फौजी राजकारणी जसवंतसिंह

विवेक मराठी    05-Oct-2020
Total Views |

१९९६ ते २००४ या काळात जसवंतसिंह यांनी अर्थमंत्री, संरक्षण मंत्री परराष्ट्र मंत्री, इत्यादी जबाबदार्या स्वीकारुन भारतीय राजकारणावरच नव्हे, तर जागतिक व्यासपीठावरही आपला प्रभाव पाडला होता. अर्थमंत्री म्हणून त्यांनी मुक्त अर्थव्यवस्थेला पोषक असे अनेक निर्णय घेतले. जसवंतसिंह हे मनाने वेषभूषेने कायम फौजी राहिले. राजकारणाच्या उत्तराधार्तात जसवंतिसंह यांच्या राजकारणाला उतरती कळा लागली. पण या अखेरच्या पर्वामुळे त्यांच्या जीवनाचे कर्तृत्व डावे ठरत नाही. जसवंतसिंह यांच्या निधनामुळे अटलबिहारी वाजपेयी सरकारमधील एक महत्त्वाचा मोठा नेता काळाच्या पडद्याआड गेला, हे खरे.


jaswantsing_1  

भारतीय राजकारणात काही जणांचा मृत्यू चटका लावून जाणारा राहिला आहे. भाजपा, जनसंघ या पक्षांच्या अंगाने विचार केला तर जवळजवळ वर्षे राजकीय जीवनापासून अलिप्त जीवन जगणारे, जीवन-मृत्यूच्या सीमारेषेवर वावरणारे अटलजी मागील वर्षी १६ ऑगस्टला गेले. पाय घसरून बाथरूममध्ये पडल्याचे निमित्त होऊन, जवळजवळ वर्षे कोमात राहिल्यावर या वीरपुरुषाचे निधन झाले. अशा प्रकारचा मृत्यू चटका लावून जाणाराच ठरतो. जनसंघाचे अध्यक्ष झाल्यावर दीनदयाळजींचा रेल्वे प्रवासात झालेला खून असो की प्रमोद महाजन यांच्या बंधूनेच घरी त्यांना यमसदनाला पाठविले असो की खासदार वा मंत्री झाले म्हणून गावी असणार्या सत्काराला जाताना भीषण अपघात होऊन सर्वांना सोडून गेलेले गोपीनाथजी असो.. हे सगळे मृत्यू चटका लावून जाणारे ठरले. जसवंतसिंहही तसेच गेले आहेत.

जसवंतसिंह तसे राजस्थानमधील. राजस्थानच्या राजघराण्यात त्यांचा जन्म झाला यथावकाश शिक्षण वगैरे पूर्ण झाल्यावर त्यांनी सैन्यदलात प्रवेश घेतला. भारतीय सैन्यदलात ते मेजर या पदावर होते. १९६५चे युद्ध त्यांनी गाजविले होते. त्यानंतर त्यांनी सैन्यदलातून निवृत्ती पत्करली. जनसंघाचे नेते भैरोसिंह शेखावत हे राजकारणातील त्यांचे गुरू. आजकालच्या भाषेत बोलायचे तर 'गॉडफादर'. पण त्यांनी जनसंघात प्रवेश केला नाही, तर भाजपाची स्थापना झाली त्या वेळी ते संस्थापक सदस्यांपैकी एक होते. भाजपात फार कमी नेते असे होते, ज्यांचे इंग्लिशवर विलक्षण प्रभुत्व होते. सामान्यत: हिंदी प्रादेशिक भाषांतून अत्यंत प्रभावी, परिणामकारक वक्तृत्वाचा वसा लाभलेल्यांची मोठी मांदियाळी जनसंघात भाजपात होती आहे. पण अतिशय उत्तम इंग्लिश बोलू शकणार्यांची संख्या मर्यादित होती. त्यात लालकृष्ण अडवाणी, जसवंतसिंह यांचा समावेश होता. त्यातही लालजी कॉन्व्हेंटमध्ये शिकलेले होते, तर जसवंतसिंह सामान्य शाळेतून शालेय शिक्षण घेते झाले होते. पण त्यांनी इंग्लिशवर विलक्षण प्रभुत्व मिळविले होते. याशिवाय त्यांचे दुसरे वैशिष्ट्य होते की, अर्थशास्त्रावरही त्यांची मजबूत पकड होती. दीनदयाळजी उपाध्याय यांच्याप्रमाणे त्यांनी अर्थशास्त्राला भारतीय तत्त्वज्ञानाची जोड दिली नव्हती. त्यामुळे आजकालच्या भाषेत सांगायचे, तर त्यांच्या अर्थशास्त्र अभ्यासाचा बाज पुरोगामी होता. जगात त्या काळात जी अर्थशास्त्र परिभाषा प्रचलित होती, त्यात ते तज्ज्ञ गणले जात. त्यामुळेच अटलजींनी आपल्या मंत्रीमंडळात त्यांना अर्थमंत्री केले होते. १९९६ ते २००४ या काळात अर्थमंत्री, संरक्षण मंत्री परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांनी भारतीय राजकारणावरच नव्हे, तर जागतिक व्यासपीठावरही आपला प्रभाव पाडला होता.

भारतीय राजकारणाचा विचार केला, तर भारतीय अर्थशास्त्राचे प्रभावी भाष्यकार असणारे भारतीय मजदूर संघाचे दत्तोपंत ठेंगडी जसवंतसिंह यांचे या विषयावरील सूर परस्परांना जुळणारे नव्हते, तरीही अटलजींनी त्यांना अर्थमंत्री केले होते. त्या वेळी आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताला दबदबा वाढवायचा होता, म्हणूनही जसवंतसिंह यांच्या भूमिकेचा फायदा होणार होता. अर्थमंत्री म्हणून त्यांनी मुक्त अर्थव्यवस्थेला पोषक असे अनेक निर्णय घेतले. त्यांनीच जागतिक बँकेवर भारताचे प्रतिनिधी असणारे विजय केळकर यांना अर्थखात्याचे सल्लागार म्हणून भारतात आणले. एक उदारमतवादी अर्थमंत्री म्हणून ते जसवंतसिंहांचा गौरव करतात.

२००२ साली जसवंतसिंह अर्थमंत्री झाले. त्यांच्या काळात युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाची फेररचना करण्यात आली. योजना आयोगाचेही ते उपाध्यक्ष होते. त्याच वेळी अर्थसचिव असणारे विजय केळकर यांच्याशी त्यांची मतभिन्नता होती, तरी त्यांनीच नंतर केळकर यांना भारतात परत आणून त्यांच्यावर जबाबदारी दिली.

जसवंतसिंह मनाने वेषभूषेने कायम फौजी होते. म्हणूनच ते खांद्यावर दोन फ्लॅपअसणारे शर्टच वापरत आणि त्यांच्या शर्टाच्या बाह्या कायम अर्ध्या केलेल्या असत.

१९९८ साली अटलजींनी एक फार मोठा निर्णय घेतला होता. पोखरण येथे मे महिन्यात अणुचाचण्या केल्या होत्या. या अणुचाचण्यांनी जगात खळबळ उडाली होती. या अणुचाचण्या होताच जगात अनेक देशांनी भारतावर आर्थिक निर्बंध लादले होते. त्यात अमेरिका जपान या देशांचा समावेश होता. भारताबद्दल निर्माण झालेले गैरसमज दूर करून या देशांशी पूर्ववत संबंध प्रस्थापित करणे आवश्यक होते. हे गैरसमज दूर करण्याचे आव्हान जसवंतसिंहांनी सहजगत्या पेलले होते. या दोन वर्षांच्या काळात अमेरिकेच्या उप परराष्ट्र मंत्री स्ट्रॉब टॉलबॅट यांच्याशी त्यांनी चांगलीच मैत्री प्रस्थापित केली होती. टॉलबॅट यांच्याशी त्यांनी या दोन वर्षांत एकूण चौदा वेळा चर्चा केली होती. त्यामुळेच अमेरिकेचे भारताबाबत धोरण सौम्य होऊ शकले आणि नंतर अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी २००२मध्ये भारताला भेट दिली होती.

एक फौजी आदमी म्हणून पाकबद्दलची त्यांची काही ठाम मते होती. ते पाकशी १९६५चे युद्ध लढले होते. त्यामुळे त्यांच्या मनात पाकबद्दल मोठ्या प्रमाणात नाराजी होती. तत्कालीन भारत सरकारच्या धोरणाशी सहमती नसल्यानेच त्यांनी सैन्यदल सोडले होते. पण पाकमधील अनेक सेनाधिकार्यांशी त्यांचे वैयक्तिक मैत्रीचे संबंध होते. त्यातून भारत-पाक संबंध सुरळीत करण्याला त्यांनी प्राधान्य दिले होते. त्याच प्रयत्नाचा भाग म्हणून १९९९मध्ये दिल्ली-लाहोर बस सुरू झाली होती. अटलजींच्या मूळ कल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी जसवंतसिंह प्रमोद महाजन यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. पहिल्या बस प्रवासात स्वत: अटलजी लाहोरला गेले होते. त्यांच्यासमवेत जसवंतसिंह प्रमोद महाजनही होतेच. या यात्रेनंतरही जनरल मुशर्रफ यांनी भारतावर कारगिल युद्ध लादले. त्याला जसवंतसिंह यांनी सडेतोड उत्तर दिले. पाकिस्तानात सत्तांतर झाले जनरल मुशर्रफ सत्ताधीश झाले. त्या वेळी आग्रा येथे अटलजी मुशर्रफ यांची भेट चर्चा झाली. जनरल मुशर्रफ यांनी ती चर्चा ठरवून हाणून पाडली. ती चर्चा यशस्वी व्हावी, यासाठी जसवंतसिंह यांनी पराकोटीचे प्रयास केले होते. पण पाकने ती चर्चा उधळून लावण्याचा पवित्रा घेतल्यावर सुषमा स्वराज यांनी मुशर्रफ यांना सडेतोड उत्तर दिले होते. शेवटी आग्रा चर्चा अपयशी ठरली.

सत्तास्थानावर असताना काही अप्रिय निर्णयही घ्यावे लागतात त्यासाठी टीकेचे धनीही व्हावे लागते. जसवंतसिंहांनी स्वत:च्या शिरावर अशीच एक जबाबदारी घेतली होती. भारतीय विमानसेवेचे इंडियन एअर लाइन्सचे एक विमान नेपाळमधून अमृतसरमार्गे कंदहारला पळवून नेण्यात आले होते. त्या विमानात दीडशेपेक्षा अधिक प्रवासी होते. त्यांना वाचविण्यासाठी अंतर्गत दबावातून मंत्रीमंडळाने तीन कुख्यात अतिरेक्यांना सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्या अतिरेक्यांसह एखाद्या जबाबदार व्यक्तीने यावे, अशीही अतिरेक्यांची मागणी होती. ती जबाबदार व्यक्ती जसवंतसिंह ठरली. एका सेनाधिकार्याने या तीन अतिरेक्यांना मुक्त केले भारतीय प्रवाशांना सुखरूप भारतात आणले. त्यात कंदहारला जाऊन काही खास सैनिकी कारवाई करण्याची योजना होती किंवा कसे, हे शेवटपर्यंत अज्ञात राहिले. मात्र एक सेनाधिकारी जबाबदार मंत्री उगाच अतिरेक्यांसोबत गेला नसणार. पण या प्रकरणात जसवंतसिंहांवर खूप टीका झाली. त्यांनी मात्र त्या टीकेला उत्तर दिले नाही. ते फक्त एवढेच म्हणत राहिले की, 'या दीडशे प्रवाशांना वाचविणे याला आम्ही अग्रक्रम दिला होता.' या सर्व टीकेचे घाव त्यांनी अतिशय धैर्याने स्वीकारले होते.

२००४ साली अटलजींचे सरकार पुन्हा सत्तेवर येऊ शकले नाही. संपुआ सरकार आले. पुढे २००९ सालीही यूपीए- सत्तेवर आले. अटलजींनी प्रकृतीमुळे सक्रिय राजकारणातून विश्रांती घेतली होती. त्यामुळे अटलजींच्या राजकारणाचे मुख्य आधारस्तंभ असणारे भाजपातील जसवंतसिंह एनडीचे अध्यक्ष जॉर्ज फर्नांडिस यांचीही उलटी वाटचाल सुरू झाली. या तिघांचाही मृत्यू हळहळ वाटावा असा झाला. जॉर्जही विस्मृतीचे शिकार झाले होते, तर पुढे जसवंतसिंहही कोमात गेले.

भाजपाच्या राजकारणात पाकचे निर्माते बॅ. महमद अली जीना यांच्यामुळे दोन मोठ्या नेत्यांची राजकारणातील कारकिर्द उतरणीला लागली होती. त्यातील एक जसवंतसिंह होते. २००९ साली त्यांनी बॅ. जीना यांची भलावण करणारे एक पुस्तक लिहिले होते. भारतातील - विशेषत: भाजपातील कुणालाच हे आवडले नाही. त्यांना भाजपातून काढून टाकण्यात आले. मात्र त्यांच्याबाबत एकूणच सहानुभूतीचे धोरण स्वीकारले गेले. २०१० साली ते भाजपात परत आले. मात्र त्यांना जुना सन्मान मिळविता आला नाही.

 
jaswantsing_1  


२०१२ साली रालोआने त्यांना उपराष्ट्रपतिपदाची उमेदवारी दिली. मात्र त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यांचे राजकीय गुरू भैरोसिंह शेखावत यांना उपराष्ट्रपती होता आले, पण नियतीने जसवंतसिंह यांना ती संधी नाकारली. त्यांच्याऐवजी संपुआचे हमीद अन्सारी उपराष्ट्रपती झाले. यानंतर जसवंतसिंहांनी कॉल टू ऑनरहे आपले आत्मचरित्र लिहिले. भारतीय राजकारणात झपाट्याने बदल होत होते.

राजकारणातील जुनी पिढी निवृत्तीला लागली नव्या पिढीने सूत्रे हाती घेतली होती. २०१४च्या निवडणुकीत वयाची पंचाहत्तरी गाठली त्यांना उमेदवारी नाही असा निर्णय घेण्यात आला. त्याला फक्त दोन अपवाद झाले होते. भाजपाने जसवंतसिहांना उमेदवारी दिली नाही. मात्र तरी बाडनेरमधून त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. पण त्यांचा पराभव झाला. भाजपाने पुन्हा एकदा त्यांना पक्षातून काढण्याचा निर्णय घेतला. ते पाच वेळा राज्यसभेचे, तर चार वेळा लोकसभेचे सदस्य झाले. त्यांना राज्यसभेत विरोधी पक्षनेताही करण्यात आले होते. संरक्षण, अर्थ परराष्ट्र अशा तीन महत्त्वाच्या मंत्रिपदांची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली होती. भाजपाने त्यांच्यावर अन्याय केला होता असे म्हणता येणार नाही. पण जसवंतसिंहांचा राजकारणाचा हा अखेरचा टप्पा त्यांचे राजकारण अधोगतीला नेणारा राहिला. जसवंतसिंहांमध्ये थोडा संयम प्रगल्भता हे दोन गुण असते, तर त्यांचे जीवन आणखी वेगळे राहिले असते.

पण राजकारणाचे काहीच सांगता येत नाही. केव्हा थांबावे हे उमजले नाही, तर अधोगती-पतनाचा मार्ग हीच नियती ठरते. जनसंघाचे मोठे नेते बलराज मधोक यांच्याहीसाठी नियतीने हेच ताट वाढून ठेवले होते. तसेच जसवंतसिंहांचेही झाले. पण या अखेरच्या पर्वामुळे त्यांच्या जीवनाचे कर्तृत्व डावे ठरत नाही. जसवंतसिंह यांच्या निधनामुळे अटलबिहारी वाजपेयी सरकारमधील एक महत्त्वाचा मोठा नेता काळाच्या पडद्याआड गेला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.