन काळापासून आहेच, पण सगळे शांततेत एकत्र नांदत असल्यानेही तुला अनेक लेण्यांमध्ये ब्राह्मणी (वैदिक), जैन, बौध्द अशा लेण्या दिसतील. आणि फक्त लेण्या, मूर्ती म्हणजे कलाच नाही, तर ज्याला दर्शनं म्हणतात अशी अनेक महापुरुषांनी सांगितलेली अनेक तत्त्वज्ञानं तुला नंतर कळतील. सांग बरं ह्याचा अर्थ...''

 

ह्याचा अर्थ आपण विचार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपली-जपतो. अशा अनेक गोष्टी अधूनमधून समोर येत राहिल्या.

 

''पण हक्कांबरोबर कर्तव्यही असतात. नागरिक म्हणून देशासाठी अशी अनेक कर्तव्यं पार पाडण्यास आपण बांधील असतो. दुसऱ्यांच्या हक्काचा आदर करणं हे एक कर्तव्यच झालं. म्हणूनच ह्याला एका नाण्याच्या दोन बाजू म्हणतात. आपल्याला ज्या विचारांमुळे स्वातंत्र्य मिळालं त्यांची जोपासना करणं, देशाची सार्वभौमता, एकता आणि एकात्मता राखणं, मैत्रभाव, बंधुभाव जोपासणं ही ह्यापैकी काही. त्यामुळे देशविघातक काहीही करणं, घोषणा देणं, लिहिणं, राष्ट्रपुरुषांचा अनादर करणं हे चूक. म्हणूनच आत्ता त्या दिल्लीच्या कॉलेजमध्ये जे चालूय, त्यावरून आणि परवा मुंबईत ती मुलगी 'फ्री काश्मीर' हे पोस्टर हातात धरून होती तिच्यावरून गोंधळ चालू होता का?'' लेकीने इतक्या लगेच हे रिलेट केलं, ह्याचं आश्चर्य वाटलं. ''हो, निदर्शनं करणाऱ्या महेक मिर्झा प्रभू ह्या मुलीविरुध्द तक्रार करण्यात आली आहे. हा गुन्हासुध्दा आहे. आपण आपल्यावर अन्याय होत असेल असं वाटलं, काही पटलं नाही तर निषेध जरूर करू शकतो, मात्र शांततापूर्ण मार्गानेच तो करावा लागतो. कारण आपल्या संविधानाचं पालन आणि आदर करणं, देशाच्या ध्वजाचा आणि राष्ट्रगीताचा आदर करणं ही तर आपली आद्य कर्तव्यं. बघ, कोणताही कायदा हा लोकशाही मार्गाने तयार झालेला असतो, त्याविरोधात तुम्ही शांततेने न्यायालयात जाऊ शकता, कारण तो अधिकार संविधानानेच दिला आहे. मात्र अशा प्रकारे आंदोलनं, निदर्शनं करणं म्हणजे संविधानाचा अनादर करणं, देशाच्या एकात्मतेला धोका पोहोचवणं.''

 

''आई, आज मला कळलं की राष्ट्रगीत चालू असताना - अगदी थिएटरमध्ये किंवा शाळेच्या गेटपाशीसुध्दा ऐकू आलं तर आपण सगळे उभे का राहतो! आदर व्यक्त करण्यासाठी ना? आणि त्याचसाठी 26 जानेवारीला किंवा 15 ऑगस्टला झेंडे कागदासारखे पायाखाली तुडवू नका वगैरे सगळे सांगत असतात, बरोबर ना?''

 

''हो, अर्थातच, ते संविधानात लिहिलेलं एक कर्तव्य आहे. त्याबरोबरच आपल्या संस्कृतीचा समृध्द वारसा खूप महत्त्वाचा आहे म्हणून तो जपणं, वनं, नद्या अशा नैसर्गिक पर्यावरणाचं रक्षण करणं, सुधारणा करणं, सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करणं आणि हिंसाचाराचा त्याग करणं हेसुध्दा त्यामध्येच येतं. म्हणूनच कचरा वा निर्माल्य अशा गोष्टी रस्त्यांवर वा नद्यांमध्ये न टाकणं, नद्या, जंगलं, पर्यटन स्थळं स्वच्छ ठेवणं हे जाणीवपूर्वक करतो आपण. कारण हे सगळं आपलं आहे ना! त्याचबरोबर आपल्या लहान मुलांना शिक्षणाच्या संधी देणं हेसुध्दा कर्तव्यांमध्ये येतं. माणूस म्हणून आपण सतत प्रगत होत असतो. सतत बदलत असतो. उन्नतीच्या मार्गावर जाण्याचा, परिपूर्ण होण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन, मानवतावाद आणि शोधक बुध्दी व सुधारणावाद यांचा विकास करणं हे माणूस म्हणून आपलं कर्तव्य आहे, हेसुध्दा आपल्या संविधानात म्हटलं आहे. एका अर्थाने अंधश्रध्दा दूर करणं, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला बाधा येईल अशा प्रथा सोडून देणं अशा कितीतरी गोष्टी आहेत, ज्यामध्ये ह्याचा अर्थ सापडतो.''

 

''व्वा! आई, तुम्ही सांगता त्या बऱ्याच गोष्टी ह्यामध्ये आहेत. म्हणजे तू सांगत होतीस तो तीन तलाक रद्द केला, तेसुध्दा ह्याप्रमाणेच ना?''

 

 

''हो, ह्याप्रमाणे आणि त्याला समता, स्त्री प्रतिष्ठा असे मूलभूत अधिकार यांचाही आधार आहे.''

 

 

''पण सगळंच आपणच करायचं का? आपण ज्यांना निवडून देतो, त्यांनीही करायच्या काही गोष्टी असतीलच ना? मग त्या कुठे लिहिल्या आहेत का?'' समज्ञा अजूनही उत्सुक होती, हे बघून बरं वाटलं. 

 

 

''आहेत ना, पण त्या राज्यांना मार्गदर्शक म्हणून आहेत. आणि राज्यं त्या मार्गदर्शक तत्त्वांवर चालताहेत की नाही हे बघणं मतदार म्हणून आणि नागरिक म्हणूनही आपलं कर्तव्यच आहे. शेवटी फक्त स्वतःचा विचार न करता जागरूक नागरिक म्हणून आपल्या जाणिवा वाढवणं महत्त्वाचं!'' - मी. 

 

 

''म्हणजे काय? ह्यामध्ये आपण काय करू शकतो? आणि ते नाही त्याप्रमाणे वागले, तर?''

 

''हे बघ, जर मूलभूत हक्कांविरोधात वागलं, तर कोर्टात जाऊ शकतो; पण ह्या तत्त्वांच्या विरोधात वागलं, तर अगदी कोर्टात जाऊ शकत नाही, पण त्याप्रमाणे वागणाऱ्या लोकांना मत देऊ शकतो, न वागणाऱ्यांना नाकारू शकतो. ह्यामध्ये आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, वंचित घटकांचं आर्थिक हितसंवर्धन, पर्यावरण रक्षण, स्त्री-पुरुषांना समान काम समान वेतन, एकरूप नागरी संहिता, उपजीविकीचं साधन मिळण्याचा स्त्री-पुरुषांचा समान हक्क, लोककल्याण, विषमता निर्मूलन अशा अनेक गाइडलाइन्स आहेत.''

 

 

''आई, तू परवा एका कंपनीच्या कमिटीवर गेलीस असं म्हणालीस आणि त्या संदर्भात तू त्यांना फोनवर समानता, भेदभाव असं काही सांगत होतीस ते हेच, बरोबर ना?'' 

 

 

''अगं, ते त्या कमिटी निर्माण होण्यामागचं तत्त्व होतं. तो एक कोर्टाने दिलेला निकाल होता. आपले हक्क संरक्षण करण्यासाठी नवनवीन कायदे होत असतात. स्त्रियांना मुक्त वातावरणात काम करायला मिळावं यासाठी कामाच्या ठिकाणी कोणाचा त्रास होऊ नये, म्हणून एका कायद्याद्वारे कमिटी स्थापन करायची असते, जिथे ती स्त्री सहजरीत्या तक्रार करू शकेल. व्यक्तिगत स्वातंत्र्य म्हणजे केवळ शरीराने अस्तित्वात असण्याचा अधिकार नाही, तर प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार. असा स्त्रीचा अधिकार मानून हा कायदा आणि समित्या स्थापन झाल्या. अगदी उपजीविकेचा, रोजगाराचा, वैद्यकीय मदतीचा, कायदेशीर मदतीचा, स्वच्छ प्रदूषणमुक्त हवेचा, शिक्षणाचा, काही प्रसंगी अटक होताना बेडया घातल्या न जाण्याचा हक्क, निवाऱ्याचा, एखाद्या कामगाराचा आरोग्य आणि वैद्यकीय सुविधांचा हक्क, अगदी प्रतिष्ठेचा अधिकारही घटनेतील ह्या व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या अधिकाराखाली मानला. आपणही असे स्वतंत्र आहोत ना हे बघणं आणि बघत राहणं म्हणजे जागरूकता. ही उदाहरणं शोधत राहणे म्हणजे जागरूकता.''

 

हा विषय आणि हा खेळ आमच्याकडे अजून चालूच आहे. तुम्ही सुरुवात करणार ना? मला कळवत राहा. vibhabidve@gmail.comवर!