गूढ, असंभवनीय, भेसूर शब्दांना आकार देणारा - रोझमेरीज बेबी

विवेक मराठी    15-Oct-2020
Total Views |

@प्रिया प्रभुदेसाई

'रोझमेरीज बेबी' हा चित्रपट फक्त भयपट नाही. एका गरोदर बाईच्या मनाची स्पंदने, तिची असुरक्षितता, भास आणि आभासाच्या हिंदोळ्यावर असलेले तिचे नाजूक मन हे यात अतिशय ताकदीने दाखवले आहे. चित्रपटाचा खलनायक सैतान नाही. रोझमेरीचा नवरा आहे. आपल्या पत्नीच्या शरीराचा सौदा त्याने स्वतःच्या कारकिर्दीसाठी खुशीने मान्य केला आहे. हॉलीवूडच्या क्लासिक्समध्ये 'रोझमेरीज बेबी'चे स्थान खूप वर आहे.

chitrapat_2  H

आई होणे ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुखद संवेदना असते. स्त्रीच्या आयुष्यातले सर्वात महत्त्वाचे स्थित्यंतर म्हणजे गर्भारपण. काही अपवाद असतीलही, पण सर्वसामान्य स्त्रियांसाठी अजूनही मातृत्व म्हणजे परमेश्वराने दिलेले वरदान आहे. गर्भधारणेसाठी मनाची तयारी करणे, गर्भ राहणे आणि मग प्रसूती हा आनंदाचा काळ असतो. नऊ महिन्यांत शरीरात होणारे बदल, मानसिक आंदोलने, डोहाळे हे कितीही त्रासदायक असले, तरीही आपल्या अपत्याला कुशीत घेण्याच्या आत्यंतिक इच्छेपुढे त्यांचे काहीही चालत नाही. मातृत्वाची चाहूल लागताच सुरू होतात ते कौतुकाचे सोहळे. जपून चाल, सांभाळून राहा, तुला काय खायला आवडेल, तुला कुठे जायला आवडेल? असे अनेक प्रश्न आणि आपल्या माणसांनी पुरवलेल्या लाडात गर्भारशी तेजाने न्हाऊन निघते.

 

रोमन पोलान्स्की दिग्दर्शित 'रोझमेरीज बेबी' या चित्रपटात अशी मातृत्वाला आसुसलेली आई आहे. तिच्या इच्छा पुऱ्या करायला धडपडणारे आई-वडिलांसारखेच शेजारी आहेत. तिच्या गर्भारपणात तिच्या बाळाची जिवापाड काळजी घेणारा डॉक्टर आहे. तिच्याबरोबर तिच्यावर प्रेम करणारा नवरा आहे. थोडे विचित्र का असेना, पण आईला लागलेले डोहाळे आहेत.. एक गोष्ट मात्र फार वेगळी आहे. ह्या मुलाचा बाप कोण आहे, हे आईला माहीत नाही. ती ज्या माणसाला - स्वतःच्या नवऱ्याला ह्या मुलाचा बाप समजते, त्याला मात्र ही गोष्ट माहीत आहे. केवळ माहीतच नाही, तर जे अघटित घडवून आणले आहे ते घडवण्यात त्याचाही हातभार लागला आहे. मुलाचे पितृत्व अशा माणसाकडे आहे, जो या पृथ्वीचा रहिवासी नाही. जे काही घडले आहे, ते अतर्क्य आहे, जे काही घडणार आहे, ते अकल्पित आहे. आई केवळ या पूर्ण घटनेत वापरले जाणारे प्यादे आहे.
 
चित्रपटाची कथा घडते १९६५मध्ये. गाय वूडहाऊस (जॉन कसावेते) आणि त्याची पत्नी रोझमेरी (मिया फॅरो) न्यूयॉर्कमधल्या ब्रँफोर्ड इमारतीत राहायला येतात. इथे राहणाऱ्या रहिवाशांबद्दल फार काही चांगले बोलले जात नाही. इथे नरमांसभक्षक आहेत अशीही वदंता आहे. त्यांचा मित्र हच त्यांना हे सांगायचं प्रयत्न तर करतो, पण रोझमेरी मात्र घराच्या प्रेमात पडलेली असते. नवरा कामाच्या शोधात, नाटकात पाय रोवू पाहणारा नट, तर बायको नवऱ्यावर विश्वास असणारी, जगाचा फार अनुभव नसलेली एक साधी गृहिणी. गृहप्रवेश काही चांगल्या मुहूर्तावर होत नाही. इथे आल्यावर ज्या मुलीशी रोझमेरीची ओळख होते, ती मुलगी आत्महत्या करते. तिला सांभाळणारे जोडपे मात्र याच मुहूर्तावर रोझमेरी आणि गायच्या आयुष्यात प्रवेश करतात. त्यांच्याशी ओळख काय होते आणि गायला एक महत्त्वाची भूमिका मिळते. एका उभरत्या नटाचा जन्म होतो. कोणतीही चांगली घटना अचानक घडत नाही या युगात. त्याला पूरक अशी एक विचित्र गोष्ट घडते. ही भूमिका करणारा नट अचानक आंधळा होतो आणि गायच्या अंधारमय कारकिर्दीला प्रकाश मिळतो.
 
याचीही किंमत चुकवावी लागतेच. ही किंमत असते रोझमेरीचे शरीर. या जगात सैतानाच्या मुलाला जन्म देणारे माध्यम म्हणून तिचा उपयोग होणार असतो. या घरात आल्यानंतर एका रात्री रोझमेरीला अतिशय भयानक स्वप्न पडते. ते स्वप्न की सत्य या भ्रमात पडलेली रोझमेरी गायला सांगते, “फारच विचित्र स्वप्न होते ते. कुणीतरी माझ्यावर अत्याचार केला, जबरदस्ती केली, पण ते कुणीतरी अमानवी होते.” रात्री जे घडते, त्याला स्वप्न तरी कसे म्हणायचे! कारण तिच्या उघड्या शरीरावर त्याच्या खुणा असतात. गाय काहीतरी उत्तर देऊन तिची शंका फेटाळून लावतो.
जे काही घडलेले असते, ती तर पुढच्या घटनांची नांदी असते. रोझमेरी गरोदर राहते. तिच्या बाळाच्या येण्याची तारीखसुद्धा निश्चित होते. शेजारचे जोडपे तिची काळजी घेता घेता तिचा ताबाच आपल्या हातात घेतात. आई-वडील नसल्याने ती ते सहज होऊ देते. तिचा नेहेमीचा डॉक्टर बदलला जातो. तिची औषधेसुद्धा तिची शेजारीण निश्चित करते.
पोटात होणाऱ्या असह्य वेदना, कमी झालेले वजन, चेहऱ्यावर आलेली मृत कळा या सर्व गोष्टी गूढ आणि तरीही नॉर्मल भासवल्या जातात. नवीन होऊ घातलेल्या आईच्या मनाचे खेळ हे! सामान्य असते ग. तिच्या मनावर जे जे अगम्य ते सामान्य म्हणून भासवले जाते. रोझमेरीचा क्षीण विरोध कुणीही लक्षात घेत नाही.
अगदी वेगळी वस्तू खाण्याचे डोहाळे तसे कॉमन नाही का? पण ते लिव्हर आणि कच्चे मांस? रोझमेरीच्या मनात संशयाचे वादळ उठते. तिचा मित्र हचसुद्धा गोंधळतो. नक्कीच काहीतरी विचित्र घडत असते. त्याचा रिसर्च त्याला या साऱ्याच्या मुळाकडे घेऊन जातो खरा, पण दुर्दैव इथेही रोझमेरीची पाठ सोडत नाही. त्याला अपघात होऊन तो कोमात जातो. रोझमेरी स्वतःच्या नेहमीच्या डॉक्टरकडे जायचे ठरवते. गाय विरोध करतो, पण नवल घडते. अचानक तिच्या वेदना थांबतात. रोझमेरीला आपल्या बाळाच्या हालचालींची जाणीव होते.


chitrapat_1  H
काही दिवसानंतर एक दुर्दैवी घटना घडते. रोझमेरीचा मित्र हच याचा दुर्दैवी अंत होतो. जाण्यापूर्वी तो रोझमेरीला जे पुस्तक देतो, त्यातून हा गुंता सुटत जातो. ह्या पुस्तकात सैतानी संघटनेची माहिती असते. आपण ज्या लोकांच्या संपर्कात आहोत, ते शेजारी आणि डॉक्टर याच संघटनेचा भाग असल्याची शंका रोझमेरीच्या मनात येते. आपले मूल धोक्यात असून कदाचित त्याचा वापर केला जाईल अशी रोझमेरीला भीती वाटते, पण फार उशीर झालेला असतो.
नक्की काय घडलेले असते? हे मूल कोणाचे असते? रोझमेरीला जाणवते ते स्वप्न नसते. त्या रात्री काहीतरी विचित्र घडत असते. जे काही घडते ते गुंगीत. चित्रपटात हा एकच प्रसंग आहे, जो ह्या चित्रपटाला भयपटाच्या गणतीत बसवतो. हा ड्रीम सिक्वेन्स आहे. सैतानाला मानणाऱ्या पंथाचे लोक, त्यांचे मंत्र, त्यांची पूजा, सैतानाला केलेले आवाहन आणि त्याला सुपुर्द केलेला स्त्री-देह. आभास आणि सत्य यांच्या सीमेवर असलेला हा प्रसंग केवळ रोझमेरीलाच नाही, तर प्रेक्षकांनासुद्धा दुविधेत टाकतो. जे घडलेय, ते केवळ रोझमेरीच्या मनाचे खेळ आहेत की हे सत्य आहे!
रोझमेरी एका मुलाला जन्म देते. ह्या मुलाचे डोळे अतिशय विलक्षण असतात. तिच्या लक्षात येते की हे आपले मूल नाही. याचे पितृत्व सैतानाचे आहे. त्याला जन्म देणारे तिचे शरीर हे फक्त माध्यम आहे. चित्रपटाचा शेवट खरे तर प्रेक्षकांना समजून आलेला असतो. जे काही चालले आहे तो आभास नाही, कल्पना नाही, तर एका अमानवी शक्तीचा खेळ आहे याचीही जाणीव आपल्याला टप्प्यात करून देण्यात पोलन्स्की यशस्वी झालेला आहे.
जे सत्य आहे, ते मान्य करणे तिच्या सदसद्विवेकबुद्धीला पटत नाही, पण बाळाला आईची गरज असते. तिला चुचकारले जाते, तिच्यामधल्या सुप्त आईला साद घालतात. आतापर्यंत तिच्या शरीराचा ताबा घेतला गेला असतो. आता तिच्या मनावर ताबा मिळवायचे प्रयत्न सुरू होतात. “तुम्ही मला या मुलाची आई व्हायला सांगत आहात?" नकार देण्याचा तिचा क्षीण प्रयत्न यशस्वी होत नाही. “तू तर त्याची आईच आहेस.” रोझमेरी आपल्या बाळाला कुशीत घेऊन जोजवताना हा चित्रपट संपतो. चित्रपटाचा शेवट अपेक्षित तरीही अस्वस्थ करतो. एका व्यक्तीचे समाजासमोर झुकणे, नवऱ्यासमोर दबणे हे दुःखदायक आहेच, पण शेवटी मातृत्व, तिच्या इच्छेला, तिच्या बुद्धीला पराभूत करते हे पाहणे
मातृत्वाचा आणि स्त्रीत्वाचा अपमान वाटतो. सैतानाचा जन्म नाही, तर रोझमेरीची असाहाय्यता मनात भीतीचे वादळ उठवतेस्त्रीच्या अस्तित्वाला केवळ तिच्या गर्भाशयामुळे अर्थ असतो का? हेच तिच्या जगण्याचे प्रयोजन ठरू शकते का? मातृत्व हे ओझे की वरदान? ह्या प्रश्नावर हा चित्रपट संपतो.

 
कोणतेही भयानक प्रसंग या चित्रपटात नाहीत. विचित्र माणसे, मुखवटे, आवाज, अंधार, पडकी घरे, जंगल, विरोधात गेलेला निसर्ग.. साधारणपणे हॉरर सिनेमात ज्या गोष्टींचा उपयोग केला जातो, ती कोणतीही गोष्ट इथे नाही. शूटिंग शहरात, जिथे झाले ती मध्यवर्ती जागा, जी माणसे खलनायक म्हणून येतात, ती सामान्य, तुमच्या-आमच्यासारखी, सुशिक्षित, सुसंस्कृत, समाजात मानाचे स्थान असणारी. त्यांचे कपडे, त्यांची भाषा, त्यांचे रितीरिवाज काही वेगळे नाहीत आणि तरीही ती तुमच्या जगातली माणसे नाहीत, कारण त्यांनाच हे जग नष्ट करायचे आहे. तुमचे देव, तुमची मूल्ये, तुमची सृष्टी, तुमचे अस्तित्व. 'रोझमेरीज बेबी'चे हे वेगळेपण भयावह आहे.
 
 
ह्या चित्रपटाबद्दल अनेक दंतकथा आहेत, त्यांनीसुद्धा हा चित्रपट गाजला. चित्रपटाचे चित्रीकरण चालू असताना चित्रपटाशी संबंधित लोकांचा मृत्यू घडणे, काही व्यक्ती आजारी पडणे ह्या सर्व गोष्टींनी हा चित्रपट चर्चेत राहिला. त्यात रोमन पोलान्स्की ह्याचा पत्नीचा खून हा दुर्दैवाचा कळस होता. त्या वेळी ती आठ महिन्यांची गरोदर होती.
हा चित्रपट फक्त भयपट नाही. एका गरोदर बाईच्या मनाची स्पंदने, तिची असुरक्षितता, भास आणि आभासाच्या हिंदोळ्यावर असलेले तिचे नाजूक मन हे यात अतिशय ताकदीने दाखवले आहे. चित्रपटाचा खलनायक सैतान नाही. रोझमेरीचा नवरा आहे. आपल्या पत्नीच्या शरीराचा सौदा त्याने स्वतःच्या कारकिर्दीसाठी खुशीने मान्य केला आहे. हॉलीवूडच्या क्लासिक्समध्ये 'रोझमेरीज बेबी'चे स्थान खूप वर आहे.