समाजसंघटक संत तुलसीदास

विवेक मराठी    18-Dec-2020
Total Views |

या अंकापासूनसंतसाहित्याचे राष्ट्रघडणीतील योगदानया विचारसूत्रात गुंफलेलेराष्ट्रसंघटक संतहे पाक्षिक सदर सुरू करत आहोत.

केवळ महाराष्ट्रच नाही, तर अवघा भारत देश ही संतांची भूमी आहे. या देशाचे ते अनन्यसाधारण वैशिष्ट्य आहे. संतांनी दिलेले विचारधन हे या भूमीचे संचित आहे. ते केवळ आध्यात्मिक योगदान नाही. एक राष्ट्र म्हणून, एक समाज म्हणून सर्वसामान्यांना संघटित करण्याची ताकद या मौलिक विचारधनात आहे. त्यातून हा देश, इथली माणसे घडायला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या खूप मदत झाली आहे. हे विचारधन नेमके काय आहे, त्याने समाजाला काय दिले, याची झलक या लेखमालेतून आपल्याला घडेल.

 
Tulsidas - Biography_1&nb

लवकरच भारतीय स्वातंत्र्याची पंचाहत्तरी साजरी होईल. मात्र आपली गुलामीची काळरात्र नक्की केव्हा सुरू झाली होती? या काळरात्रीत स्वातंत्र्याची ऊर्मी कोणी तेवत ठेवली होती? याची उत्तरे आपणास माहीत असतील, तर या स्वातंत्र्याचे सुराज्यात रूपांतर करणे आणिविश्वगुरू भारतहे स्वप्न साकार करणे आपणास शक्य होईल.

प्रस्तुत लेखात आपण समाजचिंतक आणि समाजसंघटक म्हणून संत तुलसीदासांचे कार्य जाणून घेणार आहोत. तुलसीदासांचा समकालीन मुगल शासक अकबर याचे साम्राज्य तेव्हा भारतात स्थिर झाले होते. परवशतेच्या साखळदंडात समाज जखडला असताना त्याचे मनोधैर्य कायम राखणे आणि स्वातंत्र्याची ऊर्मी जागविणे हे महान कार्य तुलसीदासांनी केले आहे.

 

तुलसीदासांच्या या कार्यावर भाष्य करताना थोर इतिहास संशोधक सेतुमाधवराव पगडी आपल्याइतिहास आणि कल्पितया ग्रंथात असे सांगतात - ‘तुळशीदासाचे रामायण घ्या. भक्तिरसप्रधान आणि रम्य अशा ललित भाषेत लिहिलेला हा रामचरित्रपर ग्रंथ लोकप्रिय व्हावा हे सहज समजण्यासारखे आहे. पण ज्या काळात, ज्या परिस्थितीत आणि ज्या प्रदेशात हा अपूर्व काव्यसंग्रह निर्माण झाला, ते पाहता या ग्रंथाने समाजाला टिकवून ठेवण्याचे महत्कार्य केले, हा निर्वाळा इतिहासकाराला द्यावा लागतो.’

 

संत तुलसीदासांनी आपल्या साहित्यसेवेच्या माध्यमातून समाजाला टिकविण्याचे महान कार्य केले आहे. तुलसीदासांची महानता लोकमनावर ठसविताना व्हिन्सेंट . स्मिथ हा पाश्चात्त्य अभ्यासक आपल्याअकबरया पुस्तकात असे म्हणतो - ‘त्यांचे (तुलसीदासांचे) नाव आपल्यालाआइन--अकबरीमध्ये सापडत नाही, मुस्लीम वृत्तान्तांच्या पानांमध्ये आणि फारसी इतिहासकारांना आधार मानलेल्या युरोपीय लेखकांच्या ग्रंथांतही आढळत नाही. तथापि ते हिंदू भारतातील त्यांच्या काळातील सर्वांत महान पुरुष होते. ते अकबरापेक्षाही महान होते, कारण या कवीने कोट्यवधी मनुष्यांच्या हृदयावर विजय मिळविला आहे आणि सम्राटाने युद्धात मिळविलेल्या कोणत्याही विजयापेक्षा अथवा त्याच्या सर्व विजयांपेक्षा हा विजय अधिक चिरस्थायी आणि महत्त्वपूर्ण आहे.’

 

अकबराचा महिमा मंडित करणार्या ग्रंथांमध्ये, मुस्लीम आणि फारसी इतिहासकारांच्या वृत्तान्तामध्ये तुलसीदासांचा उल्लेख सापडत नाही हे स्वाभाविक मानले पाहिजे. पण या अभावामुळे त्यांचा महिमा आणि त्यांचे महान कार्य झाकोळून जाऊ शकत नाही.

 

भारतीय संस्कृतीचे वर्णन करताना असे सांगितले जाते की अन्य खंडांतील संस्कृती लयाला गेल्या, पण आशिया खंडातील ही भारतीय संस्कृती अविनाशी आहे. या संस्कृतीवर विविध पाशवी आक्रमणे होऊनही ती शाबूत राहिलेली आहे. आपल्या या संस्कृतीला हे अमरत्वाचे वरदान स्वर्गस्थ देवतांकडून लाभलेले नाही, तर या संस्कृतीच्या रक्षणार्थ काया झिजविणार्या मनुष्यरूपी देवतांकडून लाभलेले आहे. त्यामुळेच संतांनाभूतलावरील भगवंतअसे बिरुद लाभलेले आहे. आपल्या देशात त्या काळी पुरुषार्थ गाजविणारे परमवीर नव्हते असे नाही, पण त्यांच्यापैकी बर्याच जणांनी आपल्या निष्ठा आक्रमकांच्या पायावर वाहून टाकलेल्या होत्या आणि त्यांच्या स्वामिनिष्ठेसमोर स्व-देश, स्व-धर्म आणि स्व-कीय यांच्या निष्ठांना काहीच महत्त्व उरलेले नव्हते.

 

अकबरकालीन राणा प्रतापाशी झुंज घेणारा अकबराचा सेनापती राजा मानसिंह हा सच्चा (!) राजपूतच होता आणि शिवछत्रपतींना दिल्लीश्वर औरंगजेबाच्या सरदारांच्या रांगेत नेऊन उभा करणारा मिर्झाराजे हासुद्धा पराकोटीचा शिवभक्त होता! हा नियतीचा क्रूर विनोद म्हणावा लागेल. अशा वेळी आपल्या संस्कृतीशी जनसामान्यांची नाळ घट्ट राहावी, यासाठी त्यांच्यासमोर महान आदर्श उभा करण्याची गरज होती, जी जाणली संत तुलसीदासांनी!


Tulsidas - Biography_2&nb 

त्यांच्या या महत्कार्यावर भाष्य करताना सेतुमाधवराव पगडी असे सांगतात - ‘मतामतांचा गलबला, सगुण-निर्गुणाचा वाद, आक्रमक संस्कृतीचे आव्हान, तिला मिळालेले पाठबळ हे लक्षात घेता समाजाला स्थिर राखण्यासाठी आदर्श स्त्री-पुरुषांची आणि नैतिक मूल्यांची दिव्य आणि भव्य चित्रे समाजासमोर उभी करणे ही त्या काळाची गरज होती. कोट्यवधी जनतेच्या समोर परमेश्वराची भक्ती करावी, नैतिक मूल्ये जपावीत, रामलक्ष्मणासारखे आदर्श जीवन जगावे, सीतेसारखे पातिव्रत्य राखावे आणि मारुतीसारखी बलोपासना स्वीकारावी, फाजील धार्मिक वादविवादांची गरज नाही, असे सांगणारा हा ग्रंथ मध्ययुगीन भारतात असंख्य लोकांचा धर्म वाचवून आणि टिकवून गेला.’

 

ही गोष्ट सत्य आहे की, तुलसीदासांच्या रामकथेला प्रचारकी थाट अथवा प्रचारकी बाज नाही. पण धर्मप्रचार धर्मप्रसार हा त्याचा नक्कीच परिणाम झाला आहे, हे नाकारण्यात अर्थ नाही. या भूमिकेबाबत सेतुमाधवराव पगडी ठामपणे सांगतात कीतुळशीदासाने घडवून आणलेले हे समाजदर्शन म्हणजे प्रचारकार्य म्हणावे काय? काव्य सुरुवातीपासून वाचा. त्यात प्रचाराचा अंश नाही. पण काव्याचा परिणाम मात्र इतिहासाच्या नजरेतून सुटू शकत नाही. उत्कृष्ट साहित्यात समाजजीवन आल्याशिवाय राहत नाही.’

 

संत तुलसीदासांनी क्रांतिकारक भूमिका घेऊन अकबराच्या राज्य शासनालाराक्षसीसंबोधले असते, तर त्यांना राणा प्रताप यांच्यासारखाच लढा द्यावा लागला असता; पण त्यांनी मोठ्या चातुर्याने सद्य:स्थितीचे वर्णन रावणाच्या जुलमी सत्तेच्या चित्रणात नेऊन ठेवले आणि समाजातील सत्त्व जागृत करताना प्रतिज्ञोत्तर दिले की,

 

भुजबल बिस्व बस्य करि राखेसि कोउ सुतंत्र

मंडलिक मनि रावन राज करइ निज मंत्र

 

आपल्या बाहुबळाने सर्व जगाला रावणाने गुलाम करून टाकले होते. या राक्षसी मनोवृत्तीला कोणतेच चांगले तंत्र नव्हते. लोक स्व-तंत्र नव्हते की ते सु-तंत्र नव्हते - म्हणजे लोककल्याणकारी शासन नव्हते. त्यामुळे तुलसीदासांनी प्रजेला बजावून सांगितले,

 

जब जब होइ धरम कै हानी।

बाढहिं असुर अधम अभिमानी॥

तब तब धरि प्रभु विविध सरीरा।

हरहिं कृपानिधि सज्जन पीरा॥

 

यवनांच्या अत्याचाराखाली पिचून निघालेल्या समाजमनाला हे कथन खचितच उभारी देणारे होते. यवनांची तुलना राक्षसी अत्याचार्यांशी करत असताना प्रभूने पृथ्वी निशाचरविहीन करण्याची शपथ घेतलेली आहे, असे संत तुलसीदास सांगत होते. ते नुसते असा उपदेश करून थांबले नाहीत, तर त्यांनी गावागावांतील तरुणांना एकत्रित करून तेथे आखाडे चालविले. रामकथा आणि रामलीला यांच्या धार्मिक कवचाखाली स्वराज्यरक्षणाचे हे प्रयत्न चालू होते. शासक जरी विधर्मी असला, तरी त्याची स्वामिनिष्ठ राज्ययंत्रणा राजा मानसिंह आणि राजा तोडरमल यांच्यासारख्या हिंदू धर्मीय मनसबदारांनीच चालविली होती. त्यामुळे धार्मिक आयोजनाच्या विरोधात सर्वकाळ ताठर भूमिका घेणे शासकाला शक्य होत नव्हते. मात्र आजही आपणास या कवचाच्या राखेखालील ज्वलंत स्वराज्यप्रेमाचा निखारा दिसत नसेल, तर तो आपलाच दृष्टिदोष समजला पाहिजे.

 

जेव्हा सर्व जाति-पंथांचे लोक रामलीला पाहताना जयघोष करीत - ‘राजा रामचंद्र की जय’, तेव्हा दिल्लीपती अकबरालाही तो जयजयकार बंद करणे शक्य होत नव्हते आणि हिंदूंचा खरा राजा प्रभू रामचंद्र हाच आहे हा विश्वास आपोआपच सर्व भारतभर जागविला जात असे. प्रभू रामचंद्राच्या राज्यारोहणाने रामलीलेचा सोहळा संपन्न होत असे आणि त्या व्यासपीठावरून का होईना, पण हिंदुराष्ट्राची जागृती घडविली जात असे.

 

रामायणाचे रसायन तुलसीदासांनी सामाजिक विषमतेची विषवल्ली नष्ट करण्यासाठी मोठ्या चतुराईने वापलेले दिसते. भिल्लीण शबरी, केवट निषाद, काकभुशुंडी, हनुमान, सुग्रीव आणि जटायू ही सर्व मंडळी वंचित वर्गातील होती; पण तुलसीदासांनी त्यांना रामभक्त ठरवून समाजाला या सर्वांच्या चरणी लीन केले.

 

तुलसीदासांचे रामचंद्र शबरीला बजावून सांगतात -

जाति पाँति कुल धर्म बडाई।

धन बल परिजन गुन चतुराई॥

भगति हीन नर सोहइ कैसा।

बिनु जल वारिद देखिअ जैसा॥

असे सांगून तुलसीदासांनीम्हणौनि कुळ जाति वर्ण। हे आघवेचि गा अकारण।ही संत ज्ञानेश्वरांनी दिलेल्या आश्वासनाची ध्वजाच खांद्यावर मिरविली आहे.

 

जेव्हा निषाद केवट राजपरिवारातील लोकांपासून दूरच उभा आहे असे राजगुरू वसिष्ठ पाहतात, तेव्हा त्याच्या मनातील विचार जाणून ते स्वतः पुढे सरसावून निषादराजाला आलिंगन देतात.

 

एहि सम निपट नीच कोउ नाही।

बड वसिष्ठ सम को जग माहीं॥

 

ही समरस भावाची मांडणी करणे केवळ तुलसीदासच जाणतात.

 

अशा संत तुलसीदासांना आपले अंकित बनविण्यासाठी अकबराने मनसबदारी देण्यासाठी आपल्या दरबारात पाचारण केले असताना ते स्पष्टपणे सांगतात -

 

हम चाकर रघुवीर के, पटो लिखो दरबार।

तुलसी अब का होहिंगे, नर के मंसबदार॥

 

तुझा पुरस्कारही नको आणि पुरस्कार-वापसी नको, अशा धर्तीचे साहित्यसेवक होते संत तुलसीदास. आदर्श समाजाची मांडणी करताना त्यांना हे पथ्य पाळणे आवश्यकच झाले होते. त्यांनी आपली निष्ठा रामचरणी वाहिली होती. त्यामुळेच जनमानसात त्यांना अढळ स्थान लाभले. कोट्यवधी जनतेने रामचरितमानस आणि हनुमान चालिसा कंठस्थ करून आपल्या जीवनात सदाचरण आणण्याचा प्रयत्न केला. भारताच्या सीमा ओलांडून मॉरिशस, सुरिनाम, त्रिनिदाद अशा देशांमध्येही ही रामकथा पोहोचविली गेली आणि धर्म संस्कृती टिकविण्याचे एक श्रेष्ठ साधन भारतीयांच्या हाती लागले. आपल्या साहित्याने ही समाजसेवा करणारे संत तुलसीदास हे संपूर्ण विश्वाच्या पटलावर केवळ आगळेवेगळेच नव्हे, तर सर्वात सफल ठरलेले एक महान समाजसंघटक संत आहेत.