राष्ट्रसंत आणि रामराज्य

विवेक मराठी    10-Oct-2020
Total Views |

राष्ट्रसंत तुकडोजी महराज म्हणजे गेल्या शतकातील बहुआयामी व्यक्तिमत्त्व. राष्ट्रसंत म्हटले की ग्रामगीता आणि खंजरी भजन यांचे सहज स्मरण होत असते. ३० एप्रिल ही राष्ट्रसंतांची जयंती. त्या निमित्ताने त्याच्या संकल्पनेतील रामराज्य समजून घेण्याचा प्रयत्न.


tukodoji maharaj_1 &

दुपारचे रखरखीत ऊन... तेही विदर्भातील. अंगाची लाही लाही होत होती. आसपास कोणाचीही चाहूल नव्हती की कसलाही आवाज नव्हता. महादेवाच्या पिंडीवर होणाऱ्या अभिषेकाच्या थेंबाने जी शांतता भंग होई, तेवढाच काय तो आवाज! दगडी मंदिराच्या गाभाऱ्यात महादेवासमोर बसलेला बाल माणिक एकाग्र होऊन महादेवाकडे पाहणारा. एवढयात मंदिराचे पुजारी आले. गाभाऱ्यात बसलेल्या माणिकला पाहून त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. हा पोरटा देवासमोरच्या दक्षिणेवर हात मारण्यासाठी गाभाऱ्यात शिरला असावा, असा ग्रह करून पुजारीबुवांनी माणिकचा हात धरून त्याला गाभाऱ्याबाहेर आणले आणि बजावले, ''याद राख पुन्हा गाभाऱ्यात शिरलास तर... तंगडी मोडून हातात देईन.'' माणिक शांतपणे म्हणाला, ''आज तुम्ही मला गाभाऱ्यातून बाहेर काढलेत, एक दिवस हा देवच मी गाभाऱ्याबाहेर आणेन.''

हा बाल माणिक पुढे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणून मान्यता पावला. आधुनिक युगाची गती आणि त्यातून निर्माण होणारी सामाजिक-मानसिक क्षिती रोखण्यासाठी ग्रामगीतेच्या रूपाने अमृतपाथेय निर्माण करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व. ईश्वरभक्ती, साधना यांच्यात निमग्न असणारे देवबाबा ऊर्फ तुकडोजी महाराज १९३५पासून सार्वजनिक जीवनात सक्रिय झाले, असे म्हणायला हरकत नाही. साधनेच्या काळात त्यांनी 'बुडती हे जन पाहवेना डोळा' ही अनुभूती घेतली होती. पण थांबवायला कोण येणार? हा प्रश्न अभिप्रेत नव्हता. आपणच हा प्रश्न सोडवला पाहिजे असे ठरवून महाराज सक्रिय झाले होते.

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात सालबर्डी नावाचे गाव आहे. तेथे महाराजांनी रूद्रयाग महायज्ञ आयोजित केला. ते वर्ष होते १९३५ आणि महाराजांचे वय होते केवळ २६. या वयातही महाराजांचा जनमानसावर प्रचंड प्रभाव होता. समूह उभा करणे, त्यांच्या एकत्वाची प्रचीती देणे हाच मुळी या सप्ताहाचा उद्देश. धर्म, पंथ, संप्रदाय यांच्या कचाट्यात अडकून माणुसकी आणि समूहभाव विसरलेल्या 'माणूस' नावाच्या प्राण्यांना सन्मार्ग दाखवण्यासाठीचा हा प्रयत्न. अनंत अडचणींवर, समस्यांवर मात करत उभा केलेला हा समूहमनाचा हुंकार. महाराजांचा हा पहिला प्रयोग यशस्वी झाला. व्यक्तिगत धर्म, रूढी, परंपरा जपणारा समाज एकरस, एकरूप दिसू लागला. यातूनच पुढच्या काळात चतुर्मास्य शिबिरे, सामुदायिक आरती मंडळे या कल्पना आकाराला आल्या.

सामर्थ्य आहे चळवळीचे,
जो जो करील तयाचे।
परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे॥

तुकडोजी महाराजांनी अधिष्ठान दिले समाज आणि राष्ट्र. वैयक्तिक जीवनात तुमचे आराध्य कोणतेही असू देत. पण सामाजिक जीवनात, समूहजीवनात समाजपुरुष, राष्ट्रपुरुष हेच आराध्य असावे, ही धारणा महाराजांनी रुजवली आणि ती कृतीतून प्रकटही केली. 'गाव' हा महाराजांच्या कार्याचा, विचाराचा आत्मा होता. महात्मा गांधींनी जो ग्रामस्वराज्याचा मंत्र सांगितला, तो प्रत्यक्षात आणण्यासाठी काय केले पाहिजे? त्याचा आराखडा तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून मांडला आहे. व्यक्तीने समष्टी विचार करताना ग्राम हे एकक बाजूला काढणे शक्य नाही. गाव स्वयंपूर्ण झाला तर देश स्वयंपूर्ण होईल, याची त्यांना जाणीव होती. एका नव्या समाजाच्या निर्मितीची कामना महाराजांच्या मनात होती.

हा नवा समाज उभा करताना, घडवताना काय करावे लागेल हे महाराज सांगतात. असा नवा समाज निर्माण करताना राम, कृष्ण, हनुमान इत्यादी अवतारी पुरुषांच्या तत्त्वज्ञानाचे दर्शन आम्हाला व्हायला पाहिजे. केवळ देवाच्या मूर्तीच्या दर्शनाने आम्ही आता थकलो. आम्हाला कृष्णाचे दर्शन गीतेतून झाले पाहिजे. मारुतीचे दर्शन म्हणजे त्यांच्या एकनिष्ठ सेवावृत्तीचे दर्शन. कृष्णाने या भारतात भक्तीचे, कर्माचे वातावरण निर्माण करावे आणि आम्ही मात्र कृष्णाची मूर्ती हातात घेऊन मिरवावे, ही दशा आता संपली पाहिजे. आता हे दर्शन विश्वाच्या प्रत्येक अणुरेणूतून झाले पाहिजे. हे सारे बळाने, धनाने, सत्तेने किंवा पांडित्याने होणार नाही, तर मानवावर चांगले संस्कार घडवूनच होणार आहे. आज अशा पुरुषाला पाहण्याची साऱ्या जगाला भूक लागून राहिली आहे आणि सर्वांची अशी खात्री आहे की, असा पुरुष भारतातच निर्माण होईल.

तुकडोजींना हा नवा समाज रामराज्य म्हणून अपेक्षित होता. या रामराज्याची वैशिष्टये त्यांनी सांगितली आहेत. ते म्हणतात - ''मित्रहो, रामराज्याची निर्मिती म्हणजे एखाद्या प्रचंड इमारतीच्या बांधकामासारखी आहे. या देशात कोणी मागासलेला, कोणी उद्योगहीन आणि कोणी अंगठा छाप राहू नये हे जेव्हा शक्य होईल, तेव्हाच सर्वांचा उदय - सर्वोदय होईल आणि सर्वोदय म्हणजे गांधीजींच्या कल्पनेतील रामराज्य. 'बंधुभाव' हेच या रामराज्याचे अधिष्ठान हवे, तरच इमारत उभी राहील याची जाणीव महाराजांना होती. बंधुभाव आला तर देशाचे अनेक प्रश्न सुटतील, म्हणूनच त्यांनी ईश्वराला प्रार्थना केली.

या भारतात बंधुभाव नित्य वसू दे।

दे, वरचि असा दे॥
हे सर्व पंथ-संप्रदाय एक दिसू दे। मतभेद नसू दे॥
या गीतात महाराज पुढे लिहितात -
हा जातिभाव विसरुनिया एक हो आम्ही।
अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी॥
खळ निंदका मनीही। सत्य न्याय वसू दे।
दे, वरचि असा दे॥


तुकडोजी महाराजांची ही प्रार्थना ज्या काळात लिहिली, त्या काळाचे प्रतिबिंब त्यात उमटले आहे.. नव्हे नव्हे, आजच्याही काळाचे ते प्रतिबिंब आहे तसेच आहे. समाजाचे समूहमन निर्माण होण्याऐवजी जातभावना उग्र होते आहे. संप्रदायांची सावली कडवटतेकडे आणि कर्मठतेकडे झुकू लागली आहे. जातीजातीत, संप्रदायात एकमेकांपासून फुटून निघण्याचे लोण पसरले आहे. या वास्तवाच्या धरातलावर राष्ट्रसंत तुकडोजींनी केलेली प्रार्थना पुन्हा नव्याने अभ्यासण्याची गरज निर्माण झाली आहे आणि यासाठी उपासनेची आवश्यकता आहे. राष्ट्र सर्वांगीण उन्नत होण्याकरिता नि त्यातील प्रत्येक मनुष्य मानवतेने वर येण्याकरिता (प्रगत होण्याकरिता) जे जे सत्कार्य करावे लागेल, ते ते विचारपूर्वक व निरभिमानीपणे करीत राहणे यालाच मी उपासना किंवा हरिभजन समजतो, असे तुकडोजी महाराज म्हणतात.

ही उपासना करण्यासाठी तुकडोजी महाराज सानेगुरुजींबरोबर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून आंदोलन करतात. विनोबांबरोबर भूदान यज्ञात सहभागी होतात आणि श्रीगुरुजींबरोबर विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेतही सहभागी होतात. चिनी आक्रमणाच्या काळात सीमेवर जाऊन भारतीय सैनिकांना भजन गाऊन दाखवतात. कोयना भूकंपाच्या वेळी मदत फेरी काढतात. गोवंशवधबंदीसाठी प्रयत्न करतात. विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेच्या काळात हिंदुत्वाची व्यापक व्याख्या करतात. ते म्हणतात,

हिंदुत्व नही है वेशभूषा
, रंग है ना जाल है।
ना पक्ष है, ना भक्ष है। ना और कोई बात है।
जो सत्य है, निज तत्त्व है। स्वयंप्रकाशी नित्य है।
जिस पर खडा यह विश्व है। सच्चा वही हिंदुत्व है।


आधुनिक काळात वेद म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेचा उल्लेख करावा लागेल. एकूण आठ पंचक आणि एकेचाळीस अध्यायांतून तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता साकारली. ग्राम हे एकक सर्व बाजूंनी स्वयंपूर्ण होतानाच माणसाला माणूस म्हणून मूल्य प्राप्त व्हावे, यासाठी महाराजांनी ग्रामगीता लिहिली. विज्ञानवादी दृष्टीकोनातून अंधरूढींवर प्रहार केला. दीन-दु:खितांना आधार द्या, प्रेम द्या असा संदेश दिला आणि 'मानवता' या मूल्याचा उद्घोष केला.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मानवतेची आणि आपल्या जगण्याची सांगड घातली होती. ते म्हणतात,

मानवता है पंथ मेरा। इन्सानियत है पक्ष मेरा।

सबकी भलाई धर्म मेरा। दुविधा को हटाना वर्म मेरा।
एक जात बनाना कर्म मेरा। सब साथ चलाना मर्म मेरा।
निच उँच रहना गर्व मेरा। गिरते को उठाना स्वर्ग मेरा॥

राष्ट्रसंतांचा हा धर्म सहजीवन, सहानुभूती, सहवेदना यांच्या आधारे उभा आहे. तो वास्तवात आला, तर बऱ्याच समस्या संपतील. आत्मकोषात मग्न राहून दुसऱ्याकडे तुच्छतेने, दीनतेने पाहणाऱ्या व्यक्तीने आपला कोष फोडावा आणि फूलपाखरासारखे सुंदर जीवन जगावे, अशी अवस्था यायची असेल तर 'मी'पेक्षा 'आम्ही'ला अधोरेखित करणे गरजेचे आहे. समाजाला देव मानून त्यांची पूजा मांडणाऱ्या तुकडोजी महाराजांना भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी 'राष्ट्रसंत' ही पदवी बहाल केली.


१९३५ सालापासून ते सार्वजनिक जीवनात कार्यरत राहिले. निरपेक्ष भावनेने त्यांनी समाज संघटित केला. दूरदृष्टीने ग्रामविकासाचे प्रकल्प राबवले. 'भेदाभेद अमंगल' हे कृतीने सिद्ध केले आणि आणखी शंभर वर्षे पुरेल इतके समृद्ध विचारधन निर्माण केले. अशा या महापुरुषाचे निर्वाण ११ ऑक्टोबर १९६८ रोजी झाले.