संघाचा आत्मभाव

विवेक मराठी    22-Oct-2020
Total Views |
संघ, संघ आहे. संघाची तुलना संघाशीच होऊ शकते. देशातील कोणत्याही संघटनेत होऊ शकत नाही. संघबीजाचा कसा विस्तार होत राहिला पाहिजे, अशी एक संघशाखांची कार्यपद्धती डॉ. हेडगेवारांनी विकसित केली. संघ समजून घ्यायचा असेल, तर डॉ. हेडगेवारांना समजून घ्यावे लागते आणि डॉ. हेडगेवारांना समजून घ्यायचे असेल, तर शाखा समजून घेण्याशिवाय पर्याय नसतो. संघ अभेद्य आहे, संघात फूट नाही, संघात नेतृत्वाची चढाओढ नाही, ही निरीक्षणे ठीक आहेत, पण तो संघाचा आत्मभाव आहे. हे समजले की संघ समजणे होय.

RSS_2  H x W: 0

गेल्या महिन्यात व्हॉट्स अॅपवर एक अनामिक लेख माझ्या वाचनात आला. लेख दलित चळवळीतील कार्यकर्त्याचा असावा. लेखात लेखकाने संघाविषयी काही विधाने केली आहेत, ती अशी -

* आरएसएस कधी गटात विभाजित झाली नाही.
 
* ते प्रसिद्धीसाठी काम करीत नाहीत.
 
* आरएसएसचा पुढील नेता कोण, हे माहीत नसते.

* त्यांच्यात संयम आणि जिद्द आहे.
 
* आरएसएसने सत्तेत येण्यासाठी अनेक रचनाबद्ध कामे केलेली आहेत.
 
* आरएसएसने सत्तेत येण्यासाठी धार्मिक बेस पक्का केला आहे.

* त्यांचे ध्येय पक्के आहे.

* त्यांच्या कामात इगो नसतो, अहंकार नसतो. इत्यादी...

लेखकाने त्याच्या चळवळीची संघाच्या कामाशी तुलना केली आहे. त्यात लेखकाचे म्हणणे असे की ‘आमच्या कामात इगो जास्त आहे, संयम कमी. सर्वांना नेता व्हायचे असते, जरा पटले नाही की, झटापट सुरू होते. आम्ही आरएसएसवर टीका करतो, पण त्यांचे काम करण्याचे तंत्र शिकत नाही. त्यांच्यातील संयम आणि जिद्द आमच्यात नाही. आम्ही आमचा धार्मिक इतिहास मातीत गाडून टाकलाय. आम्ही ध्येयासाठी नाही, स्वत:च्या नावासाठी काम करतो. ज्या दिवशी आमचा सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक बेस पक्का होईल, तेव्हाच परिवर्तन शक्य आहे..’ इत्यादी इत्यादी.


लेखकाचे संघाचे निरीक्षण कौतुकास्पद आहे आणि स्वत:च्या चळवळीचे आत्मपरीक्षणदेखील विचार करणाऱ्याला विचार करायला लावणारे आहे. संघाचे जे निरीक्षण आहे, ते बाहेरून केलेले निरीक्षण आहे. थोडेबहुत संघसाहित्य वाचून केलेले निरीक्षण आहे. अशा निरीक्षणातून संघ समजण्याची सुतराम शक्यता नाही. तशी संघावर अनेक लोक पुस्तके लिहितात, त्यात संघाबाहेरील लोकही भरपूर असतात. यातील एकही पुस्तक संघाची परिपूर्ण ओळख करून देणारे नसते. संघाच्या आत्मतत्त्वाची काही लेखकांना तर कल्पनाच नसते. म्हणून संघ समजण्यासाठी हे सर्व साहित्य अत्यंत अपुरे असते.


संघ समजून घ्यायचा असेल, तर आणि तेही प्रामाणिकपणे, आपल्या विचारांची झापडे बाजूला ठेवून, तर डॉ. हेडगेवार यांचे जीवन समजून घ्यावे लागते. ते समजल्याशिवाय संघ समजणे अशक्य कोटीतील गोष्ट आहे. सोन्याचे दागिने अनेक प्रकारचे केले जातात. त्याचे आकार आणि रंगरूपही अनेक वेळा वेगवेगळे असतात. पण ज्याला सोने काय हे समजते, तोच दागिन्याचे मूल्य समजू शकतो.


आपल्या छांदोग्योपनिषदात उद्दालक मुनी आणि त्यांचा मुलगा श्वेतकेतू यांची कथा आहे. श्वेतकेतू विद्याभ्यासासाठी गुरुकुलात गेला. बारा वर्षांनंतर परत आला, तेव्हा वडिलांनी त्याला विचारले, ''जे जाणले असता अन्य जाणण्याचे काही कारण राहत नाही, त्याचे ज्ञान तुला झाले आहे का?''
 
श्वेतकेतू म्हणाला, ''मला हे ज्ञान गुरूंनी दिले नाही. कदाचित ते त्यांनाच माहीत नसावे. किंवा तुम्ही मला हे ज्ञान द्या.''
 
उद्दालक म्हणाले, ''वटवृक्षाचे फळ घेऊन ये.''
श्वेतकेतू फळ घेऊन आला. उद्दालकांनी त्याला ते फोडायला लावले. आतून एक बी काढायला लावली. ती बी फोडायला सांगितले आणि विचारले, ''आता तुला आत काय दिसते?''
 
श्वेतकेतू म्हणाला, ''मला काही दिसत नाही.''
उद्दालक म्हणाले, ''तुला जे दिसत नाही, त्यामध्ये हा प्रचंड वटवृक्ष सामावलेला आहे. जे डोळ्यांना दिसत नाही, त्यातून तुझी निर्मिती झाली. हे तूच आहेस. (तत् त्वम् असि)''


RSS_1  H x W: 0
आज वटवृक्षासारखा जो संघ लोकांना दिसतो, तो न दिसणाऱ्या डॉ. हेडगेवारांच्या जीवनाचा विस्तार आहे. डॉ. हेडगेवार म्हणजे संघबीज. त्या बीजाचा हा सर्व विस्तार आहे. चळवळ करणारे काही जण जातीसाठी चळवळ करतात. सत्ताप्राप्ती हे फार मोठे ध्येय असते. संघ ही चळवळ नाही. काही प्राप्त करण्यासाठी संघाचे काम चाललेले नाही. समजायला आणि समजून घ्यायला फार अवघड गोष्ट आहे ही. ते जेव्हा समजेल तेव्हा समजेल. संघाची रचना आणि कार्यविस्तार दिल्लीची सत्ता हस्तगत करण्यासाठी झालेला नाही. दिल्लीची सत्ता हा संघकामाचा आनुषंगिक आणि सहज परिणाम आहे.

 
वृक्ष जेव्हा मोठा होतो तेव्हा त्याला फुले येतात, फळे येतात, वृक्षावर पक्षी येतात, असंख्य जिवाणू अन्न ग्रहण करण्यासाठी वृक्षाजवळ येतात. वृक्षामुळे हवा थंड राहते, पर्जन्यमान वाढते, असे एका वृक्षाचे शेकडो परिणाम होत असतात. कोणत्याही एका परिणामासाठी त्याचा जन्म झालेला नसतो. हे सगळे परिणाम सहजपणे घडत जात असतात, तसेच संघकार्याचे आहे.

डॉ. हेडगेवारांचे जीवन म्हणजे संघाचे बीज आहे. या बीजामध्ये अपार सर्जनशक्ती आहे. या सर्जनशक्तीचा विस्तार म्हणजे आजचा संघ आहे. ही सर्जनशक्ती कशा प्रकारची आहे? पूजनीय डॉक्टरांच्या जीवनातील सर्जनशक्तीचा महत्त्वाचा भाग म्हणजे, तिच्यात सर्वभूतात्म ऐक्यभाव आहे. डॉ. हेडगेवारांनी सर्व समाज माझा आहे, समाजाची सुख-दु:खे माझी आहेत या प्रकारची सामाजिक एकात्मिक अनुभूती उत्कटपणे प्रकट केली आहे. सर्वच माझे असल्यामुळे डॉक्टरांनी कसली पतवारी केली नाही. जातीची उतरण केली नाही. अस्पृश्यता पूर्णपणे अमान्य केली. सर्वच माझे आत्मीय आहेत, मी त्यांच्यात आणि ते माझ्यात आहेत हा अद्वैतभाव हे संघबीजाचे सामर्थ्य आहे.

 
सर्वच माझे असल्यामुळे मी त्यांच्यासाठी काम करतो, यात विशेष काय? एका परिवारातील सर्व सदस्य परिवारासाठी काम करीत असतात. कुणीही कसलेही श्रेय मागत नाहीत. आई म्हणत नाही, मी सर्वांसाठी केवढा त्याग केला आहे, वडील म्हणत नाही, सर्वांसाठी मी केवढा झिजतो आहे. आपण जे काही करतो, ते आपले कर्तव्य आहे. अशी प्रत्येकाची भावना असते. हा कर्तव्यबोध हे संघबीजाचे दुसरे लक्षण आहे.
 
कर्तव्यबोधातून जे काम होते, ते नि:स्वार्थी असते. या कामातून मला काय मिळणार आहे? मला कोणते पद मिळणार आहे? माझा कोणता सन्मान होणार आहे? असा कोणताही विचार नसतो. संघकामाची रचना नि:स्वार्थी भावनेवर उभी आहे. स्वार्थाला संघात जागा नाही. स्वार्थ घेऊन जर कोणी काम करू लागला तर, तो संघात टिकत नाही. तो आपोआप बाहेर जातो.

RSS_1  H x W: 0
पू. डॉक्टरांच्या जीवनाचे जे संघबीज आहे, यात धर्म, संस्कृती, भूमी, लोकसमूह या सर्वांविषयी शुद्ध सात्त्विक प्रेमभाव आहे. हा धर्म, माझा आहे, ही संस्कृती, माझी आहे, ही भूमी, माझी आहे, सर्व जन, माझे आहेत. ते त्यांच्या गुणदोषांसहित माझे आहेत. आपला धार्मिक आचार बिघडला, धर्माचरण अशुद्ध झाले, तेही माझेच आहे. धर्म अशुद्ध झाला म्हणून त्याचा त्याग करता येत नाही. त्याला शुद्ध करावे लागते. रक्त अशुद्ध झाले म्हणून कोणी देहत्याग करीत नाही, रक्त शुद्ध करण्याच्या मागे लागतो. डॉक्टरांनी हेच काम केले. हळूहळू हे काम रुजत गेले, वाढत गेले आणि आज ते खूप मोठे झाले आहे.


ही संस्कृती माझी आहे. या संस्कृतीतदेखील विकृती निर्माण झाली आहे. विकृतीला संस्कृती मानणारा संप्रदाय निर्माण झाला. डॉक्टरांच्या बीजात संस्कृतीचा गंगाप्रवाह शुद्ध करण्याचे सामर्थ्य आहे. संस्कृती मूल्यांवर उभी असते. ही मूल्ये आहेत समन्वय, सौहार्द, परस्पर संलग्नता, दुसऱ्याच्या सुख-दु:खाची चिंता, निसर्गाचा सन्मान, भूमीला माता मानून तिचे पूजन, मनुष्यजीवनाला जे जे उपकारक त्याला देवत्व मानून त्याची आराधना. ही सर्व आपली सांस्कृतिक जीवन परंपरा आहे. परिवार तिचा भक्कम आधार आहे. नातेसंबंध ही तिची घट्ट वीण आहे. संस्कृती हा संघबीजाचा स्थायिभाव असल्यामुळे विकृतीचे दूरीकरण आणि सत्प्रवृत्तीचे संवर्धन हा संस्कृती उन्नतीचा मार्ग आहे.
या बीजामध्ये अंगीकृत कार्यासाठी पूर्ण समर्पण अपेक्षित असते. जेथे समर्पण आहे तिथे अहंकार राहू शकत नाही. प्रकाश आणि काळोख जसे एकत्र राहू शकत नाही, तसे समर्पण आणि अहंकार एकत्र राहू शकत नाहीत. समर्पणात आत्मविलोप असते. 'मी नाही, तूच' ही भावना असते. जेव्हा डोळ्यापुढे काही भव्य स्वप्न असतात आणि दिव्यत्वाची प्रचिती असते, तेथे समर्पण आपोआप उत्पन्न होते. यासाठी विशेष काही करावे लागत नाही. अंधार दूर करा, अंधार दूर करा असे म्हणून अंधार दूर होत नसतो. समर्पित होऊन काम केले पाहिजे, असे भाषण देऊन समर्पित कार्यकर्ते उभे रहात नाहीत. तसेच चालते-बोलते आदर्श उभे करावे लागतात. डॉ. हेडगेवारांनी स्वत:चाच आदर्श उत्कंठतेने निर्माण केलेला आहे. हे समजल्याशिवाय संघ समजणे महाकठीण गोष्ट आहे.

 
संघ ही पोथीनिष्ठ संघटना नाही, तशीच ती शब्दनिष्ठ संघटना नाही. आजवर संघाचे जे सरसंघचालक झाले, त्यांच्या विचारांची पोथी संघात कधी जात नाही. संघ ही नित्य नूतन आणि काळाप्रमाणे बदलणारी संघटना आहे. संघाचा एक कुठलाही वाद (इजम) नाही. संघाचा एकच विचार आहे आणि तोही एका वाक्याचा आहे - 'राष्ट्र सर्वोपरी' - जे काही करायचे ते राष्ट्रासाठी करायचे. व्यक्तीचे नाममाहात्म्य वाढविण्यासाठी नाही. संघ नावाच्या संघटनेचे महत्त्व वाढविण्यासाठी नाही. हे समजायला फार कठीण आहे आणि लोकांना आकलन करून घेणे त्याहूनही कठीण आहे. कारण संघासारखी संघटना भारतात काय जगाच्या पाठीवर कुठेही नाही.

 
संघ, संघ आहे. संघाची तुलना संघाशीच होऊ शकते. देशातील कोणत्याही संघटनेत होऊ शकत नाही. संघबीजाचा कसा विस्तार होत राहिला पाहिजे, अशी एक संघशाखांची कार्यपद्धती डॉ. हेडगेवारांनी विकसित केली. डॉक्टरांचे चरित्र वाचून त्यांच्या जीवनातील घटना प्रसंग आपल्याला समजतील. त्यांचा आत्मा समजण्यासाठी, त्याचा बीजभाव समजण्यासाठी संघशाखेत सातत्याने जावे लागते. आपल्या देशातील अनेक महापुरुषांनी आपले कार्य हेच आपले जीवन असे म्हटले. त्यांच्या अनुयायांनी त्यांच्या कार्याचा खेळखंडोबा करून टाकला. हा मनुष्यस्वभाव आहे. कोणाला दोष देण्यात काही अर्थ नाही. ज्ञानदेव समजायचे असतील तर ज्ञानेश्वरी समजावी लागते. रामदास समजायचे असतील तर दासबोध समजून घ्यावा लागतो. तसा संघ समजून घ्यायचा असेल, तर डॉ. हेडगेवारांना समजून घ्यावे लागते आणि डॉ. हेडगेवारांना समजून घ्यायचे असेल, तर शाखा समजून घेण्याशिवाय पर्याय नसतो. संघ अभेद्य आहे, संघात फूट नाही, संघात नेतृत्वाची चढाओढ नाही, ही निरीक्षणे ठीक आहेत, पण तो संघाचा आत्मभाव आहे. हे समजले की संघ समजणे होय.