शिवाजी महाराजांचे कर्तृत्व आणि परकीय

विवेक मराठी    02-Oct-2020
Total Views |

सागरी व्यापारात, आरमारात महाराजांना कोणताही पूर्वानुभव किंवा कोणाचेही पाठबळ नव्हते. पण प्रत्यक्षात एखाद्या तरबेज आणि कसलेल्या माणसाप्रमाणे त्यांच्या हालचाली चाललेल्या दिसतात.शिवाजी महाराजांचे कतृत्तव आण परकीयांशी असलेला सावध व्यवहार आपण या लेखात पाहणार आहोत.

Shivaji Maharaj's deeds a

गेल्या अंकात आपण फोंडा किल्ला आणि महारांजांच्या त्यावरील विजयाबाबत माहिती घेतली. या लेखात त्यातील गोष्टींचा सविस्तर परिचय करून घेऊ. महाराजांनी ८ मे १६७५ रोजी फोंडा किल्ला जिंकला. त्यामुळे फोंड्याच्या अंकित असलेले तिसवाडी, चंद्रमहल, केंपे, बाल्ली, काणकोण हे आदिलशाही महाल त्यांच्या ताब्यात आले. त्यानंतर त्यांनी दक्षिणेकडे चाल करून सध्याच्या कारवार प्रांतातील सिवेश्वर, कडवाड, रुद्रा आणि अंकोला हा गंगावती किंवा गंगावली नदीपर्यंतचा आदिलशाही मुलुख काबीज केला. त्यांनी फोंडे येथे आपला सुभेदार नेमला आणि दक्षिणेकडचा कारभार बघण्यासाठी बाल्ला येथे एक हवालदार नेमला. एक प्रकारे महाराजांनी गोव्यातील पोर्तुगीजांना वेढूनच टाकले. त्यातून त्यांनी दुसऱ्या बाजूला मिरीच्या व्यापाऱ्यावर अंशतः नियंत्रण मिळवले. मिरीचे उत्पादन आदिलशाही मुलुखात मोठ्या प्रमाणावर होत असे. गोवा, कारवार भागातील समुद्रातून प्रामुख्याने ही मिरी भारताबाहेर जात असे. ह्या समुद्री भागातच महाराजांनी आपली ताकद वाढवल्यामुळे ह्या मिरीच्या व्यापारात महाराजांनी आपले स्थान निर्माण केले. पोर्तुगीजांना वेढून टाकल्यामुळे त्यांचा प्रभाव महाराजांनी कमी केला व स्वतःचा वाढवला. गोवा हे पोर्तुगीजांचे सर्वात मोठे शक्तिकेंद्र होते. पण दीव, दमण व साष्टी या प्रांतातील त्यांची सत्ता व ताकद तेवढी नव्हती. गोवा व दमण ह्यामध्ये योणाऱ्या कोकणात महाराज ताकदवान होते. हे दमण, दीव भागातील पोर्तुगीज कठीण प्रसंगी मोठी मदत इतरांना करू शकत नसत. त्यांचा व्यापार कमी होत चालला होता, पण धार्मिक कट्टरता वाढत होती. त्यामुळे लोकभावनाही त्यांच्या विरुद्धच होती. त्याचा फायदा घेऊन महाराजांनी दमण-दीव प्रांतातील पोर्तुगीजांवर 'चौथ'चा दाब ठेवला होता. महाराजांची लष्करी ताकद, दरारा आणि नीतिमान वागणे यामुळे सर्वत्र त्यांची जबरदस्त प्रतिमा तयार झाली होती. त्याचा परिणाम खालील मजकुरावरून दिसतो -


महाराजांना 'चौथ' भरून त्यांचे संरक्षण व सहकार्य मिळवावे असे दमण व साष्टी येथील पोर्तुगीज अधिकाऱ्यांना वाटत असे. वसई प्रांताचा कॅप्टन जनरल मानुएल लोबू द सिल्वैरा याने २८ मे १६७७ रोजी पाठवलेले पत्र पुरेसे बोलके आहे.

'
दमणचे कॅप्टन मानुएफ फुतीद यांनी शिवाजीशी संदर्भ लावून कोळी राजास शासन करण्याची त्याला विनंती केली. त्या विनंतीनुसार शिवाजीची आणि आमची जी बोलणी झाली, त्यास अनुसरून शिवाजीने कोळी राजाच्या राज्यात १६७२च्या एप्रिल किंवा मे महिन्यात सैन्य घुसवलेशिवाजीचा 'चौथ'वर दावा आहे. परंतु तो आमचा शेजारी असूनदेखील त्याने आमच्या प्रदेशात चौऱ्या-माऱ्या किंवा आक्रमणाचे प्रकार केलेले नाहीत. इतकेच नव्हे, तर चौथियाच्या राजाप्रमाणे त्याने खिंडी आणि रस्ते रोखून दरोडेखोरांचा बंदोबस्त केला आहे. त्यामुळे त्याला 'चौथ'चा कर देण्यास हरकत नाही. शिवाजीने कोळी राजा आणि रामनगरचा चौथिया राजा या दोघांनाही गप्प बसवले आहे. इतकेच नव्हे, तर बलसाडपावेतो मोठी पाचर मुघली मुलखात मारली आहे. तो श्रीमंत आणि बलाढ्य आहे. त्याच्या सामर्थ्याच्या मानाने आमचे सामर्थ्य मर्यादित आहे. आमचा अधिकार शहर आणि किल्ला या पलीकडे जात नसल्याने आम्हाला सगळीकडे धावाधाव करणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत शिवाजीने इकडचा सर्व प्रदेश घेतला तरी आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. तो ज्या अर्थी आमची कोणतीच नुकसानी करत नाही, त्या अर्थी त्यास 'चौथ' देण्यास हरकत नाही. शिवाजी आमच्याकडे जीवनोपयोगी वस्तूंची मागणी करत आहे. तो या शहराचा आणि किल्ल्याचा प्रामाणिक मित्र असल्याने त्याला थोडे धान्य पुरवण्यास हरकत नसावी. नाहीतरी मागच्या काळात आपण खंबायत, सुरत वगैरे बंदरांना जीवनोपयोगी वस्तू पुरवत होतोच. परंतु शिवाजीने भाताची जी मागणी केली आहे, ती आमची परीक्षा घेण्यासाठी की काय ते न कळे.'

पोर्तुगीजांसारख्या तिखट आणि कर्मठ शत्रूलाही महाराजांनी किती आणि कसे वाकवले होते, ते इथे दिसते .'लुटारू' हे त्यांचे वर्णनही कसे चुकीचे होते तेही कळते.

आता आपण महाराजांच्या दुसऱ्या प्रबळ शत्रूची (समुद्रावरील) म्हणजे इंग्रजांची एक प्रतिक्रिया बघू -

सुरतहून कंपनीस पत्र / श १५८७ चैत्र शु.६ / मार्च १२ इ.स. १६६४

'
शिवाजीने हुबळी लुटल्यामुळे मिऱ्यांचा व्यापार बसला आहे. दख्खनचा सुलतान कुलवान अथवा शूरही नाही. व्यापारीवर्ग स्वसंरक्षणाकरता इतस्ततः पळत सुटल्यामुळे सर्वत्र अंदाधुदी माजून व्यापार नष्टच झाला आहेशिवाजीची सत्ता व सामर्थ्य वाढत असून सर्वांना त्याचे भय वाटते. सुरतेच्या पाठोपाठ त्याने अनेक ठिकाणी लुटालूट केली असून आज त्याच्या ताब्यात काही नाही तरी ८-९ महत्त्वाची बंदरे आली आहेत. त्या प्रत्येक बंदरातून इराण, बसरा, मक्का या बाजूला त्याची निदान २-३ गलबते व्यापारानिमित्त बाहेत पडतात. ही आपल्याला एक चांगली संधी असून १५० टनांची दोन चार गलबते समुद्रावर सोडल्यास त्यांकरवी त्यांना पकडून आमच्या हक्कांची भरपाई करून घेता येईल. याचा विचार केला पाहिजे.' - इंग्लिश फॅक्टरी रेकॅार्ड (१२, पृ. ३, , १० इ.)

महाराजांच्या वाढत्या प्रभावाची ही इंग्रजांनी दिलेली पावती आहे. महाराजांचा व्यापार ७-८ वर्षांत किती वाढला होता, त्याचाही हा पुरावा आहे. त्याचप्रमाणे पत्रात व्यक्त झालेला हल्ल्याचा विचार हा फक्त विचारच राहिला. कारण महाराजांचे नौदल अधिक ताकदवान झाले होते, असा पुढचा इतिहास सांगते. तो आपण यानंतर पाहूच. मिऱ्यांच्या व्यापारात महाराजांनी पुढे जे बस्तान बसवले, त्याची चाहूलही हुबळीच्या लुटीतून लागते.

मुंबईकर इंग्रज २४ मार्च १६७५ला लिहितात - 'शिवाजी ऑस्टिनच्या मागणीप्रमाणे बहुधा सर्व वखारींकरता कौल देईल. परंतु या शत्रू-मित्र न मानणाऱ्या लुटारूच्या सैन्यावर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही. शिवाजी आपल्या स्वतःच्या मुलखात मात्र आपल्याला नाव ठेवण्यास जागा नाही अशा तऱ्हेने व्यापारास व्यवस्थित उत्तेजन देतो. परंतु मुघलांचा व त्याचा तह मोडल्यामुळे त्याच्या मुलखातल्या व्यापाराबद्दल आमच्या इच्छेप्रमाणे सुधारणा होत नाहीत. कालांतराने काही करता येईल असे वाटते. राजापूरकर २० एप्रिल १६७५ला मुंबईला कळवतात की, आमच्याकरता बांधायचे घर बिनखर्चाचे व आम्ही बांधू शकू, त्यापेक्षा त्वरित बांधून मिळण्याची आम्हाला आशा आहे. आम्हाला ५००० होनांचा माल अण्णाजी पंडित देणार तो नारळ, सुपारी असून त्याचे दर नारळाला ५ लारी खंडी व सुपारी १०० लारी खंडी, म्हणजे फारच महाग दर लावले आहेत. यात कंपनीला काय मिळणार ? अण्णाजींनी आम्हाला फसवायची सुरवात केली आहे. परंतु लोकांत त्याला चांगला मान आहे. सुभेदाराने आम्हास वखार बांधायचा तगादा लावला. आम्हीही अण्णाजीवर अविश्वास न दाखवता होय म्हणत राहिलो. कारण शिवाजी थोड्याच दिवसात आम्हाला भेटण्याची आशा होती. मार्च २०ला शिवाजी दुसऱ्या दिवशी काही कोसांवरील वेलवड्याला येणार असे कळले. पुढे २२ तारखेला दोन प्रहरी दुपारी दोन वाजता आमची त्याची रस्त्यात गाठ पडली. सायंकाळी आम्हास बोलवण्याचे त्याने कबूल केले. त्यानंतर अण्णाजीला व प्रल्हाद निराजीलाही आम्ही भेटली. पुढे २४ मार्चला शिवाजीचा मुक्काम राजापूरला आला व २५ तारखेला त्याची भेट झाली. त्या वेळी आम्ही त्याला २०० होनांचा नजराणा दिला. आमच्या मागण्या त्याला वाचून दाखवल्यावर त्याबद्दल फर्मान देण्याचे त्याने कबूल केले. पुढे राजा निघून गेला. मोहनदासाला फर्मान आणण्याकरिता त्याच्याबरोबर पाठवले आहे. परंतु पुढे राजाच्या मुक्कामापासून उत्तरेकडचे दळणवळण राजाने बंद केल्याने ही पत्रे त्वरेने पाठवली आहेत. फर्मान येताच नक्कल पाठवू. घराचा पाया खोदून चूना व दगड आणला आहे. (इंग्रजांसाठीचे घर) राजाने बांधणीचे काम त्वरेने होण्याकरता एक मनुष्य मुद्दाम नेमला आहे. हिशेबाच्या मोबदल्याचा माल आम्ही अद्याप घेतलेला नाही. फर्मान आल्यावर बघू.'

या २० एप्रिलच्या राजापूरकरांच्या उत्तरानंतर कंपनीच्या मुंबई कार्यालयाने त्यांना १२ मे रोजी (इ.स. १६७५) परत एक पत्र लिहिले. त्याबद्दल पुढच्या लेखामध्ये