अमन आणि शांतीसाठी कार्यरत निडर दांपत्य

विवेक मराठी    29-Jan-2020
Total Views |

*** मेधा किरीट***

  मोहम्मद अन्वर खान आणि बेगम नगीना भाभी
 
BJP_1  H x W: 0

 अन्वरभाई भाजपाचे काश्मीमधील प्रमुख नेते. पण गेल्यावर्षी त्यांच्यावर चार दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यातून ते कसेबसे वाचले. तरीही अमन आणि शांतीसाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. 

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/  

श्रीनगरमध्ये पूर! कुठूनतरी बातमी आली. तशी काश्मीरबद्दल फार माहिती नव्हती. असलीच तर भीती जास्त होती. दहशतवादी, 370 कलम, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा संशयास्पद मृत्यू... काश्मीर म्हटले की हेच विषय मनात येत. काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे आणि त्याचे लचके तोडून काही भाग पाकिस्तानकडे, तर काही चीनकडे गेलेला आहे अशी जुजबी माहिती.

त्यातच या पुराआधी आम्ही अमरनाथ यात्रेला जाऊन आलो होतो. श्रीनगर, दल सरोवर, शंकराचार्य, पहेलगाम, गुलमर्ग, सोनमर्ग, क्षीरभवानी, हजरत बाल सगळे पाहून आलो होतो. 'जन्नत ए जहाँ' काश्मीर खोरे नुकत्याच न्हाऊन निघालेल्या शोडषेसारखे लाजत मुरडत पर्यटकांना सामोरे जात होते आणि अचानक पाच सप्टेंबरला हे पुराचे संकट. ऐकून वाईट वाटले, पण ते तितपतच. तेवढयात प्रसन्नाने एक बातमी आणली की आम्ही मित्रांनी मिळून काश्मीरच्या पूरग्रस्तांसाठी काही मदत गोळा केली आहे, पण ती पोहोचवायची कशी?

याआधी आमच्या युवक प्रतिष्ठानने कच्छ भूकंपग्रास्तांसाठी खूप काम केले होते, तेव्हा आता येथेही मदत करण्याची त्याची अपेक्षा स्वाभाविक होती. मग आम्ही खूप मदत गोळा केली. तिथे आमच्या वैद्यकीय चमूची महिनाभराची व्यवस्था होईल का, त्याची पाहणी करण्यासाठी मी स्वत: जायचे ठरवले. रा.स्व. संघ आणि भाजपा यांच्या माध्यमातून सर्व मदत एकसूत्रतेने जम्मू आणि श्रीनगर या दोन ठिकाणांहून गरजवंतांपर्यंत सर्वत्र पोहोचत होती. जम्मूमध्ये बरीच मदत पोहोचत होती, कारण तिथे जाणे सोपे होते. पण काश्मीर खोऱ्यात श्रीनगरला जाणारा रस्ता बंद होता, तिथे जास्त कुणी पोहोचू शकत नव्हते. फक्त हवाईमार्गे मदत पोहोचवणे शक्य होते. मी मदतीची बोचकी घेऊन इंडिगोच्या विमानाने श्रीनगरला पोहोचले. बरोबर भाजपाचे संघटन मंत्री रमेशजी अरोरा यांचा दूरध्वनी क्रमांक तेवढा होता. त्यांच्याकडून निरोप होता की शौकत अली किंवा त्यांच्यातर्फे कोणी कार्यकर्ते आपल्याला घेण्यासाठी विमानतळावर येतील.

विमानतळावर भाजपाचे मो. अन्वर खान आले होते. ते मला मदत केंद्रात घेऊन गेले. तिथे अरोरांची भेट झाली. पुढील मदतीसाठी डॉक्टर, मदतनीस स्वयंसेवक मुंबईतून पाठवायचे ठरले. आणलेली मदत 17 सप्टेंबरला वाटण्यासाठी मो. अन्वर खान बरोबर राहतील असेही ठरले. पण राहणार कुठे? हा प्रश्न होता. अजूनही पाणी पूर्णपणे ओसरले नव्हते. धर्मशाळा, हॉटेले सुरू झाली नव्हती. शेवटी मो. अन्वर खान यांच्याकडेच माझी निवासाची व्यवस्था झाली.


BJP_1  H x W: 0

त्या वेळी नौगाममधील त्यांच्या दुमजली घरातून पाणी जेमतेम ओसरले होते. मी गेले, तेव्हा अन्वर खान यांची पत्नी बेगम नगीनाभाभी, त्यांची मुले आणि काही मदतनीस यांच्या मदतीने तळमजल्यावरची, पहिल्या मजल्यावरची काश्मिरी भारी किमतीची कार्पेट काढून रस्त्यापलीकडे शेतात टाकून आल्या होत्या आणि जमिनीवर साचलेला पाऊल रुतेल इतका गाळ आणि माती साफ करत होत्या. मात्र काश्मिरी मुळातच आतिथ्यशील असल्याने त्याही स्थितीत त्यांनी पहिल्या मजल्यावरील पाहुण्यांच्या खोलीत माझी व्यवस्था केली आणि काही वेळातच माझ्या दिमतीला आपली मुलगी हुमेरासह दाखल झाल्या. चहा-बिस्किटे घेऊन त्यांची मोठी मुलगी रिफत हसत हसतच आली. ही माझी खान कुटुंबाशी पहिली भेट. मला भाभींच्या हवाली करून अन्वरभाई दुसऱ्या कामासाठी निघून गेले. दुसऱ्या दिवशी 17 सप्टेंबरला सकाळीच मदतीचा ट्रक घेऊन निघायचे आहे असा निरोप होता. मिळालेली पूर्ण संध्याकाळ खान कुटुंबीयांशी परिचय होण्यासाठी पुरेशी होती. वीज नव्हतीच. मेणबत्तीच्या प्रकाशात भाभी आणि त्यांच्या पाच मुलांमध्ये मी कधी मिसळून गेले, ते कळलेच नाही.

त्यांची पुराची कहाणी एखाद्या चित्रपटात शोभावी अशी होती. तो भयंकर दिवस.. अचानक सुरू झालेला मुसळधार पाऊस. दुपारपासूनच पाणी भरू लागले होते. संध्याकाळी वीज गेली. मुले शाळेतून घरी आली होती. मात्र अन्वरभाई घरी आले नव्हते. फोन बंद असल्याने संपर्क होत नव्हता. पाहता पाहता पाण्याने तळमजला व्यापला. भाभींनी जेवणाचे सामान पहिल्या मजल्यावर चढवले. शेजारी असलेल्या यतीम घरातल्या (अनाथाश्रमातल्या) तीस मुलांना आणि स्वत:च्या मुलांना गच्चीत नेले! वरून पाऊस सुरू होताच, पण दुसरा पर्याय नव्हता. असे दोन दिवस आणि दोन रात्री काढल्या. अल्लावर विश्वास ठेवणे एवढेच काय ते हातात होते. भाभी आणि वय वर्ष 1 ते 13 या वयोगटातील पस्तीस मुले. त्या कसोटीच्या काळात सर्वांना भाभींनी 'दुवा करत राहा, अल्ला नक्कीच मदत करेल' असे म्हणत धीर दिला. मुले तसेच करू लागली. पण त्यांच्याच नऊ वर्षांच्या मुलीने बंड केले. ती म्हणाली, ''मी प्रार्थना करणार नाही. आपण आणि ह्या छोटया मुलांनी असे काय वाईट केले आहे की त्यांना ही शिक्षा? मला माहीत नाही माझे अब्बा कुठे आहेत, कसे आहेत?'' ती फक्त गुडघ्यात मान घालून रडत राहिली. शेवटी दोन दिवसांनी अन्वरभाईंनी कुठून तरी तीन/चार जण मावतील अशी छोटी होडी मिळवली आणि घराच्या दुसऱ्या मजल्यापर्यंत वल्हवत वल्हवत पोहोचले. आधी सर्व यतीम घरातील मुलांना सुरक्षित स्थळी पोहोचवले आणि सर्वात शेवटी स्वत:ची मुले आणि भाभी यांना घेऊन अन्वरभाई बाहेर पडले. मी गेले त्याच दिवशी ते कुटुंब स्वत:च्या घरी पुन्हा परतले होते.


आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

मो. अन्वर खान मूळचे बारामुल्लाचे. शेतकरी कुटुंबातील पदवीधर. सरकारी नोकरी करत करत स्वत:चा व्यवसाय सुरू केला. मारुती गाडया विक्रीचा आणि गाडया दुरुस्तीचा हा धंदा जोरात चालू होता. मात्र त्यापलीकडे आपल्या लोकांसाठी काहीतरी करण्याची आंतरिक इच्छा त्यांना अस्वस्थ करत होती.

बेगम नगीनाभाभीदेखील मूळच्या बारामुल्लाच्या. अत्यंत नाजूक आणि सुंदर नाकेल्या, चकाकते डोळे आणि हरिणीसारख्या चपळ. वयाच्या बाराव्या वर्षी अन्वरभाईंशी त्यांचा निकाह झाला. त्या वेळी अन्वरभाई बावीस वर्षांचे होते. वयात अंतर असले, तरी कुटुंब ओळखीचे होते, मुलगा चांगला आणि नोकरदार होता या जमेच्या बाजू भरभक्कम होत्या. नगीनाभाभी वयाच्या पंधराव्या वर्षी दहावी पास झाल्या आणि एका मुलीची आईसुध्दा! संसार कशाशी खातात ते आता कळायला लागले होते. चूल आणि मूल हेच विश्व आणि नवरा म्हणेल ते ब्रह्मवाक्य, हेच त्यांचे जग होते.


BJP_1  H x W: 0 

त्यातली सुखाची गोष्ट म्हणजे नवरा समजूतदार होता. कुटुंबवत्सल होता. बायको-मुलांवर त्याचा जीव होता.

अन्वरभाईंनी उद्योगधंद्यानिमित्त श्रीनगरला स्थलांतर केले. तेव्हा नगीनाभाभींना मुलांच्या शाळेच्या निमित्ताने, दवाखाना इस्पितळाच्या निमित्ताने घराबाहेर पडावे लागले.

 

बाहेर पडल्यावर समाजाची दुरवस्था लक्षात आली. आपणही समाजासाठी काहीतरी करावे असे वाटले. शेजारीच यतीम ट्रस्टचे होस्टेल होते. तिथे अनाथ मुले बरीच येत, राहत. त्यांच्याबरोबर काम सुरू झाले. जेवण देणे, कपडे-पुस्तके आणून देणे असे जमेल तसे, जमेल तेवढे काम त्या करू लागल्या.

 

2014च्या लोकसभा निवडणुकीत अन्वरभाईंनी सक्रिय भाग घेतला. व्यवसाय क्षेत्रातील अग्राणी म्हणून सर्व राजकीय पक्षांशी त्यांचे चांगले संबंध होते. त्यांचे व्यवसायातील पार्टनर शीख आहेत आणि जनाब मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचे कडवे समर्थक आहेत. पण अन्वरभाई आणि भाभींना जाणवले की, काश्मीर खोऱ्याचे कुणी भले करू शकेल तर ती अडवाणी-अटलजींच्या आणि आता मा. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करत असलेली भाजपा.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/  

मी त्यांच्याकडे पहिल्यांदा गेले, तेव्हा केंद्रात मोदी सरकार येऊन काही महिनेच झाले होते. पण संपूर्ण घर मोदीमय होते.

मुलगा जुन्नेद तर फक्त मोदी ड्रेस घालायचा आणि मोदीजी जे खातात तेच पदार्थ असतील तर जेवायचा. धाकटा शोएब पूर्ण वेळ हेलिकॉप्टर उडवत असायचा. त्यात मोदीजी बसलेले असायचे.

 

पूरग्रास्तासाठीच्या मदतकार्यानंतर विधानसभेच्या निवडणुका, ARSH शिक्षण संस्थेची स्थापना, कौशल्य विकास मंत्रालयाचे (PMKVYचे) कोर्सेस, गृह मंत्रालयाचे उडान - काश्मीर खोऱ्यातील मुलांना नोकरी देणे, सामाजिक न्याय विभागातर्फे बारामुल्ला-उरी येथील दिव्यांगांना स्वयंचलित हात-पाय, श्रवणयंत्र अशा अनेकानेक उपयोगी वस्तू आणि उपकरणे देणे, उज्ज्वला लाभार्थींचा पंचायत, सेवा भारती आणि परिवार संस्थांशी संपर्क, सद्भावनातर्फे प्रशिक्षण, राष्ट्रीय महिला आयोगातर्फे विधवा, अर्धविधवा आणि परित्यक्ता महिलांसाठी उपक्रम आणि टाटा सामाजिक संस्थेच्या कौशल्य केंद्रातर्फे पदवी अभ्यासक्रम या आणि अशा कामांसाठी सातत्याने माझे श्रीनगरला येणे होत असते. अन्वरभाईंच्या घरी राहणे होते. त्यांचे घर म्हणजे माझ्यासाठी माहेरघरच आहे. माझ्यासाठी वेगळी खोली आहे, ती केवळ माझ्यासाठी राखीव आहे. तेथे अन्य कुणाला राहण्याची परवानगी नाही.

 आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
 

अन्वरभाई भाजपाचे काश्मीमधील प्रमुख नेते झाले, पण गेल्या वर्षी एक विचित्र घटना घडली. त्यांच्यावर चार दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यातून ते कसेबसे वाचले. त्यांचे सुरक्षा रक्षक जखमी झाले. त्यातल्या एकाचे कालांतराने निधन झाले. त्यामुळे अन्वरभाईंना पोलीस एकटयाने बाहेर फिरण्याची परवानगी देत नाहीत, तरीसुध्दा ते पक्षाच्या कामासाठी फिरत असतात. भाभींना विचारले, तर त्या म्हणतात, ''भिऊन काय होणार? ते आमचे काश्मीर हडप करायला बसले आहेत. इससे भी खराब परिस्थिती का सामना हमने किया है. आत्ता तर कसोटीची वेळ आहे. अपना खयाल जरूर रखेंगे, मगर अब पीछे नही हटेंगे.'' आता अन्वरभाईंबरोबर 16 सुरक्षा रक्षक आहेत. पूर्ण खोऱ्यात आणि लडाख विभागात सातत्याने फिरत ते भाजपाचा प्रचार आणि कामे करीत असतात. घर सांभाळण्याची पूर्ण जबाबदारी भाभींकडेच आहे. नगीनाभाभी स्वत:चा वेगळा व्यवसाय यशस्वीरित्या करतात. त्याही मुलांच्या शिक्षणाच्या निमित्ताने देशभर फिरतात. इंटरनेटवरून, वेबसाइट्सवरून माहिती मिळवतात. कामाच्या निमित्ताने स्वत: गाडी चालवत जम्मूपासून लेहपर्यंत जातात.

 

संविधानातील 370 कलम रद्द करण्याचा निर्णय अन्वरभाई आणि भाभी यासारख्या देशप्रेमी काश्मिरींना आवश्यक वाटतो. जम्मू आणि काश्मीर राज्य तीन विभागांत - लडाख, काश्मीर खोरे आणि जम्मू यात विभागले आहे. हे तिन्ही भाग आणि विशेषतः काश्मीर खोरे स्वतंत्रपणे प्रगती करेल, असा त्यांना विश्वास आहे. याआधीच हे करणे गरजेचे होते, असे त्यांचे स्पष्ट मत आहे. भाजपावर भरोसा आहे. मात्र त्यासाठी त्यांना आणि त्यांच्यासारखी धारणा असलेल्यांना फार कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. ज्यांनी आणीबाणीमध्ये जवळचे, नातेवाईक, मित्र आणि समाज यांची विटंबना सहन केली आहे, त्यांना त्याचा थोडासा अंदाज येऊ शकतो. पण मुलांच्या शिक्षणाचा खोळंबा त्यांच्यासाठी अत्यंत चिंतेचा विषय आहे. त्यामुळे त्यांनी मुलांना शिकायला बाहेर ठेवले आहे.

 

आता अन्वरभाई भाजपाच्या राष्ट्रीय कार्य समितीचे सदस्य आहेत. मुले छान शिकत आहेत. राजा डेहराडूनला बारावीत आहे. या वर्षी हुमेरा दिल्लीला BA.Ll.B.साठी गेली, तर पुढच्या वर्षी मधला जुनेद डेहराडूनला जाईल. मोठी रिफत श्रीनगर अभियांत्रिकी महाविद्यालयात BEच्या शेवटच्या वर्षाला आहे. पुढे मास्टर्स करून ARSH महाविद्यालयातच पूर्ण लक्ष घालणार आहे.

 

काश्मीर खोऱ्यातली परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. शाळा-महाविद्यालये सुरू झाली आहेत, दळणवळण, संदेशवहनाची साधने पूर्ववत होत आहेत, पर्यटक येत आहेत, दल सरोवराजवळील ऑॅर्किड बागेतले कंद पुन्हा जोम धरू लागले आहेत. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींच्या आशीर्वादाने काश्मीर खोऱ्यात अमन आणि शांती प्रस्थापित करण्याच्या सर्वांच्या प्रयत्नांना यश येवो, हीच या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रार्थना.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/