चिरंतन उत्साहाचा झरा महेंद्र बुवा

विवेक मराठी    28-Jan-2020
Total Views |

**सुभाष सोनवणे**

 अंतापूर (ता. सटाणा, जि. नाशिक) येथील रहिवासी व हल्ली सोलापूर निवासी असलेले संघकार्यकर्ते महेंद्र बुवा यांचे सोलापूर येथे नुकतेच अपघाती निधन झाले. तीन वर्षे संघ प्रचारक, दोन वर्षे वनवासी कल्याण आश्रम पूर्णकालीन कार्यकर्ता व गेले एक वर्ष जनकल्याण समितीचे सोलापूर जिल्ह्यात अंशकालीन कार्यकर्ते तसेच मालेगाव जिल्हा संघ कार्यकारिणीत काही वर्षे काम केलेल्या महेंद्र बुवा यांच्याविषयीचा श्रध्दांजली लेख.

mahendrabuva_1   

सोलापूर येथे रेल्वे आसरा चौकातील रुळाजवळ आढळलेला मृतदेह हा इतर कुणाचा नसून अंतापूर, तालुका बागलाण येथील महेंद्र माधव बुवा या संघ कार्यकर्त्याचाच आहे, हे समजल्यावर अंगावर विजेचा लोळ कोसळावा तसा मानसिक आघात आम्हा सर्व अंतापूरवासीयांवर झाला. आणि त्या तारखेच्या वृत्तपत्रातील स्थानिक विभागात या अपघाताचे वृत्त प्रसिध्द झाले. सोशल मीडियावरही ती सर्वत्र धडकली. त्यामुळे सोलापूर परिसरातील स्वयंसेवक आणि संघटनेच्या मनात खळबळ उठली. त्या दिवसभरात आणि दुसऱ्या दिवशी ही सत्य घटना बाहेर येईपर्यंत गावकऱ्यांचे मन थाऱ्यावर नव्हते. नेमके काय घडले असेल? हा खरोखर घातपात म्हणावा की अपघात? अशा नाना शंकांनी गावातील वातावरण कुंद झाले होते. खरी घटना समजताच गावातील स्वयंसेवक बांधवांनी जनमानसात निर्माण झालेले शंकाकुशंकांचे काळे सावट दूर केले. जनमानसात असलेली त्याची प्रतिमा उजळून निघाली.


आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

तो गावात लहानपणापासून भिक्षुकी करत असे. त्या निमित्ताने घराघरात त्याचे जाणे-येणे होत असे. त्यामुळे बंजू महेंद्र बुवा कुणाला माहीत नाही असे नाही. साखर पाण्यात विरघळावी तसा तो सगळयांच्या मनामनात विरघळून गेला होता आणि स्वतःच्या वर्तनातून स्वयंसेवकांचा समरसतेचा धडा त्याने पाठीमागे ठेवला.

''आजची एकादशी'' असे घरोघरी दर एकादशीला जाऊन साद घालणारा हा किशोरवयातील बंजू 'वाढता वाढता वाढला, भेदिले सूर्यमंडळा' या शब्दात वर्णन करता येईल एवढा संघकार्यात मोठा झाला. संघाच्या छत्रछायेखालीच तो वाढला आणि आश्चर्य म्हणजे एखाद्या डेरेदार वृक्षाप्रमाणे वाढून इतर घटकांनाही घडवले.

'आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना' हे पद केवळ गाऊनच नव्हे, तर इतरांना संघाच्या शाखेत खेचून घडवले, हा त्याच्या प्रगतिपुस्तकावरील एवढा मोठा शेरा वाचून कुणीही थक्क होईल.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/  

जीवनपटावरील त्याच्या हालचाली जरा घाईच्याच झाल्या असे म्हणावे लागेल. 50व्या वर्षीच जीवनपट गुंडाळण्याची घाई नियतीने का करावी? त्याच्या बाबतीत हा नियंत्याचा निर्णय मन सुन्न करणारा आहे.

 

संघपरिवारात स्वयंसेवकांच्या बाबतीत तो एक मानदंड ठरला यात काही नवल नाही. 'तुझा तू घडवीत जा' या उक्तीप्रमाणे स्वप्रयत्नातून तो स्वतः घडला.

 

'असतो मा सदगमय, तमसो मा ज्योतिर्गमय' ही प्रार्थना म्हणता म्हणता प्रकाशाचा मार्ग आक्रमत राहिला. जेथे जेथे ईश्वरी कार्य दिसेल तिथे तिथे तो उपस्थित राहिलाच असेल. मग ते स्वाध्यायाचे कार्य असो की रामदेव बाबा प्रणीत योगासनांच्या प्रसाराचे असो! तो आमच्या डोळयांपुढे वाढत गेला आणि वाढतच राहिला. शाखाप्रमुखाची धुरा त्याच्याकडे त्याला न सांगताच आली आणि तो संघपरिवारात स्थिरदेखील झाला.

नयन महाराज अंतापूर संस्थान महाराजांच्या सातव्या पिढीत बंजूचा जन्म झाला. भागवतकार संजय महाराज बुवा हे त्यांचे ज्येष्ठ बंधू धुळे येथे स्थायिक आहेत. द्वितीय स्थान बंजूचे. दिगंबर, गणेश आणि खगेंद्र असे एकूण पाच भाऊ व एक बहीण. वडील विठू महाराज दिवंगत व आई असा त्यांचा परिवार.

 

अंगभूत शांती हा बंजूचा मोठाच गुण होता. त्याच्या या गुणांमुळेच संघकामात तो चांगलाच रुळला. 'क्षमा पुरुषस्य भूषणम्' यामुळेच तो विविध पदांपर्यंत चढत गेला. प्रचारक म्हणूनही काही वर्षे त्याने सेवा कार्यात घालवले.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/  

संघसंस्कारात वाढलेली अर्धांगिनी त्याला लाभली. एका परीने बंजू भाग्यवान खरा. त्याच्या गृहस्थाश्रमाच्या वृक्षाला तीन फळे लागली. तिघीही कन्या. प्रथम जुळया मुली, नंतर एक मुलगी. कन्यादानाच्या पुण्यफळास तो अंतरला. त्याची पत्नी अंगणवाडी सुपरवायझरपदावर सेवेत आहे. प्रपंचात परस्परांना समजून घेणे, एकमेकांना सावरणे हेच खरे सार आहे. याही बाबतीत बंजू नशीबवानच म्हणायचा.

पौराहित्याच्या बाबतीत एक वेळेची (वेळ पाळण्याची) तक्रार सोडली, तर त्याचे पौराहित्य खरोखर उल्लेखनीय असे होते. मनःपूर्वक सर्व विधी विधिवत पार पाडण्यावर त्याचा नेहमीच आग्राह असे.

एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची म्हणून नोंद घेतली गेलीच पाहिजे, जीवनापेक्षा संघकार्यात तो अधिक रमलेला असे. तसे त्याचे कनिष्ठ बंधूदेखील संघकार्यात हातभार लावणारे आहेत. दिवंगत विठू महाराज, पिताश्री जरी प्रत्यक्ष संघ कार्यक्रमाला दिसले नाहीत तरी संघकार्याची त्यांना गोडी होती. सांगायचा मुख्य मुद्दा विषय राहिला 'अवघा नारायण या धर्तीवर' हे सर्व श्रेय जाते श्रीराम वसंत खरे यांच्या दिवंगत मातोश्री मालतीआजींना. संघाचे पायस त्यांनी आम्हाला भरभरून पाजले अंतापुरात संघ पुष्ट झाला.

बंजूच्या घरी दारिद्रयाचे लेणे, पण म्हणून प्रतिकूल परिस्थितीत बिलकुल नाराज न होता तो परिस्थितीशी दोन हात अखेरपर्यंत करीतच राहिला झुंजतच राहिला.

 
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/  
 

पन्नास वर्षाचा अवघा त्याचा जीवनपट. या पन्नास वर्षात बाल शाखेपासून सुरू झालेला प्रवास संघाच्या सर्व स्तरांवरील पदांपर्यंत त्याने पूर्ण केला. संघाच्या कक्षेबाहेरील कामदेखील त्याच निष्ठेने तो पार पाडीत असे आणि म्हणूनच स्वयंसेवकांच्या कंठातील मणी होऊन बसला. ही त्याच्या कार्याची पावती होती. त्याप्रमाणे त्याचे व्यक्तिमत्त्वही लोभस असे होते.

 

जे बीज भुई रुजविले, ते वरी रुक जाहाले

कैसे इंद्रियांद्वारे भागले अंतरीची की,

मनोनी आधी उठी, तेची वाचे दिठी, कंठाशी ये...

या ज्ञानेश्वरीत माउलींनी सांगितलेल्या शब्दात बंजूचे व्यक्तिमत्त्व साकारलेले होते. आत एक बाहेर एक असे कधी त्याला जमलेच नाही.

अंतापूरच्या दंगलीच्या काळात पोलिसांनी 144 कलम लावले. तरीही या बहाद्दराने गावात संचलन काढलेच स्वतःच्या हिमतीवर आणि ते सफलही झाले. जमावबंदी असतानाही आम्ही काय विघातक काम करीत आहोत का...? असा प्रश्न विचारून पोलिसांना निरुत्तरदेखील केले होते.

रात्रीच्या अंधारात प्रकाश हरवून बसलेल्या बाइकचा प्रवास, भर थंडीत अंगात संरक्षणात्मक कपडेही नसताना बाइकवर स्वार होऊन केलेला प्रवास असे कितीतरी प्रसंग त्याच्या स्मृती मागे ठेवून जातात. त्याच्या ठायी असलेली ही बेदरकार वृत्ती त्याला संघकार्यात सतत पुढे रेटत होती.

त्याची एकूण अशी ही जीवनयात्रा पाहता एका इंग्लिश कवीने लिहिलेल्या ओळी उद्धृत कराव्याशा वाटतात

Woods are lovely dark and deep

But I have promises to keep

And miles to go before I sleep

And miles to go before I sleep.

मनोरंजक वनराईचा मोह टाळून तू संघकार्यात अनेक महत्त्वाची कामे केली. डोळे मिटण्यापूर्वी तसा तू वचनबध्द होतास की काय?

 आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

पाय झाकू जाता तोंड उघडे पडते, आखूड चादरीची रीतच अशी असते. जीवनातही असेच असते. व्यवहारी जनतेने व्यवहारी मोजपट्टीने केलेले माप. कदाचित त्यांच्या मोजपट्टीचे माप पुढे येत नसेल, अपुरे पडत असेल. परंतु दूरदृष्टीने जीवन जगणारे तुझे योग्य मूल्यांकन करतील.

 

जली मानस सरोवरीचा तू राजहंस एक...

परी हे तुजला गणतील काक...

(सटाणा तालुका संघचालक जिल्हा - नाशिक(